शेवगावचा एव्हरेस्टवीर अविनाश बावणे (Avinash Bavane from Shevgaon… to Everest)

0
688

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तरुण अविनाश बावणे याने नौदलाच्या पथकाबरोबर जाऊन एवरेस्ट शिखर सर केले. त्याने तो पराक्रम तीन दिवसांत दोनदा केला- प्रथम एकट्याने व नंतर पुन्हा चमूबरोबर समूहाने. अशी यशसिद्धी असलेला जगातील तो एकटाच...

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगावजवळील राणेगाव या लहानशा खेड्यातील युवक अविनाश कल्याण बावणे याने ‘माऊंट एव्हरेस्ट’ शिखर पादाक्रांत करून नगर जिल्ह्याच्या इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे ! त्यांच्या मालकीची इनमिन साडेतीन एकर जिरायती शेती आहे. परंतु त्याने अनंत ध्येयासक्ती दर्शवत गिर्यारोहणातील कोणताही वारसा, आर्थिक पाठबळ आणि पूर्वपीठिका नसताना, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेले सर्वात उंच ‘माऊंट एव्हरेस्ट’ शिखर सर केले आहे ! अविनाशने हे यश भारतीय नौदलाच्या गिर्यारोहक चमूमधून मिळवले.

अविनाशचे माध्यमिक शिक्षण बोधेगावच्या शिवाजी विद्यालयात झाले. तो शेवगावच्या बाळासाहेब भारदे कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याने इंडियन नेव्हीच्या वैद्यकीय विभागात छोटीशी नोकरी 2013 साली पत्करली. त्याने नेव्हीच्याच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स विभागामधून छोटासा ट्रेकिंग कॅम्प केला, तेव्हा त्याला तो विरंगुळा वाटला होता. मात्र त्या दरम्यानच, त्याला गिर्यारोहण या प्रकाराची आवड निर्माण झाली- त्याला आकाशाला आव्हान देणाऱ्या पर्वतांना समोर ठेवून त्यांच्या उंच उंच माथ्यांवर पाऊल रोवायचे ही कल्पना खूप भावली.

अविनाशने गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनीयरिंग (दार्जीलिंग) आणि आर्मी माऊंटेनीयरिंग इन्स्टिट्यूट या नामांकित संस्थांमधून घेतले. तेथे अविनाशचे वेगळेपण अधोरेखित होते. ग्रामीण भागातील युवकांकडे प्रतिभा असते, पण ते तिला न्याय देण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार मनी बाळगून वाट वाकडी करून प्रशिक्षण घेणे टाळतात. त्याचा परिणाम म्हणून ते अत्युच्च यशापासून दूर राहतात. अविनाशने मात्र मान खाली घालून, फक्त इमाने इतबारे नोकरी करणे टाळले आणि चौकटीबाहेरचा विचार केला. नोकरीतील कर्तृत्वाचे इतर पदर जाणले. त्याने नोकरी सांभाळून नेव्हीमार्फत असलेल्या सुविधांचा फायदा घेत उत्तम प्रशिक्षण मिळवून स्वत:ला गिर्यारोहक म्हणून परिपूर्ण केले. अविनाशचा आत्मविश्वास प्रशिक्षणामुळे उंचावला ! त्याने नेव्हीतर्फे आयोजित मोहिमांमध्ये सहभागी होत सहा हजार एकशेचौदा मीटर उंचीचे माऊंट जोगीने; तसेच, जवळपास सात हजार चारशे मीटर उंचीचे जगातील गिर्यारोहकांमध्ये दुर्गम आणि दुष्प्राप्य म्हणून प्रसिद्ध असलेले ‘सासर कांगरी’ या दोन शिखरांवर यशस्वी चढाई केली. त्याच्या त्या यशामुळे त्याला त्याचे स्वप्न साद घालू लागले. ते होते जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न. ते म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करणे !

