देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते. देवेश हे बदनापूरच्या ‘निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट पाथ्रीकर कॅम्पस’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. निर्मल ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था असून या संस्थेतर्फे शिक्षणाखेरीज, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येतात. त्यांचे बदनापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीत मोठे योगदान आहे. संस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर व सचिव डॉ. सौ. मेहेर पाथ्रीकर या आहेत. त्यांनी बदनापूरमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय पंचवीस वर्षापूर्वी सुरू केले. त्याला पाथ्रीकर कॅम्पस म्हणतात. त्या महाविद्यालयाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषत: विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात होतो.
देवेश यांनी संस्थेच्या शैक्षणिक सुविधांमध्ये आधुनिकता आणली असे म्हणता येईल. त्यांनी महाविद्यालयात रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र असे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले. त्याचप्रमाणे व्यवस्थापन शास्त्र (एम बी ए) महाविद्यालय, बीबीए-बीसीए महाविद्यालय या संस्था नव्याने सुरू केल्या. त्यामुळे दूर भागात आधुनिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. त्यांनी डी फार्मसी व बी फार्मसी हे व्यावसायिक अभ्यासक्रमही शहरी भागात मिळणाऱ्या सोयी-सुविधांसह बदनापूर येथे सुरू केले आहेत.
बदनापूर तालुक्याची आरोग्य क्षेत्रात मोठी पिछेहाट होती. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा नव्हत्या. देवेश पाथ्रीकर यांना त्याची खंत वाटे. त्यांनी त्या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.
देवेश पाथ्रीकर यांचे बदनापूर तालुक्यात सर्वत्र जाणे-येणे असते. त्यांच्या संस्थेने- त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळयांच्या सव्वा लक्ष बाटल्या गावागावांत जाऊन वाटल्या होत्या. त्या वेळी त्यांना असे आढळून आले, की बदनापूर तालुक्यात वेगवेगळ्या रोगांवर इलाज करणारे डॉक्टर्स आहेत. मात्र डोळ्यांचा डॉक्टर तालुकाभर नाही ! काही वृद्धांचे मोतिबिंदू पिकून, काचबिंदू होऊन त्यांची दृष्टी गेली होती असेही दिसून आले. त्यांनी कोरोना जाताच तालुक्यातील उज्जैनपुरी या डोंगराळ भागातील गावात प्रायोगिक तत्त्वावर नेत्र तपासणी व प्राथमिक उपचार शिबिर घेतले. शिबिरात मोतीबिंदूचे पस्तीस रूग्ण आढळले. तेही गरिबीच्या परिस्थितीतील व वृद्धावस्थेतील. त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांना दिसू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता. त्यामुळे देवेशही सुखावून गेले. तेथे त्यांनी ठरवले, की यापुढे नेत्र रोग्यांसाठी काम करायचे !
त्यांनी संभाजीनगर येथे काही रूग्णालयांशी संपर्क साधला. त्याच दरम्यान, त्यांची चिखलठाणा येथील लायन्स क्लब नेत्र रूग्णालयाचे डॉ. प्रीतेश सोनार यांच्याशी व त्यांच्या टीमशी चर्चा झाली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे डॉ. सोनार व त्यांची टीम देवेश यांच्यासोबत कायम असते. डॉ. प्रीतेश सोनार हे लायन्स नेत्र रूग्णालय, चिखलठाणा येथे संचालक आहेत. ते मोतीबिंदू रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. बदनापूर तालुका मोतिबिंदूमुक्त करण्याच्या देवेश यांच्या ध्येयाला लायन्स क्लबची खंबीर साथ लाभली आहे.
देवेश यांची ध्येयाप्रत कामाची एक पद्धत ठरून गेली आहे. बदनापूर तालुक्यातील एका गावात प्रत्येक आठवड्यात नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. त्या शिबिरात गावातील उपस्थित सर्व रूग्णांची तपासणी करण्यात येते. रुग्णांना चष्म्याचे नंबर काढून ते अत्यल्प किंमतीत दिले जातात. औषधी- ड्रॉप शिबिरात विनामूल्य दिले जातात. मोतिबिंदूचे निदान झालेल्या रूग्णांना शस्त्रक्रियेची तारीख देण्यात येते. त्या तारखेला त्या रुग्णांना वाहनाद्वारे शस्त्रक्रियेसाठी संभाजीनगर येथे नेण्यात येते. तेथे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना पुन्हा वाहनाद्वारे घरी सोडण्यात येते. हे सर्व देवेश पाथ्रीकर यांच्या वतीने करण्यात येते. दिवसभराच्या खटाटोपादरम्यान राहण्या-जेवण्याचा खर्च पाथ्रीकर कॅम्पसद्वारे केला जातो. चोपन्न गावांत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अठरा हजार सातशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे आणि एक हजार एकशेतेवीस मोतिबिंदू निदान झालेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करून घरपोच सोडण्यात आले आहे.
देवेश पाथ्रीकर यांनी सांगितले, की बदनापूर तालुक्यात मोतिबिंदू असणाऱ्या प्रत्येक रुग्णावर शस्त्रक्रिया होईपर्यंत ही शिबिरे सुरू राहतील.
मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया शिबिरातच का करत नाही असे विचारले असता देवेश म्हणाले, की रुग्ण स्वत: व त्यांचे नातेवाईक शिबिरात येण्याचा आळस करतात असा अनुभव आहे. त्यांना दवाखान्यात नेणे आणि त्यांची शस्त्रक्रिया करून घरी पोचवणे यामुळे चोख बंदोबस्त होतो. रोग्याला सहल झाल्यासारखेही वाटते.
हे ‘वेड’ आले कोठून असे देवेश यांना विचारता ते म्हणाले, की सार्वजनिक कार्याची ओढ आमच्या कुटुंबातच आहे. त्यामुळेच बदनापूरसारख्या मागास भागात शिक्षणासाठी एवढा मोठा परिसर उभा राहू शकला. असे ‘वेड’ प्रत्येकाच्या मनात असते, आम्ही त्या दिशेने प्रयत्न करतो. देवेश पाथ्रीकर म्हणाले, मी तात्याराव लहाने यांची भेट घेतलेली असून त्यांचेही मार्गदर्शन मला मिळालेले आहे. देवेश तेवढ्यावरच न थांबता तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारावी यासाठी विशेषत: महिलांच्या आजारांवरही गावागावांत मोफत शिबिरे सुरू करणार आहेत.
देवेश पाथ्रीकर हे मानसशास्त्रात एम ए, पीएच डी आहेत व पाथ्रीकर कॅम्पसमध्येच असोशिएट प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांचा पत्नी प्रज्ञा, मुलगी निहिका व मुलगा आर्यदीप असा घरसंसार आहे. त्यांना छंद इलेक्ट्रॉनिक वस्तू आणणे-लावणे- त्यांची दुरुस्ती करणे असा आगळावेगळा आहे.
देवेश म्हणाले, की बदनापूर तालुका मोतिबिंदूमुक्त करण्याचा ठरवल्यापासून पन्नास टक्के काम झाले आहे. उरलेले काम पूर्ण होण्यास अजून तीन वर्षे लागतील. अर्थात, दरम्यान नवनवीन रुग्ण तयार होत राहतीलच ! त्यामुळे हे अविरत चालणारे काम आहे.
देवेश पाथ्रीकर 9423088888 devesh@nkspt.in
– अमृत तारो 9503267979 taroamrut@gmail.com
———————————————————————————————-