कॅलिफोर्नियाची उपमा कोकणास का? (Can Kokan area in Maharashtra take clue from California?)

0
294

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोने पावणेदोनशे वर्षांपूर्वी सापडले. कोणीही जावे आणि सोन्याचे पोते घेऊन यावे असा समज सर्वत्र पसरला. सोने मिळते म्हटल्यावर जो तो सोने हाती लागेल या आशेने कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी धावत सुटला. अमेरिकेतील माणसे आली, चीनमधून बोटी भरून आल्या. त्याला ‘गोल्ड रश’ असे म्हणतात. ‘मॅकेनाज गोल्ड’ नावाचा सिनेमा त्या हकिगतीतूनच निर्माण झाला होता.

कॅलिफोर्नियातील मुख्य शहर सॅन फ्रान्सिस्को हे उत्तम हवामानासाठी प्रसिद्ध आहे, तसेच कल्पक उद्योगांसाठी ! सोन्याच्या खाणीत काम करण्यासाठी दणकट कपडे हवेत म्हणून लेव्ही स्ट्रास ही जीनची पॅण्ट तेथे 1873 मध्ये निर्माण केली गेली. गंमत म्हणजे तीच पॅण्ट पुढे तरुणांच्यात फॅशन म्हणून वापरली जाऊ लागली. जॉर्ज व्हिटनी याने व्हॅनिला आईस्क्रीमवर चॉकोलेटचे आवरण लावण्याचे संशोधन 1928 साली तेथेच केले. तेही चॉकोबारच्या रूपात लाखोंच्या आवडीचे खाद्य आहे. फिलो टेलर फ्रान्सवर्थ या एकवीस वर्षांच्या मुलाने इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन 1927 साली बनवला. त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्यांच्या घरी वीज नव्हती !

सॅन फ्रान्सिस्कोला जेथे गोल्डन गेट पूल बांधला आहे त्या ठिकाणी प्रशांत महासागर भूभागात दोन मैल रुंदीच्या मुखातून शिरला आहे. त्या शिरलेल्या पाण्याची उत्तर-दक्षिण लांबी शंभर किलोमीटरहून जास्त असावी. त्यामुळे तो उपसागर भासतो. तशीच भौगोलिक स्थिती भारतात कोचीला (केरळ) आहे. अरबी समुद्र केरळच्या भूभागात अगदी तशाच पद्धतीने शिरला आहे. पण त्याचा उपसागर न होता त्याचे रूपांतर ‘बॅक वॉटर’मध्ये झाले आहे. महासागराचे पाणी भूभागात शिरल्याने तयार झालेला उपसागर, त्याच्या आजूबाजूचे डोंगर आणि दऱ्या मिळून झालेला असा कॅलिफोर्नियाचा प्रदेश ‘बे एरिया’ म्हणून ओळखला जातो. त्यात नऊ जिल्हे असून त्यांची लोकसंख्या सत्त्याहत्तर लक्ष पासष्ट हजार सहाशेचाळीस आहे. त्यात गोरे लोक एकोणचाळीस टक्के म्हणजे तीस लाख सत्तेचाळीस हजार आणि आशियाई लोक एकवीस लाख एक्काहत्तर हजार आहेत. त्यात भारतीय, चिनी, कोरियन, तैवानी वगैरे आहेत. तेथे बरेच मराठी लोक आहेत. तोच विभाग ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखला जातो. तो पूर्वी ‘व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाइट’ अशा सुंदर नावाने ओळखला जात असे. कारण कॅलिफोर्निया राज्यावर निसर्गाने अनेक हातांनी मनमुरादपणे कृपा केली आहे. सिलिकॉन व्हॅली हा वास्तवात पंधरा-सोळा गावांचा मिळून बनलेला बे एरियाचा भाग आहे. डॉन हॉफलर यांनी सिलिकॉन व्हॅली हे नाव प्रथम 11 जानेवारी 1971 रोजी ‘इलेक्ट्रॉनिक न्यूज’मध्ये मुखपृष्ठावर छापले. तेव्हापासून ‘सिलिकॉन- यूएसए’  या नावाने जग त्या भागाला ओळखू लागले.

कॅलिफोर्नियातील बे एरियात डोंगरांच्या रांगा आणि खोरी आहेत. खोऱ्यातील सपाट प्रदेशात शहरे आणि फ्री वे आहेत. सगळा प्रदेश फळाफुलांनी बहरलेला असा. त्यामुळेच तो प्रदेश ‘व्हॅली ऑफ हार्ट्’स डिलाइट’. त्या खोऱ्याचा कायापालट स्टॅनफोर्ड विद्यापीठामुळे 1885 पासून सुरू झाला. त्या महाविद्यालय समूहाने प्रतिभावान माणसे जन्माला घातली. स्टॅनफर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची नावे बघितली तर त्या शिक्षणसंस्थेची थोरवी मनात अधिकच ठसून जाते. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था –

(1932) ड्रेपर लॅबोरेटरी – ड्रेपर लॅबोरेटरी चार्ल्स स्टार्क ड्रेपर (1901-1987) हा अमेरिकन इंजिनीयर शास्त्रज्ञ इनर्शियल नेव्हिगेशनचा पहिला शोधक समजला जातो. तो मॅसेच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचा प्रमुख होता. त्याला अपोलो चांद्रयान मोहिमेचा प्रमुख म्हणूनही नेमले होते. त्यांनी सुरुवातीला बी ए मानसशास्त्र नंतर बी एस्सी इलेक्ट्रोकेमिकल आणि सायन्स विषयातील पीएच डी घेतली होती.

