दीपक आपटे: सचोटीचा सागरी पर्यावरण वादी (Deepak Apte’s contribution to Marine Biology)

दीपक आपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फारसे परिचित नाही; परंतु ते सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांची व्यावसायिक वाटचालही वेगळीच आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे क्षेत्र निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे होय. ते ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मुंबईच्या संस्थेचे संचालक होते. त्यांनी ती संस्था 2021 मध्ये सोडली आणि पर्यावरणीय उपाययोजनेसाठी ‘सृष्टी कंझरव्हेशन फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याचबरोबर, ते सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हान्स रिसर्च सेंटरचे संचालक आहेत.

आपटे यांच्या निसर्गप्रेमात त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे. आईने दीपक यांच्यामध्ये पक्षी ओळखण्याचा छंद रुजवला; त्याचबरोबर त्यांना प्राण्यांवर प्रेम करण्यास शिकवले. दीपक यांचा आसपासच्या परिसरातील जखमी प्राणी घरी आणणे आणि त्यांची शुश्रूषा करणे हादेखील छंद बनून गेला. मात्र दीपक शाळेमध्ये अपयशी ठरत गेले. आईनेच त्यांच्या शाळेतील अपयशाबाबत वडिलांना समजावले की दीपकचे निसर्गप्रेम जोपासणे गरजेचे आहे. तेच त्याला अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाईल. आईचा तो पाठिंबा हे दीपक यांच्यासाठी वरदान ठरले. वडिलांनी सुरुवातीला त्यास थोडा विरोध केला, तरी त्यांनी दीपक यांचे निसर्गप्रेम स्वीकारले आणि दीपक यांना मूक पाठिंबा दिला. दीपक म्हणतात, “प्रामाणिकपणा, साधेपणा आणि निष्ठा हे गुण मी वडिलांकडूनच शिकलो.”

दीपक आपटे यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी या लहान गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच घडून आले. ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे गेले, परंतु बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या पालकांनी त्यांना परत साखरवाडीला आणले. दीपक यांच्या मते, ते अपयशच त्यांच्या जीवनातील सर्वात चांगली गोष्ट ठरली ! कारण त्याच काळात त्यांना जीवनाचा उद्देश सापडला. त्यांना औपचारिक शिक्षण कोठेही घेऊन जाणार नाही याची जाणीव झाली. त्यांना गावी परतल्यानंतर भरपूर वेळ मिळाला आणि त्या काळात ते निसर्गाशी जोडले गेले. त्यांच्या गावचा परिसर वन्यजीवांनी भरलेला होता. त्यांनी त्या निसर्गाकडूनच शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या टप्प्यावर शिक्षण पूर्णपणे सोडलेले नव्हते, तर जीवनाबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ घेतला होता, असे आता म्हणता येते.

पुढे, त्यांनी फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातून पदवी परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या रुइया महाविद्यालयातून प्राणिशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. पुढे, त्यांनी बँकॉक येथून ‘सागरकिनाऱ्यांचे व्यवस्थापन’ या विषयात, तर ड्युक विद्यापीठातून ‘सागरी जैवविविधता’ या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून डॉक्टरेटही संपादन केली. त्यांना त्या समुद्रकिनाऱ्याच्या शहरामध्ये प्रथम समुद्राची गोडी लागली. ते अलिबागमध्ये समुद्र आणि जमीन यांचा अथांग मिलाप पाहण्यात तासन् तास घालवत. त्याबाबत ते म्हणतात, “त्या रम्य आठवणी माझ्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.”

आपटे यांचा शैक्षणिक प्रवास वाट हरवलेल्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी बोर्डात नापास होऊनही, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख टिकवली. ते सांगतात, “मी करू शकलो, ते कोणीही व्यक्ती करू शकते.” ते आता पीएच डी मार्गदर्शक आहेत व विद्यार्थ्यांना वास्तव जगाशी सामना करण्यासाठी प्रेरित करतात.

