दशावतारात अब्दुल नदाफ यांच्या नव्या नायिका (Abdul Nadaf – Popular Star of Dashavtari – Traditional Folk Theatre)

0
220

अब्दुल नदाफ यांनी दशावतार कलेमध्ये खास करून स्त्रीभूमिका साकारल्या. त्यांनी खरा कलाकार जातिधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही हे समाजाला दाखवून दिले. कलेसाठी त्यांची तळमळ पाहून, त्याबद्दलचे कौतुक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांत उमटते…

अब्दुल कुंजाली नदाफ हे अभिनेते म्हणजे दशावतारातील नवा तारा आहे आणि विशेष म्हणजे ते स्त्रीभूमिका करून पुढे आले आहेत ! एकूणच, परंपरागत प्रसिद्ध दशावतार कलेला आधुनिकतेची जोड देत, नावीन्यपूर्ण प्रयोग कोकणच्या विविध नाट्य कंपन्यांत साकारले जात आहेत. त्यामुळे जुन्या दशावतार नाटकांना आणि कलाकारांना ऊर्जितावस्था प्राप्त होईल अशी आशाही निर्माण झाली आहे. कलाकार त्या बाबतीत विशेष प्रयत्नशील असल्याचे जाणवतात. दशावतार ही कोकणातील प्रसिद्ध व महत्त्वाची लोककला. स्त्रिया दशावतारी नाटकांमध्ये काम करत नाहीत. स्त्रियांची भूमिका पुरूषच करतात. पुरूषाला स्त्री रूपात पाहणे ही गावकऱ्यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते. (त्याच उत्सुकतेपोटी ‘चला हवा येऊ द्या’मधील नटमंडळी स्त्रीच्या अवतारांत येतात व एवढे लोकप्रिय होतात का?) ती कला सादर करणाऱ्या पन्नासच्यावर दशावतार कंपन्या आहेत आणि विविध नामवंत कलाकार आहेत. त्यांमध्येही एका मुस्लिमधर्मीय कलाकाराने दशावतार कला सादर केली; आणि तो उत्कृष्ट स्त्रीभूमिका साकारून नावारूपाला आला हा कौतुकाचा विषय बनला आहे ! अब्दुल नदाफ हे दोडामार्ग येथील सिद्धेश्वर कंपनीच्या नाटकांत प्रमुख स्त्रीपात्र साकारत आहेत.

ते मूळ वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील आहेत. त्यांनी दशावतार कलेमध्ये खास करून स्त्रीभूमिका साकारल्या. त्यांनी त्यांची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी उत्तम कलेला कोणत्याही धर्माचे, जाती-पातीचे बंधन नसते हे समाजाला दाखवले; तसेच, खरा कलाकार जातिधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही, हेही निदर्शनास आणून दिले आहे. विशेष म्हणजे, अब्दुल ज्या ज्या नाट्यमंडळांसाठी काम करतात त्यांनी दाखवलेली मानसिक, वैचारिक प्रगल्भता आणि जेथे जेथे ते प्रयोगासाठी जातात अशा ठिकाणच्या मानकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, रसिकांनी दाखवलेले सामंजस्य या दोन्हीही गोष्टी अभिनंदनीय आहेत.

अब्दुल यांनी रुक्मिणी (कृष्ण-मारुती युद्ध), दुर्गा (दुर्गाशक्ती), रुक्मिणी (भक्त पुंडलिक), कांचन (कांचनगंगा), लक्ष्मी (शनी-लक्ष्मी युद्ध), उषा (कामधेनू हरण) अशा स्त्रीभूमिका साकारल्या आहेत. त्यांनी पाचशेपेक्षा अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे अब्दुल हिंदू पौराणिक, वेदांतील प्रसंगांवर आधारित संवाद उत्कृष्ट, छान, सुस्पष्ट म्हणतात. ते तसे आव्हान लीलया पेलतात ! कलेसाठी त्यांची अशी तळमळ पाहून त्याबद्दलचे कौतुक स्वाभाविकच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांत उमटते.

अब्दुल यांनी पहिला नाट्यप्रयोग ते दहावीमध्ये असताना त्यांच्या वेतोरे या गावातील श्रीदेवी सातेरी दशावतार नाट्यमंडळातून केला होता. त्यांनी गावातील बाबी वेतूरकर यांच्याकडून स्त्रीभूमिकेचे धडे घेतले. त्यांनी बारावीनंतर दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार मंडळातून कला व व्यवसाय म्हणून 2008 साली दशावतार नाट्यक्षेत्रात रीतसर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘कलेश्वर दशावतार’ व झरेबांबर येथील ‘नाईक दशावतार’ या नाट्यमंडळांत स्त्रीभूमिका साकारल्या. त्या तिन्ही मंडळांचे ज्येष्ठ कलावंत बाबी कलिंगण, सागर नाईक, केशव खांबल यांनी अब्दुल यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, असे अब्दुल सांगतात. ते दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळात मालक केशव खांबल यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीभूमिका अभिनय करत आहेत.

