स्थानिक इतिहास ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची शाखा आहे. मुंबईच्या इतिहासाचा विविध अंगांनी अभ्यास करणारी काही पुस्तके इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये गेल्या दहा वर्षांत आली आहेत. तरुण अभ्यासक पुढे येत आहेत. अनेक मनोरंजक कथा समोर आल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या दालनात वेगवेगळे लेखक ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरामध्ये मुंबईविषयी लेख लिहितील. यांतील पहिला लेख नितीन साळुंखे यांचा.
बेलासीस रोड
ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी, मेजर जनरल जॉन बेलासीस याने दोनशेतीस वर्षांपूर्वी, म्हणजे 1793 मध्ये, ब्रीच कँडी आणि माझगाव यांना जोडणारा रस्ता बांधला. त्यावेळी त्याचा हुद्दा ‘कमांडिंग ऑफिसर ऑफ द फोर्सेस अॅट बॉम्बे’ असा होता. त्यावेळी तो रस्ता जेमतेम, एखादी बैलगाडी जाऊ शकेल असा कच्चा, मातीचा होता. तरीसुद्धा तो मध्य मुंबईची पूर्व-पश्चिम टोके जोडणारा पहिला मोठा रस्ता ! त्या रस्त्याच्या आधाराने पुढे मध्य मुंबईतील भायखळा, नागपाडा, मदनपुरा इत्यादी ठिकाणे जन्माला आली आणि वाढली.
तो रस्ता बांधण्यास कारण झाला, तो 1792 मध्ये गुजरातमध्ये पडलेला दुष्काळ. सुरतहून अनेक लोक दुष्काळामुळे, अन्नाच्या शोधात मुंबईत येत होते. जॉन बेलासीस याने तो रस्ता बांधण्याची योजना- त्या लोकांच्या हाताला काम देऊन त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्यासाठी तयार केली. त्याने त्या रस्त्यासाठी लोकांकडून रीतसर वर्गणी जमा केली होती. गोळा झालेल्या रकमेत स्वतःचे काही पैसे घालून, त्याने तो रस्ता तयार करून घेतला. तो रस्ता ‘बेलासीस रोड’ म्हणून मुंबई शहराच्या इतिहासात नमूद झाला. त्याचे आजचे नाव ‘जहांगीर बोमन बेहराम मार्ग’ असे आहे तरी, तो रस्ता बेलासीस रोड या नावानेच अजून ओळखला जातो. जहांगीर बोमन बेहराम हे मुंबईचे महापौर 1931-32 मध्ये होते.
तो सलग रस्ता ब्रीच कँडी ते माझगावपर्यंत होता. परंतु पश्चिम रेल्वे (जुने नाव बीबी ॲण्ड सीआय रेल्वे) ही धावणाऱ्या त्या रस्त्याला छेद देऊन 1867-68 पासून धावू लागली. रेल्वेमार्गाला वाट देण्यासाठी त्या रस्त्यावर पूल बांधण्यात आला. त्या पुलालाही ‘बेलासीस ब्रीज’ हेच नाव देण्यात आले. ‘बॉम्बे सेण्ट्रल’ स्टेशन त्या रस्त्याच्या आधाराने जन्माला आले. त्या रस्त्यामुळे मुंबईतील दोन महत्त्वाच्या संस्था एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत उदयाला आल्या. त्यांपैकी एक ‘भायखळा क्लब’. तो काळाच्या पडद्याआड गेला आहे. रेसकोर्स आधी त्या रस्त्यावर होता, तो नंतर दुसरीकडे गेला. मुंबईतील पहिले क्रिकेट ग्राऊंडही त्या रस्त्याच्या शेजारी होते. पहिल्या बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) चाळीही त्याच रस्त्याच्या कडेने 1916 मध्ये बांधण्यात आल्या. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी त्या चाळींची पायाभरणी चांदीच्या थापीने केली. ती थापी भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये आहे.
मेजर जनरल जॉन बेलासीस याचे निधन 11 फेब्रुवारी 1808 रोजी मुंबईत झाले. जॉन बेलासीस आणि त्यांची पत्नी मार्था यांची समाधी चर्चगेटच्या सेंट थॉमस चर्चमध्ये आहे.
