दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. काळूराम मोहनलाल मालू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोलीच्या मान्यवर वीस-पंचवीस व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी दापोली अर्बन बँकेची स्थापना केली. त्यात पुढील व्यक्तींचा समावेश होता- य.श्री. खोत, ज.ना. मेहता, पी.के. मेहता, जी.बी. मेहता, ना.रा. जोशी, पै. आर.एल् खान, द.त्रि. परांजपे, र. उ. रखांगे, चं.शं. तलाठी, व.गो. सैतवडेकर, पि.गो. साबळे, शे. ह.अ. मणियार, गं.वा. मंडलीक, मु.गो. कोपरकर, ग.ना. दांडेकर, वि.दि. गाडगीळ, बा.ज. बुटाला, मो.म. धारिया, सु.बा. खेडेकर, शां.स. तोडकरी. बँकेच्या मान्यवर अध्यक्षांमध्ये संस्थापक काळुराम मोहनलाल मालू, वामनराव बर्वे, शैला मंडलीक यांच्यापासून डॉ. वसंत मेहेंदळे यांच्यापर्यंतच्या गावकऱ्यांचा समावेश होतो. जालगावकर हे अध्यक्ष गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आहेत.
बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली हे तालुक्याचे ठिकाण होते, तरी सर्व व्यापार हा दाभोळ व हर्णे या बंदरांमधून होत असे. पण जलवाहतूक बंद झाली. रस्ता वाहतूक वाढली. मुख्य मध्यवर्ती ठिकाण म्हणून दापोलीचा भूभाग महत्त्वाचा झाला. आंबा, काजू, नारळ, सुपारी व मत्स्यव्यवसाय हे त्या भागाचे मुख्य आर्थिक स्रोत होते. त्यांची बाजारपेठ मुंबई व पुणे अशा शहरी भागात होती. ती शहरे रस्ता मार्गाने गाठणे सोपे झाले. बँकेची वाढ ही आरंभी संथ गतीने होत होती. रोखीचे व्यवहार, सावकारांचा अर्थपुरवठा अशा गोष्टी गावकऱ्यांमध्ये सर्रास होत्या- सोप्याही होत्या, पण त्यात लबाडी होती- लुबाडणूक होती. हे कळण्यास व पटण्याससुद्धा वीस-पंचवीस वर्षे लागली !
शहरातील काही तरुण, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा संचालक मंडळामध्ये समावेश 1987 साली झाला. बँकेची निवडणूक पंचवार्षिक असते. नव्या संचालक मंडळात निवासशेठ केळसकर, डॉ. अनंत परांजपे, शांताराम टोपरे आणि जयवंतशेठ जालगावकर हे निवडून आले. पैकी जालगावकर हे समाजाच्या सुखदुःखाची संवेदना अधिक जवळून जाणणारे गृहस्थ. जालगावकर हे बँकेचे अध्यक्ष पहिल्यांदा 1992 साली झाले. त्यांनी बँकेच्या धोरणात आणि कामकाजात आमूलाग्र बदल केला. त्यांनी बँकिंग सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाईल अशा धोरणाचा अवलंब केला. बँकेच्या शाखा दापोली शहर व मच्छिमार बंदर हर्णे अशा दोनच होत्या. जालगांवकर यांनी बँकेचा शाखाविस्तार जवळचा तालुका मंडणगड, बागायती क्षेत्र केळशी, व्यापारी पेठ खेड, जिल्ह्याचे ठिकाण रत्नागिरी, महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण भरणे, मच्छिमार बंदर दाभोळ व बुरोंडी, गुहागर, शृंगारतळी, चिपळूण खेर्डी आणि रायगड जिल्ह्यातील गोरेगाव अशा विस्तृत परिसरात केला; म्हणजे बँकेला नाव दापोलीचे, परंतु तिचे व्यवहार आजुबाजूच्या तालुक्यांत, अगदी जिल्हा केंद्रापर्यंत पसरले. त्यामुळे बँक सर्वसामान्य माणसापर्यंत पोचली.
राज्यभर प्रगतीचे वारे वाहू लागले होतेच, ते दापोलीलाही त्याच काळात पोचले. दापोली तालुक्यात कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस् कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायन्स फॅकल्टीमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरी, पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. शिक्षणाचा तो आर्थिक भार मोठा असे. गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होई. ती उणीव बँकेने हेरली. शिक्षण सुविधा हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय. बँकेने तेथे अचूक स्पर्श केला. बँकेने पुढाकार घेतला- सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !
बँकेने तेव्हापासून जनतेच्या जीवनाजवळच्या अर्थव्यवहारांना हात घालणे सतत चालवले आहे. केंद्र सरकारने गृहिणींसाठी दोन हजार रुपयांत गॅस कनेक्शन अशी योजना 1999 साली जाहीर केली. बँकेने त्या योजनेत महिला सभासदांनी सहभागी व्हावे म्हणून कमी व्याजदराने प्रत्येकी दोन हजार रुपये कर्ज देऊन त्याचा मासिक हप्ता साठ रुपये म्हणजे दिवसाचे फक्त दोन रुपये ठेवला ! ती योजना सभासद महिलांना योग्य तऱ्हेने समजावून दिली. त्यामुळे बँकेच्या कर्जदार महिलांची संख्या साडेसात हजार इतकी झाली. त्या कर्ज योजनेमुळे सर्वसामान्य ग्राहक बँकेशी जोडला गेला. पुन्हा दिलेले कर्ज हे शंभर टक्के वसूल झाले, हे त्या योजनेचे वैशिष्ट्य !
