अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा सण वैशाख शुद्ध तृतीयेस साजरा केला जातो. त्या दिवशी कृतयुगाचा आरंभ होतो असे म्हणतात. तो पवित्र दिन म्हणून विविध धर्मकृत्ये, पुण्य, दानधर्म, हवन, सत्कर्म करून पुण्यसंचय केला जातो. परशुराम जयंती त्याच दिवशी असते. चैत्रात बसवलेल्या गौराई(गौरी)चे विसर्जनही त्या दिवशी होते.
खानदेशातील अक्षय तृतीया (आखाजी) म्हणजे सासुरवाशिणीला मुक्तिदिनच असतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी येऊन सासरचा थकवा, सल, बोच, कढ व्यक्त करण्याचे मोकळेपण तेव्हाच लाभते. चैत्र-वैशाखाच्या उन्हासोबत तिची माहेरची हुरहूर, ओढ वाढावी अन् माहेरच्या वाटेकडे डोळे लागावे अशी भावावस्था आपोआप आखातीच्या मुहूर्ताला जमा होते. त्यामुळे मुलीमहिलांचा आनंदोत्सवच तो !
माझे सासरचे दिवस, सासुरवास आठवला तरी अंगावर शहारे येतात. आठवू नयेत हेच बरे. 1980/85 चा काळ, त्याच बरोबर बालपण आणि बालपणीची आखाजी हृदयाच्या कोपऱ्यात घर करून आहे ! वय वर्ष सहा ते चौदापर्यंतचे बालपण मनाला मोरपिसाचा मुलायम स्पर्श करून जाते. जातपात, उच्चनीच, गरीब-श्रीमंत असे भेद, दरी कळत नसलेल्या निष्पाप, निर्मळ जीवनाचा काळ म्हणजे बालपण. तसा तो निरागस, सोनेरी, फुलपंखी काळ मीही जगले.
सर्व जातिधर्मांतील लोक एकत्र नांदत असलेल्या गल्लीतील आम्ही पोरी, मैत्रिणी, बालसख्या एकत्र खेळत असू. घरघर (भातुकली म्हणजे भांडीभांडी) खेळणे, आट्यापाट्या , दोरीउड्या, लंगडी, हूतुतू, फुगड्या, लुपाछुपी, चौपट, कवड्या, लगोऱ्या, कचकडे, बिटट्या, बाहुला-बाहुली, नवरा-नवरी, गाण्यांच्या भेंड्या, उखाणे असे विविध खेळ असत. एकमेकींशी भांडत, गट्टी फू करत, रागरुसवा विसरत पुन्हा एकत्र येत असू. चैत्र-वैशाखातील गौराई (गौर) बसवणे हा अविस्मरणीय सण असे. महिनाभर रोज बालसख्यांनी सकाळी एकत्र येणे, झाडाचा झोका, गाणी, झगडणे मनात पिंगा घालते. चैत्र पौर्णिमेला गल्लीतल्या-गावच्या सर्व मुली गौराई बसवत असू. लाकडाची गौर, प्रतिमा न्हाऊमाखू घालून लाल वस्त्र पाटावर टाकून, पूजा करून बसवत असू. हळद-कुंकू, अक्षता वाहून फुलहार चढवला जाई. मोठी बहीण, भाऊ ओट्यावरचे कोनाडे सजवण्यास मदत करत. मी शेंडेफळ म्हणून घरकामात सूट मिळे. पण तो वेळ शाळा, पाटी-पुस्तक, अभ्यास, आवडीनिवडी यांत जास्त घालवण्यास आवडे. स्वाध्याय, पाढे तोंडपाठ झाल्यावर संध्याकाळी ओट्यावर, अंगणात, झाडाखाली आवडीचा खेळ खेळत असू.

