माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले

1
69

पार्वतीबाई आठवले स्त्रियांची आत्मचरित्रे,  आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही लोकप्रिय आहेत.

असंच एक जुनं आत्मचरित्र म्हणजे पार्वतीबाई आठवले यांचं ‘माझी कहाणी’. पार्वतीबाई ह्या श्रीमती बाया कर्वे (महर्षी कर्वे यांच्या द्वितीय पत्नी) यांची बहीण.

पार्वतीबाईंचा जन्म १८७० सालचा. अकराव्या वर्षी लग्न. पंधराव्या वर्षी पहिले अपत्य. विसाव्या वर्षी वैधव्य. केशवपन आणि तांबडी वस्त्रे हा त्या वेळच्या विधवांचा ‘सनदशीर’ पोशाख. पार्वतीबाईंनी शिकायला सविसाव्या वर्षी सुरुवात केली. त्या इंग्रजी शिकण्यासाठी अमेरिकेला पंचेचाळीसाव्या वर्षी गेल्या व त्या भारतात १९२० साली परतल्या. त्यांनी १९०४ पासून म्हणजे वयाच्या चौतिसाव्या वर्षी अनाथाश्रमाकरता वर्गणी गोळा करायचे काम अंगावर घेतले आणि त्यांनी तेच काम पुढे आयुष्यभर केले.

पार्वतीबाईंचा जीवनप्रवास कोणत्या टप्प्यांनी झाला ह्याचा हा स्थूल आराखडा. प्रवास सुरू कसा झाला, पार्वतीबाईना आयुष्याचे ध्येय कसे सापडले, त्या अमेरिकेत इंग्रजी शिक्षणासाठी गेल्या तो उद्देश सफल झाला का आणि त्यांना तिथे काय अनुभव आले किंवा कोणत्या दिव्यातून जावे लागले याचा विस्तृत वृत्तांत म्हणजे या पुस्तकातला मजकूर.

पार्वतीबाईंची कर्व्यांच्या आश्रमाशी गाठ पडली. ते त्यांना वैधव्यातून तारून नेणारे ठरले. बाया कर्वे यांचा पुनर्विवाह झाला तो त्यांच्या वडिलांच्या संमतीने, पण त्यांच्या कुटुंबावर एक वर्ष बहिष्कार पडला व खूप हाल झाले. अखेर, पार्वतीबाई व बाया कर्वे यांच्या वडिलांनी गावातील तीन देवळांच्या जीर्णोध्दारासाठी शंभर रूपये दिले व ग्रामस्थांच्या पाया पडून मर्जी प्रसन्न करून घेतली. मग घरावरील बहिष्कार उठला. (पृष्ठ,९). बहुधा त्यामुळे पार्वतीबाईंच्या आईचा त्यांच्या पुनर्विवाहाला विरोध होता. स्वत: पार्वतीबाईंनाही पुनर्विवाहाची ओढ नव्हती. ‘अण्णांच्या ध्येयांचा व त्यांच्या साध्या राहणीचा माझ्या मनावर अगदी निराळाच परिणाम होऊन एका कुटुंबाचे उपयोगी पडण्यापेक्षा माझे सर्व आयुष्य विधवांचे सेवेत घालवायचे असे मी ठरवले.’ (पृष्ठ,१६)

पार्वतीबाई आठवले पार्वतीबाई आठवले महर्षी कर्वे एकदा वर्गणी गोळा करायला घोडागाडीने जात असताना गाडी उलटली व ते जखमी झाले. “अण्णांना पुढे एखादे वेळी अपघात होऊन त्यांच्या जिवास बरेवाईट झाले तर संस्थेला वैधव्य येईल व तसा प्रसंग आला तर आम्हा सर्वांची काळजी कोण घेणार? वर्गणीचे कामात त्यांचा त्रास कमी करता आल्यास पाहावे असे माझ्या मनात येऊ लागले.”(पृष्ठ,१९) मग त्यांनी रीतसर अण्णांची परवानागी घेऊन कामाला सुरुवात केली. त्यांनी  वर्गणी गोळा करण्यासाठी पू्र्व–पश्चिम, उत्तर-दक्षिण अशा चारी दिशांना प्रवास केला.  त्यांनी पहिला प्रवास मध्यप्रदेशात केला व तोही एका मुलीची नोकर अशा नात्याने (रेल्वेचा पास फुकट मिळाला म्हणून). त्यानंतर त्यांना अनेक बरेवाईट अनुभव आले. लोक पैसे देत पण लक्ष देत नसत. प्रतिष्ठित लोकांचे पत्ते मिळवणे हेही अवघड. लोकांच्या गैरसमजांचे निराकरण. असे अनेक प्रसंग. पण पार्वतीबाई नेटाने काम करत राहिल्या. त्यांना महाराष्ट्राबाहेरच्या प्रवासातच इंग्रजी शिक्षणाची गरज वाटू लागली, कारण स्टेशनांच्या पाट्या व स्थळांची नावे वाचणेही अवघड होई. मग अण्णा कर्वे यांनी त्यांना इंग्रजी शिकवण्याचे खूप प्रयत्न केले. पण विधवा, जास्त वय यांमुळे शिकवणारे दुर्लक्ष करत. अखेर, अण्णांनी त्यांना परदेशी पाठवण्याचे ठरवले. अमेरिका का निवडली तर इंग्लंड युद्धात पडल्यामुळे रस्ते जवळपास बंद झाले होते. स्वत: पार्वतीबाईंचे उद्देश असे होते; –

