साहित्यव्रती – अशोकदेव टिळक (Ashokdev Tilak’s Contribution to Marathi Literature)

3
203
अशोकदेव टिळक

आधुनिक मराठी पंचकवींतील कविवर्य नारायण वामन टिळक आणि साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक हे आजीआजोबा. कवयित्री असलेली आजोबांची आई जानकी वामन टिळक ही पणजी. काही भक्तिगीतं आणि स्वत:च्या आईवडिलांच्या खिस्तायनाचा समारोपाचा अध्याय लिहिणारे, ‘महाराष्ट्राची तेजस्विनीपंडिता रमाबाईही चरित्रात्मक कादंबरी लिहिणारे, 1842 मध्ये सुरू झालेल्या ज्ञानोदयह्या प्रतिष्ठित मासिकाच्या संपादकपदाची धुरा जबाबदारीने सांभाळणारे आणि गोवा मुक्ती संग्रामात हिरिरीने सहभागी झालेले अॅव्होकेट देवदत्त नारायण टिळक हे वडील. आई रुथ कृष्णराव सरोदे ह्या मुंबई विद्यापीठात बी ए ला इंग्रजीत सर्वप्रथम आल्या होत्या आणि माणिकबाई बहिरामजी प्राईजच्या मानकरी झाल्या होत्या; तसेच, सर्व ख्रिस्ती विद्यार्थ्यांत प्रथम आल्यामुळे बाबा पद्मनजींच्या नावाची स्कॉलरशिपही त्यांना मिळाली होती (1913). अशा बुद्धिवंत आणि साहित्यिक घराण्यात 29 मे 1921 रोजी अशोक देवदत्त टिळक ह्यांचा जन्म झाला. अशोक यांचे बालपण त्यांची आजी लक्ष्मीबाई ह्यांच्या सहवासात मजेत गेले. आजीला त्यांच्यासारख्याच रूपागुणाच्या असलेल्या ह्या नातवाचे भारी कौतुक होते ! लक्ष्मीबार्इंनी त्यांच्या ह्या नातवाचा बोलका स्वभाव, चिकित्सक बुद्धी, त्याची जिज्ञासा शमेपर्यंत चिकाटीने प्रश्न विचारून जेरीस आणण्याची आणि स्वत:हूनही शोध घेण्याची वृत्ती स्मृतिचित्रेमध्ये वर्णन केलेली आहे.

अशोक टिळक सायकलिंग, योगासने, व्यायाम, पुस्तके बाईंडिंग करणे, कागदांच्यापुठ्ठ्यांच्या वस्तू बनवणे, लाकूड आणि खडू ह्यांवर कोरीव काम करणे, चित्रे काढणे अशा अनेक छंदांत रमत असत. अशोक टिळक यांच्याकडे नाव, पत्ता, जन्मदिवस लिहिलेले एक रजिस्टर असे. ते त्या नोंदी त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना करण्यास सांगत. त्यांची मेह्यारिडे अशी शुभेच्छा असलेली पोस्टकार्डस् ते निवडक व्यक्तींना त्यांच्या वाढदिवशी पाठवत असत.

अशोक टिळक यांचे थोरले बंधू नारायण ऊर्फ नाना हे वकील होते. त्यांचा इतिहास ह्या विषयाचा दांडगा व्यासंग होता. त्यांचे दुसरे बंधू ध्रुव हे बी एड पदवी प्राप्त केलेले उत्तम शिक्षक होते. त्यांनी काही इंग्रजीमराठी, मराठीइंग्रजी पुस्तकांच्या भाषांतराचे काम केलेले आहे. त्यांची बहीण मीरा अच्युत भागवत ह्यांनी बी ए, बी टी, बीपी एड, आणि एम ए (इंग्रजी) अशा पदवी प्राप्त केल्या. त्यांनी कन्या महाविद्यालय (नाशिक) आणि बीएड महाविद्यालय (पुणे) येथे अध्यापन केले. त्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजला (सांगली) इन्स्पेक्टर आणि महाराणी लक्ष्मी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापक होत्या. त्यांना ‘उत्तम शिक्षण व्यवस्था’ ह्या विषयावर लिहिलेल्या निबंधासाठी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी ह्यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार मिळाला होता. त्यांनी निवृत्तीनंतर अनुताई लिमये यांच्याबरोबर आदिवासी भागात केलेल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी आजही त्यांचे नाव घेतले जाते. त्या मधू दंडवते वगैरेंबरोबर राष्ट्र सेवा दलाशी संबंधित कार्यकर्त्याही होत्या. ही सगळीच भावंडे बुद्धिवान.

