हमीद दलवाई यांनी मांडलेला विचार, घेतलेल्या भूमिका आणि प्रत्यक्ष रणांगणात उतरून केलेले कार्य हे सारे एकमेवाद्वितीय आहे. भारताच्या इतिहासात असे उदाहरण नाही, जागतिक इतिहासातही ते शोधावे लागेल. हमीद दलवाई यांचा विचार, त्यांची भूमिका व त्यांचे कार्य काय स्वरूपाचे होते? मुस्लिम समाजातील सुधारणा हे त्याचे मध्यवर्ती केंद्र होते, मुस्लिम मूलतत्त्ववाद हे त्यांचे लक्ष्य होते. पण मूलतः तो लढा शोषणाच्या व अन्यायाच्या विरूद्ध होता, समतेच्या व मानवतेच्या बाजूने होता. त्यांचा सारा आटापिटा हे राष्ट्र एकात्म व्हावे, आधुनिक व्हावे, धर्मनिरपेक्ष व्हावे यासाठी होता.
साने गुरुजी यांनी ‘साधना’ साप्ताहिक 15 ऑगस्ट 1948 रोजी सुरू केले, तेव्हा ‘साधना’चे कार्यालय मुंबई शहरात होते. ते पुणे शहरात 1956 मध्ये हलवण्यात आले. ‘साधना’ची भक्कम पायाभरणी त्या आठ वर्षांत झाली, ती साने गुरुजी, आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन या तीन संपादकांच्या नेतृत्वानुसार. त्यानंतरचे पाव शतक यदुनाथ थत्ते ‘साधना’चे संपादक होते. तो काळ ‘साधना’चे उत्कर्ष पर्व म्हणता येईल. कारण ‘साधना’कडून विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था, संघटना यांना बळ पुरवण्याचे काम त्या काळात मोठ्या प्रमाणात घडून आले. ‘साधना’ने ज्या व्यक्तींना व त्यांच्या कार्याला सतत व जोरदार पाठिंबा त्या काळात दिला, त्यांतील प्रमुख नाव म्हणजे हमीद दलवाई.
‘साधना’ने कुमार विशेषांक प्रकाशित करण्यास सुरुवात 1958 मध्ये केली, त्या पहिल्याच अंकात ‘आहमद’ या शीर्षकाची कथा प्रसिद्ध झाली आहे. त्या कथेचे लेखक होते हमीद दलवाई, तेव्हा त्यांचे वय होते पंचवीस वर्षे ! त्या कथेच्या शेवटी आहमद नावाच्या शालाबाह्य मुलाने, अगदीच असह्य झाल्यावर पळण्याचे थांबवून, जिवाच्या आकांताने सर्व शक्ती एकवटून दगड उचलले आणि (त्याची टिंगलटवाळी करणाऱ्या) शाळेतील मुलांच्या दिशेने भिरकावले ! तो शेवट सुन्न करून सोडणारा आहे. ते दगड ती कथा वाचणाऱ्या कोणाही वाचकाला त्याच्याच दिशेने आले असे वाटले असणार, आजही वाटेल. तो लेखक म्हणजे हमीद दलवाई, त्यांचे कार्य आणि ‘साधना’ यांचे घट्ट नाते त्यानंतरची वीस वर्षे राहिले.
