बहनो और भाइयो… (Ameen Sayani)

2
394

‘आवाज की दुनिया के बेताज बादशहा’ अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. कुणालाही सहज प्रश्न पडेल की त्यांच्याविषयीचा श्रद्धांजलीपर लेख इथे कसा काय? तर उत्तर अगदी साधे आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातील भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे. या धाग्याची सगळ्यात उत्तम जाण कोणाला असेल तर ती अमीन सायानी या सुसंस्कृत माणसाला.

अमीन सायानी एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील. आयुष्यातल्या ‘कोमल ओल्या आठवणींची रांग’ न बुजता पुढे जात राहील, अनोळख्यांनाही गतजन्मीची ओळख पटेल*…      

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

*अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

-बा.सी.मर्ढेकर

‘बहनो और भाइयो…’

आवाज देखणा असतो? चेहरा असतो देखणा. पण आवाज? हो, असतो! शाळकरी वयात एका आवाजाच्या देखणेपणाच्या प्रेमात मीच काय माझ्या वयाच्या अनेक मुली आणि मुलेसुद्धा पडली होती.

बुधवार, रात्री आठ ते नऊ हा तास पाचही प्राण अक्षरशः असंख्य कानांत येऊन थांबलेले असायचे. ‘बहनो और भाइयो…’ आणि मग हिंदी चित्रपटांतली सर्वाधिक गाजणारी सोळा गाणी त्यांच्या लोकप्रियतेनुसार उलट्या क्रमाने वाजायची. शेवटी पहिल्या क्रमांकावर कोण येणार याची उत्सुकता दाटलेली असायची, पैजा लागायच्या. ‘दिल थामकर बैठना’ काय असते ते त्या वयातच कळले होते.

आणि मग बिगुल वाजायचे. थेट काळजात उतरायचे. ‘पहली पायदान पर…’ आणि ते गाणं! बिनाका गीतमाला संपली की चुटपूट आणि पुढच्या बुधवारची वाट पाहाणे.

दुसऱ्या दिवशी शाळेची मधली सुट्टी बिनाका गीतमालेवरच्या चर्चेला वाहिलेली. पण खरे सांगायचे तर त्या एका तासात होणारी ती जादू त्या सोळा गाण्यांची नव्हतीच मुळी. ती गाणी काय एरवीही रेडिओ सिलोनवरून ऐकायला मिळायचीच. जादू होती ती त्या ‘बहनो और भाइयो’ ने सुरू होणाऱ्या आवाजाची. तो आवाज, त्यातला शब्द न् शब्द, प्रत्येक उच्चार कानात साठवला जायचा. ‘बिनाका गीतमाला’ होती ती अमीन सायानींमुळे. दुसऱ्या कोणी जर ती सादर केली असती तर ती बिनाका गीतमाला झालीच नसती.

सिलोन रेडिओवरच प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटांची पब्लिसिटी अमीन सायानींच्या आवाजात व्हायची. ‘कब्रस्तान का दरवाज़ा अपने आप खुला. देखते ही देखते वह लड़की ग़ायब हो गई. वो… कौन थी?’ अमीन सायानींनी एवढं म्हटल्यामुळे रहस्य अधिकच गहिरे व्हायचे. आता ‘वो कौन थी’ पाहिल्याशिवाय चैन नाही. ‘मेरा नाम जोकरररर…’- अमीन सायानी शब्दाला आपले असे खास आकार द्यायचे. पुढे अनेक ब्रॉडकास्टर्सनी त्यांचे अनुकरण करायला सुरुवात केली. पण त्यांच्या शब्दांना ते राजस आकार कधी लाभले नाहीत.