अशोक टिळक यांनी 1938 साली मॅट्रिक पास केल्यानंतर नाशिकच्या एचपीटी कॉलेजमधून इंटर आर्ट्स केले (1942). 1945 ते 1950 ह्या पाच वर्षांच्या काळात परिचय, प्रवीण, पंडित, शिक्षक सनद, साहित्य प्राज्ञ अशा काही परीक्षा उत्तीर्ण केल्या. मराठी आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन बी ए (ऑनर्स) केले (1949). एचपीटी कॉलेजमधून मराठी व संस्कृत ह्या विषयांत एम ए ची पदवी प्राप्त केली (1952). धुळे येथून डी एड चे प्रशिक्षण घेतले (1955). त्यांनी शिक्षण चालू असतानाच टेक्निकल अॅप्रेण्टिस (एसपीआय, 1943-47, नाशिक) म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्या आजोबांप्रमाणेच महाबळेश्वर व नाशिक येथील लँग्वेज स्कूलमध्ये परदेशी मिशनरींना मराठी शिकवण्याचेही काम केले (1947-49).

त्यांची माध्यमिक शिक्षक म्हणून कारकीर्द पुढीलप्रमाणे होतीमराठा हायस्कूल, नाशिक (1950), न्यू इंग्लिश स्कूल, निफाड (1951-52), मराठा हायस्कूल, सटाणे, (1953-54) युनियन ट्रेनिंग कॉलेज, अहमदनगर (1955-57), आर्म्ड कोअर हायस्कूल, हिंदी माध्यम, अहमदनगर (1957-58), अमेरिकन मिशन हायस्कूल, औरंगाबाद (1958-60), सेंट झेव्हिअर्स हायस्कूल, नाशिकरोड (1967-68), न्यू हायस्कूल, नाशिक (1968-69), सिंध हायस्कूल, अमेरिकन मिशन हायस्कूल औरंगाबाद (1958 – 60), सर्वोदय विद्यालय, गोगरगाव (जि.औरंगाबाद, 1960-61), प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज कणकवली, (1961-62), विकासवाडी अध्यापन मंदिर कोसबाड (1962- 64), के.डी.हायस्कूल चिंचणी (1964-65) येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.

ते अहमदनगर कॉलेज ह्या महाविद्यालयात (अर्धवेळ प्राध्यापक, 1955-59), तसेच मिलिंद महाविद्यालय (औरंगाबाद 1959) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अशोक टिळक यांनी पत्रकारिताही केली. ते तारापूर रिपोर्टर (त्रैभाषिक)चे भाषा संपादक होते.

त्यांच्या आवडीचे भाषाविषय मराठी, संस्कृत, इंग्रजी हे होते. शिवाय, त्यांच्या आईप्रमाणेच प्राकृतिक भूगोल हा त्यांचा प्रिय विषय होता. त्यांची शिकवण्याची हातोटी आणि स्वभाव विद्यार्थ्यांशी सहजपणे सम साधण्याचा असल्याने अशोक टिळक अध्यापक म्हणून विद्यार्थिप्रिय ठरले. त्यांचे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांच्या व्याकरणावर प्रभुत्व होते.

अशोक टिळक यांना टिळकसाहित्याच्या संशोधनाचा प्रबंध पुणे विद्यापीठात सादर करून पीएच डी पदवी घ्यायची होती, पण त्यांनी घेतलेला विषय त्यांच्याच अखत्यारीतीतील असल्याने त्यांनी गाईड घेण्याची विद्यापीठाची अट नाकारली असे ऐकिवात आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या स्वसंशोधनावरस्वयंअध्यापनावर अविश्वास दाखवला. परिणामी त्यांना डॉक्टरेट मिळू शकली नाही. मौजेची गोष्ट म्हणजे त्यांनी संशोधितसंपादित केलेल्या टिळकसाहित्यावर मात्र माझ्यासारख्या काहींनी पीएच डी पदवी मिळवली !

