जगन्नाथ कान्होजी ऊर्फ आबासाहेब काकडे यांनी कोल्हापूर येथून एलएल बी ची पदवी संपादन केली. ते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. तो काळ तसाच भारलेला होता. आबासाहेबांनी देशप्रेमाने डबडबलेल्या, राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणाला डाव्या विचारांची डूब दिली. त्यांनी स्वत:ला नगर जिल्ह्यातील मार्क्सवादी विचारांच्या पक्षकार्यात झोकून दिले. आबासाहेबांच्या जीवनातील ती दहा-पंधरा वर्षे रोमहर्षक लढ्यांनी भरलेली आहेत. आबासाहेब देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र व्हावा या दृष्टीने जे जे करता येईल ते करत होते. त्यांनी शैक्षणिक व सहकारी चळवळीचा पाया घातला. सावकार-जमीनदार यांच्याविरुद्ध सर्वसामान्य शेतकरी कुळांची वकिली चालवली आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सावकार, भांडवलदार, जमीनदार यांच्या जोखडातून भूमिहीन, दलित व कष्टकरी समाजाला मुक्त करण्याच्या दिशेने चळवळी चालवल्या. तो नगर जिल्ह्याचा प्रभाव होता. त्यांनी नगर जिल्ह्यातील प्रभावाने स्वातंत्र्य चळवळीला ‘डावे’ वळण दिले ! आबासाहेब काकडे हे बापुसाहेब भापकर, भाई सथ्था, दादा पाटील-चौधरी यांच्या संपर्कात येऊन स्वातंत्र्याच्या प्रेरणेने पेटून उठले. आबासाहेबांना स्वत:चे बळ होतेच, त्यांना त्यातून आणखी विशाल मार्ग दिसला तो मानव कल्याणासाठीचा, मार्क्सवाद-लेनिन वादाचा ! ते कामगार व शेतकरी यांचे राज्य भारत देशात आणायचे या विचाराने प्रेरित झाले. त्यांनी ‘माओ त्से तुंग’चा आदर्श समोर ठेवला. आबासाहेब आलेलेही ग्रामीण शेतकरी वर्गातून होते. आबासाहेबांना कामगार-कष्टकरी वर्गाला न्याय मिळाला पाहिजे; त्यांचा विकास झाला पाहिजे; त्यांना मदत मिळाली पाहिजे ही विचारधारा जवळची वाटली. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका अखेरपर्यंत स्वीकारली.
आबासाहेब काकडे यांनी अडल्या-नाडल्या गरीब शेतकऱ्यांचे वकीलपत्र सर्रास घेतले; गोरगरीब पक्षकारांना मोफत न्याय मिळवून दिला. ‘शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे नामांकित वकील’ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. ते दत्ता देशमुख यांच्या जिल्हा चळवळीशी जोडले गेले. त्यांना दिशा, ध्येय गवसले. त्यांनी त्या तरुण वयाच्या कालखंडात सारे आयुष्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार यांच्या लढ्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी वेचले. ते म्हणत, “कष्टकरी ही माझी जात आहे; शेतकरी-कामगार-शेतमजूर-श्रमजीवी हा माझा समाज आहे.”
आबासाहेबांना काँग्रेस पक्षाचे शेतकरी विरोधी धोरण प्रतिगामी व जुलमी वाटले. त्यांनी 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. ते त्यांना त्यांचे राजकारण वाटले. आबासाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका खेड्यापाड्यात जाऊन लोकांना समजावून सांगितली. त्यांनी शेतकरी कर्ज निवारण कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्याकडून अर्ज गोळा केले व ते अर्ज लवाद बोर्डाकडे दाखल केले. अशा तऱ्हेने त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जीवनाचे ध्येय शेतकऱ्यांना मोफत कायदेविषयक सल्ला देणे; त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे बनून गेले होते.
