देवरुखचे तिघे बांगला देश युद्धात (Devarukh’s three soldiers Fought in Bangladesh war)

0
299

भारताने बांगलादेशची निर्मिती पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून केली होती. त्यामुळे 2021-22 हे वर्ष त्याप्रीत्यर्थ सुवर्ण जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. बांगलादेश स्वातंत्र्य संग्राम हा जगात युद्धशास्त्राच्या अभ्यासाचा विषय बनला आहे. अवघ्या तेरा दिवसांत युद्ध जिंकून एखाद्या देशाची निर्मिती व्हावी याचे ते एकमेव उदाहरण. त्या युद्धाचा कोड वर्ड होता ‘ऑपरेशन कॅक्टस लिली’ ! त्या युद्धात भाग घेतलेल्या तीन सैनिकांचे वास्तव्य देवरुख येथे आहे. हवालदार तुकाराम बाबुराव खेडेकर, नाईक सूर्यकांत गोविंद पवार आणि नाईक पुंडलिक गणपत पवार यांना आजही ते युद्ध पन्नास वर्षांनंतरही स्पष्टपणे आठवते.

हवालदार तुकाराम खेडेकर हे मराठा रेजिमेंटचे सैनिक. त्यांच्याकडे अनुभव म्हणजे 1959 चा गोवा मुक्ती संग्राम, 1962 चे युद्ध, 1965 चे पाकिस्तान युद्ध आणि त्याआधी इजिप्त येथे ‘युनो’च्या शांती सेनेत काम असा आहे. त्यांना 1965 च्या युद्धातील कामगिरीबद्दल तर ‘समर सेवा स्टार’ या पदकाने गौरवण्यात आले होते !

ते 1971 च्या युद्धात पठाणकोट परिसरात शक्करगड येथे पाकिस्तान्यांना सामोरे गेले. त्या काळी भारतीय सैन्याकडे .303 (पॉइंट थ्री नॉट थ्री) याच रायफली प्रामुख्याने होत्या. सेमी-ऑटोमॅटिक रायफल्स नुकत्याच सैन्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या प्रत्येकाकडे पोचल्या नव्हत्या. प्रसंग असा घडला, की त्यांच्यावर पाकिस्तानची एक संपूर्ण बटालियन हल्ला करून आली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठा रेजिमेंट, गुरखा रायफल्स रेजिमेंट आणि गढवाल रायफल्स रेजिमेंट यांनी एकत्र येत त्या बटालियनचा सामना केला. युद्ध आठ दिवस सुरू होते. अखेर, पाकिस्तान्यांचा पराभव झाला. ते युद्ध समाप्तीनंतर काही काळ बांगलादेशातील न्यूमार जंक्शन येथे होते. तेथे भारतीय सेनेतर्फे बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीतील लोकांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले. त्यात खेडकर यांचा सहभाग होता. हवालदार खेडेकर यांना या युद्धातील विजयाने ‘संग्राम मेडल’ देऊन गौरवण्यात आले.

तुकाराम खेडेकर हे सैन्यातून 1981 साली निवृत्त झाले. ते पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. मोठा मुलगा विलास खेडकर हे आयटीआयमध्ये शिक्षक होते.

हवालदार तुकाराम खेडेकर
नाईक सूर्यकांत पवार

नाईक सूर्यकांत पवार यांचे वडील पोलिस दलात होते. नाईक पवार हे तोफखाना रेजिमेंटमध्ये होते. त्यांनी तर त्या युद्धात ढाका येथे आणि पश्चिम सीमेवर अशा दोन्ही ठिकाणी युद्धात भाग घेतला. नाईक पवार यांनी पॅरॅशूट लँडिंगचेही प्रशिक्षण घेतले होते. ते त्याची आठवण अभिमानाने सांगतात. पॅरॅशूटमधून उतरायचे तर त्यासाठी रात्रीची वेळ निवडली जाते. सर्जिकल स्ट्राईकसारख्या प्रसंगी तर ती वेळ काळोख्या रात्रीची निवडली जाते. त्याचे कारण उघड आहे. पॅरॅशूटमधून उतरताना सैनिक शत्रूच्या दृष्टीस पडले तर त्यांच्या गोळ्यांचे लक्ष्य होणार. पण पवार यांच्या कंपनीने भर दुपारी चार वाजता ढाका शहरालगत पॅरॅशूट लँडिंग करून मुक्तिवाहिनीच्या साथीने पाकिस्तान्यांशी युद्ध केले होते.

