अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)

1
435

बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठी संगीत रंगभूमीचे जनक मानले जातात. किर्लोस्कर हे आडनाव रत्नागिरी जिल्ह्यातील किर्लोसी या गावावरून पडले. अण्णांचे पूर्वज किर्लोसी हे गाव सोडून कर्नाटकातील गुर्लासूर या गावी आले. ते गाव बेळगाव जिल्ह्यात मलप्रभा नदीच्या काठी धारवाडपासून बारा कोसांवर (साधारण पंचवीस किलोमीटर) आहे. अण्णासाहेबांचा जन्म 31 मार्च 1843 रोजी तेथे झाला. त्यांच्या आईचे निधन त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी झाले. त्यांचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत घरीच, विठोबा भुस्कुटे या शिक्षकांच्या जवळ झाले. त्यात मराठी व कानडी लिहिणे, वाचणे एवढाच भाग होता. पुढे, त्यांच्या इंग्रजी दोन इयत्ता कोल्हापुरात झाल्या. त्यांचा विवाह त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी पन्हाळगडचे मामलेदार बाबासाहेब कोनकर यांची कन्या द्वारकाबाई हिच्याशी झाला. अण्णा विवाहानंतर गुर्लासूर येथे परत आले. ते धारवाडला अभ्यासासाठी सुमारे चार वर्षे राहिले. त्यांनी काव्यलेखनाला लहान वयातच सुरुवात केली. ते शिक्षणासाठी पुण्यात 1863 मध्ये आले. त्यांचे ज्युनिअर फर्स्ट क्लास पर्यंतचे शिक्षण विश्रामबाग येथील शाळेत झाले. त्यावेळी ते सरवटे वाड्यात शनिवार पेठेतील मारुतीच्या देवळाच्या पिछाडीला राहत असत. त्यांना नाटकांचा छंद त्याच वेळी जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला.

अण्णांनी नाटकांच्या तालमी कसबा गणपती जवळच्या केदारेश्वराच्या बोळातील एका आडजागेच्या घरात घेण्यास सुरुवात केली; त्या पोटीच्या खर्चासाठी कानातील मोत्यांची भिकबाळी विकली, सावकाराकडून कर्ज काढले. नाटकाचा पहिला मुक्काम नगरला केला. नाटकातील मंडळींची फाटाफूट पुढे झाली. अण्णा उरलेल्या मंडळींना घेऊन खानदेशात गेले. हरभट खरे यांनी त्यांना तेथून गुर्लासूर येथे परत 1866 मध्ये आणले. ते किर्लोस्करांचे आश्रित होते. त्या वेळी अण्णांचे वय बावीस वर्षांचे होते. नंतर ते वकिलीच्या अभ्यासासाठी धारवाडला जाऊन राहिले, पण नापास झाले. नंतर ते बेळगावला शिक्षक म्हणून नोकरीला लागले, परंतु त्यांचा मुक्काम नाटक मंडळीतच असे. ते सुमारे आठ वर्षे बेळगावात होते. त्यांनी ‘श्री शांकर दिग्विजय’ हे गद्य नाटक 1873 मध्ये रचले. त्यांनी ‘भरत शास्त्रोत्तेजक मंडळी’ची स्थापनाही केली. त्यांनी बेळगावात असताना पंचवीस आख्याने रचली. ती नाटकमंडळ्या आणि हरदासी लोक यांना उपयुक्त होती. त्यांनी युक्लीडच्या सिद्धांतावर पन्नास पदे केली होती. त्यांनी ‘अल्लाउद्दीनची चितुरगडावर स्वारी’ हेही नाटक लिहिले. तेथेच त्यांच्यावर कन्नड संगीत नाटकांचा प्रभाव पडला. त्यांपैकी कर्नाटकी मंडळींच्या ‘संगीत पारिजातक’ या नाटकाचा उल्लेख मुद्दाम करता येईल. त्यांनी त्यानुसार मराठीत गद्यपद्यात्मक श्रीकृष्ण पारिजातक, रासक्रीडा, विक्रमचरित्र, हरिश्चंद्र, शुक रंभा अशी नाट्यरूपे लिहिली. त्यांनी शास्त्रीय रागदारी पद्धतीने आणि भक्तिसंगीताच्या चालीतही मराठी, हिंदी, कानडी भाषांत पदे लिहून ठेवली होती. त्यांनी विष्णुदासांची नाटके पाहिली होती. त्यांनी विष्णुदास भावे यांच्यासाठी आख्यानेही रचली होती. अण्णांचा लेखन प्रवास ‘संगीत शाकुंतल’ हे नाटक लिहिण्यापूर्वी असा झालेला होता. पुढे, त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि ते पोलिस खात्यात जमादार झाले. परंतु तीही नोकरी त्यांना मानवली नाही. ते रेव्हेन्यू खात्यात नोकरीला 16 ऑक्टोबर 1878 पासून लागले.