त्यांचा ‘बीएनएचएस’मध्ये प्रवेश अनपेक्षित रीत्या झाला. त्यांना रुइया महाविद्यालयात शिकवणाऱ्या शशी मेनन यांनी ‘बीएनएचएस’मध्ये नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी संस्थेत शिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. प्रथम त्यांचा अर्ज नाकारण्यात आला, परंतु योगायोगाने तेथे निवडल्या गेलेल्या उमेदवाराने नोकरी स्वीकारली नाही आणि आपटे ‘बीएनएचएस’मध्ये 17 जानेवारी 1994 रोजी रुजू झाले. तेथे जे.सी. डॅनियल हे त्यांचे मार्गदर्शक होते. आपटे पर्यावरणाप्रती त्यांच्या सचोटीचे आणि निष्ठेचे श्रेय डॅनियल यांनाच देतात. ‘बीएनएचएस’चे माजी संचालक असद रहमानी यांनीदेखील आपटे यांच्या सागरी जीवनाच्या आवडीला पाठिंबा दिला. आपटे यांच्याच प्रयत्नांमुळे ‘बीएनएचएस’चा सागरी संशोधन कार्यक्रम भारतातील सर्वात विस्तृत कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. त्या कार्यक्रमांतर्गत पाच क्षेत्रीय केंद्रे आणि विसांहून अधिक शास्त्रज्ञ भारताच्या सागरी आणि किनारी जैवविविधतेचे संशोधन व संवर्धन यासाठी काम करत आहेत.

‘बीएनएचएस’च्या कार्याबद्दल बोलताना आपटे सांगतात, “‘बीएनएचएस’कडे जैवविविधतेच्या संग्रहाचे उदाहरणार्थ प्राणी, पक्षी, कीटक यांचे नमुने आहेत. या विभागाचा प्रमुख उद्देश या संग्रहांचे संवर्धन आणि अभ्यास करणे हा आहे. ते कार्य आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे. ‘बीएनएचएस’ने ‘हवामान बदल, हिमालय आणि धोक्यात असलेल्या प्रजाती’ हाही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचा उद्देश हवामान बदलामुळे धोक्यात आलेल्या प्रजातींचे निरीक्षण व संवर्धन यांसाठी विज्ञानाचा वापर करणे हे आहे. कॅन्सस विद्यापीठाशी झालेला सामंजस्य करार हे त्याचे उदाहरण आहे. शैक्षणिक सहकार्याच्या आणि विज्ञानआधाराच्या अशा आणखीही काही योजना आखल्या जात आहेत.” आपटे यांचा बीएनएचएसमधील हे प्रकल्प हाती घेण्यामध्ये मोठा वाटा आहे. आपटे सांगतात, “हवामान बदलाच्या काळात समुद्री देव शिंपला हा महत्त्वाचा जैवसूचक आहे. एक मीटरपेक्षा मोठे होणारे आणि साठ ते दोनशे वर्षे जगणारे ते शिंपले एका जागी घट्ट राहतात. देव शिंपले हे समुद्रातील तापमानवाढ आणि हवामान बदल यांच्या माहितीचे सूचक आहेत.” त्यांच्या अभ्यासातून हवामान बदलाच्या संशोधनात मोठी कामगिरी साधता येऊ शकेल.

दीपक आपटे यांची काही पुस्तके

शार्क संवर्धन कार्यक्रमाबाबत बोलताना आपटे सांगतात, “भारतात शार्कची स्थिती दयनीय आहे. जर ‘बीएनएचएस’ने 1990 च्या दशकात भारतातील शार्कच्या कल्ल्यांच्या वाढत्या व्यापाराला रोखण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेतली असती, तर भारतीय सागरात शार्कची स्थिती अधिक चांगली दिसली असती. बंदीची अंमलबजावणी हे नेहमीच एक आव्हान असते. परंतु काही ठराविक मोठ्या आकाराच्या शार्कची मासेमारी नियंत्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक होते. शार्कच्या काही प्रजाती भारतीय सागरांतून जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. परंतु प्रयत्न केल्यास अजूनही परिस्थिती बदलता येऊ शकते.”

आपटे म्हणतात, की पुढील दशकांत सागरी जीवनातील काही प्रजातींची अवस्था गंभीर होणार आहे. त्यावर उपाय योजण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट् संस्था आणि नागरिक यांच्यात सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी दूरदृष्टी, प्रयत्न व संसाधने लागतील. अन्यथा त्याचा विपरित परिणाम भोगावा लागेल. आपटे यांचा व्यावसायिक प्रवास आणि पर्यावरणीय दृष्टिकोन भारताच्या सागरी जीवन संवर्धन प्रयत्नांना नवी दिशा देऊ शकतो. योग्य दृष्टिकोन आणि वचनबद्ध कार्यक्रम यांनी निसर्गाचे संरक्षण करणे शक्य आहे.

आपटे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा तत्काळ भावतो. त्यांना ते वैज्ञानिक असूनही, कलाविश्व महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, की ते जेव्हा तणावाखाली असतात, तेव्हा निसर्गकला त्यांना मनःशांती आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

दीपक आपटे 9820602965 spiderconch1@gmail.com

– बिपिन हिंदळेकर 9920485590 bipinh72@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here