त्यानंतर त्यांनी पश्चिम आघाडीवर गंगानगर परिसरातही युद्धात भाग घेतला होता. त्यांची बटालियन युद्ध समाप्तीनंतरही सुमारे दीड वर्ष गंगानगर भागात देखरेख करत होती. देवरुख जवळच्या हातिव गावात सूर्यकांत पवार राहतात. त्यांनी निवृत्तीनंतर दोन ठिकाणी खाजगी नोकर्‍या केल्या व ते निवृत्त झाले आहेत. त्यांना रणजिता कुसुमकर ही मुलगी आणि राजेश हा मुलगा आहे. रणजिता या देवरुख येथे राहतात तर राजेश त्यांच्यासमवेत राहतो.

नाईक पुंडलिक पवार हे लहानपणी एनसीसी कॅडेट होते. भगतसिंग, सावरकर यांच्या क्रांतीचा मोठा प्रभाव नाईक पवार यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी सैन्यात जाण्याचे आधीपासून ठरवले होते. सैन्यात ते सिग्नल विभागात कार्यरत होते. त्यांनी तर ट्रेनिंग संपल्या संपल्या युद्धात भाग घेतला. त्यांनी 1970 साली आधी चार महिने सिग्नल विषयाचे ट्रेनिंग आणि त्यानंतर, लगेच आठ महिने मिलिटरी ट्रेनिंग घेतले. ट्रेनिंग संपता संपताच देशात युद्धामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि नाईक पवार यांच्या कंपनीला राजस्थान सीमेवर तैनात करण्यात आले. त्यांनी युद्धकाळात सलग तीन महिने खंदकात राहून सैनिकांना संदेश देण्याचे काम केले. त्या विषयी नाईक पवार सांगतात, की दिवसच्या दिवस खंदकातून बाहेर पडता येत नसे. देहविधी उरकायचे तेही रात्रीच्या अंधारात. राजस्थानचा वाळवंटी प्रदेश, त्यामुळे पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य. जेमतेम पाच लिटर पाणी दिवसाला मिळत असे. त्यामुळे कित्येक दिवस आंघोळही करता येत नसे. मग कधीतरी टॉवेल ओला करून अंग पुसणे हीच आंघोळ होई. तेथे पाण्याच्या चोर्‍या होत असत असे ते सांगतात. ते सिग्नल्स पथकामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर हाती बंदूक धरून युद्धात लढण्याचा प्रसंग आला नाही तरी सैन्याचे संदेश देणे हे महत्त्वाचे काम त्यांची डिव्हिजन करत होती. त्यातही धोका मोठा होता. संदेश पाठवताना त्या लहरी शत्रू पकडून त्याला संदेश नेमके कोठून येत आहेत याचा अंदाज येत असे. अशा वेळी त्या ठिकाणी बाँबिंग करून सिग्नल डिव्हिजन नष्ट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान्यांकडून होत असे. त्यामुळे धोका सतत असे.

नाईक पुंडलिक पवार हेही देवरुख येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झाले. त्यांची एकुलती एक मुलगी अमिता सुनिल साळवी. ती मालगुंड येथे राहते. नाईक पवार यांनी निवृत्तीनंतर स्वतःला समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अनेक लोकांच्या थकलेल्या निवृत्ती वेतनासाठी मदत केली आहे. ते त्यांची कागदपत्रे पूर्ण करणे, सरकारी कार्यालयात त्याविषयी पाठपुरावा करणे, विधवांना निवृत्ती वेतन मिळवून देणे अशी कामे पुढाकार घेऊन करतात. त्यांनी आजवर सुमारे साडेचारशे लोकांना अशी मदत केली आहे.

नाईक पुंडलिक पवार

तिघांनीही एकच भावना व्यक्त केली, की भारतीय सैन्यात जाता आले, त्याचा भाग होता आले ही पुण्याईची गोष्ट आहे.

तुकाराम बाबुराव खेडेकर 9403144979, सूर्यकांत गोविंद पवार 8263888650

पुंडलीक गणपत पवार 7744029904

– अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here