हमीद दलवाई यांना आयुष्य मिळाले अवघे पंचेचाळीस वर्षांचे. त्यांतील पंचवीस वर्षे सार्वजनिक आयुष्य म्हणावे अशी होती, त्यांतील अर्धा कालखंड ललित लेखक म्हणून, तर अर्धा कालखंड वैचारिक लेखन व मुस्लिम समाजसुधारणा यांमध्ये व्यतीत झाले. त्यांच्यासाठी 1966 हे वर्ष टर्निंग पॉर्इंट म्हणावे असे होते. चार महत्त्वाच्या घटना त्या वर्षी त्यांच्या आयुष्यात घडल्या. पहिली- ‘इंधन’ या नावाजलेल्या व वादग्रस्तही ठरलेल्या कादंबरीचे लेखक म्हणून ते प्रसिद्धीला आले, दुसरी- त्यांनी तलाकपीडित सात मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक ठरलेला मोर्चा मुंबईत मंत्रालयावर काढला, तिसरी- त्यांनी ‘मराठा’मधील उपसंपादक ही नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक काम सुरू केले, चौथी- त्यांनी कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टकडून फेलोशीप मिळवून भारतभ्रमण केले. त्यानंतरची दहा वर्षे म्हणजे दलवाई नावाचा झंझावात होता ! त्यांनी त्या दशकात काय नाही केले? मूलगामी व विचारप्रवर्तक म्हणावे असे अनेक लेख लिहिले, वादळी म्हणावीत अशी शेकडो भाषणे केली, थोर-थोर विद्वानांशी वादविवाद केले, जीर्ण पुराणमतवाद्यांना टक्कर दिली, अनेक परिषदा आयोजित केल्या, शिबिरे भरवली, मोर्चे-आंदोलने केली. महाराष्ट्र पिंजून काढला, देशातील बराच भूप्रदेश पायाखालून घातला, विदेशातही घोडदौड करण्याची आकांक्षा बाळगली. अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याला दोनशे वर्षे 1976 मध्ये पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी अमेरिका व युरोप या खंडांचा दौरा केला. त्यांना त्या नंतरच्या वर्षी मृत्यू आला. त्यामुळे तो झंझावात अकाली संपुष्टात आला.
हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना 22 मार्च 1970 रोजी केली, स्थापनेची सभा ‘साधना’ कार्यालयाच्या आंतरभारती सभागृहात झाली. दलवार्इ यांना मंडळाच्या स्थापनेनंतर केवळ सात वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी त्या दशकभरात पक्की पायाभरणी केली. त्यांच्या अनुयायांनी तो लढा त्यानंतरचे दशकभर चालू ठेवला. मात्र 1986 हे वर्ष त्या सर्वांचे खच्चीकरण करणारे ठरले. राजीव गांधी सरकारने शहाबानो या महिलेला पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेत कायदा करून रद्दबातल ठरवला. तो प्रकार देशासाठी मोठा आघात ठरला. त्यानंतर देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली, पण त्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ज्या संस्था-संघटनांना बसला, त्यात अग्रभागी होते मुस्लिम सत्यशोधक मंडळ. त्या निर्णयानंतर मंडळाचा सूर हरवला, कार्यकर्ते सैरभैर झाले, समर्थक निराशेच्या गर्तेत अडकले. मंडळाचे काम पुढील तीन दशके चालू राहिले, पण तो झंझावात पुन्हा निर्माण झालाच नाही. ते मंडळ पन्नास वर्षांचे होऊन गेले आहे, त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 22 मार्च 2020 रोजी संपले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे विद्यमान कार्यकर्ते व हितचिंतक स्वतंत्रपणे वा एकत्रितपणे शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. त्यांना मर्यादा अपुरी साधने व आर्थिक बळाचा अभाव यामुळे येत आहेत. परंतु त्यांची अवस्था ‘या मर्यादा एकवेळ परवडल्या, पण चहूबाजूंनी होणारी कोंडी नको’ अशी आहे. ती कोंडी कमालीची त्रासदायक आहे, त्यांनी समाजविन्मुख व्हावे अशी आहे. कोंडीच्या चार बाजू कशा आहेत?
