आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे (Abasaheb Kakade : Work to educational activity)

0
207

स्वातंत्र्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो आम जनांना शिक्षणाचा. बहुजन समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ती उच्चभ्रू सुशिक्षित समाजाकडून नाडली जात होती. आबासाहेबांच्या मनात कार्य करण्याची सामाजिक जाण होती. ते म्हणत, मी ज्या समाजात जन्माला आलो; त्या समाजाचे सामाजिक ॠण असते, त्या ऋणातून मुक्त होणे गरजेचे आहे. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, दीन-दलित बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी ‘कॉम्रेड’, ‘कर्मयोगी’, ‘अॅडव्होकेट’ आबासाहेब काकडे यांनी ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिग, शेवगाव’ या संस्थेची स्थापना केली !

आबासाहेब काकडे यांनी स्वतःच्या वाड्यात शेवगावच्या जैन गल्लीत मुलांचे पहिले वसतिगृह 1954 मध्ये सुरू केले. त्यांनी त्या वसतिगृहास ‘श्री संत गाडगे महाराज’ यांचे नाव दिले. तेथे पाण्यासाठी आड खोदून पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यांनी त्या पाठोपाठ मुलींसाठी श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालय 1958 मध्ये शेवगाव येथेच सुरू केले. त्यांनी त्यानंतर वसतिगृहे शेवगाव, ढोरजळगाव, शहरटाकळी, चापडगाव, अमरापूर, कांबी, भालगाव, भातकुडगाव, मंगरूळ, पाथर्डी, कर्जत, अहमदनगर या ठिकाणी सुरू केली. त्यामुळे गोरगरीब, दीन-दलित मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. आबासाहेब काकडे आणि त्यांचे सहकारी हातामध्ये पोते घेऊन गावोगावी जात आणि वसतिगृहांसाठी धान्य गोळा करत. वसतिगृहे सुरू ठेवणे ही ते सुरू करण्यापेक्षा अवघड गोष्ट होती, कारण समाजात सगळाच अभाव होता. ना जाण होती- ना साधनसंपत्ती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वसतिगृहांनी समाजाने नाकारलेल्या घटकांतील मुलांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली ! आबासाहेब यांनी समाजातील अनाथ बालक-बालिका आणि आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली पोरकी मुले यांच्यासाठी स्वतंत्रपणे लक्ष घालून कनिष्ठ व वरिष्ठ बालसुधार गृहे सुरू करून त्यांनाही प्रेम व आपुलकी दिली. त्यांनी महात्मा फुले यांचा विचार कृतीतून साकार केला ! या वसतिगृहांना गाडगे महाराज, भाऊराव पाटील, नाना पाटील, अमर शेख, दादासाहेब गायकवाड यांनी भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो.

आबासाहेब प्रत्येक वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थी हा त्यांचे अपत्य आहे असे समजून त्यांच्या शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकासाकडे लक्ष देत असत. त्याहून थोर होते ते त्यांचे विचार. ते भारतीय संस्कारपद्धतीत आणि पाश्चात्य आधुनिक पुरोगामी विचारपद्धतीत वाढले होते. त्यांचे विचार मानवतावादावर आधारलेले होते. जातपात व अन्य भेद यांना त्यांच्याकडे थारा नव्हता. सर्वाना शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे असे त्यांना वाटे.

संबंधित लेख –
आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते
आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची
आबासाहेब काकडे – सर्वसामान्यांचे नामांकित वकील

आबासाहेब काकडे यांचे डाव्या चळवळीतील गोरगरिबांसाठी रोमहर्षक लढे हा त्यांच्या जीवनातील क्रांतिकाळ आहे, परंतु त्यांनी जाणले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्याच गोरगरीब जनतेला जीवनात उभे करण्यासाठी विधायक, रचनात्मक कार्याची गरज आहे. त्यासाठी समाजबांधणीचे कार्य आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातील आंदोलनात्मक पर्व तेथे संपले आणि त्यांनी समाजशिक्षणाचे कार्य हाती घेतले.

आबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात दृष्टी आहे. त्यांनी प्रथम गरीब मुलामुलींसाठी वसतिगृहे बांधणे आरंभले. सरकारी-निमसरकारी शाळा होत्या तेथे गरिबांना जाणेयेणे परवडत नव्हते. त्यांची राहण्या-जेवण्याची सोय नजीकच्या परिसरात होणे आबासाहेबांना महत्त्वाचे वाटले. त्यांनी, पहिली शाळा पुढे, 1961 साली सुरू केली. तो प्रसंगही बोलका आहे. ते अहमदनगरहून शेवगावी येत असताना ढोरजळगावच्या ढोरा नदीला पूर आला होता, म्हणून आबासाहेब काकडे यांना तेथे मुक्काम करावा लागला. तेव्हा गावकर्‍यांनी त्यांना ढोरजळगावी हायस्कूल सुरू करण्याची गळ घातली. गावकऱ्यांच्या त्या मागणीला आबासाहेबांना नकार देववेना. त्यांनी गावकर्‍यांच्या शाळेच्या प्रस्तावाला होकार दिला. एफ.डी.एल. शिक्षणसंस्थेमार्फत श्रीरामाच्या नावाने पहिले माध्यमिक विद्यालय 21 जून 1961 रोजी सुरू करण्यात आले. ‘श्रीराम माध्यमिक विद्यालय, ढोरजळगाव’ हे त्याचे नाव. ते शेवगाव तालुक्यातच आहे.