रेडिओवरून कानावर पडणारे सुरेल आवाज होते रफी-मुकेश-तलत-मन्ना डे-किशोरकुमार… या सगळ्या आवाजांना देखणे चेहरे लाभलेले असायचे. दिलीपकुमार-देव आनंद-राज कपूर…किती तरी. पण अमीन सायानी हा एक आवाज असा होता की ज्याचे व्हिज्युअलायझेशन करावे लागायचे. एक अत्यंत उमदे व्यक्तिमत्त्व, अत्यंत देखणा चेहरा उभा राहायचा मनात…

काही वर्षं गेली. संगीतकार मदनमोहन यांचे निधन झाले होते. त्यांची शोकसभा एचएमव्हीच्या ऑफिसात होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या माधुरी या फिल्मविषयक पाक्षिकाचे संगीतावर लिहिणारे उपसंपादक हरीश तिवारी यांच्याबरोबर मी -प्रशिक्षणार्थी पत्रकार -शोकसभेला गेले. चित्रपट आणि चित्रपट-संगीत क्षेत्रातली बरीच मंडळी आली होती. काही जण बोलले. ‘मुकेशभाई, ये हमारी कलीग हैं.’- हरीशजींनी मुकेशशी ओळख करून दिली. पण त्याहून महत्त्वाचं वाक्य त्यांचे होते ते म्हणजे, ‘अमीनभाई आ गए.’ मी वळले. सामान्य उंचीचे पण अतिशय उमद्या व्यक्तिमत्त्वाचे अत्यंत देखणे गृहस्थ हॉलमध्ये येऊन श्रोत्यांमध्ये बसले. त्या क्षणी मला जिंकल्याचा आनंद झाला! माझे व्हिज्युअलायझेशन यशस्वी ठरले होते. शोकसभा संपली. बाहेर येता येता मी हरीशजींना म्हटलं, ‘अमीन सायानींनी बोलायला हवं होतं. नाही का?’ तेही चुटपुटले. म्हणाले, ‘अरे हाँ, उनसे ऑर्गनाइजर्स ने कहा ही नहीं बोलने को. वे तो ज़रूर बोलते.’

नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांत अमीन सायानींना ‘याचि डोळा’ ऐकत आले. दोन वेळा मुलाखतीचाही योग आला, पण तो अमीन सायानी नावाच्या अस्तित्वाला साजेसाच. दोन्ही वेळा कामातील व्यग्रतेमुळे त्यांनी फोनवरच मुलाखती दिल्या. अमीन सायानींचा आवाज. त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद. त्यातल्या पहिल्या वेळी त्यांनी आवर्जून माझी चूक सुधारून दिली, ‘सयानी नहीं, सायानी है.’ अमीन सायानींचे असंख्य चाहते आजही ही चूक करत असतात. मला शहाणपण आले ते खुद्द अमीन सायानींच्या शिकवणुकीतून.

अमीन सायानी म्हणजे बिनाका गीतमाला हे समीकरण कायमचे कोरले गेले आहे.  रेडिओ प्रसारणाच्या इतिहासात. 1952 साल. म्हणजे पहिली निवडणूक होऊन देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे साल. बी. व्ही. केसकर हे माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री होते. त्यांना वाटले, हिंदी चित्रपटातल्या गाण्यांनी देशाची तरुण पिढी बिघडेल. त्यांनी आकाशवाणीवर चित्रपटगीतांच्या प्रसारणाला बंदी घातली. सिलोन रेडिओने संधी साधली. सिलोन रेडिओची लोकप्रियता गगनाला भिडली. अमाप व्यावसायिक लाभ झाला. पण त्याचबरोबर जगात एकमेव अशा ‘भारतीय चित्रपट-संगीत’ या भारतीय संगीत-प्रकारावर फार मोठे उपकारही करून ठेवले. या कार्यक्रमांत सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला तो बिनाका गीतमाला. चित्रपटांचे संगीतकार, निर्माते-दिग्दर्शक, गायक-गायिका, अभिनेतेसुद्धा बुधवारी ‘दिल थामकर’ वाट पहात असायचे. केवळ आवाजाच्या जोरावर बिनाका गीतमाला सादर करणारे अमीन सायानी म्हणजे आवाजाच्या दुनियेतले बेताज बादशाह झाले आणि त्यांची प्रदीर्घ कारकीर्द पुढे भारत सरकारने त्यांची चूक सुधारल्यानंतर विविध भारतीवरही ‘सिबाका गीतमाला’ या नव्या नावाने चालूच राहिली. अमीन सायानींनी श्राव्य माध्यमात प्रसारणाचा जो आदर्श घालून दिला तो कायमस्वरूपी. अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले, अनेक एकलव्यही झाले त्यांचे.

