Home गावगाथा बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature...

बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two neighbouring villages- Kakachiwadi and Bagani, Maharashtra)

12

काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काकाचीवाडी हे गाव पूर्वी वेगळे, स्वतंत्र नव्हतेच. बागणीमध्ये काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी, रोजावाडी व पांढरमळा ही गावे एकत्रित होती. ती गेल्या चार दशकांत स्वतंत्र झाली आहेत. ती सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रामपंचायती आहेत. बागणीहे मूळ गाव चार हजार लोकसंख्येचे आहे, काकाचीवाडी तेवीसशे लोकवस्तीचे, तर बाकी गावे प्रत्येकी आठशे-हजार लोकवस्तीची असतील. बागणी व काकाचीवाडी या गावांत एकाद्या किलोमीटरचे अंतर असेल. बाकी तीन गावे काकाचीवाडीपासून त्याच्या दुप्पट अंतरावर आहेत. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे हिंदू-मुस्लिम लोक धार्मिक समुदाय एकत्र, एकात्म भावनेने राहतात. मराठा समाज सर्वात जास्त आहे. त्या खालोखाल मुस्लिम, धनगर व नंतर माळी. मुस्लिम वस्ती ही सर्वत्र बऱ्यापैकी विखुरलेली आहे. संपूर्ण गावात ठोके, ढोले, मालेकर, घोरपडे, खुडे, जाधव, यादव, डाळे, क्षीरसागर, गावडे, माने, फकिर, महाब्री, जमादार, गवंडी, सुतार, कोळी, माळी अशा आडनावांचे हिंदू-मुस्लिम राहतात. काकाचीवाडीची ग्रामरचना अर्धवर्तुळाकार आहे. बागणी व काकाचीवाडी यांच्या सीमा जेथे मिळतात तेथे बस स्टँड आहे. स्टँडला लागूनच मराठी मुलांची शाळा नंबर एक व मुलींची शाळा नंबर दोन आहेत. त्या स्टँडला मूळचे तीन रस्ते फुटले आहेत : एक आष्ट्याकडे, दुसरा काकाचीवाडी गावाकडे व तिसरा बागणी गावाकडे जातो. काकाचीवाडी गावच्या रस्त्याला थोडे पुढे गेले, की चार फाटे फुटतात. ते सारे गावात शिरतात. एक बिरोबा मंदिराकडे जातो. त्या रस्त्यास धनगर वस्ती आहे. याच परिसरात गावची ग्रामपंचायत व पहिली ते चौथी शाळा आहे. दुसरा जाधव गल्ली तेथे मराठा समाज आढळतो. काही मुस्लिम कुटुंबे आहेत. तिसरा फाटा बिननावाचा. त्यावर मुस्लिम समाज जास्त आहे. त्या रस्त्याला मशीद आहे. चौथा फाटा मारुती मंदिराच्या दिशेने जातो. त्यावर मराठा, धनगर, मुस्लिम अशी वस्ती आहे.

