Home व्यक्ती आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man –...

आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man – Anand Karve)

आनंद दिनकर कर्वे हे भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांची ख्याती करडई तेलबियावरील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून आहे. त्यांनी गोड ज्वारीपासून साखर निर्मितीच्या प्रकल्पाचा सल्लागार म्हणून इराणमध्ये काम केले आहे. ऊसाची रोपवाटिका ही त्यांनी विकसित केलेली संकल्पना पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसशेतीच्या भागात लोकप्रिय झाली आहे. त्यांनी स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून जैवइंधन तयार करण्याची पद्धत विकसित केली. कर्वे हे आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ‘ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी’ या विषयावर काम करत आहेत. आनंद कर्वे हे पुण्यातील ‘अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक. त्या संस्थेला ब्रिटनमधून ‘ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अॅश्डेन पुरस्कार’ 2002 आणि 2006 साली, असा दोन वेळा मिळाला आहे. तो पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो.

आनंद कर्वे यांचा जन्म पुण्यात 7 ऑगस्ट 1936 रोजी समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांच्या घराण्यात झाला. महर्षी कर्वे हे त्यांचे पितामह. आनंद यांचे वडील दिनकर धोंडो कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर त्यांच्या आई म्हणजे मानववंश शास्त्रज्ञ, साहित्यिक इरावती कर्वे या होत. त्या स्कूटरवर पुण्यात फिरणाऱ्या पहिल्या महिला असा त्यांचा आणखी वेगळा लौकिक होता.

आनंद कर्वे यांनी वयाच्या विसाव्या वर्षी बी एस्सी ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळवली आणि ते उच्च शिक्षणासाठी जर्मनीच्या ट्यूबिंगेन विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी वनस्पतिशास्त्रात 1960 साली डॉक्टरेट मिळवली. त्यानंतरची चार वर्षे, ते व्याख्याते पंजाब विद्यापीठात व मराठवाडा विद्यापीठात होते. त्यानंतर, ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रुजू झाले. तेथे त्यांनी 1964 ते 1966 या दोन वर्षांसाठी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुखपद भूषवले. फलटणचे बनबिहारी विष्णू निंबकर हे त्यांचे मेव्हणे. त्यांनी ‘निंबकर सीड्स’ नावाने संकरित बियाण्यांचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु त्या वेळी राज्याचा कृषी विभाग, कृषी संशोधक हे सारे संकरित बियाण्यांच्या विरूद्ध मताचे होते. संकरित बियाणे म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांचा खेळ असे कृषिशास्त्रज्ञ व सरकारी अधिकारी म्हणत असत. मात्र 1972 मध्ये दुष्काळ पडला. त्या दुष्काळात केवळ संकरित ज्वारी तग धरून राहू शकली. ‘हायब्रीड’ची ती जादू मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे ते संकरित बियाण्यांचे खंदे प्रचारक बनले. त्यामुळेच कृषी खात्याचा विरोध गळून पडला !

कर्वे यांना भेटण्यास आलेल्या निंबकर यांचे म्हणणे होते, की कर्वे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ‘निंबकर सीड्स’ संस्थेत संशोधन प्रकल्प द्यावे. ते त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतील. ते बियाणेविषयक समस्यांवर संशोधन करतील. त्यांना पीएच डी मिळेल व निंबकर यांचेही काम होईल. कर्वे निंबकर यांना घेऊन कुलगुरू अप्पासाहेब पवार यांच्याकडे गेले, पण त्यांना ती कल्पना पटली नाही. त्यांचे म्हणणे “विद्यापीठातील संशोधन भांडवलदाराचे पैसे घेऊन चालवण्याचे आपले धोरण नाही; आपल्याला समाजाच्या मालकीच्या (समाजवादी अंगाने) बाजूने कामे करायची आहेत.” आनंद कर्वे यांचा पिंड संशोधकाचा असल्याने त्यांनी विद्यापीठातील नोकरी सोडून निंबकर सीड्ससाठी संशोधन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

कर्वे हे ‘निंबकर सीड्स’चे संशोधन-संचालक म्हणून 1982 सालापर्यंत कार्यरत राहिले. तेथून पुढे त्यांनी स्वत:ला कृषी संशोधनात गाडून घेत कामे केली. देशात कामे करताना त्यांनी विदेशातही सेवा केली. त्यांनी ‘अलेक्झांडर फॉन हुंबोल्ट फाउंडेशन सीनियर रिसर्च फेलो’ या नात्याने जर्मनीतील फ्रायबुर्ग विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात 1983 साली संशोधन केले. ते ‘इंटरनॅशनल रॉस्टर ऑफ सॅफ्लॉवर एक्सपर्ट’चे सदस्यदेखील होते. त्यांनी म्यानमारमध्ये ‘युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ या संघटनेच्या वतीने भुईमूग तज्ज्ञ म्हणून काम केले; इराणमध्ये गोड ज्वारीपासून साखर निर्मितीच्या प्रकल्पाचा सल्लागार म्हणून काम केले.