त्यांनी चित्रपटांच्या पब्लिसिटीसाठी या माध्यमाचा प्रभावी वापर केला. चित्रपटांची पब्लिसिटी करणारे रेडिओ प्रोग्राम व्हायचे. ते त्याच्या नाट्यपूर्ण स्क्रिप्ट लिहायचे, सादर करायचे. ते 1953 मध्ये ‘आह’ पासून राज कपूरच्या चित्रपटांची पब्लिसिटी करू लागले. ‘मेरा नाम जोकर’ची पब्लिसिटी सुरू केली ती राजसाहेबांच्या टीमने दिलेल्या ब्रीफिंगवरून. चित्रपट न पाहता. अमीनभाई बोलायचे ‘मेरा नाम जोकरररर’. चित्रपट पाहिला तेव्हा आपली चूक त्यांच्या लक्षात आली. चित्रपटाचा सूर कारुण्याचा होता. पुढच्या स्लॉटमध्ये अमीनभाईंनी चूक सुधारली. त्यांनी 1973 मध्ये ‘बॉबी’च्या पब्लिसिटीचे काम आले तेव्हा अट घातली. फिल्म पाहिल्याशिवाय पब्लिसिटी करणार नाही. ‘बॉबी’ सुपरहिट झाला.

चित्रपटसंगीत हाच प्रांत. त्यामुळे आणि अमीनभाईंच्या स्वभावामुळेही चित्रपट-संगीत क्षेत्रातल्या अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. बिनाका गीतमाला सुरू केली तेव्हा त्यांनी लता, रफी वगैरे सगळ्या गायक कलाकारांचे बाइट्स घेतले. किशोरकुमार मात्र सारखे टाळत होते. शेवटी एकदाची वेळ दिली. पण दूरवरच्या ठिकाणी बोलावलं. अमीनभाईंची टीम तेथे पोचली, पण गेटवरच अडवण्यात आले. किशोरकुमारने निरोप पाठवला की अमीन सायानी परत जाईल तेव्हाच बाइट देईन. किशोरकुमारची मुलाखत कधीही न घेण्याची शपथ घेऊन अमीनभाई परतले. काही वर्षं गेली आणि 1964 साली ‘दूर गगन की छाँव में’ या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी किशोरकुमारने त्यांना बोलावले. ते गेले नाहीत. 1971 मध्ये ‘दूर का राही’साठी बोलावले. ते गेले नाहीत. ते कालांतराने विविध भारतीवर ‘सारिडॉन के साथी’ हा कार्यक्रम करू लागले. ‘बढ़ती का नाम दाढी’ या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी किशोरकुमार स्वतः भेटायला आला. अमीनभाई म्हणाले, ‘गेटवरच्या पहिलावानांना पाहिलं नं? मुलाखत दिली नाही तर ते बुकलून काढतील.’ किशोरकुमार म्हणाला, ‘बदला ले रहे हो?’

दिनेश लखनपाल हा माझा पत्रकार आणि अनेक डॉक्युमेंटरीजचा दिग्दर्शक मित्र. त्यानंच ही आठवण वर्णन करून सांगितली. तो सूत्रसंचालन करत असलेल्या एका कार्यक्रमात दिलीपकुमार, लता मंगेशकर वगैरे बरीच स्टार व्यक्तिमत्त्वे व्यासपीठावर बसली होती. काही समोर प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले होते. दिनेशला अमीन सायानी यांना व्यासपीठावर पाचारण करायचे होते. त्याने प्रेक्षकांना एक प्रसंग कथन केला-

