कोकणातील दशावतार (Dashavatar in Konkan)

5
168
दशावताराच्या सादरीकरणाचे एक दृश्यृ
दशावताराच्या सादरीकरणाचे एक दृश्यृ

दशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते – मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार रूपे मानवी नाहीत; ती प्राणी रूपे आहेत.  नववा अवतार कलंकी व दहावा बुद्ध. हे दोन अवतार ‘दशावतारा’त दाखवले जात नाहीत. ती सर्व पात्रे प्रत्यक्ष सभा मंडपात (रंगमंचावर) येत नाहीत. त्यातील काही प्रत्यक्ष रंगमंचावर येतात, तर काहींचा केवळ उल्लेख केला जातो.

दशावतार ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील लोककला . पूर्वरंगातील संकासूर-भटजी-गणपती, ऋद्धी-सिद्धी, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू ही पात्रे आणि उत्तररंगात रामायण, महाभारत या पुराणांमधील आख्यान असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. अर्थातच ते नाट्यरूपात सादर होते. 

गावगाड्यात पंचक्रोशीतील लोकांना एकत्र येण्याची, ठेवण्याची संधी म्हणजे जत्रा. जत्रेच्या जागी ‘दशावतार’ होतो. जत्रेतील विशिष्ट कामे विशिष्ट लोकांकडे सोपवली जातात. उदाहरणार्थ, देवाच्या पालखी च्या वेळी झांज आणि पखवाज वाजवणारे दशावतारीच पाहिजेत. ते त्या वेळचे मानकरी होत. देवळी हा देवाची सेवा करणारा, शिंगे वाजवणारा, पालखीपुढे मशाल धरणारा असतो.

कोकणातील देवळी, लिंगायत आणि गुरव समाजाचा गावोगावी जाऊन दशावतार सादर करणे हा व्‍यवसाय होता. दशावतार सादर करणारे कलावंत ही कला सादर करण्‍याचे कसब एकलव्‍याप्रमाणे स्‍वतः शिकतात, त्‍यांना कुणाकडूनही तालीम मिळत नाही. मंडळातील कलाकारांना रंगभूषा करण्‍यापूर्वी एकत्रितपणे सूत्रधाराकडून आख्‍यानाची कल्‍पना दिली जाते; भूमिका वाटून दिल्‍या जातात. वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सर्व कलाकार हे पुरुषच असतात.
 

गावातील देवाच्या वार्षिक उत्सवातही ‘दशावतार’ सादर केले जाते. जत्रेसाठी व दशावतार पाहण्यासाठी गावोगावचे लोक रात्री एकत्र जमतात. प्रथम स्त्रीवर्गाकडून देवीची ओटी भरली जाते, नंतर देवांची पालखी काढण्यात येते. त्यावेळेस ढोल, ताशा, सनई इत्यादी वाद्ये वाजवली जातात. देवाची पालखी घेऊन मृदुंग वादक- झांजवादक, चवर्‍या घेऊन भावीण असतात. त्यांच्यासोबत गावकरी देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा चालू असताना भजन, आरत्या व भटजी मंगलाष्टके म्हणून देवांची लग्ने लावतात. कार्यक्रम संपल्यावर ‘दशावतारी’ प्रयोगाला सुरुवात होते. पूर्वरंगात गणपती, सरस्वती, भटजी, संकासूर, विष्णू ही पात्रे दाखवली जाऊन नंतर आख्यानास सुरूवात होते. आख्यान मुख्यत: पौराणिक असते.

दशावतारी जत्रेचा काळ सहा महिन्यांचा असतो. कार्तिक शुध्द दशमीपासून (ऑक्टोबर-नोव्हेंबर) ते वैशाख शुद्ध पंचमीपर्यंतचा (एप्रिल-मे महिना) तो काळ. रात्री दहा-अकरा वाजता सुरू झालेला दशावतार पहाटे झुंजूमूंजू होईपर्यंत चालतो.

दशावतारात सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्त्‍या गणपतीला आवाहन करणारे धृपद म्हणतो. ते संपण्याच्या सुमारास रिध्दी-सिध्दीसहित गणपती रंगमंचावर येतो. त्याच्या मागोमाग सरस्वती येते. गणपतीचे आवाहन संपले, की सूत्रधार सरस्वतीची स्तुती करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते. त्यानंतर प्रत्यक्ष खेळाला सुरुवात!