माऊंट एव्हरेस्टची मोहीम करण्यासाठी चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा व्यक्तिगत खर्च येतो. संस्था अशा मोहिमा करते तेव्हा एकूण खर्च कोटींच्या घरात जातो. म्हणून त्या मोहिमा यशस्वी न झाल्यास त्यांचा प्रचंड खर्च वाया जातो. हे टाळण्यासाठी ते अशा मोहिमांसाठी सदस्यांची निवड कठोर निकषांवर आणि तशाच उत्तम गुणवत्तेवर करतात. नेव्हीने ‘सागरतळ ते सागरमाथा’ ही धाडसी एव्हरेस्ट मोहीम 2017 साली आखली होती. त्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या चाळीस सदस्यांमध्ये अविनाश हा एक होता. त्याची खरी परीक्षा पुढेच होती. त्याला त्या चाळीस सदस्यांमधून अंतिम मोहिमेसाठी अतिशय खडतर प्रशिक्षण आणि निवड शिबिरे अशा कसोटीमधून जावे लागणार होते, अविनाश त्याची उच्च शारीरिक क्षमता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या बळावर तो अंतिम चोवीस सदस्यांमध्ये निवडला गेला. त्या चोवीसांमध्ये चार महाराष्ट्रीयन होते. अविनाश त्यातही पुढे. अंतिम शिखरावर प्रत्यक्ष चढाई करणाऱ्या अठरांमध्ये समाविष्ट होता. उर्वरित सहा जणांची निवड ‘सपोर्टर’ म्हणून बेस कॅम्पसाठी झाली.

नेव्हीने त्यांच्या संघाला शुभेच्छा देणाऱ्या ‘फ्लॅग ऑफ’ समारंभाचे आयोजन 23 मार्च 2017 रोजी केले. तो संघ लेगेच एव्हरेस्टकडे रवाना झाला. त्यांनी खुंबू या भागात प्रत्यक्ष  सराव 4 एप्रिलपासून सुरू केला. रोज पंधराशे ते दोन हजार मीटर चढणे आणि उतरणे असा तो सराव. त्यासाठी दमखम मजबूत लागतो. तीच एक तपश्चर्या असते ! अविनाशने तो सराव सोळा दिवस केला. बेस कॅम्पपर्यंतची चढाई 20 एप्रिल रोजी उत्साहात पूर्ण झाली आणि बर्फाळ जमीन, जोराचे वारे व हिमवादळे यांचा सामना सुरू झाला. प्रत्येकासोबत ऑक्सिजन सिलिंडर, ग्लुकोज, ओआरएस, एनर्जी जेल अशी जवळपास पंधरा किलो वजन असलेली बॅग पाठीवरच त्याशिवाय चढाईसाठी दोर, त्यांचे हूक, बूट, हातमोजे आणि थंडीपासून बचाव करणारा पोशाख, बर्फापासून बचाव करणारे चष्मे आणि अंधारात रस्ता दाखवण्यासाठी टॉर्च असा लवाजमा… प्रत्येक सदस्याला मार्गदर्शक म्हणून मदतीला शेर्पा, तज्ज्ञ डॉक्टर होते. सोबत प्रचंड शारीरिक क्षमता, इच्छाशक्ती आणि मुख्य म्हणजे देशप्रेमाची भावना घेऊन संघ बेस कॅम्पपासून पुढे निघाला !