पहिली बाजू अडवली आहे, ज्या मुस्लिम समाजासाठी हे सत्यशोधक काम करतात, त्या समाजातील पुराणमतवाद्यांनी ! त्यांचा अपप्रचार ‘ते सत्यशोधक देव आणि धर्म नाकारणारे आहेत’ असा आहे. जुन्या व जाचक रूढी-परंपरांना कवटाळून बसलेल्या त्या लोकांकडून सत्यशोधकांवर काही टीका जाणूनबुजून, तर काही टीका अजाणतेपणातून होत असते. हितसंबंध जपण्यासाठी व कमजोर घटकांचे शोषण करून स्वत:चे वर्चस्व राखण्यासाठी हे काही जणांकडून घडते. मात्र उर्वरित जनता मुस्लिम सत्यशोधकांकडे पाखंडी म्हणूनच पाहते; त्यांना शत्रूस्थानी मानते. साहजिकच, मुस्लिम सत्यशोधकांना जागोजागी कडवा विरोध होत राहतो.
सत्यशोधकांची दुसरी बाजू अडवली आहे, देशातील बहुसंख्य हिंदू समाजाने. हिंदू समाजातील बहुतांश लोकांच्या मनात मुस्लिम समाजाविषयी राग, द्वेष वा दुरावा आहे. कारण काहींच्या मनावर इतिहासाचे ओझे आहे, बहुसंख्यांच्या मनात तो राग-द्वेष लहानपणापासूनच्या संस्कारांतून पेरला गेलेला आहे. काहींच्या मनात तो सभोवतालच्या विखारी प्रचारामुळे आहे, तो राग-द्वेष काहींच्या मनात स्वत:च्या अनुभवांचा चुकीचा अर्थ लावण्यातून आहे; तर उर्वरितांच्या मनात दुरावा आहे, सामाजिक व सांस्कृतिक अभिसरण न घडण्यातून म्हणजे प्रत्यक्ष संबंध-संपर्क न येण्यातून किंवा कमी प्रमाणात येण्यातून ! परिणामी, सर्वसामान्य हिंदू लोक, धर्मपरायण हिंदू लोक, धर्मनिष्ठ हिंदू लोक, हिंदुत्ववादी लोक आणि धर्मांध हिंदू लोक या सर्व घटकांकडून मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे ‘अखेर मुस्लिमच’ अशा पद्धतीने पाहिले जाते ! त्यांपैकी काही घटकांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाविषयी थोडीबहुत सहानुभूती वाटत असते; पण त्याचे मुख्य कारण ते मंडळ मुस्लिम मूलतत्त्ववादावर टीका करते म्हणून, मुस्लिम समाजातील रूढी-परंपरांवर प्रहार करत असते म्हणून ! बहुतांश हिंदू लोक मुस्लिम सत्यशोधकांकडे ‘काट्याने काटा काढणे’ अशा पद्धतीने बघत असतात, त्यांना सत्यशोधकांची तमा त्यापलीकडे नसते.
मुस्लिम सत्यशोधकांची तिसरी बाजू अडवली आहे, त्यांना पाठिंबा, मदत व साथसंगत करणाऱ्या उदारमतवादी, पुरोगामी वा सुधारणावादी लोकांनी. त्यांच्यात अनेक प्रकारचे गट-तट आहेत, पण त्यांच्या भूमिकांना तीन प्रमुख आयाम आहेत. एक- काहींना वाटते, की मुस्लिम सत्यशोधक मंडळ ज्या प्रकारची भूमिका घेते, त्यामुळे धर्माचा पगडा असलेला मुस्लिम समाज त्यांच्यापासून दूर जाईल. तर काहींना वाटते, की स्वधर्मावर टीका करणाऱ्या सत्यशोधक मंडळाच्या भूमिकांचा गैरफायदा हिंदुत्ववादी शक्ती उचलतील आणि मग मंडळाला जे हवे त्याच्या नेमके उलट घडेल. तिसरा आयाम असणाराही एक वर्ग आहे, त्यांच्या मतांनुसार धर्म ही गंभीर व जटिल बाब आहे; तिला हात न घालता शिक्षण, बेरोजगारी असे विषय हाताळूनच मुस्लिम समाजाला सुधारणांच्या दिशेने सरकावता येईल. हे तिन्ही आयाम असणाऱ्या लोकांच्या भूमिका स्थूल मानाने बरोबर आहेत आणि त्यांच्या आक्षेपांमध्ये वा त्यांना वाटणाऱ्या भीतीमध्ये तथ्यही काही प्रमाणात आहे. मात्र त्या आधारावर ते लोक मुस्लिम सत्यशोधकांवर ज्या प्रकारचा दबाव कळत-नकळत निर्माण करतात, त्याचा परिणाम सत्यशोधकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी होऊन जाते. त्यातही विशेष हे आहे, की धर्मनिष्ठ हिंदू वा हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या व्यक्ती-संस्था-संघटना यांच्याशी जरा कोठे संबंध आला किंवा संवाद झाला, की त्या सत्यशोधकांकडे संशयी नजरेने पाहिले जाते. ती समजूत ‘हे शत्रूच्या कळपात जातील किंवा शत्रू यांचा गैरफायदा उठवतील’ अशी काहीशी असते. आणि बरोबर त्याच्या उलट हिंदुत्ववाद्यांमधील उदारमतवादी समर्थक वा सहानुभूतीदार वागत असतात, त्यांच्या उक्ती-कृतीला सत्यशोधकांनी ‘हो’ म्हणावे अशी अपेक्षा बाळगून असतात.
