वृद्धांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, वृद्धाश्रम आहेत. वृद्धाश्रमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी अनेक जण परोपरीने प्रयत्न करत आहेत. यामागे प्रत्येकाचा हेतू चांगलाच असतो. तरीही प्रत्येकाचा दृष्टीकोन, वेगवेगळा असतो. डॉक्टर होऊन भौतिक माया वाढवण्यापेक्षा मायेने निराधार वृद्ध लोकांचा सांभाळ करावासा वाटणाऱ्या माणसांची विचारांची घडण अनन्यसाधारण असते. पुण्याच्या डॉ.अपर्णा देशमुख यांची गाठ घेऊन त्यांच्या कामाची माहिती सुरेश चव्हाण यांनी लेखस्वरूपात दिली आहे. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
———————————————————————————————–
वृद्धांसाठी पुण्यात आभाळमाया
पुण्याच्या डॉ. अपर्णा देशमुख यांचा ‘आभाळमाया’ नावाचा वृद्धाश्रम नावाप्रमाणेच आजी-आजोबांना माया देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. तो पुण्याच्या सिंहगड रोडवरील माणिक बाग भागातील नॅशनल पार्क सोसायटीमधील ‘स्वप्निल’ या इमारतीत आहे. अपर्णा यांचा स्वत:चा व तेथील आजी-आजोबांचे हसरे-आनंदी-टवटवीत चेहरे पाहिल्यावर तो वृद्धाश्रम न वाटता, एखादे कुटुंबच तेथे राहत आहे असे वाटते. यापाठीमागे दडला आहे तो अपर्णा यांचा त्या आजीआजोबांप्रती असलेला अकृत्रिम स्नेहबंध- अपर्णा यांनी तीच भावना कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न चालवला आहे हा त्यांतील विशेष होय.
अपर्णा या तरुणीने वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वृद्धसेवेचे हे स्वप्न पाहिले व तसे काम हाती घेतले. त्या हे कार्य गेले एक तप करत आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण जळगावात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया या त्यांच्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पुण्यात येऊन घेतले. त्यासाठी त्यांनी खाजगी रुग्णालयात नोकरी केली.
वृद्धाश्रम काढण्याची गरज अपर्णा यांना त्यांच्या जीवनात आकस्मिक झालेल्या एका घटनेमुळे वाटली. त्या घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. घडले असे, की एका आजीला कोणी आजारी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. तिचे पाय फ्रॅक्चर झाले होते. ती रस्त्याच्या कडेला वेदनेने विव्हळत पडली होती. अपर्णा यांनी ते पाहिले व त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी त्या आजीला घरी आणून तिची शुश्रूषा केली. त्या एका घटनेने अपर्णा देशमुख यांचे आयुष्यच बदलून गेले ! त्यांनी एक फ्लॅट निराधार आजी-आजोबांसाठी भाड्याने घेतला आणि कामाला सुरुवात केली. घरच्याच माणसांनी रस्त्यावर टाकून दिलेले गोरगरीब वृद्ध रुग्ण शोधून त्यांना आधार देणे हे त्यांनी त्यांचे जीवनकार्य ठरवले. रुग्ण वाढले, तेव्हा त्यांनी एका इमारतीत भाड्याने जागा घेतली व त्या आश्रमास नाव ठेवले ‘आभाळमाया’ !
त्यासाठी लागणारा खर्च त्या शस्त्रक्रियादी वैद्यकीय सेवा करून मिळवलेला पैसा त्या वापरतात. त्या पुण्यात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ‘जनरल सर्जरी’ करतात. त्यांनी वृद्धसेवेचे काम करण्यासाठी अविवाहित राहण्याचे ठरवले आहे. त्या चाळीस वर्षांच्या आहेत. डॉ. अपर्णा यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असे आहे. त्यांच्या वडिलांचा- डॉ. अनिल देशमुख यांचा अपर्णा यांना या कामासाठी पाठिंबा आहे. अपर्णा यांना त्यांचे वडील व भावंडे यांची मदत होत आहे. काही दानशूर मंडळीही त्यांना या कामासाठी मदत करत असतात.
