निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)

7
315
-devrukh-nature

देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे.

देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते. वृक्षांची निगा पार बांधून केली जाते. त्या वृक्षांची पूजा बांधण्याचे विधी व सण आहेत. देवरूखात तसे तब्बल एकवीस पार आहेत! एकेकाळी ते शंभराहून अधिक होते. देवरूखात घराचा वा कार्यालयाचा पत्ता पारांवरून सांगण्याची पद्धत आहे. सर्वाधिक पार खालची आळी परिसरात आहेत. एकविसातील दहा पार त्या भागात आहेत. सत्यनारायण प्रासादिक मंडळ पार, हनुमान प्रासादिक मंडळ पार, त्रिविक्रम मंदिराशेजारचा पार, भागवत घरासमोरचा पार, दत्तनगरचा पार, पोलिस स्टेशनचा पार, कांजिवरा पार, शिवाजी चौकातील पार, दत्ता साठ्ये घराशेजारचा पार असे अनेक पार पाहण्यास मिळतात. त्याशिवाय मधील आळीत पाच, वरच्या आळीत दोन, सोळजाई परिसरात तीन, कॉलेज परिसरात एक असे पार आहेत. त्या सर्व पारांवर पूजा दैनंदिन केली जाते. त्यांतील काही पारांवर वार्षिक महापूजादेखील केली जाते- काही पारांवर स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही त्यावेळी सादर केले जातात. सत्यनारायण प्रासादिक मंडळाच्या पाराने चौऱ्याऐंशी वर्षांची परंपरा पूर्ण केली आहे. खानदेशात पारोळा हे तसेच ‘पारांचे गाव’ आहे.

देवरूख निसर्गरम्य आहे. ते गाव त्याची पूर्वापार निसर्गसंपत्ती टिकवून आहे. देवरूख हे वृक्षांनी वेढून टाकलेले, चहुबाजूंनी डोंगररांगा असलेले गाव आहे. वर्षाचे बाराही महिने सुंदर हवामान तेथे असते. हिवाळ्यात थंडी, पावसाळ्यात भरपूर पाऊस व म्हणून गारवा आणि उन्हाळ्यात मात्र उष्णतेचा दाह कमी असे नियमित थंड वातावरण देवरूखला लाभले आहे.

-devrukh-paarदेवरूख कालानुरूप सुधारले असले तरीही तो परिसर गाव आणि शहर यांतील चांगल्या संस्कृतीचे मिश्रण आहे. देवरुख हे संगमेश्वरपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरीपासून एकोणपन्नास किलोमीटर अंतरावर आहे. देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय आहे. संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय हे संगमेश्वर गावातच होते. पण तेथे भीषण आग 1878 साली लागली आणि सर्व सरकारी इमारती जळाल्या. तेव्हा संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय देवरुख या गावात हलवले आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण देवरुख हे झाले ते कायमचे. संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय हेसुध्दा देवरुखला आहे. तालुका पोलिस स्टेशन देवरुखमध्ये आहे. कोर्ट, तहसीलदार कार्यालय, तालुका धान्य पुरवठा कार्यालय (रेशन) व सगळी कार्यालये, जी तालुक्याच्या गावी असतात ती संगमेश्वर येथे नसून देवरुखमध्ये आहेत.

देवरूख गाव खालची आळी, मधली आळी आणि वरची आळी अशा तीन आळ्यांमध्ये विभागले गेले आहे. देवरूखची ग्रामदेवता सोळजाई देवी असून ती देवरूखसह परिसरातील चव्वेचाळीस गावांची मालकीण म्हणून ओळखली जाते. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी देवरुखला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. तसेच, शिवाजी महाराजांनी बऱ्याचदा सोळजाई मातेच्या मंदिराला भेट दिली आहे. त्या ग्रामदेवतेचे मंदिर देवरूखच्या नदीपलीकडील भागात आहे. ते मंदिर एकशेपंचवीस वर्षापूर्वीचे आहे. बांधकाम दगडी आहे. मंदिरात नवरात्रोत्सव, शिमगा; तसेच, देवदिवाळी यांसह बारा तिथींना बारा उत्सव साजरे केले जातात. देवदिवाळीचा उत्सव मोठा असतो. त्या दिवशी सोळजाईला केलेले नवस फेडण्याचा विधी प्रेक्षणीय असतो. ती परंपरा एकशेपंचवीस वर्षांपासून आहे. नवस फेडण्यासाठी भक्त देवीसमोर लोटांगण घालतात. देवरूखची ‘मरीमाय यात्रा’ ही प्रसिद्ध आहे. गावात रोगराई पसरू नये, गावावर कोठले अरिष्ट येऊ नये म्हणून सोळजाई देवीच्या जवळच असलेल्या ’व्याडेश्वर मरीमाय’ मैदानावर दरवर्षी हनुमान जयंतीला ’मरीमाय यात्रा’ भरवली जाते. मरीमाय यात्रेतील नवस बोलणे, फेडणे असे कार्यक्रम पाहण्यासारखे असतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे दिला जाणारा प्रसाद! यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मटण-भाकरी हा प्रसाद आवर्जून दिला जातो.