गावामध्ये रस्त्यांची नावे धनगरांची गल्ली, ठोक्यांची गल्ली,मालेकरांची गल्ली, मुस्लिमांची गल्ली अशी आहेत. त्यात संगती नाही, पण त्यावरून गावपरिसराची ओळख होते. त्या हद्दीत येणाऱे काही लोक प्लॉट पद्धतीनुसार गावातून जाणाऱ्या वडगाव-आष्टा रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूंस राहतात. तेथे परत एक वेळ हिंदू, त्यांच्या उपजाती व मुस्लिम आहेत. तेथेच लोहार आहेत. ते जनावरांना नाला मारणे, विळा-खुरपी बनवणे, हत्यारांना धार लावणे अशी कामे करतात. त्या वस्तीस फलाटावर हा शब्द प्रचलित आहे. पूर्वी तेथे दहावीस कुटुंबे दिसत, पण सध्या पन्नास-साठ कुटुंबे आहेत. ते गावाच्या प्रगतीचे लक्षण आहे. तेथे लोहार, माने, फकीर, पट्टेकरी, लोखंडे, कांबळे, जाधव, क्षीरसागर, डाळे, गुरवअशा सर्व जातिधर्मांच्या आडनावांचे लोक राहतात. त्या लोकांचे शेती, रोजंदारी, पार्लर, शिलाईकाम, किराणा दुकान, भाजीपाला विक्री, डॉक्टर, वकील, इंजिनीयर, शिक्षक, गवंडी आहेत. त्याच रस्त्यावर काही स्टेशनरी दुकाने, सेतू सेवा केंद्र, मेकॅनिक दुकाने आहेत. रोजंदारी वर्ग, कुक्कुटपालन, मेंढीपालन, मासेमारी, पावभट्टी, पशुपालन, शिलाई (टेलर), कंपनी कामगार, दळण गिरणी असे विविध नोकरी-व्यवसाय करणारे लोक राहतात. गावात कासारांची कुटुंबे एकदोन आहेत. गावातील सर्व स्त्रियांची बांगड्या भरण्याची मागणी त्यांच्याकडे असते! काही स्त्रिया त्यांच्या घरी जाऊन बांगड्या भरतात तर काहीजण त्यांना घरी बोलावतात. गावात गुरव कुटुंबे दोन-तीनच आहेत. ते लोक हनुमानमंदिरात पूजा करतात. तकियात मुसलमान व बिरोबाच्या देवळात धनगर लोक त्यांचे पूजाविधी वगैरे धार्मिक कार्य करतात. बांबूच्या टोपल्या,बुट्ट्या वगैरे करणारे कुटुंबही एकच आहे. पण तेही बाहेरगावाहून आलेले व येथे स्थिरावलेले आहे. काकाचीवाडीत पूर्वी एक देवर्षी होते. ते वारल्यानंतर आता कोणी नाहीत. लोक त्यांच्याकडे जाऊन भविष्याबाबत विचारपूस करत असत. अगदी दूरवरून लोक येत. आता लोक त्यांची ती गरज कशी भागवतात ते कळत नाही. डावीकडे राजारामबापू पाटील साखर कारखाना व महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे ऑफिस आहे. त्यास लागूनच आठवी ते दहावीपर्यंतची न्यू इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. गावातील मुले तेथे शिकतात वा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (बागणी) येथे जातात.

भगवा झेंडा चौक

 

आष्टा-वडगाव रस्त्याने भगवा झेंडा चौक समोर ठेवून काही अंतर चालले असता उजवीकडे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे, तर डावीकडे ईदगाह. त्या परिसरात नारळाची बाग, समाधिस्थळ ही ठिकाणेही आहेत. तोच रस्ता पुढे वडगाव-आष्टा रोडला भगवा झेंडा चौक येथे मिळतो. त्या परिसरात बागणी व काकाचीवाडी गावांचे सामायिक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. भगवा झेंडा चौकातून समोर पाहिले असता नागाव रोड दिसतो. तेथे काही अंतरावर धनगर वस्ती आहे. त्यानंतर माळीवस्ती लागते. माळी लोकांमध्ये घरे शेतांमध्येच बांधून राहण्याची प्रथा पूर्वीपासूनची आहे. बहुसंख्य माळी लोक त्यांच्या शेतात घरे बांधून गावाबाहेर, निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.

गावाला पाणी पुरवठा वारणा नदीचा होतो. पाण्याची टाकी मात्र बागणी हद्दीत आहे. काहींच्या स्वतःच्या विहिरी व बोअरवेल आहेत. लोकांनी त्यांची घरे ऐपतीनुसार बांधली आहेत, त्यामुळे ती वेगवेगळी दिसतात- बंगले, इमारती तर काही कौलारू घरे! काही कुटुंबे प्रत्येकी छोट्या दहा बाय दहाच्या खोल्यांमध्येही राहतात. पूर्वी कौलारू घरांचे प्रमाण जास्त होते. पण सध्या इमारती व पत्र्यांच्या घरांचे प्रमाण वाढत आहे. घरे बांधण्यासाठी दारिद्र्यरेषा व घरकुल योजनेअंतर्गत शासनाची गावातील लोकांना मदत झाली आहे. घरांवर खोपटी, ऊसाचा पाला व ताडपत्री घालण्याची पद्धत पूर्णत: गेली आहे. लोकांच्या हाती थोडाफार पैसा खेळता राहत आहे.

