मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे. निसर्गापासून माणसांपर्यंत नात्यातील वेगवेगळे हळुवार संबंध समजून घेतले तर मायेने, जिव्हाळ्याने, एकमेकांशी जोडले जाऊन खरेच एक ‘समृद्ध’ नाते निर्माण होऊ शकते. ते नसेल, तर आयुष्यात सगळे असून अंतरी समाधान नाही अशी परिस्थिती असू शकते. अशा शिबिरामध्ये काम करताना आलेले प्रामाणिक अनुभव या लेखात अंजली म्हसाणे यांनी मांडले आहेत. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
—————————————————————————————————————-
रिलेशानी (Beautiful Relationship)
चमकत्या डोळ्यांनी आणि उत्सुक चेहऱ्यांनी तीस-चाळीस मुले-मुली समोर बसलेली असतात. प्रथम थोडी बुजलेली ती मुले थोड्याच वेळात मोकळी होऊ लागतात. कधी स्वतःचे नाव निसर्गाशी जोडतात, तर कधी मुलगे आणि मुली एकत्र येऊन एखादे हलके गाणे गात रचनाशिल्प तयार करतात. हॉलच्या बाहेर काढलेल्या चपला-बुटांबरोबरच मनावरचे टेन्शन तेथेच सोडून, ती हळुहळू खुलू लागतात. कधी ती मुले शहरातील उच्चभ्रू शाळांतील असतात, तर कधी ग्रामीण, कधी आश्रमशाळांतील आदिवासी, तर कधी शहरी श्रीमंत शाळांतील. प्रत्येक ‘रिलेशानी’ शिबिरातील चित्र असेच असते. ‘रिलेशानी’ हा नवा शब्द डॉ. मोहन देस यांचा !
‘रिलेशानी’ म्हणजे शानदार, सुरक्षित, सुंदर, समृद्ध असे नाते ! व्यक्तीचे निसर्गाशी, आई-वडिलांशी, शाळेशी, मित्र-मैत्रिणींशी असणारे नाते आणि स्वतःशीदेखील ! ‘आरोग्यभान’च्या शिबिराचा विषय ‘नातेसंबंध म्हणजे रिलेशनशिप’ असा असतो. आयुष्याचा ‘दुसऱ्या दशका’चा (अकरा ते वीस वर्षे) काळ निर्णायक असतो. लहानपण जाऊन मोठे होता-होता ते दुसरे दशक ओलांडले, तरी आयुष्यभर लक्षात राहते. शाळा-कॉलेजांत इतर अनेक विषय शिकवले जातात. परंतु मानवी नातेसंबंधांचा, खास करून स्त्री-पुरुष नात्याचा विषय अभ्यासक्रमात फारसा येत नाही. तो खूप महत्त्वाचा अरिष्टात सापडलेला असा विषय आहे. त्या वयोगटातील मुला-मुलींना त्याविषयी नीट, सर्व पैलूंसह जाणून घेण्याची गरजदेखील आहे. ती पूर्वी होतीच, पण आज, मुले ती गरज थेट बोलून दाखवत आहेत.
त्या वयात मुलांचे सारे विश्व बदलून जाते. आई-वडील, शेजारपाजार, शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत पूर्वी असलेले नाते यांत आमूलाग्र असे परिवर्तन होते. मोठ्यांच्या बदललेल्या नजरा, अपेक्षा मुलांना जाणवू लागतात. त्यांच्या नात्यामध्ये ताण येतो, तर मित्रमंडळींतील नाते घट्ट होऊ लागते. आई-वडील काहीसे दुरावतात- आई-वडीलही त्यांच्या करिअरमध्ये व्यग्र असल्याने त्यांना संवादासाठी उसंत मिळत नाही. शिक्षकदेखील त्यांच्यामुळे त्रासून जातात ! आत्तापर्यंत ती मुले छान होती, पण अचानक त्यांना काय होते ते शिक्षकांना कळत नाही. मुलांचे पालकांशी आणि शिक्षकांशी छान असलेले नाते बिघडू लागते.
अनेक मुलांना मुलगा-मुलगी मैत्रीच्या ‘खास’ गोष्टींवर खूप सारे प्रश्न असतात. मैत्रीचा मुळात अर्थ काय, जवळीक- खास जवळीक कशी असते, आकर्षण म्हणजे काय, आकर्षण म्हणजेच प्रेम असते का, स्पर्शाची भाषा कशी असते, खरे प्रेम कसे ओळखावे, छोट्या वयात असे काही होत असेल, तर ते सांभाळावे कसे… नीट काही समजत/उमजत नाही. हे चित्र शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी अशा सर्व मुलांच्या अनुभवाला येत असतात. पुढे, जोडीदार निवडताना काय पाहवे, जातपात, धर्म, घराणे, पगार, व्हेज-नॉनव्हेज, जमीन, संपत्ती, हुंडा, सिक्स पॅक्स, कातडीचा रंग, फिगर… की त्यांच्याही पलीकडचे काहीतरी?
