अचलपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे ! बाबासाहेबांनी इंग्रजीराजवटीत अचलपूरनगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यासघेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिकवाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेदऔषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित
केली…
अचलपूरच्या सामाजिक–सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे !
अचलपूर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेले गाव आहे. फत्तेउल्ला इमाद उल मुल्कने 1490 मध्ये वऱ्हाडात स्वतःस इमादशहा म्हणून स्वतःचे स्वतंत्र राज्य घोषित केले आणि त्याने एलिचपूर (सध्याचे अचलपूर) येथे राजधानी वसवली. अचलपूरचे वतन देशमुख कुटुंबास तत्कालिन वऱ्हाडात मुगल राज्याची स्थापना होण्यापूर्वीच मिळाले होते. मूळचे बिदर (कर्नाटक) येथील रहिवासी असणारे ते कुटुंब बहामनी राज्याच्या वेळी वऱ्हाडात आले. त्या कुटुंबाकडे असलेल्या शेत जमिनीचा विस्तार हा सत्तावीस खेडेगावांत होता आणि लवाजमा रुपये 4291116 अशी मालमत्ता होती. पुढे, त्या मिळकतीच्या वाटण्या झाल्या. त्यातील अर्धा हिस्सा व्यंकटेश हणमंत उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्याकडे तर अर्धा हिस्सा माधवराव देशमुख यांचे सुपुत्र विठ्ठल व हरिहर यांच्याकडे आला.
प्राचीन ग्रंथ संपदा हे भारतीय संस्कृती टिकवण्याचे उत्तम माध्यम आहे. त्या विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेबांनी अचलपूर शहरातील अभ्यासू व वाचक वर्गास अल्प दरात म्हणजे केवळ तीन रुपये अनामत रकमेवर आणि चाळीस पैसे दरमहा वर्गणीवर दुर्मीळ, बहुमोल, अद्ययावत ग्रंथांचे वाचन व अभ्यास करता यावा यासाठी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. त्या संस्थेचा स्थापना दिन उपलब्ध नसला तरी वाचनालयाच्या इमारतीस स्थानिक नगरपालिकेने 1893 मध्ये जागा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख सरकारी दप्तरी दाखल आहे. त्या वाचनालयास महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडून तालुका वर्ग ‘अ’ हे मानांकन प्राप्त आहे. ते अचलपूर तालुक्यातीलच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील नामांकित वाचनालय आहे. वाचनालयाची विद्यमान संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रगती सुरू आहे. वाचनालयात दुर्मीळ पुस्तके, ग्रंथ उपलब्ध असल्याने शहरातील अनेक वाचक व अभ्यासक त्या वाचनालयातील पुस्तकांचा लाभ घेतात.
सध्याच्या विदर्भातील अमरावती विभाग म्हणजे जुन्या काळातील वऱ्हाड प्रांतातील मुख्य भाग. तेथे त्या काळी कापसाचे प्रचंड उत्पादन होत असे. त्यातही अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव, खामगाव हे कापूस उत्पादनाचे मोठे केंद्र होते. शासनातर्फे शेतीमालावर प्रक्रिया आणि त्याला बाजारपेठ उपलब्ध असावी हे जे धोरण राबवले जात आहे, ते धोरण दूरदृष्टी असलेल्या बाबासाहेबांनी 1903 सालीच राबवले होते. त्यांनी त्यांच्या कुलदेवतेच्या नावाने अंजनगाव सुर्जी येथे श्री पांडुरंग जिनिंग फॅक्टरी सुरू केली. पांडुरंग जिनिंग फॅक्टरीचे काम समाधानकारक चालत असलेले पाहून अचलपूर येथेही कापड गिरणी सुरू करावी असा विचार बाबासाहेबांच्या मनात सुरू झाला. त्यांनी ती गिरणी स्थापन करण्यामागे काही तत्त्वे व दृष्टिकोन निश्चित केले होते – गिरणी गावातच सुरू करावी, गिरणी केवळ श्रमिकांसाठी असावी, गिरणी उभारण्यात जास्तीत जास्त मंडळींचा व प्रामुख्याने विदर्भातील मंडळींचाच समावेश असावा, गिरणीचे क्षेत्र विदर्भापुरते मर्यादित असावे, गिरणीमुळे अनेकांना अन्न-वस्त्र व रोजगार मिळावा, ते स्वदेशीच्या पुरस्काराचे विशेष असे साधन असेल, गिरणीला ‘विदर्भ मिल्स’ हेच नाव असावे.