गौराईच्या दिवसांत सकाळी लवकर जागायचो. तांब्याचा तांब्या मातीने, राखेने चकचकीत घासायचा. त्यात पानी भरायचे. नागवेलीची किंवा आंब्याच्या झाडाची पाने तांब्याच्या तोंडावर ठेवायची. मध्ये बसेल असा काळ्या चिकण्या मातीचा घट्ट गोळा पानांच्या मध्ये ठेवायचा. त्यावर सुती कापड ठेवून, कोरडी माती गाळून चिकन लेप द्यायचा. तांब्याच्या भोवती चंदन, हळदकुंकवाची बोटे ओढायची. तो बालपणीचा मंगलकलश नारळाशिवायचा असायचा. रुमालाची किंवा जुन्या फडक्याची चुंबळ डोक्यावर ठेवून त्यावर कलश ठेवायचा. डोक्यापेक्षा चुंबळ मोठी असायची. गल्लीतील सर्व बालसख्या एकत्र जमायचो. हातात टिपऱ्या घेऊन गौराईची गाणी म्हणत नदीवर ‘पानी आणायला’ निघत असू. त्या नदीवरून कलश भरून आणलेल्या पाण्याने गौराई न्हाणवायचो.
अमरावती व भोगावती या दोन नद्यांच्या ‘डाच्यात’ (तोंडात) वसलेले गाव म्हणून आमच्या गावाचे नाव ‘दोंडाईचा’. अमरावती नदी राहत्या घरापासून लांब म्हणून आम्ही जवळच्या भोगावती नदीत, नदीच्या पुढील आमराईत गौर खेळायला, ‘पानी भरायला’, टिपऱ्या खेळायला जायचो. आम्ही सख्या स्कर्ट, परकर-पोलकी घालून, हातात नया पैशाच्या प्लास्टिकच्या रबरी बांगड्या, गळ्यात द्राक्षरंगाच्या काचेच्या मण्यांची माळ, कानात साधे डूल, पायात गिल्लटचे काळेकुट्ट चाळ (पैंजण)… असे काचकथिलही सोन्याचा, हिऱ्यामोत्याचा आनंद देत असे. अर्थात ते माहीतही नव्हते. तो आनंद, ते रमणीय बालपण, तो निरागसपणा, निष्पाप जगणे सोन्याचे आयुष्य घडवत होते.
त्या काळी पार्लर, मेकअप हे गावीही नव्हते. कुंकू ओले करून ओठ लालसर करायचो. चुलीवरच्या तव्यावरचे ‘काळे’ काजळ म्हणून हौसेने डोळ्यांच्या कडांना लावायचो. आईच्या हातचा धपाटाही खायचो. कुठली तरी खाकी पावडर एखाद्या मैत्रिणीकडे असे. म्हणजे आमच्या मानाने ती खूप श्रीमंत, सुखदायी गोष्ट. ती थोडी पावडर भाव खात आम्हालाही देई. केसांना कधी तेल तर कधी पाणी लावून चापूनचोपून, करकचून दोन वेण्या रिबिनी लावून बांधून दिल्या जात. एखाद्या सिनेमाचे पोस्टर बघून, नखरा म्हणून ‘हिरॉईन’सारखे दोन्ही कानांजवळ केसांच्या बटा काढून सोडायचो व मखडवायचो. आईच्या शिव्या, मोठ्या भावाचा मार त्यासोबत असायचे. एकंदरीत असे नटूनथटून, मुरडत-हसत, खेळत नदीवर जात असू. तेथे नाचतगात, टिपऱ्या खेळत महिनाभर मजा करायचो. महिनाभर रोज गौराईला वेगवेगळी माळ (हार,सर) करून गळ्यात घातली जायची. जसे-मुरमुरे, शेव, भुईमूग शेंगा, डांगरच्या बिया, टरबूज बिया…. यांच्या माळा केल्या जायच्या. गौर म्हणजे पार्वती. म्हणजे माहेरी आलेली मुलगी. सासरहून आलेल्या मुलीला सर्व पौष्टिक अन्न मिळावे, मानसन्मान मिळावा, सासुरवासात राहून आलेल्या मुलीला सर्व सुखे, पोषक आहार मिळावा हा हेतू त्यामागे असावा.