अविनाश सांगतो, की उणे तीस अंशाच्या जवळपास असलेले तापमान, कमी होत जाणारी प्राणवायूची पातळी, रक्त गोठवणारी थंडी यांमुळे शरीर आणि मन यांच्यावर होणारे प्रतिकूल परिणाम या साऱ्यांशी झुंजत चढाई करणे, जवळपास एकटे असल्यासारखे चालत राहणे म्हणजे शारीरिक, मानसिक सामर्थ्याची कसोटी असते. आम्हाला वातावरण खराब असल्याने 9 मे पर्यंत तेथेच वाट पाहत थांबावे लागले ! आम्ही सहा हजार चारशे मीटर उंचीवर असलेल्या दुसऱ्या कॅम्पला 17 मे रोजी पोचलो. आम्हाला तेथेही खराब हवामानामुळे चार ते पाच दिवस वाट पाहत बसून राहवे लागले. आमच्या वेळीच दुसरा एक संघही एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न घेऊन तेथे थांबलेला होता. त्या संघातील गिर्यारोहक दुसऱ्या बेस कॅम्पपासून कंटाळून मागे फिरले. आम्ही मात्र वातावरण सुधारण्याची प्रार्थना करत तेथेच थांबून राहिलो. शरीर-मनावर उणे तापमानाचा प्रतिकूल परिणाम होत होता. कधी एखादा सहकारी हतबल होऊन धीर गमावून परत माघारी जाण्याचा आग्रह करायचा, तर कधी दुसऱ्या पथकातील एखादा सदस्य प्राणवायू संपत आल्याने किंवा शारीरिक क्षमता संपल्याने मृत्यूच्या दारात तडफडताना दिसायचा. दुर्दैवी गिर्यारोहकांचे मृत देहही क्वचित कधी रस्त्यात मधेच दिसायचे. तशा वेळी इच्छा असूनही, माणुसकी बाजूला ठेवून, त्याला ओलांडून पुढे जावे लागायचे. तशा खराब वातावरणात तिसऱ्या कॅम्पला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते सात हजार शंभर मीटर उंचीवर पोचलेही !

तेथून त्या पथकाची खरी परीक्षा सुरू झाली. तापमान उणे तीस अंशापेक्षाही कमी झाले होते. प्राणवायूचे सिलिंडर आटले होते आणि थंडगार वारे भयानक वेगाने वाहू लागले होते. आता, सात हजार एकशे ते आठ हजार चारशेअठ्ठेचाळीस मीटर हा अंतिम पण अतिशय अवघड टप्पा बाकी होता. गिर्यारोहकाचे यश सर्वोच्च टप्प्यावर फक्त हवामानाच्या लहरीवर अवलंबून असते. अविनाश सांगतो, “जोराचे वारे आणि हिमकणांचा मारा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नव्हता. जवळ प्राणवायू आणि मोजका अन्नसाठा असल्याने एके ठिकाणी फार काळ थांबणे धोक्याचे होते. त्याच्या पथकाने बेस कॅम्पवर दिवसभर वातावरण निवळण्याची वाट पाहिली, पण वातावरण निरभ्र होत नव्हते. त्यांच्या तंबूजवळील परदेशी गिर्यारोहकांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. इतका मोठा खर्च करून, इतक्या उंचीवर येऊन परत फिरणे भारतीय नौदलाच्या पथकाला मान्य होत नव्हते. मार्गदर्शक शेर्पानेसुद्धा माघारी फिरण्यात शहाणपणा असल्याचे सांगितले, पण योग असा, की रात्रीच्या सुमारास वातावरण निवळले. पथकाने त्या रात्रीच शेवटच्या टप्प्याचा प्रवास सुरू केला. अविनाशचा चालण्याचा वेग बरा असल्याने तो व त्याचा शेर्पा न थांबता रात्रभर वर चढाई करत होते. तशातच, त्याच्या विजेरीची बॅटरी संपली. तेव्हा ते दोघे शेर्पाच्या विजेरीच्या मदतीने पुढे जात राहिले आणि अविनाशने त्याचे स्वप्न 27 मे रोजी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी प्रत्यक्षात ‘याची देही’ अनुभवले. अविनाशने माऊंट एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर पाय ठेवला होता !

