अकोला हे शहर मोर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा उपयोग आक्रमण करणाऱ्या शत्रूविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाची फळी असा होई, त्या काळची ही गोष्ट आहे. म्हणूनच मोर्णा नदीच्या पश्चिमेला आसदगडाची निर्मिती होऊन, त्याला लगत नागरी वस्त्या निर्माण झाल्या. अकोला शहराचा निश्चित कार्यकाल सांगता येत नाही. परंतु एक आख्यायिका प्रचलित आहे. अकोलसिंह नावाचा सरदार कान्हेरी येथे राहत होता. त्याची पत्नी ही महादेवाची भक्त होती. सध्या अकोल्यात जेथे राजराजेश्वर मंदिर आहे तेथे आधी जंगल असायचे. तेथे महादेवाची पिंड होती. अकोलसिंह याची पत्नी त्या पिंडीची पूजा करण्यास मध्यरात्र उलटल्यावर कान्हेरीवरून येई. ती अभिषेकासाठी पाणी मोर्णा नदीचे वापरत असे. ही गोष्ट अकोलसिंह याच्या कानावर गेली. अकोलसिंह याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. त्याने त्याची पत्नी पूजेसाठी निघाल्यावर हाती तलवार घेऊन तिचा पाठलाग एका रात्री केला. ही गोष्ट अकोलसिंह याच्या पत्नीला समजली तेव्हा तिला दुःख झाले. तिने महादेवाची प्रार्थना मनोमन करून धरणीमातेने तिला उदरात सामावून घ्यावे अशी इच्छा प्रकट केली. तोच प्रचंड कडकडाट झाला. शिवलिंग दुभंगले आणि त्यात अकोलसिंह याच्या पत्नीने उडी घेतली !
अकोलसिंहाने पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवलिंग पुन्हा जुळले. पत्नीच्या वस्त्राचा केवळ पदर त्याच्या हातात आला. त्या घटनेमुळे पश्चाताप झालेल्या अकोलसिंहाने तेथेच राहून शिवभक्ती सुरू केली. पुढे, त्याच्यासोबत इतरही लोक त्या परिसरात वास्तव्याला आले. अशा प्रकारे मोर्णा नदीच्या काठावर वस्ती उदयास आली. अकोलसिंहाच्या नावावरून ‘अकोल’ हे नाव रूढ होऊन अकोला नावारूपाला आले. मोर्णा नदीच्या वर्णनात आसदगड आणि ही आख्यायिका यांना विशेष महत्त्व आहे.
अकोला शहराचा ऐतिहासिक कालखंड औरंगजेब बादशहाच्या कारकिर्दीपासून सुरू होतो. औरंगजेबाने दिल्लीचे तख्त 1658 मध्ये काबीज केले. अकोला शहराची ‘जहागिरी’ औरंगजेब बादशहाने त्याच्या मर्जीतील आसदखान नावाच्या सरदाराला दिली. बाळापूर किल्ल्याची सुरक्षा मजबूत राहवी आणि आग्नेय दिशेने शत्रूची चढाई थोपवावी यासाठी अकोला शहरात आसदगड किल्ल्याची निर्मिती झाली. किल्ल्याला अंडाकृती परकोट आहे. तो मोर्णा नदीच्या प्रवाहाला लागून बांधण्यात आला. किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष मुख्य तटबंदीपासून मोर्णा नदीच्या काठाकाठाला दगडी पूलापर्यंत काही ठिकाणी सुस्थितीत तर काही ठिकाणी भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यामध्ये ‘तीन वेस’ (प्रवेशद्वारे) होत्या. पहिली ‘दहिहंडा वेस’ सध्याच्या गणेश घाटाच्या समोर आहे. दुसरी ‘आगरवेस’ गुलजार पुऱ्यालगत आहे. ती भग्नावस्थेत आहे. तिसरी वेस शिवाजीनगरला होती. तिला पूर्वी ‘गंजी वेस’ म्हणत.