काळ पालटत होता. गावाकडील अर्थव्यवहारही नवनवी क्षेत्रे काबीज करू लागला होता. त्याचे प्रतिबिंब बँकेच्या 2004 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमटले. डॉ. प्रशांत मेहता, दत्ताराम चोगले या जुन्या संचालकांबरोबर सुभाष मालू, अशोक वाडकर, पर्यटन क्षेत्रात काम करणारे शैलेश मोरे, आंबा व्यापारी अन्वर रखांगे, नर्सरी उद्योजक तुकाराम जागडे आणि ग्रामीण उद्योग आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रातील मी- माधव शेट्ये असे नवे संचालक झाले. संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये घर तेथे शौचालय अशी सर्वसामान्य माणसाच्या गरजेची योजना बँकेने राबवली. कर्ज दोन हजार ते दहा हजार रुपये आणि हप्ता साठ ते तीन हजार रुपये. पुढे, 2005 साली महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्यक्रमात तशाच प्रकारच्या योजनेचा समावेश केला. त्याही योजनेमध्ये बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के झाली !
दापोली तालुक्याला असलेला निसर्गरम्य व स्वच्छ समुद्रकिनारा आणि त्या ठिकाणी येणारे पर्यटक हे लक्षात घेता पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा त्या भागात कमी होती. अध्यक्ष जालगावकर यांनी दापोलीचे लोकप्रिय राजकारणी बाबुराव बेलोसे यांच्या नावाने पर्यटन योजना राबवली. बाबुराव बेलोसे हे दापोलीचे माजी मंत्री होते. अध्यक्ष व संचालक यांनी पर्यटन परिसरात सभा-मेळावे घेतले; तीन दिवसांची कार्यशाळा घेतली. त्या जाणीवजागृतीमुळे दाभोळपासून केळशीपर्यंतच्या चौऱ्याहत्तर किलोमीटर परिसरात साडेचारशेपेक्षा जास्त एवढ्या निवासव्यवस्थेची साखळी तयार झाली आहे. त्यांतील काही हॉटेले ‘थ्री स्टार’ आहेत. त्यांतून दहा हजार एवढा स्थानिक रोजगार निर्माण झाला आहे. बाजारव्यवस्थेला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. दापोली हे पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. बँकेने चालना दिलेले हे अर्थक्षेत्र आहे.
बँकेने विद्यार्थ्यांना सायकल, विद्यार्थ्यांना देशात-परदेशात शैक्षणिक कर्जे, मच्छिमार महिलांना शीतपेट्या, अपंगांना व्यवसाय कर्ज अशा लोकांना उपयोगी आणखी काही कर्जयोजना आखल्या. त्यास अपघात विम्याचे संरक्षण कवच दिले. त्यामुळे सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा लाभला.
बँकेची टेबल बँकिंग योजना ही ग्राहकांना आकर्षण देणारी ठरली. ग्राहक (खातेदार) हा राजा म्हटले जाते, परंतु त्यास वागणूक गुलामाची मिळते हा कोणत्याही आस्थापनेतील अनुभव. परंतु दापोली बँकेने ग्राहकाला प्रथम बसण्यास खुर्ची दिली ! ती योजना बँकेने कार्यान्वित 2004 पासून केली. त्यामुळे ग्राहकांना खुर्चीत बसून व्यवहार करता येतात. त्यामध्येही ‘जनरल’ कक्ष, महिला कक्ष आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष अशी वर्गवारी आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग सेवेचा वेगळा अनुभव घेता आला. बँकेच्या सूक्ष्म वित्त पुरवठा योजना पाहण्याकरता देशी-परदेशी शिष्टमंडळे आली. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन बँक सर्वसामान्य माणसासाठी करत असलेल्या कामाची प्रशंसा केली. कोकणासारख्या ग्रामीण भागात सामाजिक भान ठेवून बँकिंग करणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे असेच मत अनेक मान्यवरांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.
बँकेने बँकिंगव्यतिरिक्त समाजाच्या गरजेसाठी वेळोवेळी काम केले आहे. फयान वादळामध्ये (2010) नुकसानग्रस्तांना तातडीची गरज म्हणून अन्यधान्य, कपडे व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच हजार रुपये अशी तातडीची मदत केली. खेड, चिपळूण परिसरामध्ये मोठया प्रमाणात पूर (2005 व 2021) आल्यामुळे पूर्ण बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. त्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले होते. बँकेने तातडीने सभा घेऊन पूरग्रस्त व्यापाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये व फक्त पंचनाम्याची प्रत या एका कागदावर कर्ज अशा रूपात आधार दिला. कोरोनासारख्या महामारीमध्ये (2020-21) सॅनिटायझर व मास्क यांचे आवश्यक तेथे वितरण केले. त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये पीपीई किट व गरम पाण्याचे मशीन आवश्यक तेथे दिले. निसर्ग वादळामध्ये (2021) कोकण किनारपट्टीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी जुन्या, शंभर वर्षांपूर्वीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तशा वेळी बँकेचे एकशेआठ कर्मचारी, अध्यक्ष व सर्व संचालक यांनी बागाबागांमध्ये उतरून आपदग्रस्तांना प्रत्यक्ष मदत केली.
बँक नुसते बँकिंग करत नसून ती समाजाचा भाग बनली आहे याची जाणीव लोकांना झाली. बँकेने स्वत:च्या नावलौकिकाबरोबर दापोलीच्या नावलौकिकात भर घातली आहे !
– माधव रा. शेटये 9422382059 marshlin23@gmail.com
———————————————————————————————-