मुलींची लग्ने लहान वयातच का लावून दिली जातात, जात-धर्म यांच्या प्रभावाचा प्रेमाच्या नात्यावर परिणाम कसा होतो, धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा व समाजाची विशेष विभागणी यांचादेखील परिणाम काय असतो? लग्न म्हणजे काय, लिव्ह-इन काय असते, ब्रेकअप कधी होतो, नाते तुटते तेव्हा काय करावे, एकतर्फी प्रेम म्हणजे काय, सेक्सचे आकर्षण म्हणजे काय? लैंगिकता म्हणजेच सगळे नाते असते का? जाहिरातींत-सिनेमांत-सोशल मीडियावर-इंटरनेटवर सांगतात ते सगळे खरे असते का? कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुलांचे त्या संबंधातील प्रश्न अधिक जटिल झाले होते. त्यांच्या हातातील स्मार्ट फोनमधून विविध साइटस्, बऱ्यावाईट गोष्टीही समोर आल्या… तरी एकूणच, समृद्ध-सुंदर नाते कसे असते? ते खरेच वास्तवात असू शकते का? असाही प्रश्न उभा असतो.
‘रिलेशानी’ शिबिर म्हणजे फक्त लैंगिक शिक्षण नसते. त्या शिबिरात मुलांशी ‘मानवी नातेसंबंधां’बद्दल समग्र संवाद होतो. त्यात लैंगिकतेचे चांगलेवाईट आविष्कार यांच्याबद्दलही बोलले जाते. पण मुख्य विषय ‘नातेसंबंध’ हा असतो. अशा प्रश्नांच्या जोडीला काही तीव्र मानसिक ताण असतात. तोही मुले अनेकदा आतल्या आत सहन करतात. त्यांना त्याविषयी बोलण्यास योग्य माणूस भेटत नाही किंवा अगदी चुकीचा माणूस भेटतो ! कधी खूप राग येतो, संताप होतो, पण सांगावे कोणाला? अशा कुंठित अवस्थेमुळे काही मुले कधी हिंसकदेखील होतात. कधी कधी तर स्वतःलाच इजा करून घेतात !
सौंदर्य म्हणजे काय? चांगला पुरुष कोणाला म्हणावे? मर्दानगी म्हणजे काय? आदर्श स्त्री म्हणजे कशी? बाईची कामे, पुरुषांची कामे वेगळी का? ते कोण ठरवते? असेही प्रश्न असतात. त्याच वयात अनेक समज-अपसमज, अंधश्रद्धा रुजवल्या जातात.
परंपरा, संस्कृती म्हणजे काय? त्यात काय सांगितले गेले आहे? काही प्रौढ माणसे विचित्र आणि वाईट का वागतात? अशा सगळ्या विषयांवर त्या शिबिरात मुले आपापसांत बोलतात. म्हणजे संवाद असतो.
संवादात मुले खूप उत्स्फूर्तपणे, उत्साहाने सहभागी होतात. आभासी मैत्री, मोबाईल सेक्स, सेक्सटिंग, डिजिटल फूटप्रिंट्स, पोर्नोग्राफी- त्यातील खरे-खोटे धोके यांवरही खुली चर्चा होते. मुला-मुलींचे अनुभव- त्यांची मते-त्यांचे आनंदभयाचे प्रसंग, काळजी, स्वप्ने मोकळेपणाने समोर यावीत यासाठी गटचर्चा, चित्रकला, गाणी, कथा, अनुभवकथन, नाटुकली अशा माध्यमांचा मुक्त वापर केला जातो.
शिबिरात अर्थात गरजेनुसार, काही शास्त्रीय माहिती दिली जाते. ती माहिती देताना समोर बसलेल्या मुला-मुलींना अवघडल्यासारखे किंवा लाजिरवाणे वाटत नाही, त्यांच्या माना खाली जात नाहीत, ती बोअर होत नाहीत ! माहिती मुले आणि मुली यांना ‘एकत्रित’ दिली जाते. शिबिराच्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी दोन तास पालकांना आणि शिक्षकांना आमंत्रित केले जाते. मुलेच ती पालक/शिक्षक सभा घेतात ! तीन दिवस ते काय-काय नवीन शिकले ते सांगतात. तो अभूतपूर्व असा प्रसंग असतो.