-soljai-mandirदेवरूखातील शिंपणेउत्सव प्रसिद्ध आहे. शिंपणेउत्सव खालची आळी, शिवाजी चौक, मारूती मंदिर, भोईवाडा, रोहिदास आळी आणि सोळजाई मंदिरात होम पेटवून साजरा केला जातो. वरील आळीतील सिद्धिविनायकाचे मंदिर प्रसिद्ध आहे. साक्षात्कारातून मिळालेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची चांदीची मूर्ती त्या मंदिरात प्रतिष्ठापित केली आहे. त्या मंदिरात दरवर्षी प्रतिपदा ते अष्टमी असा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या गणेशाची ओळख देवस्थानचे मालक कै. पंतजोशी यांचा गणपती अशी आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ वेदपाठ शाळेच्या संस्थेने बांधलेले द्विभुज गणेश मंदिर आहे. त्या मंदिरातील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक वातावरणात आणि मंत्रोच्चारांच्या घोषात, शुचिता पाळून घडवण्यात आली आहे. तशा मूर्ती संपूर्ण देशात दोनच आहेत. मंदिराच्या तळघरात गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनासुद्धा करण्यात आली आहे. गावातील वेद पाठशाळेत वेदाध्ययनाचे काम वीस वर्षांपासून सुरू आहे. तेथे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते.

कोकणात ओहोळाला पर्या म्हणतात. देवरूख गावात सह्याद्रीनगराला लागून एक पऱ्या वाहतो. तो चोरपर्या म्हणून माहीत आहे. चाळीस वर्षांपूर्वी, देवरूख परिसरात चोरी झाली होती. ग्रामस्थांनी ती चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला. ग्रामस्थांनी केलेला कडेकोट बंदोबस्त पाहून पलायन करणाऱ्या चोरांना काहीच न सुचून त्यांनी पऱ्यावरच्या पुलाचा आश्रय घेतला. त्या ठिकाणी चोरांनी पकडले जाण्याच्या भीतीने तब्बल तीन दिवस वस्ती केली होती! त्यामुळे त्या पऱ्याला ’चोरपऱ्या’ असे नाव पडले.

-tikleshwarदेवरुख शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना काकासाहेब पंडित, दादासाहेब मावळणकर (लोकसभेचे पहिले सभापती), विनायकराव केतकर, दादासाहेब पित्रे, रावसाहेब कुलकर्णी, दादासाहेब सरदेशपांडे आणि देवरुख गावातील इतर ग्रामस्थ यांनी मिळून 1927 साली केली. तात्यासाहेब आठल्ये व विश्वनाथराव सप्रे यांनी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी कला व वाणिज्य शाखा देवरूख परिसरात सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली. अरूण आठल्ये यांनी स्वतःची हमी देऊन खूप मोठे कर्ज घेतले व संस्थेचा विस्तार केला. त्यांनी ती संस्था कर्जमुक्त केली. त्यांनी त्यांच्याजवळ असणारा ‘बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्स’च्या जुन्या शिक्षकांच्या चित्रांचा संग्रह संस्थेला दान केला. त्या संस्थेने 1927 साली ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. तेथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. संस्थेकडे गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान महाविद्यालय, श्रीमती अरूंधती अरूण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. तेथे बालवाडीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण दिले जाते. देवरूखपासून पाच किलोमीटर अंतरावर राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. राजू काकडे हेल्प अॅकॅडमी(आपत्ती व्यवस्थापन), फाईन आर्टचे पदवी अभ्यासक्रम सुरू करणारी डी कॅड, अभिजात संगीताचे कार्यक्रम करणारी अभिरुची, ललित कला केंद्र अशा संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्या संस्था देवरूखचे सांस्कृतिक महात्म्य जप्त असतात.