त्यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीवर चालणाऱ्या ‘कास्टफोर्ड’ या प्रकल्पात 1988 मध्ये काम केले. त्यांनी पुण्यातील इंद्रायणी बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी 1993 मध्ये स्वीकारली. त्यांनी त्यांच्या आयुष्याची सारी वाटचाल कृषी क्षेत्रातच केली. ते मुंबईतील ‘हिंदुस्थान लिव्हर’च्या कृषी विभागाचे 1984 ते 88 या कालावधीत प्रमुख होते. त्या कंपनीने ‘पारस सीड्‍स’ या नावाने बियाणे उद्योग सुरू केला होता, पण त्यांचा मुख्य व्यवसाय सौदर्यप्रसाधने निर्मितीचा आणि तो कायम स्वरूपाचा होता. त्या तुलनेत बियाणे व्यवसाय छोटा आणि हंगामी होता. शिवाय, तेथे स्वतंत्र संशोधन करण्यास मनाई होती. म्हणून त्यांनी त्या कंपनीचा राजीनामा दिला. त्याच वेळी पुण्यातील बी.डी. टिळक यांनी त्यांना त्यांच्या ‘कास्टफोर्ड’ (सेंटर फॉर अॅप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रूरल डेव्हलपमेंट) या नव्याने सुरू केलेल्या गटात कामाला येण्याचे सुचवले. टिळक हे ‘कास्टफोर्ड’चे संचालक आणि कर्वे हे उपसंचालक म्हणून काम करत असत. टिळक हे ग्रामीण क्षेत्रासाठी संशोधन व तंत्रे आणण्याकरता धडपडत होते. ते सरकारी संस्थांमधील संशोधनाचा वापर व्यावसायिक स्तरावर आणण्याकरता चाचपणी करत असत. ‘कास्टफोर्ड’चे कामकाज कोथरूडमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचा एक भाग म्हणून चालवले जात असे. टिळक भारतीय विज्ञान व औद्योगिक परिषदेत सतत जात. ते तेथील शास्त्रज्ञांनी शोधलेले काही तंत्र किंवा शोध याची माहिती घेत. ते स्वयंसेवी संस्थांच्या परिषदा पुण्यात घेत व त्यात त्या शोधांची माहिती देत. कर्वे हे नंतर ‘कास्टफोर्ड’चे संचालक झाले. पुढे, याच गटाने त्यांच्या नेतृत्वाखाली अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) या नावाने नोंदणीकृत संस्था स्थापन केली.

आरती संस्थेने विकसित केलेल्या तंत्रांचे व्यावसायिकरण करण्यासाठी त्यांच्याच पुढाकाराने 2001 साली फलटण येथे ‘सह्याद्री तंत्रसेवा व औद्योगिक सहकार संस्था स्थापन झाली व ते त्या संस्थेचे संस्थापक संचालक बनले. स्वयंसेवी संस्थेला जोडून व्यावसायिक संस्था असा हा अनोखा प्रयत्न यशस्वी फार ठरला नसला तरी त्या प्रयोगाने इतर अनेक संस्थांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवला आहे.

अ‍ॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) या संशोधन केंद्राची स्थापना 1996 साली झाली. आनंद कर्वे यांनी त्या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या संस्थेमार्फत कमी जागेत कमी संसाधनांत अधिकाधिक शेती उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक तंत्रे विकसित केली. हजारो शेतकरी ती तंत्रे महाराष्ट्रच नाही तर भारतभरात आणि भारताबाहेरही वापरत आहेत. शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करून ती रोपे इतरांना विकली तर शेतकऱ्याला शेतीतून मिळणाऱ्या फायद्यापेक्षाही अधिक नफा मिळतो आणि रोपवाटिकेला लागणारी जागा व मेहनत शेतीच्या तुलनेत किरकोळ असते.