तकिया

 

काकाचीवाडी हे गाव विविध धर्म, व्यवसाय, गृहरचना, आडनावे व समाजस्थळे यांनी संमिश्र आहे. सर्व लोक एकमेकांच्या सणांत सहभागी होतात. सार्वजनिक गणपती बसवले जातात. जेथे गणपती बसवले जातात तेथे मिरवणुकीचे मार्ग ठरलेले असतात. गावाचे चार रस्ते जेथून निघतात त्या जागेवर मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे वा मुलांचे डिजिटल स्वरूपातील फोटो त्याच चौकात कौतुक म्हणून लावले जातात. काकाचीवाडी हे गाव स्त्री-पुरुष समानतेचे; तसेच, मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबतसुद्धा समानतेचा दृष्टिकोन असणारे आहे. विविध राजकीय पक्षांचा प्रभाव तेथे आहे. हे गाव स्त्रियांनासुद्धा राजकारणामध्ये सक्रिय सहभागाची संधी देते. लग्नसमांरभ व गणपतीच्या मिरवणुका संपूर्ण काकाचीवाडी गावात निघतात. गावात लहान-मोठी मिळून चार-पाच मंदिरे आहेत. गावात हिंदूंमधील विविध जातीं-उपजातींची समाजमंदिरेही आहेत. गावात भोंगा पद्धत नाही पण मशिदींमध्ये अजान होते. गावास ग्रामपंचायतीद्वारे कामानिमित्त दवंडी असते. गावात रोगराई पसरू नये म्हणून त्या त्या वेळी औषधवाटप व फवारणी होते. गावात तंटामुक्ती समिती आहे. त्याद्वारा गावातील वाद सोडवले जातात. लोक खरोखरीच कोर्ट-कचेरीपर्यंत जात नाहीत. गावातील दोन मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचे काम करत आहेत.

बागणीची जहांगिरी बेळगाव प्रांतातील देसाई सरकारांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना बक्षीस स्वरूपात पेशवाईच्या काळात मिळाली होती. त्यांना ती व्यवस्थेच्या दृष्टीने झेपत नव्हती, म्हणून त्यांनी मंत्री सरकारांना कारभारी म्हणून नेमले. तेच तेथील संस्थानिक झाले. त्या मंत्री सरकारांपैकी कोणीच आता इकडे नाही. बागणीचा भुईकोट किल्ला हा 1654 च्या आधीचा आहे. आदिलशहाने पन्हाळ्यावर नजर ठेवण्यासाठी दक्षिणेकडील शेवटचा किल्ला म्हणून बागणीचा भुईकोट किल्ला बांधला अशी नोंद आढळते. आता तो प्रत्यक्षात नाही. काही अवशेष आहेत. किल्ल्यावर 1951पर्यंत वस्ती होती व तेथूनच व्यवहार चालायचा. कालांतराने भुईकोट किल्ल्याची नासधूस झाल्याने गावचा सर्व व्यवहार विस्तारू लागला. त्यानंतर मात्र किल्ल्याच्या आसपास वस्ती व वाड्या वसल्या. समर्थ रामदास स्वामींनी बांधलेल्या एकवीस मारुती मंदिरांमध्ये, बागणीतील हनुमान मंदिराचा समावेश होतो. तो समावेश छत्रपती संभाजी महाराजांच्या विनंतीवरून झाला असे म्हणतात. बागणी ग्रामपंचायत लॉर्ड कर्झनच्या काळात, 14 एप्रिल 1914 रोजी स्थापना झाली.