अब्दुल हे त्यांच्या मूळ गावाविषयी अभिमानाने बोलतात. ते म्हणाले, की त्यांची घडण श्रीदेवी सातेरीमुळे झाली. त्यांना पहिला नाट्यप्रयोग करण्याची संधी त्या देवीच्या मंडपातच मिळाली. ते त्यांना त्यांचे भाग्य वाटते ! ते म्हणतात, “त्यावेळी गावातील लोकांनी माझ्यावर कौतुकाची थाप दिली. बाबी वेतूरकर आणि संतोष मांजरेकर यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन माझ्या उपयोगी येत आहे. त्यामुळे मी माझी कलाकार म्हणून जी ओळख आहे, ती वेतोरेवासीयांच्या सहकार्यामुळेच आहे असे मानतो.”

दशावतारी रंगभूमीने ओमप्रकाश चव्हाण यांच्यासारखे दिग्गज कलाकार रंगभूमीला दिले. ओमप्रकाश हे मालवण तालुक्यातील आमडोस या गावी राहतात. त्यांनी दशावतारात काम करण्यास वयाच्या विसाव्या वर्षी सुरुवात केली. त्यांनी गेल्या तीस वर्षांत जवळपास आठ हजार प्रयोगांमधून काम केले आहे. त्यांची अभिनयाची समज व स्त्रीमधील बारकावे हेरून ते अभिनयात मांडण्याची ताकद निव्वळ लाजवाब आहे. मी ओमप्रकाश यांच्यासोबत जवळ जवळ पन्नास गावे गेल्या काही वर्षांमध्ये फिरलो. परंतु कोठेही त्यांच्यावर ते स्त्री भूमिका करतात म्हणून लोकांनी टोमणे मारलेले पाहिले नाहीत. एवढा स्वीकार पुरुषाने स्त्रीभूमिका करण्याच्या प्रथेचा होतो. मुळात ओमप्रकाश व अन्य कलावंत यांनी त्यांच्या अभिनयातून स्त्री बीभत्सरूपात कधीही दिसू दिली नाही. त्यामुळे त्यांना स्त्रीवर्गाकडूनही आदर मिळतो. त्यांना हृदयविकाराचा झटका नाटक करताना 2015 साली आला. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया झाली. त्यांना त्या कठीण प्रसंगात जनतेकडून भरभरून मदत मिळाली. त्यांचे करिअर ऐन भरात असताना त्या आजारपणात संपल्यातच जमा झाले होते. पण तो जातिवंत कलाकार नव्या उमेदीने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा रंगमंचावर दाखल झाला. दशावतारी कला गेल्या तीन दशकांत जिवंत ठेवण्यामागे ओमप्रकाश चव्हाण यांच्याप्रमाणेच गौतम केरकर, देवा राऊळ यांच्यासारख्या कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये अब्दुल कुंजाली नदाफ यांचीही भर पुढील पिढीत पडत आहे ही गोष्ट कोकणवासीयांना अभिमानाची वाटते.

दशावतारी नाट्यक्षेत्रात व्यावसायिक नाटकांप्रमाणे भरपूर पैसा नाही; परंतु समाधान मात्र पुष्कळ असते. दशावतारी नाट्य प्रयोग मुख्यत: जत्रोत्सवात होतात. तेथील प्रत्येक देवस्थान समित्यांशी, लोकांशी दशावतारी नाट्य कलाकारांचे जिव्हाळ्याचे संबंध असतात. कोकणातील रवळनाथ, भूतनाथ, सातेरी, भराडी या लोकदैवत संप्रदायाची भुरळ तेथील लोकमानसावर असेपर्यंत तो दशावतार मंदिरातील ढोलासोबत सतत वाजतगाजत राहील, असे सर्व भाविक व नाट्यप्रेमी मानतात.

दशावतार लोककला अबाधित ठेवणे असेल तर दशावतार लोककलेत ट्रिकसीन आणि स्त्रियांनी प्रयोग सादर करणे योग्य होईल, असे एक मत हल्ली व्यक्त केले जाते. मात्र, ती कृती दशावतार संकल्पनेला भेदणारी ठरेल व ती योग्य नव्हे, असे रंगकर्मी म्हणून अब्दुल नदाफ यांचे मत आहे.

– सतीश पाटणकर 8551810999 sypatankar@gmail.com

——————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here