‘रिलेशानी’ शिबिरानंतर मुले शांत होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कोठल्या तरी नसत्या गोष्टी त्यांच्या मनाला त्रास देत नाहीत. ती नीट अभ्यास करू लागतात. मुले-मुली एकमेकांशी छान वागू लागतात. त्यांचा उत्साह वाढतो. त्यांचे कलागुण विकसित होऊ लागतात. त्यांचे पालकांशी आणि शिक्षकांशी नाते मोकळे, मैत्रीचे आणि सन्मानाचे होते ! मुख्य म्हणजे, त्या संवादशाळेमुळे सहभागी मुलांचे, खास करून मुलींचे भवितव्य सुरक्षित, शांत आणि सुखकारक होते. तसे ती आम्हाला सांगतात.
रिलेशानी 2
‘रिलेशानी’ची शिबिरे कॉलेजांमध्ये मुला-मुलींची घेतली जातात. तरुणाईचा प्रत्यक्ष जीवनातील मुद्दा बदलत्या युगातील बदलत्या नातेसंबंधांचा आहे. विशी ओलांडता-ओलांडता किंवा थोडे आधीच, काही मुले प्रेमात पडतात. त्या प्रेमाचे स्वरूप कसे असते? असे दिसते की प्रेम एकदा मान्य झाले की प्रेमाच्या माणसावर चक्क मालकी सांगितली जाते ! कारण प्रेम म्हणजे एकात्मता, एकत्व ! ते माणूस प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तिच्या मालकीचे आहे असे वाटू लागते. त्या मालकीत काही प्रमाणात गोडवा असतो; हे खरे, परंतु तो गोडवा संपला की जबरदस्ती सुरू होते. काही वेळा तर संशयसुद्धा निर्माण होतो. ते माणूस म्हणजे जणू एक ‘वस्तू’च आहे असे ती व्यक्ती मानू लागते. मग त्या ‘वस्तू’ने काय करावे- काय करू नये, कोणाशी बोलावे- कोणाशी नाही, तिने कसे वागावे, जॉब करावा की नाही, करियर करावे की नको… कोणाशी मैत्री करावी हे सारे तिच्या वतीने ती व्यक्ती ठरवू लागते. दुसरी व्यक्ती ऐकत नसेल, तर व्यक्ती नाराज होते. तिने ते ऐकावे म्हणून कधीकधी तर तिला ‘ब्लॅक मेल’ केले जाते ! हे अर्थात पुरुषप्रधान समाजात जास्त करून पुरुषाकडून होते.
तरुणाईचे एक वास्तव मात्र पुनः पुन्हा समोर येते. ते खूप वेगळे असे आहे. काही तरुणांना असे वाटते, की दोघांना गरज आहे, दोघे एकत्र आलो, वीकेंड रिलेशन झाले. मस्त वाटले, संपले. पुन्हा दुसरी व्यक्ती. त्यात काय बिघडले? कशाला त्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक नाते आणि दोन घराण्यांचे मीलन? वचनबद्धतेचे लोढणे? दोघांच्या त्या नात्यात कसलीही पैशाची देवाणघेवाण नाही, बाजार नाही. कोणीच कोणावर जबरदस्ती करत नाही. दोघेही सगळी काळजी घेतो. काही झालेच तर डॉक्टरांची मदत घेतो. प्रॉब्लेम काय?
त्यात प्रेम नाही हे मान्य. पण बंधनही नाही, वचनबद्धता नाही, अटी नाहीत. व्यावहारिक देणे-घेणे, जे लग्नाबिग्नात असते, ते नाही. कायदा-कागदपत्रे… काही नाही. मुक्त वाटणे आहे ! बांधिलकी नाही. म्हणून ‘ब्रेकअप’सुद्धा नाही. दुःख, वेदना, ताटातूट नाही. काम झाले की पाठ वळून ज्याने त्याने कामाला लागायचे. मग आकर्षण आणि सुख या पलीकडे नाते कशाला हवे असते? अशा प्रकारच्या चर्चा करण्यासाठीसुद्धा ‘रिलेशानी’ हे मोकळे व्यासपीठ आहे. ‘रिलेशानी’ शिबिरांतून जीवनात येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी असते/होते.
येणाऱ्या पुढच्या पिढ्या स्त्री-पुरुष नात्याचा नवनवोन्मेषशाली शोध घेत राहतील, नवी आणि अधिक प्रगल्भ मानुषता त्यांच्या पदरी पडेल असा विश्वास मनात ठेवूनच ‘रिलेशानी’चे काम जोमाने सुरू आहे.
– अंजली म्हसाणे 9657610863 runjali@gmail.com
——————————————————————————————————————————-
सुंदर उपक्रम…सर्वत्र अंमलात आणण्यासाठी.
खूप महत्वाचा विषय आहे हा
फार छान मांडणी