बागणी हे नाव कसे पडले त्याचे लिखित स्वरूपात पुरावे नाहीत. पण बागायती क्षेत्र हे शिगाव, कवठेपिरानदुधगाव या आसपासच्या गावांपेक्षा बागणीत जास्त असल्यामुळे बागणी हे नाव पडले असावे. तर काकाचीवाडी हे नाव कसे पडले हेही निश्चितपणे सांगता येत नाही. बागणी विकास सोसायटीची स्थापना 1914 मध्ये झाली. तेव्हा पांढरमळा, रोजावाडी, काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी हे बागणीतील वॉर्ड एकमध्ये होते. ते 1992 पर्यंत चालत आले. त्या गावांना महसुली दर्जा द्यावा असा नियम आल्यानंतर, 1992 मध्ये काकाचीवाडी स्वतंत्र झाली व पहिले सरपंच म्हणून भीमराव खुडे निवडून आले. गावास शहिदांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. कारण गावातील बरेच लोक सैन्यात होते म्हणे पैकी गावातील हुतात्मे म्हणून राजाराम चव्हाण यांचे नाव सांगितले जाते. त्यांचे वंशजही मिलिटरीमध्ये होते. बागणी-काकाचीवाडी गावातील मान्यताप्राप्त मंडळी म्हणजे वि.स. पागे, कृ.भा. बाबर, सरोजिनी बाबर, शिवशाहीर रमजान बागणीकर ही होत. गावाला कुस्तीची परंपरासुद्धा आहे. त्यात हसन मनेर, बाबुतात्या शेटे, शंकरराव दाभोळे, बसलिंगदादा शेटे, बस्लिम शेटे, गणू बाळा माळी यांनी छाप उमटवली आहे.

काकाचीवाडी हे मूळ गाव तसे छोटेसे. शंभर घरांनी युक्त. कोणत्या गावचे म्हणून विचारल्यावर लोक बागणी असेच नाव सांगत. वाडी साठ-सत्तर वर्षांपूर्वी मागासलेली होती. नागरिक शिकलेले नव्हते. घरांजवळ उकिरडे असत. पिण्याचे पाणी विहिरीत उतरून घ्यावे लागे. त्यामुळे नारू रोगाचा प्रादुर्भाव घरोघरी असे. साथीचे रोग वारंवार होत. आजारी माणसांना आष्टा या, पाच किलोमीटर अंतरावरील गावी न्यावे लागे. बागणी व आसपास वीस-पंचवीस गावांत दवाखाना नव्हता. वाडीत आड 1954-55 मध्ये खोदला गेला. तेव्हापासून नारू रोग समूळ नष्ट झाला. त्यानंतर लोकांचे आरोग्य सुधारले. शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. सुधारणा आल्या. राधानगरीची वीज बागणीत प्रथम 1958-59 ला आली; त्यानंतर काकाचीवाडीमध्ये 1968 साली आली. तोपर्यंत वाडीत रात्री अंधार असायचा. बागणी ग्रामपंचायतीकडून रॉकेलच्या दिवाबत्तीची सोय होत होती. वीज आल्याने दळणाची गिरण व किराणा मालाची दुकाने चालू झाली. लोकांचे राहणीमान सुधारले. शेतीस अनंत पाणीपुरवठा तर पिण्याच्या पाण्यासाठी जलस्वराज्य योजना आली. लोकांची प्रगती बागायती शेती आल्यापासून झाली. आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्यामुळे पूर्वीची दगड-मातीची घरे जाऊन बंगले बनले. विविध क्षेत्रांमध्ये तरुण नोकऱ्या करू लागले. वाडीत जनता सुखी-समाधानी जाणवते.

काकाचीवाडी गावास फुटलेले चार फाटे

गावाचे हवामान उष्ण आहे. गावाच्या सीमेस लागून गावातील लोकांची स्वतःची व इतर लोकांची शेती आहे. त्याचा फायदा म्हणजे गावातील सीमेवरील जवळच्या रहिवाशांना त्यामुळे पाणी मिळते. लोकांच्या पोशाखात आधुनिकतेनुसार फरक पडला आहे. काही हिंदू वृद्ध स्त्रिया नऊवारी लुगडी आणि पुरुष धोतर-सदरा व पांढरी गांधी टोपी घालणे विसरलेले नाहीत. पण बऱ्याच स्त्रिया व तितकेच पुरुष आधुनिक पोशाख घालतात. स्त्रियांच्या हाती दिसणाऱ्या भरगच्च हात भरून हिरव्या बांगड्या सुजलाम-सुफलाम स्थितीची आठवण करून देतात. मुस्लिम स्त्रिया व मुली साडी, पंजाबी ड्रेस, बुरखा घालतात. पुरूष गोल टोपी, पायजमा-कुरता वापरतात. त्यांच्याही पोशाखात कालानुरूप बदल दिसतो. आहारात फरक धर्मानुसार दिसतो. शाकाहारी व मांसाहारी जेवण आवडीचे आहे. काही लोक माळकरी, शिवलिंग दीक्षा घेणारे आहेत.