(1939) ह्युलीट पॅकार्ड – सिलिकॉन व्हॅलीची मुहूर्तमेढ स्टॅनफोर्ड विद्यापीठातील फ्रेडरिक टर्मन या प्राध्यापकाने इलेक्ट्रॉनिक, पॉवर इंजिनीयरिंग कॅमूटिंग आणि कम्युनिकेशन या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी रोवली. त्याकरता त्याने ह्युलीट आणि पॅकार्ड या विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. त्या दोन विद्यार्थ्यांना कंपनी स्थापण्यास आणि विद्यापीठाला त्या प्रकारच्या उद्यमात लक्ष घालण्यास मदत केली. ‘एचपी’ हे तिचे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. प्रयोग करण्यास प्रेरणा देतो तो प्राध्यापक !

(1948) रसेल हॅरिसन व्हेरिअन आणि सिगुर्ड व्हेरिअन हे दोघे भाऊ राष्ट्रभक्त होते. त्यांनी क्लिस्रोन व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावला. त्याच्या अनेक उपयोगापैकी रेडिएशन आँकॉलॉजीमध्येही होतो. त्यांना रशियाच्या मार्क्सिस्ट कल्पनांचा राग होता. त्यांनी ॲटम बॉम्बचा उपयोग करता येईल हे दाखवले, पण नंतर त्यांना पश्चाताप झाला.

(1995) ‘याहू’ला जन्म देणारे जेरी यांग आणि डेविड फिलो. त्यातील जेरी यांग याचा जन्म तायवानमध्ये झाला. तो दोन वर्षांचा असताना त्याची आई दोन मुलांना घेऊन अमेरिकेत आली. ती इंग्रजी भाषा आणि नाट्यकला या विषयांची प्राध्यापक होती. तिने अमेरिकेतील तिच्या नातेवाईकांच्या मदतीने जेरी यांग याला वाढवले.

(1997) नेटफ्लिक्सचे निर्माते रीड हेस्टिंग्ज (माजी स्टॅनफोर्ड) आणि मार्क रुडॉल्फ यांचे मुख्यालय लॉस गॅटोस (सिलिकॉन व्हॅली) येथे आहे.

(1998) गुगलची निर्मिती करणारे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन

(2002) रीड हॉफमॅन आणि जीन लूक वेलेट लिंक्डइन या सारख्यांना जन्म देणारे हे सगळे एके काळचे स्टॅनफोर्डचे विद्यार्थी.

(2003) इलॉन मस्क हा टेस्ला इलेक्ट्रिक कार आणि अनेक साहसी योजना यांमुळे जगाला माहीत आहे.

(2009) व्हॉट्स ॲप. ब्रायन ॲक्टन आणि जेन कॉउम हे पूर्वी ‘याहू’मध्ये काम करत असत. त्यांनी 2009 साली व्हॉट्स ॲप बनवले. कॉउम हा युक्रेनचा.

(2010) इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्म केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रियेंगेर (मूळचा ब्राझीलचा) यांनी 2010 साली बनवला. इंस्टाग्रामचा जन्म सिस्ट्रॉम याच्या छायाचित्रकलेच्या आवडीमधून झाला होता. आता तो फेसबुकने विकत घेतला आहे.

(जन्म 1980) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले.

हार्वर्ड विद्यापीठातील एका तरुणाने खूप नाव कमावले. तो म्हणजे मार्क झुकरबर्ग. शाळेतच तो अतिशय हुशार म्हणून ओळखला जात असे. त्याने विसाव्या वर्षी काही मित्रांच्या संगतीने हार्वर्डमध्ये 2004 साली फेसबुकची निर्मिती केली आणि जग जिंकले ! मात्र ते यश त्याने पचवले कॅलिफोर्नियात येऊन व तेथे स्थिरावून. जगभरातील अशा अनेक विद्यापीठांतील मान्यवर व्यक्ती त्या विद्यापीठात शिकून गेल्या आहेत.

सिलिकॉन व्हॅलीमधे फिरताना असे लक्षात आले, की संशोधन करून नव्या संस्था स्थापन करणाऱ्या बऱ्याच जणांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले होते. 1940 नंतर जवळ जवळ दरवर्षी एक विद्यार्थी नवी संस्था स्थापन करत होता आणि तो सिलसिला 2023 पर्यंत चालू आहे. त्याचा विचार केल्यावर माणूस थक्क होतो.

इटालीतील फ्लोरेन्स या लहानशा गावात गॅलिलिओ, मायकेल अँजेलो, वास्तुकलाकार लिओन बटिस्टा अल्बर्टी, फिलिप्पो बृनीलेतसी जिओट्टो जिओटस, लिओनार्दो दा विंची अशी अनेक महान माणसे जन्माला आली होती, हा एक चमत्कार आहे. भारतातही अशा जागा आहेत, की जेथून महान माणसे उगवलेली दिसतात. शिवाजी-संभाजी, संताजी-धनाजी, नेताजी-व्यंकोजी, येसाजी-मुरारबाजी अशी माणसे पश्चिम महाराष्ट्रात का व कशी जन्माला आली? टिळक, कर्वे, आंबेडकर, काणे ही माणसेदेखील रत्नागिरी जिल्ह्याच्या विशिष्ट टापूत (मुरूड) जन्मली आहेत.

नावीन्याच्या शोधात असलेले हुन्नरी तरुण कोठून कोठून कॅलिफोर्नियात जात असतात. बे एरिया म्हणजे हुशार तरुण-तरुणींचा अड्डाच होऊन गेला आहे.

 – प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here