मुंबई शहराच्या पोटात कितीतरी आश्चये दडली आहेत. जनरल मोटर्स भारतात कारखाना सुरू करण्यासाठी योग्य अशा जागांची पाहणी 1927-28 मध्ये करत होते. त्यांनी कारखान्यासाठी शिवडीची निवड केली. कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सवलती व सुविधा शिवडी परिसरात सहज उपलब्ध होत्या. उदाहरणार्थ, स्वस्त मजूर, उद्योगस्नेही शासन-प्रशासन, रेल्वेमार्ग, जवळच असलेले बंदर आणि तेथपर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असलेले रस्ते… इत्यादी. शिवडीतील धान्य डेपोच्या शेड्स उपलब्ध होत्या. त्या प्रचंड मोठ्या शेड्सचे कारखान्याच्या इमारतींमध्ये रुपांतर सहज झाले. त्यासाठी वेळ जास्त लागला नाही. भाड्याने घेतलेल्या त्या पाच शेड्सचे क्षेत्रफळ एकूण तीन लाख पन्नास हजार चौरस फूट होते. पुढील काही महिन्यांत मोटारींचा असेम्ब्ली प्लाण्ट तेथे सुरू झाला. त्या काळातील आधुनिक मशिनरीने युक्त असा ‘जनरल मोटर्स इंडिया, लिमिटेड’ या नावाचा कारखाना 1928 च्या सुरुवातीस अस्तित्वात आला.
पहिली ‘शेव्हर्ले (Chevrolet)’ कार त्या कारखान्यातून 4 डिसेंबर 1928 रोजी बाहेर पडली. त्या महिन्याभरात एकूण एक हजार गाड्या असेम्बल करण्यात आल्या. कारखाना पूर्ण क्षमतेने आणखी काही महिन्यांत चालू झाला. कारखान्याची क्षमता दिवसाला शंभर गाड्या या गतीने गाड्यांची जुळणी करण्याची होती. त्या कारखान्यात तयार होणाऱ्या शेव्हर्ले, ब्युक, व्हॉक्स्हॉल, कॅडीलॅक, पॉण्टिॲक इत्यादी गाड्या आणि लॉऱ्या भारतात आणि परदेशातही विकल्या जात होत्या. तो कारभार पुढील सव्वीस वर्षे, 1954 पर्यंत चालू होता. त्या गाड्यांची ती नावे बाबुराव अर्नाळकर यांच्या रहस्यकथांमधील काळा पहाड, झुंजार, धनंजय या पात्रांच्या मालकीच्या असलेल्या आढळतात. त्याचे कारण कदाचित ‘बॉम्बे’तील तो कारखाना असावा !
तो प्लाण्ट नेमका कोठे होता हे सांगणे अवघड आहे, पण तो पोर्ट ट्रस्टच्या रस्त्याने शिवडीवरून जाताना मोठ-मोठी गोडाऊन्स दिसतात, त्यांपैकी काही गोडाऊन्समध्ये असावा. कारखान्यातून पंचवीस हजारावी गाडी 1931 साली बाहेर पडली. तसेच एक दुसरे आश्चर्य मुंबईच्या एका नकाशात दिसले. 1933 चा बॉम्बे सर्व्हे नकाशा वाचताना लक्षात आले, की सायन (शीव) जवळ ‘आगरवाडा रेल्वे स्टेशन’ होते. आजवर कधीही ते नाव ऐकले नाही. त्या स्टेशनचे आजचे नाव ‘गुरु तेगबहादूर नगर’ रेल्वे स्टेशन (GTB Nagar) आहे. (या स्टेशनचे नाव सायन कोळीवाडा असेही लिहिलेले काही ठिकाणी दिसते).
– नितीन साळुंखे 9321811091 salunkesnitin@gmail.com
———————————————————————————————-
नितीन जी,
छान माहितीपूर्ण लेख लिहिलाय तुम्ही!
बेलासीस रोड व त्याच्या साक्षीने उभ्या राहिलेल्या वास्तूंच्या आठवणींना उजाळा मिळाला याद्वारे.