अशोक टिळक यांचा विवाह बारामतीचे सेवाभावी डॉ. कृष्णराव कोल्हटकर ह्यांच्या कन्या कुसुममाला (लग्नानंतरचे नाव मायावती) ह्यांच्याशी 27 डिसेंबर 1946 रोजी झाला. त्या लग्नात प्रि. मामा पाटणकर, दादासाहेब गायकवाड, कवी सोपानदेव चोधरी, प्रबोधनकार ठाकरे अशी बडी मंडळी, घरचे कार्य म्हणून उपस्थित होती. मायावती ह्यादेखील विद्यार्थिप्रिय शिक्षिका. त्यांनी स्वत:च्या नागरिक छापखान्यातून प्रकाशित होणारी अशोक टिळक यांच्या पुस्तक प्रकाशनाची बाजू समर्थपणे सांभाळली. अशोक टिळक यांच्या कन्या मुक्ता ह्यांच्याकडे तो साहित्यवारसा आला असल्याची साक्ष त्यांचे मुक्ताईह्या बालकथासंग्रहाचे तीन भाग देतात.

अशोक टिळक यांची जन्मतारीख 29 मे शांतिसदनाच्या घरभरणीची आणि नागरिक छापखाना सुरू करण्याचीदेखील तीच तारीख. असा हा त्रिवेणी संगमाचा विशेष दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी म्हणून कदाचित असेल, त्यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी एक तरी लहान का होईना पुस्तक प्रसिद्ध करणे 1972 सालापासून सुरू केले होते. त्याआधीही अशोकदेव यांची पुस्तके प्रकाशित होत होतीच. अशोकदेव यांच्या नावावर पुढील ग्रंथसंपदा आहे

        ‘सावल्या‘ (विनोदी व उपरोधिक पुस्तके (1939),  ‘अशोकदेवी‘ (कविता, 1942), ‘लहरी‘ (कविता, 1952), ‘विषय आजचाच‘ (भाषणे व निबंध, 1954), ‘प्रौढांचे भाऊ, तरुणांचे बाबा, मुलांचे आजोबादे.ना.टिळक‘ (सत्तरीनिमित्त परिचयात्मक, 1961), ‘चालताबोलता चमत्कार‘ (टिळक जन्मशताब्दीनिमित्त, 1961), ‘अगदी स्टेप बाय स्टेप‘ (लक्ष्मीबाईची साक्षमराठी 1963, इंग्रजी 1966), ‘सप्रेम भेट‘ (मुलांसाठी संस्कारकथाकविता, 1970), ‘शांतिसदन‘ (ललित आठवणी, 1975), ‘असे केले तर‘ (शिक्षण क्षेत्रातील समस्या व त्यावर तोडगे, 1976), ‘मित्रहो!” (व्याख्याने: मराठीसंस्कृत,1977), “जरा वेगळा अँगल‘ (नावाटिव्यक्तिविकसनाचा मागोवा, 1979), ‘जयजय येशो‘ (भक्तिपर कविता, 1980), ‘चालता बोलता चमत्कार‘ (नावाटि. चरित्रात्मक कादंबरी, 2000), ‘वैतुहि‘ (आठव, 2001), ‘टक्करमाळ‘ (काही खमंग किस्से, 2006).

टिळकसाहित्य संशोधन हा अशोक टिळक यांचा प्रमुख विषय असला तरी त्यांच्या लेखनाचा तो एकमात्र विषय नव्हता हे पुस्तकांच्या उल्लेखित यादीवरून लक्षात येते. त्यांनी त्यांचे नाव पूर्ण न लिहिता अशोकदेवअसेच अनेकदा वापरलेले दिसते. एरवी ते अनेकांचे अप्पा होते. नुसते .दे.म्हटले तरी ते अशोक टिळक किंवा अप्पा टिळक आहेत, हे जाणकार समजून घेत.

अशोक टिळक यांनी केलेली संपादने पुढीलप्रमाणे आहेत अभंगांजलि‘ (ना.वा. टिळकलिखित (1959), ‘ख्रिस्तायन‘ (ना.वा. टिळकलिखित निवडक अध्याय, परिचय, टिपाप्रस्तावनेसहित, 1961),’टिळकांची कविता भाग 4‘ (टिपाप्रस्तावना नवीन, 1963), ‘साहित्यलक्ष्मी शताब्दिपर लेख, ‘स्मृतिचित्रे‘, अभिनव आवृत्ती (1973), ‘देवदत्तांची कविता‘ (दे.ना.टि.दहावा स्मृतिदिन), ‘विश्रब्धशारदाखुर्द‘ (मौलिक पत्रसंग्रह, 1978). अशोक टिळकलिखित सतरा पुस्तके असून संपादित ग्रंथांची संख्या सात आहे.