१. परदेशात जाऊन शिक्षणसंस्थांचे व समाजाचे तुलनात्मक ज्ञान व अनुभव फार लवकर मिळवता येतील.

२. आपल्या भारतभूमीतील विधवाश्रमाकरता परदेशात जर वर्गणी जमा करता आली तर पाहावे.

३. साधल्यास संभाषणात्मक पद्धतीने –direct method- परदेशात इंग्रजी शिक्षणाची संधी मिळेल असे वाटत असल्याने परदेशात जाण्याचा निश्चय कायम करता आला. (पृष्ठ,४५)

पार्वतीबाई आठवले त्या प्रा. धर्मानंद कोसंबी यांच्या समवेत आगबोटीने अमेरिकेला गेल्या. अपुरे कपडे व शाकाहार यांमुळे थंडीचा खूपच त्रास झाला. बोटीवर सहप्रवाशांनी मदत केली तरी सॅनफ्रॅन्सिस्कोला पोचेपर्यंत त्या आजारी पडल्या. त्यांना पुढे पाच वर्षांत याच अडचणींशी सतत सामना करावा लागला. कधी त्यांनी मोलकरीण म्हणून काम केले तर कधी हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून. वाय.डब्ल्यू.सी.ए.मध्ये थोडा विसावा देणारे काम मिळाले पण तेथे सतत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा दबाव. हा सततचा आग्रह व त्यातून उपजणारी भीती यांमुळे बाईंनी स्थानिक भारतीयांची ओळख काढून हा ख्रिस्ती ससेमिरा थोपवला. त्यांना तीन विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नेले. शक्य तेवढी सोय करायचा प्रयत्न केला. काळजी घेतली. पण मुळात त्यांची परिस्थितीच बेतासबात. अशा वातावरणात पार्वतीबाई इंग्रजी शिकणार केव्हा? ‘’महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून मला माझ्या अमेरिकेला येण्याच्या उद्देशांना फारच थोडी सहानुभूती मिळाली. ते म्हणत, तुम्हाला अशा वयात प्रो.कर्वे यांनी अमेरिकेत कशाला पाठवले?” (पृष्ठ,५९)

त्यांना अशा परिस्थितीत आणखी एका महाराष्ट्रीय गृहस्थांचा पत्ता मिळाला. पार्वतीबाईंनी आपली हकीगत त्यांना कळवली. गोखले यांनी तिकिटाची सोय केल्यावर त्या सहा दिवसांचा प्रवास करुन त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी ओळखीच्या एका घरात मोलकरणीचे काम पत्करले. त्यांना ते सुटल्यावर एका इस्पितळात काम मिळाले. पण राहण्याची जागा अतिशय त्रासदायक. त्यामुळे नोकर म्हणून वावरण्याऐवजी पेशंट म्हणून पडून राहण्याची वेळ आली. त्यामुळे तीही नोकरी सुटली. दुसरी मिळाली, पण काही बंगाली तरुण त्यांना जबरदस्तीने भारतात पाठवावयास निघाले.

तुम्हाला उच्च कुळात जन्म मिळाला असता तुम्ही या ठिकाणी, यवनांच्या घरी नोकरी का करता? तुम्ही या देशात काम मिळवण्यासाठी बारा घरे व तेरा ओस-या कशाला हिंडता? तुम्ही या देशात राहू नका. तुमच्या कृतीने आम्हा हिंदवासीयांना मोठी लाज निर्माण झाली आहे. हा बंगाली विद्यार्थ्यांचा आक्षेप (पृष्ठ,७२). पुढे, न्यूयांर्कच्या वेदान्त आश्रमातील स्वामी बोधानंद यांच्या मध्यस्थीमुळे पार्वतीबाईंना त्यांच्या इच्छेविरुद्ध अमेरिका सोडून भारतात परतण्याची वेळ टळली. न्यूयांर्कमध्ये पुन्हा जागोजागी नोकरीसाठी भटकंती. ती नोकरीही प्राय: मोलकरणीची. एका घरात नोकरी करताना ‘यंग इंडियां’च्या ऑफिसमध्ये पार्वतीबाईंची ओळख मिसेस ओरेयली नावाच्या महिलेशी झाली. त्यांनी पार्वतीबाईंना वॉशिंग्टन येथे भरू घातलेल्या सर्वराष्ट्रीय मजूर परिषदेत हिंदी स्त्री मजुरांच्या प्रतिनिधी म्हणून भाग घेण्यास बोलावले. तिकिटाची सोयही केली. पार्वतीबाईनी १९१९ मध्ये सर्वराष्ट्रीय मजूर परिषदेत भाग घेतला. परंतु आयत्या वेळी, त्यांची भाषण करण्याची परवानगी रद्द झाली.