तसेच, ते बांबूचे स्वस्त हरितगृह उभारून त्याद्वारे फुलांची व भाजीपाल्यांची शेती करत आहेत; बांबूवर रासायनिक प्रक्रिया करून, त्यापासून हरितगृह, भाज्यांचे मांडव, पाण्याच्या टाक्या, फर्निचर, ट्रेलर, हातगाड्या इत्यादी उपयुक्त वस्तू तयार करून पंचक्रोशीत विक्री करतात; बांबूपासून पाण्याची टाकी तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवतात व त्यामुळे खेडूत बायकांची पाण्यासाठी होणारी वणवण वाचते. कर्वे गावागावात बचतगट स्थापन करून ऑस्ट्रेलियन अकोशिया या वनस्पतीची लागवड करण्यास प्रोत्साहन देतात, कारण त्या झाडांच्या शेंगांपासून उत्कृष्ट दर्ज्याचा साबण तयार करता येतो.

कर्वे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले अन्न वापरून बायोगॅस तयार करता येतो हे सर्वप्रथम दाखवून दिले. पारंपरिक बायोगॅस संयंत्रांना लागणाऱ्या चाळीस किलो शेणाऐवजी, त्या प्रणालीला फक्त एक किलो जैव खाद्य लागते आणि त्यातून गॅस पाचशे ग्रॅम तयार होतो.  अनेक उद्योजक त्या संकल्पनेचा वापर करून व्यवसाय करत आहेत व ओल्या कचऱ्यावरील बायोगॅस निर्मिती ही संकल्पना सर्वमान्य झाली आहे. बायोगॅस हे प्रदूषणमुक्त जैव इंधन होय. त्यातील ज्वलनशील तत्त्व म्हणजे मिथेन हे आहे. देशात उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय कचऱ्यापासून मिथेन गॅस तयार केला तर एक हेक्टरसुद्धा जमीन लागवडीखाली न आणता दरवर्षी दहा कोटी टन इतका मिथेन भारतात निर्माण होऊ शकतो. परंतु सव्वाशे कोटीच्या या देशात अवघी पंचवीस लक्ष बायोगॅस संयंत्रे आहेत ही खेदाची बाब आहे.

मिथेन वायू स्वंयपाकघरासाठी वापरू शकतोच, पण पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या इंजिनांमध्ये इंधन म्हणून त्याचा उपयोग करणे हे अधिक फायद्याचे ठरते. विशेषत: ग्रामीण भागात वीजेचा तुटवडा तर असतोच आणि विद्युतजनित्रे चालवण्यासाठी लागणारे डिझेल किंवा पेट्रोल खेड्यात मिळत नाही; ते मिळाले तरी पेट्रोल वा डिझेल जाळून खाजगी रीत्या निर्माण केलेली वीज ही प्रती युनिट दहा ते पंधरा रुपये इतकी महाग पडते. त्यामुळे कचऱ्यापासून स्वस्तात मिळणारा बायोगॅस वापरून वीजनिर्मिती केल्यास ती खूपच स्वस्तात पडेल.

‘आरती’ने शेतातील काडीकचऱ्यापासून कांडीकोळसा निर्माण करण्याची वैज्ञानिक शक्कल शोधून काढली. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर हा पट्टा ऊसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऊसाचे पीक घेतल्यानंतर, दरवर्षी साधारणत: पंचेचाळीस लाख टन कचरा पाचटाच्या (वाळलेल्या पात्याच्या) रूपाने मागे उरतो. तो शेतातच जाळला जातो. देशभरात गव्हाचे काड, मक्याच्या बुरकुंड्या, बाजरीचे सरमाड, भाताचा पेंढा; तसेच गळीत धान्ये, कडधान्ये, भाज्या, केळी, हळद, कपाशी अशा पिकांचा शेतात उरणारा भाग, बोरे व द्राक्षे यांची छाटणी केल्यावर मिळणार्‍या काड्या व फांद्या, फळबागांचा पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या व करवंट्या, कडधान्याच्या शेंगांची टरफले वगैरे टाकाऊ शेतमाल दरवर्षी साठ कोटी टनांवर जातो. तो वर्षानुवर्षे जाळून नष्ट करण्याची पद्धत आहे.

कोळसा मिळवण्यासाठी जैव कचरा स्टेनलेस स्टीलच्या पिंपात घालून भट्टीस बाहेरून उष्णता दिली जाते. त्यामुळे ऑक्सिजनच्या गैरहजेरीत त्याचे विघटन होते आणि त्यातून सत्तर टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने बाहेर पडतात; जैवभाराचा अवशेष उरतो, तो कोळसा असतो. अशा प्रकारे, जैवभार पेटवण्यासाठी लागणारी उष्णता जैवभार पेटवूनच मिळवली जाते.

