प्रभाकर रघुनाथ जोशी
माझे आजोबा हे काही मोजक्या घरांसाठी गणपती करत असत. लहानसा कारखाना असे त्याचे स्वरूप होते. त्यांच्याकडे ही शिल्पकला पणजोबांकडून आली असावी. माझे पणजोबा चित्रकार होते असे म्हणता येईल. त्यांनी 1850 मध्ये काढलेले गणपतीचे वैशिष्ट्यपूर्ण चित्र आमच्याकडे उपलब्ध आहे. जोश्यांच्या घराण्यात असा, 1850 पासून सुरू झालेला कलाप्रवास चित्र, शिल्प, स्थापत्य, कलाशिक्षण, मुद्रण, रेखा व रंगचित्र, उपयोजित चित्रकला, शिल्पकला व मॉडेलिंग, ग्राफिक डिझाईन आणि प्रॉडक्ट डिझाईन अशा विविध शाखांत विकसित होऊन 2020 पर्यंत जोशी कुटुंबाच्या सहा पिढ्यांच्या पुढे सुरूच आहे. याला आम्हा जोश्यांच्या जनुकांचा प्रवास म्हणता येईल का?...
आजोबा कस्टम खात्यात नोकरीस होते. |
जनुक ह्या शब्दाचा अर्थ मला ‘गुगल सर्च’वर पुढीलप्रमाणे मिळाला : “जनुक हे सजीवांमधील अनुवंशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNA चा असा तुकडा, जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत (Code) आहे किंवा RNA चा असा तुकडा, की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. सगळी प्रथिने आणि RNA साखळ्या (Chains) ह्या जनुकांकडून संकेतल्या जातात. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची, तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते.” मी माझ्यातील चित्रकलेचे जनुक शोधले ते पणजोबांनी काढलेले चित्र पाहून. माझ्या वडिलांनी (रघुवीर प्रभाकर जोशी यांनी) त्यांच्या आजोबांचे म्हणजे रघुनाथ हरी जोशी ह्यांचे (माझ्या पणजोबांचे) एक हस्तलिखित जपून ठेवले होते. ते एकदा मला दिले. ते लेखन होते ज्योतिषशास्त्रावरील. मौज म्हणजे त्यात चित्रे होती. तेव्हा छपाई सहज उपलब्ध नव्हती. मूळ हस्तलिखितावरून स्वतःकरता प्रत तयार केली जात असे. तो काळ दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा. स्वहस्ते लिहून प्रत करणे याला धार्मिक महत्त्वाचे काम समजले जाई. लहानपणी आम्ही पणजोबांची ती प्रत जणू देवघरातील महत्त्वाची गोष्ट आहे असे पाहत होतो. त्यामुळे ती सहजपणे हाताळली जात नसे. त्याचा फायदा असा झाला, की ती प्रत सुरक्षित राहिली आणि आता ती माझ्या मोठ्या भावाकडे आहे. आम्हा भावंडांना ती प्रत घराण्याचा वारसा म्हणून महत्त्वाची वाटतेच, परंतु मला त्या लेखनाबरोबर असलेली पणजोबांची चित्रे अधिक मोह घालतात. त्यातून आम्हा जोश्यांना मिळालेला कलेचा वारसा कळून येतो.
पणजोबांनी काढलेली chitre |
आमचे मूळ नाव ‘शिगणे’ असे होते. जोशी कुटुंब काही शतकांपूर्वी नेवासे येथून स्थलांतर करत आलेवाडी येथे स्थायिक झाले. आलेवाडी हे सातपाटी येथील समुद्र किनार्यावरील गाव. तेथून जवळच तारापूर अणुकेंद्र आहे. माझ्या पणजोबांचा व्यवसाय ज्योतिषशास्त्राशी संबंधित असावा. आमचे ‘जोशी’ हे नाव ज्योतिषशास्त्र जाणणारे म्हणून बदलले गेले. पणजोबांचे चिरंजीव म्हणजे माझे आजोबा हे मात्र ब्रिटिश सरकारच्या कस्टम खात्यात नोकरीस होते. त्यांना गोव्यापासून वसईपर्यंत प्रवास करावा लागे. आमचे मूळ घर आलेवाडी येथे अजून आहे. मात्र ते पूर्ण कोसळले आहे.