अकोला शहराची भरभराट मोर्णेच्या साक्षीने झाली आहे. मोर्णा नदी ही विशेषत: जुन्या अकोल्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती. अकोलेकर पहाट झाल्याबरोबर मोर्णा नदीच्या काठावर सूर्य नारायणाचे दर्शन तथा तांब्यात मोर्णेचे जल घेऊन, राजराजेश्वराला अभिषेक करत व त्याचे दर्शन घेत. जुन्या शहरातील बऱ्याच लोकांच्या सकाळची सुरुवात राजेश्वराच्या दर्शनाने होते. मोर्णा नदीचे पाणी गढूळ झाल्यामुळे मोर्णेचे जल अभिषेकासाठी वापरणे मात्र बंद झाले आहे. मोर्णा नदीच्या काठावर सकाळी पाणी भरण्यासाठी गर्दी होई. दुपारी महिला तेथे धुणी धूत. गुरांची गर्दी गुलजारपुरा भागात असे, ती पाणी पिण्यासाठी. जनावरांना त्यांचे मालक त्या ठरावीक ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणत. गोरक्षण संस्था त्याच भागात मोहता मिलच्या पटांगणात होती. ती आता गोरक्षण रोडवर आहे.
मोर्णा नदीवर छोटेमोठे एकूण पाच पूल आहेत. मोर्णा नदीच्या पूर्वेला सरकारी इमारतींचे तथा अधिकाऱ्यांच्या बंगल्यांचे निर्माण 1860 नंतर सुरू झाले. त्यामुळे अकोला शहराची दळणवळणाची गरज वाढली. प्रसंगी, नदी पोहूनही पार करावी लागत असे. दहिहंडा वेस ते गणेश घाट या दरम्यान एक दगडी रपटा (जलप्रवाह ओलांडण्यासाठी दगड टाकून तयार केलेला रस्ता) अस्तित्वात होता. तो पाणी ओसरल्यावर वापरता येई. त्या रपट्याचे अवशेष सापडत नाहीत. तत्कालीन वृत्तपत्र ‘वऱ्हाड समाचार’ने त्याबाबत लेखमाला चालवली होती. त्या प्रसिद्धीचा परिणाम होऊन 1874 मध्ये सिटी कोतवाली ते जयहिंद चौक या मार्गावर दहिहंडा वेशीजवळ ‘लोखंडी पूल’ बांधला गेला. त्याला ‘मोठा पूल’ म्हणतात. इंग्रजांनी आगरवेशीच्या पुढे दगडी पूल निर्माण केला. दगडी पूल जीर्ण झाल्यामुळे तो पाडून तेथे नवीन पूल बांधला गेला आहे. दगडी पूलाचे अवशेष आहेत.
मोर्णा नदीसोबत अकोला महानगरातील ‘कावड उत्सव’ आणि ‘गणपती उत्सव’ याबाबतच्या ऐतिहासिक गोष्टी जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ 1942-43 मध्ये पडला होता. अकोल्यालाही त्याची प्रचंड झळ पोचली होती. त्यावेळी अकोल्यातील काही युवकांनी मातीची पिंड बनवून तिची मनोभावे पूजा केली. दोन दिवसांनी, अकोल्यात पाऊस झाला आणि मोर्णा नदीला मोठा पूर आला ! पुराचे पाणी शहरात शिरले. परिसराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. घरांच्या भिंती पडल्या. घराघरातील साहित्य वाहून गेले. मात्र मातीची पिंड जशीच्या तशी होती. सखाराम वानखडे, बाबुराव कुंभार, कासार तथा कथले या युवकांचा त्या अनुष्ठानात पुढाकार होता. पुढे तेथे उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मंडळाने मातीची पिंड पुन्हा 1944 मध्ये तयार केली आणि मोर्णा नदीच्या जलाने तिला अभिषेक केला. मंडळाने वाघोली येथे पायी जाऊन, काटेपूर्णेचे पाणी भोपळ्यात आणून राजेश्वराला जलाभिषेक पुढील वर्षीपासून सुरू केला. कावड उत्सव अशा प्रकारे सुरू झाला.
अकोल्यात मानाचे गणपती तीन आहेत- बाराभाई गणपती; जागेश्वर-अंबिका संस्थान मंडळाचा गणपती तथा राजराजेश्वर मंडळाचा गणपती ! त्यांचे पूजन करून गणपती उत्सव होतो व विसर्जन मिरवणूकही निघते. मिरवणूक गणेश घाटावर संपते. गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद अलिकडे निर्माण केला जात आहे.