आश्रमात निराधार, अंथरुणाला खिळलेले, मानसिक आजाराने त्रस्त, मतिमंद, दिव्यांग; तसेच, लग्न न झालेले, पक्षाघात झालेले वृद्ध व मध्यमवयीन स्त्री-पुरुष आहेत; परित्यक्ता स्त्रियादेखील आहेत. आश्रमात सत्तर जण आहेत. ‘आभाळमाया’त वृद्ध व आजारी आई-वडिलांची काळजी घेतली जाईल अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत. अपर्णा स्वत: त्यांच्यावर गरजेनुसार मोफत शस्त्रक्रिया करतात; त्यांचा औषधोपचार करतात. त्यासाठी अपर्णा दिवसाला कधी कधी अठरा तास काम करतात !
अपर्णा यांना आश्रमातील प्रत्येकाला सगळे काही मोफत देणे शक्य होत नाही. काही जणांनी पूर्वी नोकरी केलेली असते, त्यांना पेन्शन मिळते. काहींचे पालक पैसे भरू शकतात. अशांकडून त्या महिना सहा हजार रुपये घेतात. अपर्णा स्वत: आश्रमातील सत्तर जणांपैकी तीस निराधार रुग्णांचा खर्च करतात. त्यांनी वृद्धाश्रमासाठी तीन मजली इमारत भाड्याने घेतली आहे. तिचे महिना भाडे दोन लाख चाळीस हजार रुपये एवढे आहे. अपर्णा यांना बारा वर्षांच्या कामात विदारक, अस्वस्थ करणारेही अनुभव आले आहेत. आईवडिलांना तेथे सोडणारी त्यांच्या पोटची मुले परत त्यांना तोंडही दाखवत नाहीत; त्यांचा स्वत:चा मोबाईल नंबर बदलून टाकतात. घरचा खोटा पत्ता देतात, मानसिक आजार असलेल्या, विस्मरण आजार झालेल्या आईबद्दल ‘ती आमच्या घरातील मोलकरीण आहे’ असेही सांगण्यास कमी करत नाहीत ! आश्रमात निराधार वृद्धांना राहण्यास व औषधोपचार मोफत मिळतो. त्यामुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा खर्च परवडणारी मुलेही, अपर्णा यांच्याकडे निराधारांसाठी मोफत सोय आहे हे समजल्यावर पहिल्या महिन्यात पैसे भरून आई-वडिलांना दाखल करून गेलेली मुले दूरध्वनी क्रमांक, पत्ता बदलून परागंदा होतात. काही नातेवाईक त्यांच्या रुग्णाला आश्रमाच्या बाहेर आणून सोडतात !
अपर्णा म्हणाल्या, की “मी जर लग्न केले तर माझा जोडीदार माझ्याच विचाराचा मिळेल याची खात्री देता येत नाही. आता जेवढे मी काम करते तेवढे काम मी लग्न-मुले वगैरे झाल्यावर करू शकेन-पैसा मिळवू शकेन हे सांगता येत नाही; आणि मी येथे एकटी नाहीच आहे- हे सगळे आजी-आजोबा हे माझे कुटुंबच आहे ! त्यांची सुखदु:खे ही माझीच आहेत. मी त्यांना माझ्या आईवडिलांप्रमाणे, आजी-आजोबांप्रमाणे मानते.”
