भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे.
उदाहरणार्थ आड: गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत. रहाट,आस, मुठ्या,बादली काढाना गळ, गळ टाकणे, गाळ काढणे, आड खोदणे, आड कोरणे, पुरूषभर पाणी असणे, खाटेचं सुम बुडण्याइतके पाणी असणे, (‘खाट’ही वस्तूही नामशेष होत असल्याने सुम हा शब्दही हरवून गेला), शिकाळी आदी शब्दांना मराठी भाषा लवकरच मुकणार आहे.
बैलगाडी: बैलगाडी लुप्त होत आहे. ती काही वर्षांनी कायमस्वरूपी नामशेष होईल. त्या पाठोपाठ मराठी भाषेतील कितीतरी शब्द मान टाकणार आहेत. साटलं,साटली, पांजरी,सावळा, जोतं,जुवाडं, दुशर (बैलाच्या मानेवर जुवाड ठेवण्याची जागा), आस,आर्या, दांडके,नांदनी (बैलांच्या पायाला चाक लागू नये म्हणून गाड्याला बांधलेली आडवी काठी),शिंगाड पाटली (गाडीवानाला बसण्यासाठी केलेली जागा),आखरी पेटी (आसावर बसवलेले चौकोनी लाकूड),तुंब (चाकाचा मध्यभाग),धाव बसवणे, वंगन,नळा, गेज,आरी, नाथ, माथोट्या, श्याम्या, काकडा,शेल, गाडं,चकारी, छकडं,आंड ठेचणं, बैल जुंपणं,बैल दाव्याला बांधणं, बैलांना पानी दाखवणं (बैल पाण्यावर नेणं),(बैलगाडीला वा औताला जोडलेले बैल हाकलण्यासाठी हट,हय, च्यच्य) आदी शब्द भाषेतून लुप्त होणार आहेत. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ ही म्हणही अर्थलुप्त होईल.
बाजरी-गहू काढण्याची पद्धत: बाजरी,गहू आणि इतर धान्ये काढण्याची पारंपरिक पद्धत बंद होऊन धान्ये मशीनने काढण्याची सुरूवात झाल्याने भाषेतील अनेक शब्द,वाक्प्रचार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. खळं तयार करणं,खळं सारवणं, वडांग करणं,शिडं पडणं, शिडं बुजणं, वडांग शाकारणं, उढी रचणं,उढी फोडणं, पेंढी बांधणं,पेंढी फोडणं, बाजरी खुडणं,पाथ धरणं, मुचकं बांधणं,कणसं कांडणं, च्याहूर,फावडं, पाट्या देणं,डालकं, साबडं,उपणणं, रास,व्हका घेणं, उप्त घेणं,चिड्या उडवणं, मोगरी, वार्याची वाट पाहणं आदी.
जुनी घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून घरांच्या संदर्भातील अनेक संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत. घर शेणाने सारवणं,सडा टाकणं, पोतारणं, भुई घेणं, भुई पिटणं, पिटणी, चिरी, सरी, कड्या, किलचन, आडेकडे, साने, खांब, कमान, पांजडानं सपरं, छप्पर, झ्याप, सैडन, कवाडी, कवाड, कुस, नाल, कुमई, खारी, धाब्यावर खारी टाकणं, धाबं निंदणं, पंडाळ, घर गळणं, धाब्यावर नळा बुजायला जाणं, कौलारू घर, पांजडानं घर, पत्रासनं घर, धबानं घर, पाटाईनं घर, इटासनं घर, माडीनं घर, रद्दान्या भितडा, शिडी, बोळ,पडवी, पायथोर्या, कोस आदी शब्द घराची रचना बदलल्याने आणि सिमेंटचा वापर होऊ लागल्याने संपुष्टात आले आहेत.
घरातील पाटा गेला म्हणून पाटा या शब्दासह,वरवंटा, वाटणे,ठेचणे, चयडणे हे शब्द गेले. कैरीचा ठेचा गेला. मिरचीचा ठेचा कालबाहय झाला. घरातील खलबत्ता गेला म्हणून खलबत्त्यासह मुसळी, कांडणं,कुटणं, दणका देणं हे शब्द गेले.