हा ही लेख वाचा – माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले

देवरुख गावाला सामाजिक कार्याची व ‘समतेची परंपरा आहे. ‘समतानंद’ अनंत हरि गद्रे हे मूळ देवरूखचे. त्यांनी झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्या स्पृश्यह सत्यनारायण ही दोन तंत्रे वापरून अस्पृश्यांना समानतेचा अधिकार दिला. देवरुख गावात पार्वतीबाई आठवले यांच्यासारख्या समाजसेविका होऊन गेल्या. तसेच, शंकर धोंडशेठ सार्दळ आणि त्यांची मुलगी विमल शंकर सार्दळ हे स्वातंत्र्यसैनिक होते. शंकरराव सार्दळ यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शंकररावांनी लिला विशंभर हे कानडी साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले. ‘मातृमंदिर’च्या संस्थापक इंदिराबाई ऊर्फ मावशी हळबे यांचे कार्य फार थोर. त्यांच्या पश्चात, ’मौज’कार श्री. पु. भागवत, चित्रकार राजाराम पानवलकर, साहित्यिक राजा राजवाडे, रा. द. आगरकर, माधव कोंडविलकर, राष्ट्रपती सन्मानप्राप्त शिक्षक मनोहर जागुष्टे यांच्यामुळे देवरुखचे महत्त्व वाढले आहे. ’समाजसेवा हीच ईश्वरसेवा’ मानत बाळुदादा पानवलकर, रमाकांत आर्ते, चौसोपीचे पंतजोशी, उद्योजक बाळासाहेब आणि विमल पित्रे, श्रद्धा देशपांडे या मंडळींनी देवरूखच्या सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांचे कार्य बाहेरच्या प्रदेशांतही ठाऊक आहे. देवरूख परिसरात आकार ऑर्गनायझेशन, सर्पमित्र समिती, कोमसाप, विठ्ठल मंदिर, वेद ब्राह्यण, लोकमान्य वाचनालय अशा काही संस्था युवकांना सोबत घेऊन समाजकार्य करत आहेत. 

-marleshwarदेवरुख नगराच्या सभोवताली वीस किलोमीटर अंतरावर पर्यटन स्थळे आहेत. महिमतगड व प्रसिद्धगड हे देवरुखपासून सर्वात जवळचे किल्ले. तेथील चौसोपी हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे. संभाजी महाराजांच्या काळात त्या ठिकाणी घोड्यांचा तबेला होता. कवी कलश हे तेथील सर्व व्यवस्था पाहत. देवरूख परिसरातून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीवर शिवशंकराची सात लिंगे आहे. मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ देवरूखपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. देवरुख गावाजवळ एका पर्वतात टिकलेश्वर हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध कर्णेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीचे आहे. ते मंदिर देवरुखपासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर आहे. केदारलिंग मंदिर हे भेट देण्यासारखे ठिकाण आहे. देवरुखपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केतवली गावाचे ते ग्रामदैवत आहे. ते शिवमंदिर आहे.

देवरुखात रविवारी बाजार भरतो. ती परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गावाच्या आसपास चार-पाच किलोमीटर अंतरावर ताडवली, ओझरे, हत्तीव आणि पाडगाव ही गावे आहेत. गावची लोकसंख्या वीस हजारच्या आसपास आहे. गावात संगमेश्वरी भाषा बोलली जाते. तेथे भाताचीच लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अलिकडे, काजू लागवडीचे प्रमाण वाढले आहे. 

अमित पंडित 9527108522  ameet293@gmail.com
——————————————————————————————-

देवरूख हे देववृक्षांचे गाव अशी गावाची ख्याती होती. एक फार मोठी ऐतिहासिक संस्कार-संक्रमणाची परंपरा असलेले गाव. गौतमबुद्ध, बसवेश्वर ते मुचकुंद ऋषी यांच्या पर्यंतच्या वास्तव्याच्या खुणा सांगणारी, अगदी पंधराव्या शतकापूर्वीच्या अनेक घटनांची साक्ष देणारी येथील पारंपरिक संस्कृती. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या त्या काळात अधिक चर्चेत असणारे कोकणातील तालुक्याचे गाव म्हणून अधिक आकर्षण होते. देवरूख येथे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना त्या काळातील दिवाणी न्यायाधीश आर.एच. मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली 1927 साली आयोजित सभेत झाली. ती प्रत्येक वकिलाने दहा रुपये देणगी देऊन स्थापन करण्यात आली होती. संस्थेचे पहिले अध्यक्ष काकासाहेब पंडित यांनी फार मेहनत घेत संस्थेची इंग्रजी पहिली ते दुसरीपर्यंतची शाळा उभारली. त्या काळातील ब्रिटिश कलेक्टर एन.एन. ब्राऊन यांनी न्यू इंग्लिश स्कूलला परवानगी आणि जागा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील ज्या शाळा ब्रिटिश राजवटीत सुरू झाल्या त्यात देवरूखच्या शैक्षणिक कार्याची विशेष अशी नोंद केली जाते. त्या काळात खेडेकर आणि राजवाडे यांच्या पहिल्या देणग्याही त्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाच्या मानल्या गेल्या.

