शि.द. फडणीस यांचे फ्रेंच कनेक्शन (Cartoonist S D Phadnis’s French Connection)

1
225

रेमण्ड सॅविग्नॅक हे प्रसिद्ध फ्रेंच अभिजात उपयोजित चित्रकार होते. सॅविग्नॅक यांनी फ्रेंच ग्राफिक डिझाईन व जाहिरातकला या क्षेत्रात गेल्या शतकारंभी पन्नास वर्षेपर्यंत अतिशय उच्च दर्ज्याचे असे काम केले- नवे पायंडे पाडले. महाराष्ट्राच्या/भारताच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व असे की त्यांना समांतर अशी कामगिरी शि.द. फडणीस यांनी त्यानंतर सुमारे वीस वर्षांनी महाराष्ट्रात केली. त्यामुळे सॅविग्नॅक यांचे काम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी, 2002 मध्ये निधन पावले. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यावेळी एक वेगळाच प्रयोग घडवून आणला गेला. त्यामुळे त्यांचे कार्य विशेषत: पाश्चात्य जगात पुन्हा उजळले गेले.

फ्लोरेन्स रॉबर्ट या फ्रेंच उपयोजित कला इतिहासतज्ज्ञ. त्यांनी युरोपातील साठ यशस्वी उपयोजित चित्रकारांना त्या वेळी आवाहन केले, की त्या प्रत्येकाने त्याच्या त्याच्या स्वतंत्र शैलीतून, सॅविग्नॅक यांनी वापरलेल्या चित्रप्रतिमांच्या आधारे पोस्टर तयार करावीत ! त्या चित्रकारांनी फ्लोरेन्स यांच्या आवाहनास उत्साहाने प्रतिसाद दिला. ती साठ पोस्टरचित्रे होती. त्यांचा एकत्र संच ‘ट्रिब्यूट टू सॅविग्नॅक’ ह्या नावाने प्रसिद्ध केला गेला. वेगवेगळ्या चित्रकारांनी सॅविग्नॅक यांच्या दृक्प्रतिमांचा कल्पक वापर त्या साठ पोस्टरच्या संचात केला आहे व त्यांना सॅविग्नॅक जसे कळले तशी पोस्टरचित्रांची मांडणी केली आहे. फ्लोरेन्स भारतात आल्या होत्या. ही गोष्ट 2005-2006 सालची. माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला पोस्टरसंचाची कथा सांगितली. नंतर त्यांनी तो साठ पोस्टरांचा संच मला भेट म्हणून फ्रान्सहून पाठवलादेखील आणि मी थक्क झालो. मी ती चित्रे न्याहाळत असताना, मला ते सारे परिचयाचे वाटू लागले. त्यासारखी दृश्य प्रतिमांचा वापर करणारी चित्रे शि.द. फडणीस यांनी काढली असल्याचे माझ्या लक्षात आले ! मी फडणीस यांच्याबाबत फ्लॉरेन्स यांना कळवले. त्यांनाही आश्चर्य वाटले.

सॅविग्नॅक यांनी 1940 च्या आसपास ज्या प्रकारचे काम केले तशाच प्रकारचे काम शि.द. फडणीस यांनी महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे केलेले आहे ! त्यांनी मराठी मध्यमवर्गीय संस्कृती तशा वैश्विक भाषेत 1950 ते 1970 या व त्या नंतरच्या काळात प्रभावीपणे मांडलेली आहे. भारतातील हा मराठी चित्रकार जागतिक चित्रकलेच्या तोडीस तोड काम करतो हे लक्षात यावे यासाठी, मला सॅविग्नक यांचे काम आणि त्या प्रकारची चित्रकला यांना युरोपात मान्य झालेले महत्त्व वाचकांसमोर मांडावेसे वाटले. मी सॅविग्नॅक व शि.द. फडणीस यांच्या कलानिर्मितीवर आधारित शोधनिबंध ‘दृक्समांतर संस्कृतीचे रंग’ या विषयनामाने फ्रान्समध्ये 2006 साली सादर केला होता.

हे लक्षात घेतले पाहिजे, की युरोपात भित्तिचित्रकला (पोस्टर डिझाईन) व भेटकार्ड (पोस्टकार्ड) हे चित्रकलेचे प्रकार अभिजात पूर्वीपासूनच समजले जातात. भारतात पोस्टरांकडे उपयोजित अशी दुय्यम प्रकारची चित्रकला म्हणून पाहिले जाते. ते माध्यम जरी उपयोजित प्रकारात मोडणारे असले तरी चित्रकाराचा रोख सौंदर्यदृष्टीने चित्रे काढण्यावर असतो आणि तो विशुद्ध असतो. पिकासो, तुलू लोत्रेक यांच्यासारख्या अभिजात मानल्या गेलेल्या काही चित्रकारांनी त्या माध्यमातून तशा प्रकारची चित्रनिर्मिती केलेली आहे. ती उच्च दर्ज्याची समजली जाते. दुसरे तसे माध्यम आहे ते ‘इल्युमिनेटेड बुक’ किंवा ‘बुकमेकिंग आर्ट’. म्हणजे मराठीत सजावटकार म्हणून जो चित्रकार पुस्तकनिर्मितीमध्ये असतो तो. मराठीत र.कृ. जोशी, अशोक शहाणे यांनी मुख्यत: आणि बाळ ठाकूर, कमल शेडगे यांनी अंशत: तसे काम केले. विकास गायतोंडे नव्या जमान्यात तशी, जाणीवपूर्वक संवेदना जपत पुस्तकनिर्मिती करतात. त्यांना अरुण खोपकरसारख्या अस्सल लेखक-कलावंताची साथ मिळालेली आहे. युरोपात तशा कामास अभिजात चित्रकलेइतके महत्त्वाचे मानले जाते ! त्या निर्मितीमध्ये चित्रकलेतील कारागिरीबरोबर साहित्याची जाण, विशिष्ट चित्रशैलीची योजना, कल्पकता व विचारपूर्वक वापर या घटकांचा समावेश होतो.