घरातील घरोट गेला म्हणून घरोट शब्दासह घट्या,जातं, भरडकी,भरडणं, दळणं,घरोट बसवणं, घरोट उपटणं,खुटा, दांडा,माकडी हे शब्द लुप्त झाले. ‘हरण पळे दुध गळे’ हा उखाणा यापुढे कोणाला कळणार नाही आणि मुख्य म्हणजे जाते नामशेष झाल्याने जात्यावरील असंख्य ओव्या,म्हणी, उखाणे, आन्हे नामशेष झाल्या. घरातील उखळ गेला म्हणून उखळ या शब्दासह मुसळ,कांडणं हे शब्द गेले. लाकडाचा नांगर,पांभर, वखर,औत धरणे आजच नामशेष झाले आहेत. लोखंडाचे फणतोले,कुदळ, पहार,फाळ, पास ह्या वस्तू आणि पर्यायाने भाषेतील शब्दही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विळा, खुरपनं, कुर्हाड, टिकम आणि पावडी या वस्तू अजून तरी पाहण्यास मिळतात. मळ्यातील मोट इतिहासजमा झाली म्हणून मोटेवरील प्रासादिक गेय गाणी कायमची लुप्त झाली.
या सर्व वस्तू बनवणारे विविध कारागिर रस्त्यावर आले ते वेगळेच. घरातील भाकरींची डालकी गेली म्हणून अड्याकड्याला टांगून ठेवण्याची शिकाळी (घराच्या छताला लाकडी चौकटीच्या बाजूला दोरी बांधण्याची व्यवस्था) गेली. भाकरींच्या डालकीतून कुत्र्या- मांजरांनी भाकरी पळवू नये म्हणून शिकाळीची सोय असायची. धाब्याच्या ग्रामीण घरातील सानं (चूलपेटवल्यावर धूर जाण्यासाठी घर बांधताना केलेली व्यवस्था) गेलं. घरात वा घराबाहेर बांधलेला झोका गेला म्हणून झोक्यावरची असंख्य गाणी विस्मरणात गेली. घरात वापरण्याचा समार आहे पण तो बाजारातून आयता येतो. समार करण्याची पद्धत विस्मरणात चालली. मिरचीचा साधा लाल समार घरात केला जात नाही, आयता आणतात. लाल समाराला तिखट म्हणतात. पूर्वीचे तिखट नव्या जमान्यात मिरचीची पावडर झाली आहे, ती बाजारातून आयती आणली जाते. हिरव्या मिरच्या पावशीने कापल्या जात नाहीत,चाकूने कट केल्या जातात. म्हणून घरातून पावशी गुप्त झाली. ग्रामीण महिलांनी नऊवारी लुगडं नेसणं सोडताच कंबळकाच,बटवा,कंबरनी पिसोडी आदी शब्द गेले. भाकरी करण्यास लाकडातून कोरलेली काठोख कोणी वापरत नाही. म्हणून काठोख या वस्तूसह भाषेतील महत्त्वपूर्ण- सौष्ठवयुक्त शब्द लुप्त झाला.
ग्रामीण भागात शेती अजूनही बर्याच प्रमाणात पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने शेतीची मेर म्हणजे काय हे सर्वसाधारण माणसाला समजते. भोद,सारंग, बांध, निंदनं,खुरपनं, गव्हान,बंधनी, वाफा,बेले, बारा देणं, सोला, साकरू, चिचना हांगोडा, कैरीस्ना घड, चिचोक्या, कोयी, सरकी, तन, बोचकं, गागा बसनं,डाभुर्ल, आबगा,जथापत, गेदू,ल्हाव करनं, पघळनं,फसकारा करणं, बाशी,याळ, पुल्हाळ, रामपहार,तिसरा पहार, चिपडं पडनं,आखठं करनं, कठान घेणं,हरभरा घेवाले जाणं, बाजरीवरल्या चिड्या उडावाले जाणं, आरन्या आदी शब्द वा वाक्प्रचार अजून तरी तग धरून आहेत.