वैशाख द्वितीयेला कुंभाराघरी वाजतगाजत सन्मानाने ‘शंकर’ आणण्यास जायचो. सर्व आपापल्या परीने सजून-सवरून, नटूनथटून तयार व्हायचो. एवढ्या लहान वयात मापाचे पोलके कोठून मिळणार? म्हणून मोठ्या वहिनीचा, बहिणीचा, आईचा डगला पोलका किंवा फ्रॉकवरच साडी गुंडाळून घ्यायचो. साडी घालताच पोक्तपणाचा आव यायचा. झटके मारत, मुरडत चालत असू. ‘शंकर’ आणण्यासाठी ताट घेऊन त्यात हळद-कुंकू, अक्षता, पांढऱ्या कापडाच्या चिंध्यांना हळद लावून, पिवळे करून फेटा, धोती, उपरणे बनवण्यासाठी न्यायचो. गौरी-कलश पुढील ‘धान्या’ पूजेला असत. कुंभाराला त्याने ‘शंकर’ (काळ्या मातीचा) घडवला म्हणून मोबदला नया पैसा, एक पै, दोन पै, तीन पै, पाच पैसा, दहा पैसे अशी नाणेरुपात असे. कुंभाराघरी पोरींची झुंबड असे. शंकर घेऊन घरी उत्साहाने टिपऱ्या वाजवत, गौराईची गाणी म्हणत, आनंदात, उत्साहात परतत असू. गौराईशेजारी शंकर बसवून त्यास नैवेद्य दिला जाई. माझी माय गोड गव्हाचे काटके (जाड शेवया), दूध शेवया, सांजोरी मोठ्या उत्साहाने बनवायची. काटके (जाड शेवया) लाकडी फळीवर वळण्यासाठी दुपारी गल्लीतल्या बाया एकमेकींना मदत करायच्या. शेवया तोडून खाटेवर टाकण्यासाठी आम्ही बालगोपाल मंडळी हौसेने बसायचो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात ‘घागर’ पुजली जाई. घागरीमध्ये पाणी, पाण्यात हळद-कुंकू, अक्षता, फुले, नाणे टाकून आंब्याच्या डहाळ्या; त्यावर ताटात पुरणपोळी, आंब्याचा रस, सारभात, रंगीत कुरड्या-पापड्या, भजी ठेवली जात. डांगर छोट्या कळसावर पूजेला असायचे. पितर पूजा, सवाष्ण पूजा होई. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन उत्साहाने, आनंदाने सण साजरा होत असे. आम्ही बच्चेकंपनी अंगणातील झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून झोके घ्यायचो, खायचो. कोणीतरी मोठा झोका द्यावा म्हणून कोकलत असू. सासरहून आलेल्या मोठ्या बहिणीची दादागिरी चालत असे. कधी आईच्या, कधी मोठ्या बहिणीच्या मांड्यांवर बसून झोके खाण्यात स्वर्गानंद असे. आमचे भाऊही आमच्यात मिसळून आनंद घेत. उंच झोका देण्यासाठी हौसेने पुढे येत. उंचच उंच गेलेला झोका काळजाचा ठोका चुकवत असे. आम्ही घाबरून किंचाळ्या मारत असू. सासुरवाशिणी, माहेरी आलेल्या मुली, लहानमोठ्या मुली, आई, गल्लीतल्या बाया सर्वजणी मिळून आखाजीची गाणी म्हणायचो.
