मुधोजीराजे यांच्याकडे फलटण संस्थानाची गादी 10 फेब्रुवारी 1860 रोजी आली. मुधोजीराजे हे कार्यक्षम आणि तळमळीचे राजे होते. त्यांनी फलटणला एक आदर्श संस्थान 1860 ते 1916 या कालावधीत बनवले. मुधोजीराजे हे विसाव्या शतकातील पहिले राजे. महाराष्ट्रात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला त्या काळात आरंभ झाला होता. इंग्रजी शिक्षण घेतलेले नवशिक्षित, सुधारकी विचारांचे तरुण समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या खटपटीत होते. मुधोजीराजांनी बदलत्या काळाची पावले ओळखून संस्थानात बदल सुरू केले. त्यांच्या काळात फलटणच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला गेला. त्यांनी शिक्षणास प्राधान्य दिले. त्यांनी फलटणमध्ये मराठी शाळांची संख्या वाढवली. त्यांनी इंग्रजी शाळाही सुरू केल्या. त्यांचा विचार शिक्षणाचा लाभ सर्व जातीजमातींपर्यंत पोचला पाहिजे असा होता. त्यांनी फलटण संस्थानातील सर्व शाळांमध्ये मागासवर्गीयांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली, तसेच त्यांना मोफत पाटी-पुस्तके-वह्या यांच्या वाटपाची पद्धत सुरू केली. त्यांनी संस्थानात सर्वत्र मोफत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्याचे धोरण 1907 पासून राबवले. त्याचा परिणाम असा झाला, की फलटण संस्थानात पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. मुधोजीराजे यांनी मुलांबरोबरच मुलींनाही शिक्षण मिळण्यास पाहिजे या विचारातून मुलींसाठी शाळा काढल्या.
त्यांनी शेतीतही लक्ष पुरवले. त्यांनी शेतीचा महसूल हे संस्थानाचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे हे लक्षात घेऊन 1883-84 मध्ये स्वतः काही गावांना भेटी दिल्या आणि जमाबंदी केली. स्वतः राजाने जमाबंदी करण्याची फलटण संस्थानाच्या इतिहासातील ती पहिलीच घटना होय. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अल्प दराने कर्ज आणि दुष्काळात तगून राहण्यासाठी तगाई देण्याची सुरुवात केली. ते ती मिळताना प्रजेची छळणूक होऊ नये याकडे जातीने लक्ष देत. त्यांनी नगरपालिका फलटणमध्ये 1868 मध्ये स्थापन केली. त्यांनी त्याद्वारे रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती, बाजारपेठ अशा अनेक व्यवस्था निर्माण केल्या.
फलटणचा तत्कालीन सर्वात तीव्र प्रश्न म्हणजे पाणी. फलटणमध्ये पाण्याची तीव्र कमतरता जाणवत असे. मुधोजीराजांनी फलटणवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांनी सहा मैल दूरवर असलेल्या निरगुडी या गावातील भूमिगत झऱ्यापासून लोकांच्या घरोघरी लोखंडी नळांनी पाणी पोचवले आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून नावलौकिक मिळवला. मुंबई सरकारने मुधोजीराजांना मुंबई लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्यत्व; तसेच, 1911 साली ‘सीएसआय’ हा किताब बहाल केला.
मुधोजीराजे यांचे चिरंजीव व्यंकटरावराजे यांचे 1887 साली निधन झाल्यामुळे गादीचा वारसदार म्हणून मुधोजीराजांनी त्यांचे नातेवाईक रघुनाथराव यांचा मुलगा नारायण यास दत्तक घेतले. तो चुणचुणीत, हुशार आणि रुबाबदार मुलगा होता. नारायणाचे नाव मालोजीराजे असे दत्तक विधानाच्या वेळी ठेवले गेले. मुधोजीराजे यांचे निधन 1916 मध्ये झाले. मुधोजीराजे यांच्या निधनानंतर त्यांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक सुधारणांचा वारसा त्यांचे पुत्र मालोजीराजे यांनी तितक्याच समर्थपणे पुढे नेला.
– अंजली कुलकर्णी 9922072158 anjalikulkarni1810@gmail.com
——————————————————————————————————————-