अविनाश व शेर्पा हे दोघे पृथ्वीतलावरील त्या सर्वोच्च टोकावर पंधरा-वीस मिनिटे राहिले व नंतर माघारी फिरले. अविनाश म्हणतो, “माझे मन मात्र मला त्या सर्वोच्च शिखराला बाय-बाय करू देत नव्हते. पण स्वप्नपूर्तीचे हे क्षण फक्त अनुभवायचे असतात. त्याचे कोणत्याही शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.” त्याने त्या सर्वोच्च शिखरावर महाराष्ट्राचा फलक आणि भगवा झेंडा फडकावला. आवश्यक ते फोटो काढून बेस कॅम्पला शिखर सर केल्याचा संदेश पोचवला आणि शेर्पासह पुन्हा खालच्या बेस कॅम्पला उतरून येण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांचे पथक त्यांना त्या परतीच्या प्रवासात भेटले. त्या पथकाने आपण सर्वांनी संघभावना म्हणून एकत्र शिखरावर जाणे योग्य ठरले असते असे मत व्यक्त केले. पथकातील या वेगळ्या भावनेने अविनाश अस्वस्थ झाला. त्याने त्या संघासोबत पुन्हा शिखरावर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला ! त्याच्या शेर्पाने त्याला विरोध केला, कारण असे करण्याचा वेडेपणा तोवर जगात कोणीही केलेला नव्हता. त्यांच्या जवळ प्राणवायू आणि अन्नसामुग्री मर्यादित होती. ती खाली जाईपर्यंत पुरवणे आवश्यक होते. परंतु शेर्पाने अविनाशच्या निश्चयापुढे हार मानली. त्याने अविनाशला पुढे जाण्यास मुभा दिली, परंतु शेर्पा स्वत: मात्र खाली उतरून, कॅम्पवर जाऊन थांबला. अविनाशसह त्या सर्वांनी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी शिखर पुन्हा सर केले. त्यांनी संघभावनेने विजयोत्सव साजरा केला आणि सारे गिर्यारोहक आवश्यक त्या पूर्तता करून परतीच्या प्रवासाला लागले.

अविनाश सांगतो, “चढाई तुलनेने सोपी पण परतीचा प्रवास तीव्र उतारामुळे फारच कठीण असतो. शिवाय, शारीरिक दृष्ट्या शरीर थकलेले असते, अन्नसामुग्री व प्राणवायू संपत आलेले असतात. त्यामुळे परतीचा प्रवास अधिक जिकिरीचा ठरतो. मी तशाच एका टप्प्यावर कोसळलो. माझ्याजवळचा प्राणवायू संपत आल्याने तो जपून वापरण्याच्या नादात माझ्या शरीरातील प्राणवायूची पातळी खूपच कमी झाल्याचा तो गंभीर परिणाम होता. माझ्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला. मला निरनिराळे भास होऊ लागले. एका क्षणी तर माझा शेर्पा, ‘आता तुझे काही खरे नाही’ असे म्हणाला. मीदेखील जिवंत परतण्याची आशा सोडली होती. डोळ्यांना हिमकण लागून सूज आलेली होती. शरीर साथ सोडत होते. मी अक्षरश: सरपटत उतरत होतो. तशात वर जाणाऱ्या एका अनोळखी गिर्यारोहकाने मला त्याच्या जवळील प्राणवायूचा अधिकचा सिलिंडर दिला आणि मी त्या ‘देवदूता’च्या मदतीने सावरलो. प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित झाल्याने तरतरी आली. शरीर-मेंदू साथ देण्यास मदत करू लागले. मी कॅम्पला परत आलो. कॅम्प दोन जवळ आल्यावर मला डॉक्टरांकडून मदत मिळू लागली आणि मी बेस कॅम्पला सुखरूप परत आलो. आम्ही आमची मोहीम यशस्वी करून 2 जून रोजी परत आलो. काठमांडूमध्ये थकवा घालवण्यासाठी थांबलो. आमच्या टीमच्या यशाबद्दल चीफ ऑफ नेव्ही यांच्या हस्ते दिल्ली येथे मोठा समारंभ 8 जून रोजी आयोजित करण्यात आला होता.”

विंदांची कविता आहे- असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर !

नजरेमध्ये नजर रोखुनी, आयुष्याला द्यावे उत्तर !! त्या कवितेमधील ओळींप्रमाणे अविनाशने त्याच्या आयुष्याला आव्हान दिले आणि उत्तरही दिले ! माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारा अविनाश नगर जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव गिर्यारोहक ठरला आहे !

– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com

————————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here