सत्यशोधकांची चौथी बाजू अडवली जाते सरकारकडून व प्रशासनाकडून. कोणतेही सरकार मग ते राज्यांतील असो वा केंद्रातील आणि कोणत्याही पक्षाचे असो (डाव्या, उजव्या, मधल्या), ते सत्यशोधकांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. ‘हे सत्यशोधक इतके अल्पसंख्य आहेत, की त्यांचा फायदा सत्ता मिळवण्यासाठी नाही’ अशी ती भावना. पण ती भावना एक वेळ परवडली अशी त्यांची दुसरी भावना असते. ती अशी, की या सुधारणावाद्यांशी संपर्क-संवाद ठेवणे म्हणजे सर्वसामान्य वा धर्मश्रद्ध मुस्लिम समाज (जो सत्तेत जाऊ इच्छिणाऱ्यांचा मतदार आहे वा होऊ शकतो) त्यांच्यापासून दुरावेल ! सरकारदरबारी अशी मानसिकता असेल तर मुस्लिम सत्यशोधकांच्या वाट्याला प्रशासनाच्या स्तरावर बेपर्वाई, बेफिकिरी व असहकार येणार यात विशेष ते काय ! या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी काही कायदे करायचे असतील वा काही पुरोगामी पावले टाकणारे कार्यक्रम-उपक्रम राबवण्याची मागणी करायची असेल, तर सरकार व प्रशासन यांच्याकडून चालढकल वा साफ दुर्लक्ष केले जाते.
मुस्लिम सत्यशोधकांना त्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खुष्कीचा म्हणावा असा मार्ग दिसत नाही. परिणामी, सत्यशोधकांचे प्रभावक्षेत्र वाढत नाही. ही कोंडी दीर्घकाळच्या जटिल परिस्थितीतून निर्माण झालेली असल्याने, कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सोपी उत्तरे नाहीत. एक लक्षात घेतले पाहिजे, की कोंडी हमीद दलवाई यांचीही झाली होतीच ! त्यांनी त्यातून धडका मारून झंझावात निर्माण केला. ते समजून घेतले, तर काही वाट प्राप्त परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी दिसू शकेल. बौद्धिक व नैतिक बळ गोळा करणे, संघटनशक्ती वाढवणे आणि विरोधकांच्या टीकेला व समर्थकांच्या आक्षेपांना तोडीस तोड उत्तरे देण्यासाठी वादविवादाची तयारी ठेवणे; प्रसंगी किंमत चुकवण्याची तयारी असणे हीच ती वाट !
अशी सर्व अडचणींची परिस्थिती असूनसुद्धा, मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे, देशपातळीवर तरी अनन्यसाधारण आहे.
– विनोद शिरसाठ vinod.shirsath@gmail.com
———————————————————————————————-