त्या योजनेस मूर्त स्वरूप 12 मार्च 1923 रोजी ‘दि विदर्भ मिल्स बेरार लिमिटेड’ या नावाने कंपनी पंजीकृत करून प्राप्त करून दिले गेले. त्यातून मिळालेल्या नफ्यातून पुढे, कापड विभाग व रंगाई खाते यांची निर्मिती करण्यात आली. कापड खात्याचा उद्घाटन समारंभ त्या वेळचे मध्य प्रांताचे गव्हर्नर सर माँटेग्यू बटलर यांच्या हस्ते झाला.
कालांतराने शासनाचे बदलते धोरण, बाजारपेठेत असलेली प्रचंड स्पर्धा व इतर कारणांमुळे ती गिरणी तोट्यात गेली. भारत सरकारने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (N.T.C.) स्थापन करून देशात ज्या एकशेपाच कापड गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले गेले त्यात विदर्भ मिल्सचासुद्धा समावेश होता. सध्या त्या जागेवर अत्याधुनिक अशी फिनले मिल ही नवीन मिल उभी आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना बघण्यास वेगळाच आनंद मिळतो.
बाबासाहेब यांनी आगपेटीच्या कारखान्यातही भांडवल गुंतवलेले होते. त्यांचा तो उद्योगही भरभराटीस यावा म्हणून प्रयत्न चालू होते. परंतु तो कारखाना अल्पावधीतच बंद पडल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.
अचलपुरात पूर्व माध्यमिक शिक्षणाशिवाय अन्य सोयी 1928 पूर्वी उपलब्ध नव्हत्या. माध्यमिक शिक्षणाकरता पाच किलोमीटरवर असलेल्या परतवाडा येथे किंवा पन्नास किलोमीटरवर असलेल्या अमरावतीला जावे लागत असे. तेथील शिक्षणाकरता विद्यार्थ्याच्या प्रवासाची सोय, खाण्यापिण्याची व राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागत असे. ते सर्व सामान्यांच्या मुलांना सहज शक्य नसल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहवे लागत असे. बाबासाहेबांनादेखील त्यांच्या पाच सुपुत्रांचे शिक्षण अमरावती येथे स्वतंत्र व्यवस्था करून करावे लागले होते. त्यातूनच बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली ती गावात हायस्कूल काढण्याची आणि उदयास आले ‘हायस्कूल एज्युकेशन सोसायटी’ ! ते 1928 मध्ये स्थापन केले व त्याच वर्षी ‘सिटी हायस्कूल’चीही स्थापना केली. त्या सिटी हायस्कूलला तत्कालीन सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस बोर्डाने 5 ऑगस्ट 1928 रोजी प्रथम मान्यता प्रदान केली. ती अमरावती जिल्ह्यातील सर्वात जुनी खाजगी शैक्षणिक संस्था असावी.
बाबासाहेबांच्या 22 एप्रिल 1931 रोजी आकस्मिक निधनानंतर त्या संस्थेची धुरा त्यांचे चिरंजीव पांडुरंग, नारायण, मेघश्याम, राजेश्वर व नातू श्रीकृष्ण पांडुरंग देशमुख यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. सद्यस्थितीत त्या संस्थेचे सुकाणू बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीकडे आहेत. बाबासाहेबांची पणती माधुरी रामराव देशमुख यांच्याकडे त्या संस्थेच्या अध्यक्ष पदाचे, तर बाबासाहेबांचे पणतू (दिपक) यांच्याकडे संस्थेच्या सचिव पदाचे दायित्व आहे.
बाबासाहेबांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे एका मोठया वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. सद्यस्थितीत हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचा विस्तार म्हणजे सिटी हायस्कूल व श्रीमती उषाबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) व द्विलक्षी अभ्यासक्रम, श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सिटी हायस्कूल, प्राथमिक विभाग या सर्व शैक्षणिक संस्था प्रगतीपथावर असून अमरावती जिल्ह्यात नामवंत म्हणून ख्यातीप्राप्त आहेत.
सर्वसामान्य लोकांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी हे बाबासाहेबांचे विचार त्यांच्या मुलांमध्येही होते. त्या काळात विदर्भ मिल्स परिसरातून अचलपूर शहरात येणे कठीण होते. कारण जाण्या-येण्यासाठी खूप मर्यादित साधने उपलब्ध होती व तशा परिस्थितीत मिलच्या कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत या हेतूने सिटी हायस्कूलचे तत्कालीन शिक्षक विदर्भ मिल परिसरात मिल कामगारांच्या मुलांचे वर्ग घेत असत. ते वर्ग मिलच्या थिएटरमध्ये (सध्याचे मोती मंगल कार्यालय) भरत असत. सिटी हायस्कूलच्या शिक्षकांना तेथे पाठवून मिल कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली होती.