दिलीपकुमार लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच्या काळात एका पत्रकाराने त्यांना विचारले होते, की ‘तुमच्यापेक्षाही मोठा कुणी स्टार आहे असं तुम्हाला कधी वाटतं का’? त्यावर दिलीपकुमार म्हणाले, ‘आम्ही स्टार बनतो ते लार्जर दॅन लाइफ इमेज तयार केल्यामुळे. मी जी भूमिका करत असतो त्या भूमिकेसाठीचा मेकअप, कॉसच्युम मी केलेला असतो, नयनरम्य लोकेशनवर शूटिंग होतं. सोबत सुंदर हिरॉइन असते, माझ्याकडून मार खाणारा व्हिलन असतो. खास शैलीत बोलायचे संवाद असतात, कॅमेऱ्याच्या खास कोनातून मला आकर्षक रीत्या दाखवलं जातं. डबिंगमध्ये संवादफेक अधिक चमकदार होते, पार्श्वसंगीत सगळा माहौल आणखी उठावदार करतं. आणि मग थिएटरच्या काळोखात पडद्यावर मी स्टार बनून पेश होतो. पण एक माणूस असा असतो की तो कुठे बसलाय हे कुणालाच दिसत नाही. फक्त त्याचे तीन शब्द ऐकू येतात आणि ऐकणारा कान टवकारतो, चालणाऱ्याची पावलं थबकतात. बोलणारा बोलायचं सोडून ऐकू लागतो. ते तीन शब्द असतात, ‘बहनो और भाइयो…’

बस्स. एवढे बोलताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मूर्तिमंत सभ्यपणा असे अमीनभाई व्यासपीठावर येऊन मध्यभागी हात जोडून उभे राहिले. भावुक झाले होते. कडकडाट चालूच होता. काही क्षण असेच गेले. मग सूत्रसंचालक दिनेशनं त्यांना माइकवर येऊन थोडं बोलायची विनंती केली. ते व्यासपीठाच्या कोपऱ्यात उभ्या माइकपाशी आले. बोलू लागले, ‘बहनो और भाइयो…’

 आणि अवघं प्रेक्षागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. क्षणभर अमीनभाई अवाक्. आणि मग तेही हास्यकल्लोळात सामील झाले.

एक्याण्णव वर्षांचे उमदे आयुष्य जगून अमीन सायानी यांनी दुनियेचा निरोप घेतला. पण निरोप कसला? माझी पिढी बालपणीच ज्या देखण्या आवाजावर फिदा झाली, तो आवाज अवकाशात फिरत राहणार- रफीच्या, लताच्या आवाजासारखाच. तंत्रज्ञानाचे किती आभार मानावेत! अमीनभाईंचा तो आवाज हवा तेव्हा कानांना, मनाला आजही ऐकू येत राहणार. नव्या पिढ्यांनासुद्धा कळेल, आम्ही किती देखणी दुनिया पाहिली, ऐकली !

– रेखा देशपांडे 9821286450 deshrekha@yahoo.com

About Post Author

Previous articleऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious Heritage of Mumbai City)
Next articleकुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि कवी बोरकर
रेखा देशपांडे या पत्रकार-लेखक-चित्रपटसमीक्षक-अनुवादक आहेत. त्यांनी माधुरी, जनसत्ता, स्क्रीन, लोकसत्तामधून पत्रकारिता, चित्रपट-समीक्षा केली आहे. त्यांची चित्रपट विषयक ‘रुपेरी’, ‘चांदण्याचे कण’, ‘स्मिता पाटील’, ‘मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास’, ‘नायिका’, ‘तारामतीचा प्रवास : भारतीय चित्रपटातील स्त्री-चित्रणाची शंभर वर्षे’ आणि ‘दास्तान-ए-दिलीपकुमार’ अशी सात पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच इतिहास, समाजकारण, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील अनुवाद प्रकाशित आहेत. त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सावल्या’, ‘कालचक्र’, ‘आनंदी गोपाल’ या मालिकांचे पटकथा-संवाद-लेखन केले आहे. त्यांनी अनेक माहितीपटांसाठी लेखन, तसेच ‘कथा तिच्या लग्नाची’ या चित्रपटाचे सहलेखन केले आहे. त्या फीप्रेस्की या आंतरराष्ट्रीय चित्रपट-समीक्षक संघटनेच्या सदस्य व देशी-विदेशी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून क्रिटिक्स ज्युरीच्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या आहेत.

2 COMMENTS

  1. देवयानी चौबळ, दिवाकर गंधेजी, रेखाजी तुम्ही तुमच्या लेखण्यांनी चित्रपट रिळांच्या मागची, वास्तवाची रीळं वाचकांसाठी उलगडलीत, कधी चांदण्यांची मागची बाजूही प्रकाशित केलीत. सूत्रसंचालन व्यवसायाचा आद्य गुरु अमिन सायानी नावाचा हाही खजिना असाच सुंदर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here