बिरोबा मंदिर

गावातील कमी लोकांना स्वत:ची मोठी शेती आहे. काहींकडे गुंठ्यातच आहे. काही वाटेकरी पद्धतीने शेती करत आहेत. गावात मुख्य पीक म्हणजे ऊस. तसेच सोयाबीन, आले, हळद, गहू, हरभरा ही पिके ऋतूनुसार दिसतात. भाजीपाल्यात विविधता टोमॅटो, वांगी, भेंडी, दोडका, फ्लॉवर, कोबी अशी दिसते. फुलबागा केवळ माळी लोकांच्या दिसतील. त्यात झेंडू,निशिगंध, गलाटा, आस्टर यांचे उत्पादन होते. काहींच्या फळबागा आहेत. त्यात प्रथम दिसते ती केळी. सर्वच लोकांच्या शेताभोवती नारळीची झाडे, शेवगा, पपई, आंब्याची झाडे, सीताफळ,चिकू, पेरू, रामफळ अशी झाडे दिसतील. गावात राहणाऱ्या लोकांनीही परड्यात फुलझाडे-फळझाडे लावली आहेत. भाजीमध्ये मेथी, शेपू व तांदळ आवडीची. पूर्वीचे कुरडू व पातर भाजी हे प्रकारही प्रचलित आहेत.

गावाला संमिश्र भाषासंस्कृती आहे;एकभाषा छाप नाही. हिंदू-मुस्लिम यांच्या दोन वेगवेगळ्या बोली भाषा गावात जाणवतात. त्या मराठी व हिंदी वळणाच्या आहेत, पण त्यांतही फरक आहे. मराठीमध्ये अगदी ग्रामीण बोलीसोबत शुद्ध बोलणारी कुटुंबे आहेत. मुस्लिम हिंदी भाषा तिच्या मूळ स्वरूपात न बोलता त्यांत बोली भाषेनुसार शब्दोच्चारांचे चढउतार आहेत. पण मुस्लिम लोक हिंदूंसोबत बोलताना मराठी भाषेचा वापर करतात. शिक्षित लोकांत काही इंग्रजी शब्द वापरले जातात. गावात सामाजिक व धार्मिक संस्था आहेत. त्यांतही हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसते. गाव सण-उत्सव कोणतेही राजकीय डावपेच न ठेवता पूर्वीपासून साजरे करते. गणेश मंडळे गल्लीनिहाय आहेत. गावावर येणाऱ्या अडचणीच्या प्रसंगी तरुण पिढी तत्पर असते. पिढीजात व्यवसाय सांभाळून नवीन प्रवाहात सामावून जाणारे लोक आधुनिक विचारांस तयार असतात. गावात बालविवाह करत नाहीत व हुंडा देणेघेणे यावर बंदी आहे. विविध राजकीय पक्षांचे वर्चस्व असूनही कोणताही राजकीय भाग दैनंदिन जीवनात येत नाही. घराणेशाही नाही. निवडणुका संपल्या, की लोक आहेत त्या पूर्वपदावर येऊन व्यवहार करतात. देणेघेणे वस्तुविनिमयाद्वारेही सुरू असते.

नगिना माळी 89752 95297 naginamali2012@gmail.com

नगिना सुभाष माळी या काकाचीवाडी येथे राहतात. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. त्या सध्या शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते.

——————————————————————————————————————————————————-

 

एस टी स्टँड

 

आष्टा-वडगाव या मूळ रस्त्याला काकाचीवाडीतून जोडणारा फलाटजवळील रस्ता

———————————————————————————————————————————–

About Post Author

12 COMMENTS

  1. नमस्कार,छान माहिती कळते आणि गाव,संस्कृती माणसे आणि राहणीमान उलगडत जाते

  2. निश्चीत असे पुरावे नाहीत.पण बागणीत राहणाऱ्या लोकांचे काका काकाचीवाडीत रहायचे यावरून ते नाव पडले असावे असे काही जाणकार सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version