आजोबा (प्रभाकर रघुनाथ) व थोरले काका (गजानन प्रभाकर) यांचा गणपती तयार करण्याचा लहान स्वरूपाचा कारखाना मूळ गावी होता; तो अर्थात त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय नव्हता. गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम धार्मिक निरागसता जपत केले जात असे. आजोबा, थोरले काका आणि वडील असे सर्व गणपतीच्या मूर्ती तयार करत. आजोबा 1940 साली वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करून वारले. आमचे थोरले काका हे आधी मुंबईला आले. ते स्वतः रेल्वेत अकाऊंटंट होते. त्यांनी माझे वडील व दुसरे काका ह्यांना नोकर्यांनिमित्ताने मुंबईत आणले. वडील व काका यांनी गणपती कारखाना मुंबईत काही प्रमाणात सुरू ठेवला.
वडील मॅट्रिक झाल्यावर हायकोर्ट प्लीडरचा अभ्यास करू लागले. परंतु त्यांची ती धडपड चालू असताना त्यांना त्यांच्यातील कलेचे जनुक स्वस्थ बसू देत नव्हते. वडील (जन्म 12 मार्च 1911) तिशीत असताना त्यांनी चित्रकार मालाडकर, चित्रकार हळदणकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील चित्रकला शिक्षक अभ्यासक्रम (डीटीसी, डीएम आणि एम) पूर्ण करत ते आर्ट मास्टर झाले. त्यांनी दुसरा क्रमांक बॉम्बे प्रेसिडेन्सीतून मिळवला. त्यांचा विवाह इंदुमती (हिरा) बाबरेकर हिच्याशी 1935 मध्ये झाला. आमच्या जोशी कुटुंबाचे जे.जे. स्कूलशी घट्ट नाते 1932 पासून जोडले गेले ते वडिलांमुळे. ते 2010 पर्यंत चालू राहिले. त्या वर्षी माझी पत्नी विद्यालक्ष्मी जे.जे. उपयोजित कला संस्थेतून प्राध्यापक म्हणून स्वेच्छानिवृत्त झाली. त्याआधी मी देखील काही वर्षे तेथे सहअधिव्याख्याता होतो. शिक्षकी ही आमच्या कुटुंबात असावी. माझे वडील व्ही.जे.टी.आय. ह्या प्रसिद्ध संस्थेत टेक्स्टाइल डिझाइन विभागात 1949 ते 1971 पर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तो विभाग त्यांनीच विकसित केला होता.
वडील रघुवीर प्रभाकर व आई इंदुमती |
माझे वडील रघुवीर प्रभाकर व आई इंदुमती यांना एकूण आठ अपत्ये- दोन बहिणी व आम्ही सहा मुले. जोशी कुटुंब खूप मोठे. माझे वडील त्यांच्या विस्तारीत कुटुंबातील वरून पाचवे असावेत. त्यांच्या नंतर तीन भाऊ होते. मोठे घर! माझ्या वडिलांनी प्रथम त्यांचे सर्वात धाकटे बंधू दत्तात्रय प्रभाकर ह्यांना आर्किटेक्चर अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्येच शिक्षण घेतले. ते पुढे अमेरिकेत गेले. त्यांना टाऊन प्लानिंग विषयात शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम महाराष्ट्राच्या शिक्षणक्रमात रुजवला. ते जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे व्हाईस प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. त्यांनी व्यावसायिक कामेदेखील केली. त्यांचा मुलगा चेतन व सून सुचित्रा ह्यांचे आर्किटेक्चर क्षेत्रात काम सुरू राहिले आहे (संदर्भ rivcomm.blogspot.com).
आम्हा आठ भावंडांपैकी सहा जणांचे – एक बहीण व बाकी आम्ही पाचजण – जे.जे. कलासंस्थेच्या आवारातील विभाग ह्यांच्याशी घट्ट नाते होते. माझ्या वडिलांनी चित्रकला शिक्षक म्हणून किंग्ज जॉर्ज हायस्कूल आणि अन्य काही शाळांतून काम केले होते. त्यांचा वावर महाराष्ट्राच्या कला वर्तुळात तेव्हापासून बॉम्बे आर्ट सोसायटीचे सेक्रेटरी, दादर येथील मॉडेल आर्टचे संस्थापक-सेक्रेटरी, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूट्सचे (महाराष्ट्र) सक्रिय कार्यकर्ते अशा अनेक स्वरूपाचा होता. त्यांनी चित्रकार म्हणून अनेक प्रदर्शनांतून सहभाग घेतला व पारितोषिके मिळवली. ते वृत्तपत्रे, मासिके इत्यादींतून कला समीक्षणे व लेखन करत असत. त्यांचा मृत्यू 1987 साली झाला (rivcomm.blogspot.com).