अकोला शहराची नदीच्या पूर्वेला नवीन शहर तर पश्चिमेला जुने शहर अशी विभागणी मोर्णा नदीने केली आहे. जुन्या शहरातील लोकांना कामानिमित्त नवीन शहरात येणेजाणे करावे लागते. त्यामुळे नदी ओलांडल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. मात्र नवीन अकोल्यातील माणसांचे तसे नाही. नदीशी त्यांचा संबंध सणावाराप्रमाणे येतो. श्रावण महिन्यात राजराजेश्वराच्या दर्शनाच्या वेळी, रामनवमीला जुन्या राम मंदिरात रामाच्या दर्शनाच्या वेळी, एकादशीला जुन्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाच्या वेळी, गणपती महोत्सवात मानाच्या गणपतींचे दर्शन, नवरात्रीत सुद्धा महत्त्वाच्या देवींच्या दर्शनाच्या वेळी नवीन शहरातील लोकांचा नदीशी व जुन्या गावाशी संबंध येतो. इतकेच नव्हे तर गावाजवळ असलेल्या गावांतील व्यक्तीचे निधन झाल्यावर अजूनही मोर्णा नदीच्याच तीरावर शहरातील महत्त्वाच्या तीन ते चार स्मशानभूमी आहेत, तेथे नवीन शहरातील अकोलेकरांचा नदीसोबत संबंध येतो. नवीन शहरातील लोकांना अकोल्यातील मोर्णा नदीवर असे जुन्या भावनेतून प्रेम आहे. नवीन शहरातील लोकांपेक्षा अकोल्याच्या जुन्या शहरातील लोकांचा नदीशी जिव्हाळा अधिक आहे. नदीबाबत जुन्या शहरातील लोक फार भावनिक आहेत. त्यांचा जिव्हाळा त्यांच्या वागण्यातूनही जाणवतो. नदीच्या अस्वच्छतेबद्दल त्यांच्या मनात हळहळ असते. अकोल्यात कोणताही उत्सव किंवा सण जोपर्यंत त्याची मिरवणूक मोर्णा नदीकाठी जात नाही तोपर्यंत तो ‘साजरा’ होत नाही.
मोर्णा नदी हा शहराचा स्वच्छ आणि निर्मळ पाण्याचा विनापाणीपट्टीचा स्रोत होता. मोर्णा नदी ही अकोल्याची खरी ओळख आहे. अकोला महानगराची ऐतिहासिक महत्त्वाची संक्रांत 2018 सालच्या जानेवारी महिन्यातील तेरा तारखेला साजरी झाली. ती किमया साध्य झाली अकोला जिल्हा प्रशासनातील त्रिमूर्तींमुळे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे; उपजिल्हाधिकारी राजेश खवले आणि उपविभागीय अधिकारी संजय खडसे या तिघांच्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानामुळे मोर्णा नदीला नवसंजीवनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ते तिघे ध्येयवेडे प्रशासक आहेत. जिल्हा प्रशासनाने मोर्णा नदीची भीषण अवस्था पाहून नदी स्वच्छ करण्याचा निर्धार केला. नागरिकांनीसुद्धा कृतियुक्त सहभाग त्या अभियानात घेतला. मोर्णा नदी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप काही काळ प्राप्त झाल्याने मोर्णा नदीला मोकळा श्वास तेव्हा घेता आला ! नदीचे आठ किलोमीटर पात्र स्वच्छ झाले होते- पण काही काळ !
मोर्णा नदी स्वच्छता अभियान आणि भूमिगत गटार योजना यांची योग्य सांगड घालून ती योजना लवकरात लवकर प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे. मोर्णा नदीच्या पात्रात दोन्ही बाजूंला पुण्याच्या धर्तीवर सांडपाणी वाहून नेणारे ‘कॅनॉल’ बांधून ते सांडपाणी जल तथा मल निस्सारण प्रकल्पापर्यंत वाहून नेण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
– निलेश कवडे 9822367706 nilesh.k8485@gmail.com