त्या तीन मजली इमारतीत विविध आजारांनी अंथरुणाला खिळलेले, मानसिक आजार असलेले, पक्षाघाताने त्रस्त अशांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ परिचारिका आहेत. काही रुग्णांना अन्न पोटात नळी टाकून द्यावे लागते; अपर्णा स्वत: त्यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया, ‘प्रोसिजर’ करतात. डॉ. अपर्णा यांचे त्या सगळ्या गोष्टींवर जातीने लक्ष असते. त्यांच्या कार्यात सहकारी डॉ. आरती गोलेचा यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
डॉ. अपर्णा सांगतात, ‘‘अगदी सुरुवातीच्या काळात एक आजोबा आजारी पडले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. साठ हजार रुपये बिल झाले. आयत्या वेळी इतके रुपये उभे करणे शक्य नसते. त्यावेळी मी माझी मैत्रीण डॉ. आरती गोलेचा हिच्यासह पुण्याच्या नऱ्हे भागात ‘सिल्व्हर हॉस्पिटल’ सुरू केले. माझी अट एकच होती, माझ्या कुटुंबातल्या आजी-आजोबांसाठी पाच बेड तेथे राखीव असावेत. त्यामुळे आता खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत नाही, पण तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिओथेरपी यांचा खर्च पेलावाच लागतो.’’ ‘आभाळमाया’तील निराधार व गरजू रुग्णांना त्यामुळे मोफत वा साठ टक्के सवलतीने उपचार करणे शक्य होते.
राहुल पाठक व इतर कर्मचारी असा ‘आभाळमाया’त ‘स्टाफ’ आहे. ते सर्वही आपुलकीने तेथील लोकांची देखभाल करतात. सगळे निवासी वृद्ध दररोज संध्याकाळी तळमजल्यावरील मोकळ्या जागेत एकत्र जमतात- गप्पागोष्टी, एकमेकांची चौकशी अशी देवाणघेवाण करतात. काही गाणारे आहेत- त्यांच्यासाठी माइकची व्यवस्था केलेली आहे. भजन, कीर्तन, गाणी, वृद्धांचा स्नेहमेळावा- त्यांचे वाढदिवस, सण, उत्सव असे कार्यक्रम संध्याकाळच्या एकत्र मेळाव्यात साजरे केले जातात. त्या मंडळींसाठी वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही कधी केले जाते. वाचण्यासाठी वर्तमानपत्रे-मासिके-पुस्तके तेथे ठेवली आहेत. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणेही कधी कधी होत असते.
‘आभाळमाया’ वृद्धाश्रमासाठी स्वत:ची इमारत असावी म्हणून अपर्णा यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना सरकारी मदत मिळत नाही. त्यांना त्यांच्या कामासाठी ‘मदर तेरेसा’, ‘राष्ट्रीय एकात्मता’, ‘धन्वंतरी’ असे काही पुरस्कार मिळाले आहेत. आश्रमाला दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, उस्ताद झाकीर हुसेन, कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम, अभिनेता सुबोध भावे यांचा समावेश आहे. त्या मान्वरांच्या हस्ते अपर्णा यांचा सत्कार झाला आहे.
धकाधकीच्या आयुष्यात घरातील वृद्ध व आजारी आई-वडिलांची काळजी घेणाऱ्या वृद्धाश्रमांची गरज समाजाला आहे. “आयुष्याच्या संध्याकाळी व्यक्तीचा तिच्या स्वत:वर ताबा नसतो, तेव्हा त्या व्यक्तीला सुरक्षित हातांमध्ये सोपवणे महत्त्वाचे असते. मुलांच्या भविष्यासाठी पालक त्यांना हॉस्टेलमध्ये दूरगावी ठेवतात. तुमच्या आजीआजोबांचे घरी हाल होत असतील तर वृद्धाश्रमास संस्कृतिबाह्य समजू नये.” असे परखड विचार डॉ. अपर्णा यांचे आहेत.
मोठे हॉस्पिटल सुरू करावे व भरपूर पैसा मिळवावा असे स्वप्न बघणारे डॉक्टर अनेक आहेत, पण डॉक्टरी व्यवसायातून मिळालेले पैसे निराधार, गरजू वृद्ध रुग्णांसाठी खर्च करणारी डॉक्टर व्यक्ती एखादीच !
आभाळमाया संपर्क : डॉ. अपर्णा देशमुख 7757071093 स्वप्निल बिल्डिंग, नॅशनल पार्क, सिद्धार्थ हॉलजवळ, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे 411 052. इमेल – dr22aparnad@gmail.com
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
———————————————————————————————————
फी किती आहे आमच्या शेजारी एक काकू आहे त्यांना कोणी रेलॅटिव्ह नाहि आहे त्यांच्या साठी हवे आहे