दशावतारासाठी रंगभूषा करणारा कलावंतनाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे धुमाळ म्हणजे गायन होते. नंतर मंगलाचरण व त्यावर गणपती-सरस्वतीचा प्रवेश असा क्रम असतो. पुढे वरयाचना व वरदान इ. प्रकारानंतर ब्रह्मदेवाचा प्रवेश, संकासुराचे वेदचौर्य व विष्णूकडून त्याचे पारिपत्य इ. कथाभाग होतो. या नंतर मात्र पुढचे सर्व कथाप्रसंग गाळून एकदम गोपी-कृष्णाच्या लीला दाखविण्यात येतात. येथे पूर्वरंग संपून उत्तररंगाला प्रारंभ होंतो. त्यात एखाद्या पौराणिक कथेचे आख्यान असते. सूत्रधार आपल्या पद्यांतून कथानकाच्या विकासक्रम दाखवतो, तर पात्रे आपापली भाषणे स्वयंस्फूर्तीने म्हणतात. देव-दावन आणि राजे-राक्षस यांच्या युध्दांची दृष्ये रंगमंचावर दाखविण्यात येतात. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळ उडविण्यात येते व तो आरडा-ओरडा करीत तलवारीच्या फेका फेकत रंगमंचावर प्रवेश करतो. देव-दावनांच्या युध्द प्रसंगी मृदंग व झांजा वगैरे वाद्यांचा एकच गजर चालतो. अखेरीस राक्षसांचा पराभव होतो. खेळाच्या शेवटी हंडी फोडून दहीकाला वाटतात व नंतर आरती होऊन खेळाचा शेवट होतो.

देव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण, राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येतो. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, आरोळया, हातातील लखलखणा-या तलवारी व रोळेचा उसळलेला डोंब यामुळे प्रेक्षक घाबरतात. आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला (गोपाळकाला) होतो. त्यावेळी नाटकातील स्‍त्री वेषधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रेक्षकांत फिरवितो. प्रेक्षक आरतीत पैसे टाकतात. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला ‘दहिकाला’ असेही म्हणतात.

दशावताराचे ठळक वैशिष्ट्य हे की यातील संवाद लिहिलेले नसतात. ते उत्स्फूर्तपणे व हजरजबाबी पद्धतीने, कथानुरोधाने केले जातात. संहिता नसताना पौराणिक नाटक सादर करणे मोठे आव्हान असते. संगीताचा बराचसा कार्यभाग नाईकजी पुरवतात. पूर्वरंगात केवळ संकासूर कोकणी (मालवणी) बोली भाषा बोलतो तेव्हा प्रेक्षक पोट धरधरून हसतात. मात्र देव, इतर पात्रे आणि राक्षस पात्रेसुद्धा शुध्द बोली बोलण्याचा प्रयत्‍न करतात.
 

दशावतारातील भटजी, दासी, गणपती व संकासूर (सौजन्यः मराठी विश्वकोष संकेतस्थळ)दशावतारात पुराणकथा सादर केल्या जातात. हरिविजय, भक्तिविजय ग्रंथांतील चित्रे पाहून या कलावंतांनी वेषभूषेची प्रेरणा घेतली. त्यांतील कथानके आख्यानासाठी निवडली. चित्रांत दिसणा-या किंवा परंपरेने मनात असलेल्या रंगसंगतीत ते ते पात्र दिसले पाहिजे, याकडे कलाकारांचे लक्ष असते.

रंगभूषेच्या बाबतीत काही ठिकाणी गेरू, काळा कोळसा आणि रंग पूर्वी वापरले जात. राक्षस पार्ट्यांची रंगभूषा अधिक भडक, उग्र स्वरूपाची असते तर देवांची सात्त्विक स्वरूपाची. दशावतारात काम करणारे कलावंत जत्रांच्या हंगामाखेरीजच्या दिवसांत शेतीभाती किंवा इतर व्यवसायांत गुंतलेले असतात. दशावतार नाटके गोव्यात विविध उत्सवांत सादर केली जातात. गोव्यातही त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मास्यात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि गोवा प्रमाणे देवगड भागातही दशावतारी नाटके लोकप्रिय आहेत. 

तुळशीच्या लग्नापासून विविध जत्रांमध्ये कोकणात दशावतारी खेळ सुरू होतात ते मे महिन्यापर्यंत चालतात. पूर्वरंग हा दशावताराचा आत्मा असतो. आता मात्र पूर्वरंगाला दशावतारात फाटा दिलेला असतो.

सुरेश चव्हाण

About Post Author

Previous articleअभिजात वाचकाच्या शोधात
Next article‘रणांगण’च्या निमित्ताने…
सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते चाळीस वर्षे मुक्त पत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य समीक्षक, संशोधक, परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ‘नमन-खेळे’ या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी ‘देवदासी’ विषयावर यल्लमाच्या दासी हा व अन्य सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर माहितीपट तयार केले आहेत. ते मुंबईतील ‘ग्रंथाली’ आणि ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि कोसबाडची ‘नूतन बाल शिक्षण’ या संस्थांशी संलग्न आहेत.

5 COMMENTS

  1. माहिती उत्कृष्टपणे मांडली आहे
    माहिती उत्कृष्टपणे मांडली आहे. ही दशावतार नाटकाची परंपरा अशीच वर्षानुवर्षे चालू ठेवणे गरजेचे आहे. यात खंड पडू नये. सिंधुदूर्गात ज्या ज्या ठिकाणी देवस्थानामध्ये दहिकाला उत्सव होतो, त्या ठिकाणच्या सर्वांना कळकळीचे आवाहन आहे, की कोणत्याही परिस्थितीत ही परंपरा पुढे चालू ठेवण्यास सक्रीय रहावे.

  2. खुप छान आणि सोप्या
    भाषेत…

    खुप छान आणि सोप्या
    भाषेत दशावतार कळाला.दशावतारनाटक पाहण्याची उत्सुकता वाढली.

Comments are closed.