ग्रामीण भागातील रोज वापरले जाणारे काही शब्दधन मात्र लोकांच्या अंगवळणी पडलेले दिसते. उदाहरणार्थ, वैचा जायेल,लसूनचोट्टा, चोखांडभर,उल्हानं देनं, शिळागार, कडीजखडीना,वरमाड, मोचडं,डांजनं, दिवाबत्ती करणं, चिपडं पडणं, खुशाल, शिमर्या तानणं, हयाती रहाणं आदी शब्दसंपदा तर वयाने चाळीस- पन्नासच्या घरात असलेली पिढी थोडीफार समजू शकतो.
तसे शब्दधन शाबूत असल्यानेच ग्रामीणप्रधान व शेतीप्रधान रांगडी मराठी भाषा अजूनही जिवंत भासते. पुढे मागे न्यूनगंडाने या शब्दांची लाज वाटण्यास लागली की मराठी भाषेचा पाया धसत सांगाडा ढळण्यास लागेल. लोकसंस्कृतीतील घटक नाहीसे होताच भाषा लयाला जाऊ लागते, अथवा उसन्या शब्दांचे नवे वळण घेत कात टाकते. भाषेतील जुने शब्द पूर्ण लुप्त झाल्याने, त्यात भाषेचे नुकसानच होत असते. भाषेतील जुने शब्दधन जतन करत नव्या शब्दांचेही (इतर भाषेतीलसुद्धा) स्वागत करते ती भाषा समृद्ध होते.
(‘मराठी संशोधन पत्रिका’, जानेवारी-फेब्रुवारी-मार्च 2020 वरून उद्धृत, संस्कारित)
——————————————————————————————————–
अतिशय सुंदर…
सरजी, मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रेममय शुभेच्छा!💐आपला लेख वाचला.शेतीसंबंधात वापरलेले विविध शब्द वाचतांना मला माझे ५० वर्षापुर्वीचे ग्राम्य व कृषी जीवन आठवले.लेख मनाला भावला…👍
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
डाॅ.सुधीर देवरे साहेबांचा हा लेख खुप आवडला.या लेखाने मला भुतकाळात नेले .मल माझे धाकलपन आठवले .माझी मातृभाषा अहीराणी आहे .काही अहीराणी शब्द मी पण विसरलो होतो .जुने शब्द वाचून खुदकन हसू आले . सिन्नर मध्ये आम्ही खान्देशी लोकांनी एकत्र येत अहीराणी भाषा उत्कर्ष मंडळ स्थापन केले आहे या लेखातील काही शब्द बिगर अहीराणीभाषिक लोकांना कदाचित कळणारही नाहीत मायबोलीतले जुने शब्द वाचून समाधान वाटले .
आदिवासी तडवी भील संस्कृति ची * तडवी * भाषा हीव इतर आदिवासी भाषा आज 1-2 दशकात नामोशेष लुप्तप्राय होणेचे मार्गावर आहे यात तडवी, पावरी, मुंडा, संथाली इत्यादि आदिवासी भाषा जगविण्याचे काम करते आहे तसेच मी आदिवासी जागर ही पत्रिका चालवित आहे तसेच खानदेशातील अहिराणी तावडी इत्यादि भाषा जगविण्याचे काम झालं पाहिजे मी व काही जन हे काम करते आहे आपलं लेख आवडला 40-45 वर्षा पूर्वी भाषा तील जुने शब्द नाहीसे झाली भाषा लिपिबद्ध केलं जावी मी नोकरी प्रपंच आजारपण हे साभाडून काम करते आहे सर आपलं अभिनंदन व शुभेच्छा
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
फार चांगले, विचार करून आणि विचार करायला लावणारे लिहिले आहे. मरणपंथाला लागलेले व मरण पावलेले शब्द योग्य वेचून भाषा आणि संस्कृतीचा अन्योन्य संबंधही योग्य प्रकारे अधोरेखित केला असल्याने लेख आवडला. -डॉ. अरुण प्रभुणे, अमेरिका
फार चांगले, विचार करून आणि विचार करायला लावणारे लिहिले आहे. मरणपंथाला लागलेले व मरण पावलेले शब्द योग्य वेचून भाषा आणि संस्कृतीचा अन्योन्य संबंधही योग्य प्रकारे अधोरेखित केला असल्याने लेख आवडला. -डॉ. अरुण प्रभुणे, अमेरिका