थोरली बहीण नीलांबरी (आता पटवर्धन) हिने वडिलांप्रमाणेच जे.जे. स्कूलमधून आर्ट मास्टरचे कला शिक्षण घेतले. ती मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमधून चित्रकला शिक्षिका म्हणून काम करून निवृत्त झाली. तिचे पती कै. गणपत पटवर्धन हेदेखील आमचे काका दत्तात्रय प्रभाकर जोशी ह्यांचे जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील 1958 सालातील विद्यार्थी. नीलांबरी पटवर्धन हिच्या मुलीनेही (स्वाती) कलाशिक्षण घेतले आहे. तिची मुलगी (सानिका) ग्राफिक डिझाईनर होत आहे.
तिसरे बंधू सुहास याने मुद्रण कला पदविकेत प्रथम वर्ग द्वितीय क्रमांकाने यश मिळवले (1962). ती संस्था जे.जे.च्या आवारातच आहे. सुहास याने मुद्रण कलातज्ज्ञ म्हणून काम केले. त्याच्या मुलीने देखील मुद्रण व्यवसायात अनेक वर्षे काम केले आहे. सहावे बंधू प्रकाश ह्याने जे.जे. स्कूलमधील रेखा व रंगकला-चित्रकला विभागांतून पदविका घेतली. तो दादर येथील मॉडेल आर्ट ह्या कला संस्थेच्या प्रिन्सिपॉलपदावरून निवृत्त झाला. त्याने व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्सटाइल अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आणि व्यावसायिक कामे केली.
प्रकाश नंतरचा मी. मी जे.जे. उपयोजित कला संस्थेतून कमर्शियल आर्ट अभ्यासक्रम (1972) गुणवत्ता घेत पूर्ण केला. माझी दक्षिणा फेलो (1972/73) आणि नंतर (1973) उपयोजित कला सहअधिव्याख्याता म्हणून निवड झाली. मी 1977 पर्यंत काम केले. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या व परदेशी चित्रकला शिक्षण क्षेत्रात अध्यापन 2011 पर्यंत हौसेने व स्वेच्छेने करत राहिलो. नंतर माझा रंगशास्त्राचा अभ्यास चालू असतो. त्यास जागतिक मान्यता मिळाली आहे. माझी पत्नी विद्यालक्ष्मी हिलादेखील दक्षिणा फेलोचा सन्मान मिळाला होता. आमच्या मुलाने (आदित्य) जे.जे. उपयोजित कला संस्थेतून ग्राफिक डिझाईनमधील पदवी घेऊन, तो स्वतंत्र व्यवसाय करत आहे. त्याची पत्नी गौरी हीदेखील त्याच संस्थेतून ग्राफिक डिझाईनमधील पदवीधारक आहे आणि ती जाहिरात व डिजिटल मार्केटिंग व स्ट्रॅटेजी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझ्या कुटुंबातील आम्ही चारही जे.जे. उपयोजितचे विद्यार्थी.
माझा सर्वात धाकटा बंधू चारुदत्त याने जे.जे. स्कूलमधून शिल्पकला आणि मॉडेलिंग विभागांतून गुणवत्तेसह पदविका मिळवली. त्याने बडोदा युनिव्हर्सिटीच्या फाईन आर्ट विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथेही त्याला विशेष गुणवत्तेसह यश मिळाले. त्याने शिल्पकला क्षेत्रात अनेक कामे पूर्ण केली. पुण्याचे प्रसिद्ध ट्रायबल रिसर्च म्युझियममधील डायोरमा निर्मिती, राजा केळकर म्युझियमचे क्यूरेटर अशा कामांचा त्यांत समावेश आहे. त्याने जे. कृष्णमूर्ती फाउंडेशन – वाराणसी आणि इतर शाळांमधून कला शिक्षक म्हणूनही काम केले आहे.
– रंजन रघुवीर इंदुमती जोशी 9969530942
joranjanvid@gmail.com
———————————————————————————————————————-
जोशी यांचा लेख फारच छान आहे. अशाप्रकारे प्रत्येक कुटुंबाने प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे.