ते पुण्याला 1880 मध्ये आले असताना, त्यांनी मुंबईच्या दादाभाई सोराबजी पटेल यांच्या पारसी नाटक कंपनीचे ‘इंद्रसभा’ हे नाटक पूर्णानंद नाट्यगृहात पाहिले. ते गद्यपद्यात्मक होते. त्यातील देखावे आकर्षक, डोळे दिपवणारे होते. त्याचे संगीत उडत्या चालीचे होते. अण्णासाहेब ते नाटक पाहून भारावून गेले आणि त्यांच्या मनाने तशा प्रकारचे नाटक मराठीत हवे असे घेतले. त्यांनी कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत संगीत शाकुंतल लिहिण्यास त्या भरात घेतले. त्यांनी पहिले चार अंक लिहून झाल्यावर त्याची रंगीत तालीम केली. तो दिवस होता 13 ऑक्टोबर 1880. मुहूर्त होता विजयादशमीचा. ते सारे पुण्याच्या तंबाखू आळीतील शुक्रवार पेठेतील गुळवे यांच्या हवेलीत घडून आले. त्या ठिकाणी पुढे सार्वजनिक सभा स्थापन झाली. संगीत शाकुंतलाच्या पहिल्या चार अंकांचा प्रयोग 31 ऑक्टोबर 1880 रोजी, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्याच्या बुधवार पेठेतील आनंदोद्भव थिएटर मध्ये (भांग्या मारुती समोर) सादर झाला. त्या नाटकाची नांदी ही मराठी संगीत रंगभूमीची नांदी ठरली ! ‘पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो’ ही खमाज रागातील रचना शंभर वर्षांनंतरही त्याच निष्ठेने गायली जाते. त्या नाट्यप्रयोगात भूमिका पुढीलप्रमाणे केल्या गेल्या –

– स्वतः अण्णासाहेब – सूत्रधार, शारंगरव, मारीच.

– मोरोबा वाघोलीकर म्हणजे मोरो बापूजी वाघोलीकर (यांचे मूळ आडनाव देव) हे दुष्यंत

– बाळकोबा नाटेकर म्हणजे बाळकृष्ण नारायण नाटेकर – कण्व.

– शंकरराव मुजुमदार – शकुंतला

– केशवराव शुक्ल – दुष्यंताचा सारथी

– गंगाधर भीमराव जांभेकर – विदूषक

नांदी आणि मंगलाचरण यांच्या गायनासाठी सूत्रधाराबरोबर परिपार्श्वक म्हणून बाळकोबा नाटेकर आणि नाना शेवडे हे होते. नाटकातील सर्व पात्रे स्वतः स्वतःची गाणी संगीत शाकुंतलपासून गाऊ लागली. पूर्वी ती एकटा सूत्रधार गात असे. शकुंतलेला नाटकात सुरुवातीला एकही गाणे घातले नव्हते, कारण ती भूमिका करणारे शंकरराव मुजुमदार यांना गायन येत नव्हते. भाऊराव कोल्हटकर (लक्ष्मण बापूजी कोल्हटकर) किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये बडोद्याहून 20 सप्टेंबर 1882 रोजी सामील झाले. त्यांनी गेईटी थिएटर, मुंबई येथे ‘शाकुंतल’मध्ये नटीची भूमिका प्रथमच केली. ती भूमिका लोकप्रिय झाली. अण्णासाहेबांनी भाऊरावांना शकुंतलेची भूमिका देण्याचे ठरवले आणि तेव्हाच त्यांनी गोविंद बल्लाळ देवल यांना किर्लोस्कर नाटक मंडळीत बोलावले. त्यांची जबाबदारी शकुंतलेसाठी पदरचना करावी आणि भाऊराव कोल्हटकर यांना नाटकाचे शिक्षण द्यावे अशी होती. देवल हे अण्णासाहेबांचे पट्टशिष्य होते. त्यांनी शकुंतलेच्या काही गद्य संवादांच्या जागी पदे लिहिली आणि मग शकुंतला नाटकामध्ये गाऊ लागली !