बाबासाहेबांच्या मातोश्री राधाबाई देशमुख यांचा ‘श्री पांडुरंग जिनिंग फॅक्टरी’मध्ये सात आण्यांचा हिस्सा होता. त्या हिश्श्याच्या नफ्याची रक्कम बाबासाहेबांजवळ जमा होती. त्यापैकी चाळीस हजार रुपयांच्या रकमेच्या सरकारी प्रॉमिसरी नोटा घेऊन त्या विश्वस्तांच्या स्वाधीन केल्या गेल्या. विश्वस्तांनी त्या नोटांचे जे व्याज येईल त्यातून धर्मार्थ आयुर्वेदीय औषधालय चालवावे व त्या अनुषंगाने ट्रस्ट डीड तयार करावी असे बाबासाहेबांनी ठरवले होते. त्याप्रमाणे धर्मार्थ औषधालयाची स्थापना 14 जानेवारी 1921 रोजी करण्यात आली. ते धर्मार्थ औषधालय ‘श्रीमती राधाबाई देशमुख धर्मार्थ आयुर्वेदिक औषधालय, अचलपूर शहर’ या नावाने सुरू करण्यात आले. लोकांना औषधे बाहेरून विकत आणून देण्यापेक्षा आपल्या नजरेखालीच औषधे खलून रुग्णांना देणे अधिक हिताचे व विश्वासाचे म्हणून वैद्यबुवा यांच्या सल्ल्यानुसार बाबासाहेबांनी औषधी तेथेच तयार करण्याचा विभाग उघडला. ते आयुर्वेदीय औषधालय बरीच वर्षे सुरू होते. डॉ.अनंत त्रिंबक भारतीय यांनी ते आयुर्वेदीय औषधालय चालवले. नंतरच्या काळात इंग्रजी औषधांचे प्रस्थ अधिक वाढल्यामुळे ती स्वयंपूर्ण आयुर्वेदीय चिकित्सा पद्धत मागे पडली. त्यामुळे सध्या ते बंद स्थितीत आहे. बाबासाहेबांचे प्रत्येक क्षेत्रांतील कार्य यशस्वीपणे पुढे प्रगतीपथावर गेले आहे.
बाबासाहेबांचे आचरण ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेच करी ||’ या संत तुकाराम यांच्या अभंगातील पंक्तीप्रमाणे होते. बाबासाहेबांनी इंग्रजी राजवटीत अचलपूर नगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यास घेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिक वाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेद औषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित केली. त्यांचे अचलपूरच्या विकासातील मोलाचे कार्य पाहिल्यावर बाबासाहेब देशमुख हे आधुनिक अचलपूरचे शिल्पकार असे अभिमानाने सांगता येते. दानधर्म व मदत देण्यात नेहमीच अग्रेसर सकलगुणसंपन्न असणारे बाबासाहेब देशमुख यांचे अतिश्रम, प्रवास व त्यामुळे होणारी दगदग यामुळे बासष्टव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी गावकर्यांमधून उस्फूर्तपणे बाहेर आलेले शब्द म्हणजे ‘आज हमारे बस्ती का राजा चले गया…’
– दिपक देशमुख 94221 58051 advdwdach@gmail.com
———————————————————————————————————————————-
दीपक देशमुख यांनी बाबासाहेबांबदल जे स्तुत्य लिखाण केल त्या बदल खरोखरच खूप छान वाटल बाबासाहेबांचा व आपल्या पूर्ण घराण्याचा आमच्या मनात नेहमीच आदर होता आणि राहीलही माझे वडील नारायणराव हिंगणीकर यांचेकडून नेहमीच चांगल्या गोष्टी एकायला मिळायच्या किंबहुना आमच्या घरातील उते ४ मेंबर आपल्या शाळेत असल्यामुळे तो आदर वेगळाच होता लहान पणा पासून आपल्या घराण्याचा आदर सद्य स्थितीत जास्तच वृद्धींगत झाला कारण आजच्या स्वार्थी समाजात असेही लोक असतात हे देशमुख कुटुंबीयांनी स्वतःच्या कार्यत्वाने सिध्द केल श्रीमंतीचा बडेजाव न करता इतराचा इतका मोलाचा विचार करण एखाद्या कर्मयोग्यालाच जमू शकत प्या कर्मयोग्या ला शतशः नमन q आपण त्यांचे वारसदार आहात वयोग्य मार्गावर आहात म्हणून आपलेही अभिनंदन