फार छान
श्री रंजन जोशी हे आमचे कलेतले पाहिले गुरू ..लेख वाचताना कलेचा प्रवाह कसा वाहतोय. हे सुंदर लिखाण आणि चित्र जतन ही जोशी सरांची खासियत आहे.खूप माहितीपर लेख आहे.
कलात्मक ईतिहास असलेले कुटुंब आहे सर तुमचे आणि तुमचा रंग शास्त्रीय अभ्यास सुद्धा वाखाणण्याजोगा आहे छान आणि अभिमानास्पद माहिती बरोबर तत्कालीन परिस्थितीचेही आकलन होतय लेख वाचून.
सर, तुमच्या कला व्यासंगी कुटुंबाचा चित्रप्रवास थक्क करणारा..!!👌👌👌👍👍👍👍👍
जोशी कुटुंबाचा हा इतिहास थक्क करणारा आहे .. माझे वडील V. K. PATIL हे दादरच्या मॉडेल आर्ट संस्थेशी संलग्न होते , ते स्वतः DIRECTOR OF ART मधे होते व नंतर गोवा कॉलेज ऑफ आर्टचे प्रिन्सिपल होते.त्यामुळे R.P.JOSHIन्चा् नेहमी उल्लेख असे घरात.मी स्वतः प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जे जे मधून केली व लार्सेन अँड टुब्रो मधून निव्रुत्त झालो ( मेटल प्रिंटिंग ).हा लेख खूप आवडला .. समस्त जोशी कुटुंबास खूप खूप शुभेच्छा ! 💐💐💐
श्रीकांत पाटील नमस्कार होय V. K. PATIL माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. बर वाटले आपल्याला हयानिमित्ताने भेटून. खूप आभारी आहे आपला रंजन जोशी
Chan lekj
जोश्यांचे जनुक चित्रकलेचे, हा लेख उत्तम आहे. त्यांच्या घराण्यातील चित्रकलेचा प्रवास अदभूतच आहे.ललित लेखनाच्या अंगाने जनुक हा शब्द तिथे वापरला आहे असे मी समजतो. त्याला काही हरकत नाही.मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्जित वैशिष्ट्ये (acquired skills) ही जनुकातून संक्रमित होत नाहीत. ती बर्याच प्रमाणात बाह्य परिस्थितीतून विकसित होतात. पण बाह्य तंत्र आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत काही आनुवंशिक गुण सहाय्यकारी ठरतात, म्हणजे बुद्ध्यांक सारख्या गोष्टी.
धन्यवाद प्रकाश पेठे आपले पुस्तक 'बखर वास्तुकलेची' अभ्यासपूर्ण आणि नवा दृष्टीकोन देणारे आहे. माझ्या काका आर्किटेक प्रो. डी.पि. जोशी ह्यांच्यावरील पिडीफ आपणास शक्य झाल्यास माझ्या rivcomm.blogspot.com or slide share ranjan joshi google search वर Tribute To D.P.JOSHI पाहता येईल. आपलारंजन जोशी
धन्यवाद मी उलट म्हणेन राज शिंगे सारखी सतत नवे शोधणारी मुले भेटली हे आमचे शिक्षक म्हणून भाग्य..खूप शुभेछारंजन जोशी
खूप धन्यवाद आपले शुभचिंतन मला कुतूहल व अभ्यास करण्यास ऊर्जा देते.रंजन र.इं.जोशी
खूप धन्यवाद हा लेख दिनकर गांगल ह्यांच्या मुळे निर्माण झाला. तेव्हा त्यांचे आभार. आपला रंजन र.इं.जोशी
दिनकर गांगल ह्यांची पारख करणारी दृष्टी, ह्या लेखाचे ते खरे मानकरी. प्रत्येक कुटुंबात असे चांगले लपलेले असते. शोध घेतला तर नक्कीच मिळते.रंजन र. इं. जोशी
धन्यवाद होय ललित कलेच्या अंगाने जनुक श्ब्दाचा उपयोग केला आहे. आपण म्हणता ते खर आहे, “बाह्य परिस्थितीतून विकसित होतात. पण बाह्य तंत्र आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत काही आनुवंशिक गुण सहाय्यकारी ठरतात, म्हणजे बुद्ध्यांक सारख्या गोष्टी.” आपला रंजन र.इं.जोशी
thanks