- चैत्र वैशाखाचं ऊन वंमाय,
वैशाखाचं ऊन धरणी तापून झाली लाल वं माय,
तापून झाली लाल… आईच्या पायाला आले फोड वं माय,
पायाला आले फोड…
- आथानी कैरी तथानी कैरी,कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना झुय झुय पानी व्हाय वं…
- गेली माळीच्या मळ्यात माझी गौराई(दोन वेळा म्हणणे)
फुल तोडीलं चाफ्याचं माझी गौराई (दोन वेळा म्हणणे)
माळी आला का धावत माझी गौराई (दोन वेळा म्हणणे)
माळी बोलला रागात माझी गौराई (दोन वेळा म्हणणे) …
अशी अनेक गाणी पोरी, वयस्क बायका, मुली तालासुरात म्हणत. आम्ही त्यांच्यामागे सूर धरत असू. सूर धरता धरता ते संस्कार, भाव अलगद मनावर अक्षय कोरले गेले. दोन नद्यांच्या अल्याड-पल्याडच्या (दोन्ही काठांवरच्या) मुली, बायका गौराई घेऊन विसर्जनासाठी येत. हातात टिपऱ्या घेऊन धोबीघाटावर, आमराईत समोरासमोर झुंडीने
येत असू. दोन गट पडत. दोन्ही गटांतील मुली, बायका एकमेकींना गाण्यातून शिव्या घालत-भांडत. एकमेकींना टिपऱ्या दाखवत. गाण्यातून शिव्या घालण्यात मोठ्ठी चढाओढ असे. पण त्या भांडणांत वैर, द्वेष, सूड असे काही नसून खेळकरपणा असे.
मी मात्र यात सर्वात मागे असायची. कारण बालपणापासूनच शिव्या, घाणेरडे बोलणे यांचा मला तिरस्कार. आईने कधीतरी शिवी दिली तर मी दोन दोन दिवस न जेवता रागात राहत असे. आई धार्मिक वृत्तीची होती. तिच्यासोबत संपूर्ण श्रावण महिना कृष्णमंदिरात पोथी-पुराणे ऐकण्यात, पारायण-व्रत-उपवास करण्यात जाई. त्यामुळे आपोआप चांगले संस्कार, विचार, वृत्ती रुजत गेली. चांगल्यावरील विश्वास वाढत गेला. म्हणून शिव्या, झगडणे जिभेवर आले नाही, येत नाही. अन्याय होत असताना चिडून मनातल्या मनात मात्र खूप शिव्या देते. पण त्याही साध्या.
नदीपल्याडच्या मुली टिपऱ्या ठोकत, कंबर खोचत ‘झगडण्या’साठी तयारीनिशी उतरत. त्या लयबद्ध गाण्यातील गच्चाळ शिव्या शिसारी आणत. त्या शिव्या मी उच्चारणे अशक्य होई. ऐकणेही कठीण वाटे. पण आडदांड, जबर मुलींना एकमेकींशी झगडताना, टिपरे खुपसताना, हारलेल्या मुलींना पळून जाताना पाहून मात्र मजा येई. मी गांडू, घाबरट म्हणून एखादी संधी साधून माझ्या दिशेने एखादी मुलगी धावत येताना पाहून मी मोठ्या मुलींच्या आड लपून, चकवा देत पळून जात असे व नदीतल्या महादेव मंदिरातून लपून गंमत बघत बसे. अंधार पडल्यावर सर्व मैत्रिणी ओल्याचिंब होऊन घरी परतत. दमल्याने कोठे, कसा डोळा लागे ते कळायचे नाही. महिनाभर एकत्र येऊन केलेली धमाल, गाणी, मस्ती सारे सारे मनात कितीतरी दिवस रेंगाळत राही. खूप दिवसांपर्यंत पोकळी जाणवे. खूप सारे हरवल्यागत वाटत राही.
आज ते दिवस, ते बालपण, त्या मैत्रिणी, गाणी, सण, उत्सव, हसणे, खिदळणे, राग, रुसवाफुगवा, जिव्हाळा, झोका, ओव्या, गौराई, भुलाबाई… सारे फक्त आणि फक्त आठवणींत उरले आहे. आजचे आधुनिक जग, जगणे, माणसे – त्यांचे सुख पाहून मनाचा गोंधळ होतो, की ‘ते सुख’ खरे की ‘हे सुख’? सद्यकालात सकारात्मक खूप असले तरी त्या भूतकालीन अस्सल, गावरान सुखाच्या आठवणींनी मन पाझरते… ओलावते…. गार होते… आणि स्थिरावते कागदरूपी आभाळावर…. तटस्थपणे ह्या जगाकडे पाहण्यासाठी… तडजोड स्वीकारत…!!!
– लतिका चौधरी, 7841917198/9326656059 latikachaudhari1910@gmail.com