‘आरती’ने तयार केलेल्या भट्ट्या आकाराने छोट्या असल्यामुळे त्या सहज हलवता येतात. त्या भट्टीतून एकूण आत जाळलेल्या जैवभाराच्या वीस टक्के कोळसा मिळतो. म्हणजेच देशातील साठ कोटी कृषिकचऱ्यातून बारा कोटी टन कोळसा मिळवता येऊ शकतो. त्या कोळशाचा बारीक भुगा करून त्यात थोडे शेण किंवा खळ मिसळल्यास साच्याच्या साहाय्याने कांडीकोळसा किंवा इंधन विटा तयार करता येतात. तो कोळसा तंदूर, बार्बेक्यू किंवा साध्या शेगडीत; तसेच, लोहार कामासाठीसुद्धा वापरता येतो. कोळसा जळताना धूर होत नाही. तो शेतकऱ्यांसाठी जोडउद्योग होऊ शकतो. कांडीकोळसा पारंपरिक कोळशाच्या शेगड्यांमध्ये इंधन म्हणून वापरता येतो. तसेच, आरतीच्याच वैज्ञानिकांनी कांडीकोळशावर चालणाऱ्या कार्यक्षम अशा वाफेच्या कुकरचीही रचना केली आहे.

कर्वे यांनी सुमारे पन्नासहून अधिक संशोधन प्रकल्प राबवले आहेत. त्यांनी सव्वाशे संशोधनपर निबंध व अडीचशे शास्त्रीय लेख लिहिले आहेत. त्यांची चार मराठी पुस्तके, एक व्हिडिओ फीत आणि पंधरा सीडीज प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांना ‘ऑइल टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’द्वारे प्रा. जे.जी. काणे पारितोषिक 1980 साली बहाल करण्यात आले. त्यांना वॉशिंग्टनच्या ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेण्ट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’द्वारा सर्टिफिकेट ऑफ मेरिट त्याच वर्षी बहाल करण्यात आले. ते नवी दिल्ली येथील ‘इंडियन नॅशनल अकॅडमी’द्वारा प्रदान करण्यात येणार्‍या ‘डॉ.बी.डी. टिळक’ पुरस्काराचे मानकरी 1995 साली ठरले. त्यांनी ‘विज्ञान तंत्रज्ञान व मानव’ या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत पहिले भाषण करण्याचा मान पटकावला. ती परिषद जर्मनीतील हाले या ठिकाणी 2000 साली भरली होती. ते भारतात प्रतिष्ठेच्या असलेल्या जमनालाल बजाज पुरस्काराचेही 2007 सालचे मानकरी आहेत. त्यांना तो पुरस्कार लोकोपयोगी विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदान यासाठी बहाल करण्यात आला.

आनंद कर्वे हे बहुआयामी संशोधक आहेत. त्यांच्या विविध कल्पनांमध्ये महात्मा गांधी यांची स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे सामर्थ्य आहे. त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते कोपऱ्यावरील दूधवाल्यापासून ते इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सपर्यंत सर्वांशी एकाच पद्धतीने वागतात आणि बोलतात. त्यांच्या घरात तर सगळेच त्यांना ‘नंदू’ या नावाने पुकारतात. ते सदैव कार्यमग्न असतात. ते डोक्यात एकादी नवी कल्पना आली की ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अधीर होतात. ते सत्त्याऐंशी वर्षांचे आहेत. ते तरुणांइतक्याच उत्साहाने नवीन संशोधनात गढलेले असतात.

आनंद कर्वे यांची मुलगी प्रियदर्शिनी कर्वे यांनीसुद्धा त्यांच्या वडिलांबरोबर समुचित तंत्रज्ञानात काम केले. ऊसाच्या पाचटापासून इंधन बनवण्याच्या तंत्रज्ञानाला मार्च 2002 मध्ये लंडनचा तीस हजार पौंडाचा (तेव्हाचे बावीस लाख रुपये) पुरस्कार मिळाला. त्या प्रकल्पाचे नेतृत्व प्रियदर्शिनी यांनी केले होते. अन्नधान्याची टंचाई, इंधनांची टंचाई, नापीक जमिनी या समस्या भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार आहेत. निसर्गाशी सुसंवाद साधून, सहजसोपी जीवनशैली स्वीकारणे हाच पर्याय उपलब्ध आहे. आनंद कर्वे यांच्यासारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञांचे संशोधन हा तशा समस्यांवर उतारा ठरतो.

आनंद कर्वे adkarve@gmail.com

– जोसेफ तुस्कानो 9820077836 haiku_joe_123@yahoo.co.in

————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version