अमेरिकेतल्या पाच वर्षांच्या वास्तव्यात पार्वतीबाईंना कामे करावी लागली ती बहुधा मोलकरणीची. अनेकदा त्या आजारी पडल्या. तरीही जिद्दीने त्यांनी आश्रमासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम चालू ठेवले. एवढेच नाही तर न्यूयांर्कमधल्या सोरोसिस क्लबच्या (केवळ स्वावलंबनाने चरितार्थ चालवणार्याच स्त्रियांचा क्लब) पाचशे सभासदांपुढे महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणप्रसाराच्या कामाची माहिती दिली व त्यातून अण्णा कर्वे यांच्या आश्रमाला एक मोटार (प्रवासासाठी साहाय्य म्हणून) भेट मिळाली.

पार्वतीबाई आठवले अमेरिकेहून परतताना पार्वतीबाईंना मार्सेलीस-मुंबई या प्रवासात रवींद्रनाथ टागोर व त्यांची सुनबाई यांच्या सहवासाचा लाभ झाला. रवींद्रनाथांचा उपदेश व त्यांचे काव्य-शास्त्रविवेचन यांचा आस्वाद बाईंना घेता आला. पुस्तकाच्या अखेरीस बाईंनी सामाजिक प्रश्नांवर त्यांचे विचार मांडले आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग असा-

१. स्त्रिया या देशातील भावी माता असल्याने त्यांना संसारोपयोगी असे सर्व शिक्षण दिले पाहिजे.

२. सध्याचे स्त्रियांचे शिक्षण बर्यालच अंशाने पुरुषांचे शिक्षणाचे वळणावर चालले आहे. त्याला वेळीच आळा घातला पाहिजे.

३. युरोपीयन राहणीतील वरवरच्या फॅशन्सचे अनुकरण सध्या समाजात होत आहे.

४. विवाहित स्त्रिया इक़डे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पुरुषांजवळ कुरकुर करत असतात. त्यामुळे शिकलेले नवरे व मुलगे आपापला बहुतेक रिकामा वेळ क्लबात घालवतात. पाश्चिमात्य देशांप्रमाणे घरी येण्यात पुरूषांना एक प्रकारचे आकर्षण वाटले पाहिजे. तसे ते वाटते का ह्याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा.

५. आपल्या देशात स्त्रियांच्या सौंदर्यभावनांची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी झालेली दिसत नाही. या बाबतीत पाश्चिमात्य देशांतील स्त्रियांपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशी तिकडील वधुवर आपल्या पोशाखाची व सौंदर्याची जितकी काळजी घेतात तितकीच काळजी लग्न होऊन पाच-दहा वर्षे झाली तरी घेत असतात. याच्या अगदी उलट स्थिती आमच्याकडे असते. पत्नीने विवाहानंतरही आपल्या सौदर्यांची व पोशाखाची काळजी घेतली तर त्यापासून खात्रीने आनंद वाढेल. त्याचप्रमाणे पतीने पत्नीची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न विवाहानंतरही चालू ठेवला तर त्यामुळे पत्नीची प्रसन्नता अधिक वाढेल.

६. पाश्चिमात्य देशातील स्त्रिया घरातील स्वच्छता जिवापाड मेहनत घेऊन ठेवत असतात. याचे उलट आमचेकडील कित्येक श्रीमंतांचे घरातून देखील सांदीकोप-यातून वर्षांनुवर्षे साचलेला केर, कोळ्यांची जाळी व न धुतलेले चहाचे पेले आढळतात.

पुढची दोन प्रकरणे आमची विवाहपद्धत, स्त्रियांच्या संस्था व त्यापुढील प्रश्न अशी आहेत. शेवटच्या प्रकरणात अबलोन्नतीसाठी काही सूचना आहेत. परिशिष्टात १०.१.०५ रोजी पार्वतीबाईनी सामाजिक परिषदेत केलेल्या भाषणाचा सारांश आहे.

(प्रथम आवृत्ती-अनाथ बालिकाश्रमाची मंडळी, हिंगणे बुद्रुक, पुणे ४)

मुकुंद वझे
बी-१३, शीतल सोसायटी,
रामनगर, बोरीवली, पश्चिम ४०००९२
९८२०९४६५४७
vazemukund@yahoo.com
(सर्व फोटो ‘माझी कहाणी’ या पुस्‍तकातून साभार.)

About Post Author

1 COMMENT

  1. This is indeed very
    This is indeed very astonishing!!! So many lives have been lived by great people but we hardly know !! It is a very good endeavor. Good!!

Comments are closed.