हायस्कूलला दहावीची मान्यता 1939 मध्ये मिळाली आणि 1940 मध्ये त्या काळातील व्हर्नाक्यूलर फायनलची पहिली बॅच पास होऊन बाहेर पडली. त्यावेळी देवरूख हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासाहेब बिनिवाले हे होते. बाबासाहेब हे पुण्याचे, त्यांचे सारे शिक्षण पुण्यात झालेले. मात्र त्यांना खेड्यातील मुलांसांठी काम करण्यात अधिक रूची होती. त्यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या ज्ञानदानातून घडवण्याचे स्वप्न होते. त्यामुळे देवरूख हायस्कूल म्हणजे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक मान्यवर दर्जेदार हायस्कूल असा त्याचा नावलौकिक झाला.

देवरूखचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे तेथील समृद्ध वाचनालय. लोकमान्य टिळक यांचे निर्वाण झाले त्याच वर्षी, 1920 साली त्यांच्याच नावाने, देवरूख हायस्कूल सुरू होण्याच्याही पूर्वी तेथे वाचनालय सुरू करण्यात आले होते. वाचन संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल ही देवरुखच्या वैचारिक प्रगतीचा एक अनोखा आविष्कार होता. त्या वाचन संस्कृतीचे आणि वाचनालयाचे त्या गावी मुक्कामास आलेल्या इंदिराबाई हळबे यांना मोठे आकर्षण होते. इंदिराबाई देवरूख येथे त्यांचे नातेवाईक आणि देवरूख शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब पंडित यांच्याकडे राहत होत्या. काकासाहेबांच्या कुटुंबाचा तसेच त्यांच्या नात्यातील भास्कर आठले यांचा इंदिराबाईंना आधार वाटत होता. भास्कर आठल्ये यांच्या सोबत वीर शंकरराव पेंढारकर, गोविंदराव शिंदे हे देवरूखला राष्ट्र सेवा दलात होते. ते तरुण त्या काळात स्वातंत्र्य आंदोलनाच्या वातावरणाने भारलेले होते. देवरूखला रोज पहाटे प्रभातफेऱ्या निघत. त्यात ती तरुण मंडळी असत. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे पडसाद देवरूख सारख्या छोट्या गावात उमटत असल्याचे विशेष वाटत असे.

– (अभिजित हेगशेट्ये यांच्या सेवाव्रती इंदिराबाई हळबे या पुस्तकातून)
Last Updated on 24th August 2021
————————————————————————————————–

About Post Author

7 COMMENTS

  1. खूपच माहितीपुर्ण लेख. छान.
    माहितीपूर्ण लेख आहे, छान.

  2. Ya vetirikt devruk madhe…
    या व्यतिरिक्त देवरूखमध्ये भरपूर काही आहे.

  3. ऐतिहासिक आणि उद्बोधक
    देवरुख गावाची माहिती उद्बोधक आहे. उपक्रम फारच छान.

  4. खुप छान. भटकंती साठी उपयुक्त…
    खूप छान. भटकंतीसाठी माहिती उपयुक्त ठरेल.

  5. सुंदर वर्णन. देवरूखबद्दल…
    देवरूखबद्दल फारसे काही ऐकले नव्हते. आता उत्सुकता जागली. सुंदर वर्णन.

  6. ऐतिहासिक माहिती उद्बोधक आहे
    ऐतिहासिक माहिती उद्बोधक आहे.

  7. मी न्यू इंग्लिश स्कूल,…
    मी न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखचा १९६०-६४ चा विद्यार्थी, नंतर १९७१-७९ अशी ८ वर्षे स्टेट बँकेच्या देवरुख शाखेत देवरुखकरांची सेवा केली आहे. देवरुखच्या खूप सा-या आठवणी मनात रुंजी घालताहेत. धन्यवाद देवरुख!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here