दापोलीचे केशवराज मंदिर (Dapoli’s unique Keshavraj Temple)

0
418

केशवराज (विष्णूचे) मंदिर हे दापोलीचे मोठे आकर्षण आहे. त्याला धार्मिक व भाविक असे महात्म्य लाभले आहेच; त्याबरोबर, पर्यटनाच्या दृष्टीनेही ते ठिकाण विलोभनीय वाटते. मंदिरातील विष्णुमूर्ती सुंदर आहे. त्या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन चोवीस प्रकार पुराणात (अग्नी, पद्म, स्कंद) सांगितलेले आहेत. मंदिर दापोली-हर्णे मार्गावर आहे. त्या ठिकाणास आसूद बाग असे म्हणतात. मंदिर तेथून पंधरा-वीस मिनिटे चालत गेल्यावर दिसते. मंदिर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू-विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी, गावाबाहेर, निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर या गोष्टीस अपवाद आहे. तेथे जाताना, सुरुवातीला नदीचा छोटा पूल आहे. तो पूल पूर्वी लाकडी होता; आता, सिमेंटचा बांधण्यात आला आहे. तो पूल श्री.ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीमुळे अजरामर झाला आहे. श्री.ना. पेंडसे यांनी ज्या परिसराला डोळ्यांसमोर ठेवून ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर होय. गारंबीचा बापू या चित्रपटातील चित्रीकरणदेखील या परिसरातील लाकडी पुलापासून ते नारळी-पोफळीच्या बागांपर्यंत झाले आहे.

पूल ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू इत्यादी वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तेथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरण्यास लावते. चढ असला तरी तेथे थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.

गर्द झाडीत वसलेले केशवराज मंदिर साधारण एक हजार वर्षे जुने आहे. बांधकाम दगडी आहे. मंदिराची रचना उत्तम आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून बाराही महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वर, एक दगडी शिवलिंग आणि एक अनामिक देव ठेवलेले आहेत; तर जवळच जोत्याचा दगड अन् तुळशी वृंदावन आहेत ! गोमुखाच्या वरील टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे.

          ते देऊळ पांडवांनी एका रात्रीत बांधले अशी गंमतीदार आख्यायिका त्याबाबत सांगितली जाते.

मंदिरातील उत्सव कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून सुरू होतो, तो त्यानंतर पाच दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. उत्सव दुसऱ्या एकादशीपासून तीन दिवस असतो तर प्रसाद त्रयोदशीला असतो. केशवराज हे देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे कुलदैवत आहे. त्या मंदिराची पिढीजात व्यवस्था देपोलकर कुटुंबाकडे आहे. त्यांची चौदावी पिढी मंदिराची व्यवस्था पाहत आहे.

विलास देपोलकर 9422496377

– विजय तोरो 9421005546 vijaytoro47@gmail.com
(‘परिचित-अपरिचित दापोली तालुका’ या विजय तोरो यांच्या पुस्तकावरून उद्धृत)
————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here