निर्मलाताई काकडे या दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग (शेवगाव) या संस्थेच्या आधारस्तंभ होत्या. आबासाहेबांनी त्यांच्यामुळे शैक्षणिक कार्य ताकदीने व उमेदीने केले, निर्मलाताई यांचे शिक्षण पुणे, मुंबई या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून झाले. त्या इंग्रजी विषय घेऊन पदवीधर होणाऱ्या बहुजन समाजातील अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला होत. निर्मलाताई यांनी विवाहापूर्वी दौंड या ठिकाणी ‘शिक्षिका’ म्हणून काम केले होते. आबासाहेबांनी शेवगाव येथे छात्रालय हायस्कूलची स्थापना करण्याचा निर्णय घेतला तेव्हा निर्मलाताई रेसिडेन्शीयल हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून शेवगावला कार्यरत होत्या. निर्मलाताई यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन विनावेतन शिपायापासून ते मुख्याध्यापिकापदापर्यंतची सर्व कामे नव्या शाळेत उत्साहाने केली. त्यांनी त्यांच्या कार्यातून आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, उत्तम संस्थाध्यापक म्हणून कामाचा ठसा उमटवला आहे.

आबासाहेबांनी शिक्षणाचे दुसरे रोपटे उजाड माळरानावर निसर्गाच्या सान्निध्यात लावले, ते चापडगाव येथे, 21 जून 1964 रोजी; ‘जेथे हायस्कूल तेथे वसतिगृह’ हा आबासाहेबांचा न्याय होता. त्यामुळे चापडगाव येथे मुला-मुलींसाठी ‘संत गाडगे महाराज छात्रालय (1965) व ‘संत गाडगे महाराज कन्या छात्रालय (1966) अशी दोन वसतिगृहे सुरू झाली. आबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा पसारा नंतर वाढतच होता. त्यांनी त्यांचे सारे लक्ष शैक्षणिक विकासाकडे एक सामाजिक चळवळ म्हणून केंद्रित केले.

आबासाहेबांनी त्यांचे शैक्षणिक कार्य शेवगाव तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता, ते कार्य पाथर्डी तालुक्यातही जोमाने सुरू ठेवले. तेथे दोन वसतिगृहे 1958 मध्ये सुरू केली. त्यांनी भालगाव (तालुका पाथर्डी) येथे भालेश्वर विद्यालयाची स्थापना 1967 मध्ये केली. तेथेही वसतिगृह 1971 साली सुरू केले. कांबी विद्यालयाची स्थापना मराठवाड्याच्या सरहद्दीवर कांबी येथे 10 जून 1968 रोजी केली. अमरापूर हायस्कूल 1969 साली सुरू केले. अनाथ बाल-बालिकांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ बालसुधारगृहाची स्थापना 1972 साली केली. एकंदरीत, आबासाहेबांनी जिल्ह्यामध्ये दहा वसतिगृहे व सात विद्यालये यांची स्थापना केली. ती यशस्वीपणे चालवली. शिक्षणाची गंगोत्री दीनदलितांच्या दारात उभी केली.

आबासाहेब विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीस लागावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक-पालक व विद्यार्थी यांचा संवाद घडवून आणत. आबासाहेब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम ध्येयवृत्तीने राबवत असत. त्यामध्ये शालाबाह्य परीक्षांचे आयोजन, रात्रीचे अभ्यासवर्ग, लेखनप्रकल्प, शुद्धलेखन तथा सुवाच्य हस्ताक्षर स्पर्धा, सहली, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, बहिस्थ व्याख्यानमाला आणि शिक्षक उद्भोधन वर्ग यांचा समावेश असे. शिक्षक शिक्षणकार्यास सतत सुसज्ज असला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.

आबासाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, विविध विषयांवरील सांगोपांग ज्ञान, ध्येयनिष्ठा, निर्व्यसनीपणा, प्रखर इच्छाशक्ती, श्रमावर श्रद्धा व प्रेम असे गुण त्यांच्या ठायी होते. समाजनिष्ठा, निस्वार्थीपणा, सतत काम करण्याची वृत्ती, सेवाभावीपणा, शिक्षणकार्याची ओढ हे आबासाहेबांचे गुणविशेष संघटनात्मक कार्यात दिसून येत. आबासाहेबांनी स्वतः डामडौल किंवा मोठेपणा मिरवला नाही. ते आयुष्यभर साधी राहणी व उच्च विचारसरणी या न्यायाने वागले. ते त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. ते आयुष्यभर जनता जनार्दनासाठी झटले, म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘कर्मयोगी’ या उपाधीने गौरवाने केला जातो. या कर्मयोग्याचे निधन शेतकर्‍यांसाठी आंदोलन व चळवळी पुढे नेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 9 ऑक्टोबर 1978 रोजी झाले.

          त्यांचे चिरंजीव शिवाजीराव ऊर्फ विद्याधर व स्नुषा हर्षदा ही दोघे त्याच पाऊलवाटेने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, या संकुलाची धुरा सांभाळत आहेत.

सुभाष खर्चन 9823794489 skharchan3@gmail.com

———————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here