युरोपमध्ये पहिल्या महायुद्धानंतर यंत्रज्ञान व तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्याचबरोबर नवी जीवनशैली घडत गेली. तिचा परिणाम म्हणून कला व रचनाशास्त्र यांत नवविचार होऊ लागला. यंत्राने घडवलेल्या वस्तू आणि औद्योगिक संकल्पना; तसेच, त्यावर आधारित विविध रचनाकृती यांचा प्रभाव जाणवू लागला. परिणामत: भौमितिक आकार व अवकाश ह्यांची सरमिसळ होऊन नवीन चित्रप्रतिमा शैली तयार झाली. त्याला ‘क्युबिस्ट आयडियाज’ किंवा ‘क्युबिझम’ म्हणतात. पिकासोसारख्या चित्रकारांनी त्या शैलीचा आविष्कार केला. ‘क्युबिझम’चा प्रभाव ग्राफिक डिझाईनसारख्या उपयोजित कलाप्रकारांवर अधिक पडला. एडवर्ड मॅकनाईट (अमेरिका) व ए.एम. कॅसांड्रे (लंडन येथे कर्मभूमी) ह्या दोघांच्या चित्रांतील शैलीच्या प्रभावातून सॅविग्नॅक यांनी उपयोगात आणलेल्या चित्रशैलीचा जन्म झाला आहे असे म्हणता येईल. फडणीस यांनी ती शैली उत्स्फूर्तपणे पकडली हा त्यांच्या प्रतिभेचा भाग होय.

कॅसांड्रे हे वयाच्या चौदाव्या वर्षी फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले. त्यांना वयाच्या एकविसाव्या वर्षी हाचार्ड आणि सीइ प्रिंटिंग फर्मची पोस्टर तयार करण्याची मोठी ऑर्डर मिळाली. त्यातून त्यांचे शिक्षण व त्यांची मिळकत यांचा प्रश्न सुटला. कॅसांड्रे यांनी 1923 ते 1935 या काळात फ्रेंच जाहिरातकलेचा चेहराच बदलून टाकला ! त्यांनी द्विमितीय आकार, मोहक रंगसंगती अशी गुणवैशिष्ट्ये विकसित केली. त्यांनी विषयाची क्लिष्टता सोप्या चिन्हांकित चित्रशैलीत मांडली. त्यातून घट्ट वीण असलेल्या रचनेची ‘क्युबिझम’ शैली निर्माण झाली. भौमितिक आकार (त्रिकोण, चौकोन व वर्तुळ असे) आणि निसर्गाचे विविध आकार यांच्यातून छायाप्रकाशामुळे तयार होणाऱ्या ‘सिल्यूट’ (बाह्य रेषांनी ओळख पटणाऱ्या काळ्या आकृती) रचनेतून नवीन चित्रभाषा तयार झाली. शब्द, अक्षर यांच्या रचनेने त्यास संवादाचे नवीन परिमाण प्राप्त झाले.

दृक्कलेच्या विचार-प्रसारण शास्त्रामध्ये ह्यावर खूप अभ्यास केला जात आहे व दृक्साक्षरतेचे नवे मापदंड पुढे येत आहेत. सॅविग्नॅक व आन्द्रे फ्रांकास हे दोघे कॅसांड्रे यांचे साहाय्यक होते. ते दोघे त्यांच्या चित्रशैलीच्या वातावरणात तयार झाले. त्या शैलीचा प्रभाव 1930 ते 1960 पर्यंत जगभरच्या (भारतातसुद्धा) सर्व दृक्विचार प्रसारणावर असल्याचे दिसते. सॅविग्नॅक यांनी कॅसांड्रेसारख्या कलाकारांच्या जुन्या पिढीने दिलेले ते चित्रप्रभाव जीवनस्पर्शी आणि आणखी बदलून टाकण्याचे काम केले. त्यांनी त्यासाठी हास्य व व्यंग कलेचा उपयोग केला. सॅविग्नॅक यांनी ‘जक्स्टापोझिशन’ची पद्धत (म्हणजे चित्रांचा एकमेकांवर प्रसंग व आकार, रेषा, रंग इत्यादी थरांनी नवीन चित्रप्रतिमा तयार करणे) पूर्णपणे नाकारली. त्यांनी एक प्रतिमा एकाच कल्पनेसाठी असे नवीन चित्रसूत्र निर्माण केले. त्यास नाव दिले ‘व्हिज्युअल गॅग’ – अथवा ‘व्हिज्युअल स्कॅण्डल’. म्हणजेच थोडेसे अतिवास्तववादी परंतु अनपेक्षित चमत्कृतीने हास्य निर्माण करत, शब्दांवर अवलंबून न राहता संवाद साधणे ! प्रश्न असा पडतो, की कला विकास सूत्रांची अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना शि.द. फडणीस यांनी मराठीमध्ये तशाच प्रकारची शैली कशी उपयोगात आणली असावी? की येणाऱ्या जागतिकीकरणाची ती पूर्वसूचना होती?

– रंजन रघुवीर जोशी 9920125112 joranjanvid@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here