‘संगीत शाकुंतल’चा प्रयोग मुंबईच्या ग्रँटरोडच्या रिपन थिएटरमध्ये (तेव्हाचे व्हिक्टोरिया नाटकगृह) येथे 21 नोव्हेंबर 1880 रोजी झाला. प्रयोगाला अपूर्व यश मिळाले. अण्णासाहेबांना कीर्ती खूप प्राप्त झाली. नाटकाला तीन प्रयोग मिळून दोन हजारांवर प्राप्ती पहिल्या वर्षी झाली. बुधवारवाडा 1879 साली जळाला आणि त्याबरोबर त्यात असलेली नेटिव्ह जनरल लायब्ररीही जळाली. तेव्हा अण्णासाहेबांनी लायब्ररीत ग्रंथखरेदीसाठी आणि इतरही काही कामांसाठी देणग्या दिल्या. त्यांनी ‘संगीत शाकुंतल’चे पुढील तीन अंक क्रमाक्रमाने लिहिले. एकूण दोनशे पदे ‘शाकुंतल’मध्ये होती.

किर्लोस्करी संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे ते संगीत कथानकाचा वेग वाढवणारे आणि नाट्यरसाचा परिपोष करणारे होते. ते हरदासी थाटाचे होते. त्यात साकी, दिंडी, कामदा अशी जातिवृत्ते, स्त्रीगीते, अंजनीगीते, लावणी, टप्पा या सगळ्यांचा समावेश असे. त्यात कानडी चालींचाही वापर होता. पदरचना सुबोध, प्रासादिक होती. शास्त्रीय राग लोकांना परिचित असलेले- यमन, भूप, बिहाग, भीमपलास, आसावरी, ललत, जोगी, पिलू असे होते. त्यामुळे किर्लोस्कर संगीत लोकप्रिय झाले. अण्णासाहेबांनी तीन वेगवेगळी पदे ‘उद्धवा शांतवन कर जा’ या एका गाण्याच्या चालीवर ‘शाकुंतल’मध्ये रचली. अण्णासाहेबांनी पदरचना ‘अजि अक्रूर हा’ या गाजलेल्या गाण्याच्या चालीवरही केली. लोकांना ते सारे परिचित वाटे. मोरोबा, बाळकोबा आणि भाऊराव हे उत्तम गायक होते. मर्यादित गायन हे किर्लोस्करी संगीताचे वैशिष्ट्य होते, तरीही ‘शाकुंतल’च्या पहिल्या प्रयोगाचे परीक्षण करताना ‘इंदु प्रकाश’ या वृत्तपत्रात अशी टीका आली, की “कण्वाचे पात्र गायनकलेत निपुण होते, तथापि कंठ अतिशयच मधुर पडला व गायनात रसपरिपोषापेक्षा ताना घेण्याकडे विशेष लक्ष पुरवले गेले.” केरूनाना छत्रे या विद्वानांनी मोरोबा आणि बाळकोबा यांना जाणीव करून दिली होती, की पदे म्हणत असताना ललकार्‍या आणि जोरजोरात ताना अधिक घेतल्यामुळे अर्थाची हानी होते आणि रसभंग होतो. किर्लोस्करी संगीतात पुढे काही दोष शिरले, तरीही अण्णासाहेबांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्या संगीताचा प्रभाव अनेक वर्षे राहिला. त्या संगीताने रसिकांची अभिरूची घडवली. अण्णासाहेबांच्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी रसिकांची मने हर्षोत्फुल्ल झाली. ‘संगीत शाकुंतल’चा प्रयोग ही मराठी रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाची घटना ठरली ! अण्णासाहेबांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, पण त्या व्यवसायातील माणसे स्वैर वर्तन करत. ते पाहून अण्णासाहेब व्यथित होत. त्यांनी अतिशय उद्विग्नतेने काढलेले उद्गार “मी हे केशराचे शेत लावून ठेवले आहे व त्यात गाढवे चरत आहेत.” हे प्रसिद्ध आहेत. अण्णासाहेबांचे निधन 2 नोव्हेंबर 1885 रोजी झाले.

 मेधा सिधये 9588437190 medhasidhaye@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. शाकुंतल नाटकाचा पहिला प्रयोग बेळगाव येथे झाला याबद्दल आपणास काही माहित आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here