इतकी विविध ग्रंथसंपदा असूनदेखील ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना का लाभले नाही असा प्रश्न माझ्यासारखीला नुसता पडत नाही तर ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या यादीत आपल्यासारख्या नवोदिताचं नाव यावं, ही गोष्टही मला स्वतःला मान खाली घालायला लावते. अध्यक्षपद न मिळण्याची कारणे काहीही असोत, साहित्यक्षेत्रात अ.दे. टिळक यांना ख्रिस्ती समाजाकडूनही मिळावा तसा बहुमान मिळाला नाही.

ना.वा. टिळक यांची जन्मतारीख उपलब्ध आहे परंतु लक्ष्मीबार्इंच्या जन्मतारखेची नोंद कोठेच नव्हती. अशोकदेव यांनी ती 1 जून 1866 अशी निश्चित केली. त्यांनी लक्ष्मीबार्इंची कबरही शोधून काढली. हे सगळे त्यांनी अर्थातच त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर केले. त्यांनी स्वत: लक्ष्मीबाई टिळक यांनी स्मृतिचित्रेमध्ये लिहिलेल्या आठवणी समीक्षकसंपादकाच्या नजरेने तपासून घेतल्या. त्यांनी काही त्रुटी लक्षात आल्यावर त्याबाबत संशोधन करून त्यात पूरक माहितीचा ऐवज घातला. त्यांनी ती माहिती मिळवण्यासाठी अपार भटकंती केली. त्यांच्या आजीआजोबांच्या काळातील, त्यांच्याशी संबंधित अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. डोळ्यांत तेल घालून ती माहिती चोखंदळपणे गाळूनचाळून घेतली. स्मृतिचित्रेची अभिनव आवृत्ती संपादन करणे हे फार जिकिरीचे काम होते. ते त्यांनी एकहाती पार पाडले. नव्या आवृत्तीसाठी टिपणे काढून ठेवली. सांगे वडिलांची कीर्तीएवढाच त्यामागे उद्देश नव्हता, तर त्यांनी ते त्यांच्या आयुष्याचे मिशनसमजून केले. ते मुळात स्वत: चांगले साहित्यिक होते. परंतु त्यांना त्यांच्या साहित्यापेक्षा पूर्वजांचे साहित्य योग्य पद्धतीने मराठी वाचकांपुढे ठेवण्याचा लागलेला ध्यास पराकोटीचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांची संपूर्ण हयात खर्ची घातली. त्यांनी केलेले हे साहित्यिक कार्य फार मोलाचे ठरले आहे. शतकातील महत्त्वाच्या मराठी वाङ्मयामध्ये नोंद झालेल्या स्मृतिचित्रेची अभिनव आवृत्ती दुर्मीळात जमा झाली आहे. अशोकदेवांनी दुरुस्ती सुचवलेली नवी आवृत्ती प्रकाशित झाली तर त्यांची जन्मशताब्दी खऱ्या अर्थाने साजरी केल्यासारखे होईल.

 अनुपमा निरंजन उजगरे  9920102089 anupama.uzgare@gmail.com   

अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी लेखनच नव्हे तर संपादन आणि संशोधनही केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होत. (अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.)

———————————————————————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. साहित्यव्रती आप्पासाहेब टिळकांची चरित्ररेषा, साहित्यनिर्मिती,कार्यकर्तृत्व विषयक अतिशय परिपूर्ण,विस्तृत लेख संस्मरणीय आहे.आप्पासाहेबांच्या स्मृतींना शतशः अभिवादन!

  2. अशोक देवदत्त टिळकांविषयीची माहीती ज्ञात झाली.टिळक घराणे हे साहित्य समृद्ध वाटते.साहीत्याचा वारसा त्यांच्या घराण्यातील सगळ्यांनी जोपासलेला दिसतो.लेखीकेने छान माहिती दिली.धन्यवाद.

  3. चिपळूणला श्रीकृष्ण व्याख्यानमालेत मी त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. दोन दिवस माझ्या घरी मुक्काम होता. त्यावेळी आम्ही कवी माधवांच्या जन्मगावी आणि गोपाल कृष्ण गोखले यांच्या जन्म गावी गेलो होतो. खूप छान गप्पा झाल्या होत्या. नेहमी पत्र म्हणजे पोस्ट कार्ड यायचं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here