संबंधित लेख –
आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते
आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची
आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे
आबासाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाची धुरा अहमदनगर जिल्ह्याकरता बराच काळ सांभाळली. केंद्रीय व प्रांतिक सरकारांनी ब्रिटिशांच्या काळातील आर्थिक आणि सामाजिक धोरणे चालूच ठेवली होती. त्याविरुद्ध जनतेचा संघर्ष होऊ लागला. त्या आंदोलनात सहभागी शेकडो कम्युनिस्ट आणि समाजवादी कार्यकर्त्यांना तुरुंगात बेमुदत स्थानबद्ध करण्यात आले. आबासाहेब काकडे तर नेते व कार्यकर्ते होते. आबासाहेब काकडे यांना नाशिकच्या तुरुंगात मार्च 1949 मध्ये बेमुदत स्थानबद्ध करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांनी त्या घटनेचा जाहीर निषेध केला. आबासाहेब काकडे यांची सुटका दहा महिन्यांनी जानेवारी 1950 साली झाली. श्रीपाद अमृत डांगे, दत्ता देशमुख, मधुकर कात्रे असे कम्युनिस्ट नेते त्या वेळी तुरुंगात होते. आबासाहेबांना त्यांची भाषणे ऐकण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली.
आबासाहेब यांनी सभा, संमेलने, परिषदा, मोर्चे, सत्याग्रह, आंदोलने, घेराओ, पत्रके काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सरकारने ‘सक्तीचे लेव्ही वसुली धोरण’ अवलंबले होते, तेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून ! त्या अन्यायकारक दडपशाहीविरुद्ध आबासाहेब यांनी आवाज उठवला. त्या अन्यायाविरुद्ध जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभे राहिले. त्याचे नेतृत्व आबासाहेब काकडे यांच्याकडे होते. आंदोलनाच्या संघर्षाची पहिली ठिणगी शेवगाव तालुक्यात ‘एरंडगाव’ येथे पडली. त्यात सात लोकांचा बळी गेला.
आबासाहेबांनी कामगार किसान पक्षातर्फे उत्तर कोपरगाव मतदार संघातून ‘सायकल’ या चिन्हावर पहिल्या लोकसभेची निवडणूक 1952 मध्ये लढवली. त्यावेळी ते तीस वर्षांचे होते. ते अर्थातच काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. मोठा दुष्काळ 1952-53 मध्ये पडला होता. आबासाहेब पहिल्या जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यांनी जिल्हा लोकल बोर्डामार्फत जनतेला दुष्काळी कामावर रोजगार मिळवून दिला; चारा तगाई, डोल मिळवून दिले.
आबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतीला हमखास पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी पाठपुरावा केला. शेतकरी, शेतमजुरांच्या ठिकठिकाणी सभा, मोर्चे-मोहिमा, शेतकरी परिषदा, आंदोलने, घेराओ, रास्ता रोको अशा चळवळी करून जनतेला आधार दिला. सर्वपक्षीय पाटपाणी कृती समितीची स्थापना हे त्यांचे महत्त्वाचे काम होय. मुळा धरणाचे पाणी लाडजळगावपर्यंत गेलेच पाहिजे, ताजनापूर लिफ्ट झालीच पाहिजे, शेवगाव तालुक्यातील पंधरा गावांना विद्युत पुरवठा झालाच पाहिजे, शेवगावला कॉलेज झालेच पाहिजे ! अशा प्रमुख मागण्या होत्या. पाच-साडेपाच हजार महिलांनी आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन करून स्वतःला अटक करून घेतली. त्यांच्या पत्नी निर्मलाताई याही मंगरुळच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोपरे धरण व्हावे; ही त्यांची मनोमन इच्छा होती. ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. कोपरे धरण मंजूर होऊनही तत्कालीन पुढाऱ्यांनी धार्मिक कारण पुढे करून ते रद्दही केले !
आबासाहेब जनतेच्या दैनंदिन प्रश्नाबाबत दक्ष असत व त्यासाठीही जागरूकपणे पत्रव्यवहार, प्रत्यक्ष संपर्क करत. ते जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून शंभर रुपयांत लग्न झाले पाहिजे ! असा कायदा मंजूर करावा अशी मागणी शासनाकडे केली. आबासाहेबांनी लोकांची वाहतूक व दळणवळण व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी अनेक एस.टी. बसेस सुरू व्हाव्या म्हणून महामंडळाकडे पाठपुरावा केला; त्यात त्यांना यशही आले.
लोकशाहीर अमरशेख आणि आबासाहेब काकडे यांचा परिचय होताच. अमरशेख यांनी बोधेगाव येथे लोककलेचे शिक्षण देणारे शाहिरी विद्यापीठ उभारण्याचे ठरवले होते. आबासाहेबांनी ती कल्पना उचलून धरली. पण अमरशेख यांचे मोटार अपघातात निधन झाले आणि ते स्वप्न हवेतच विरले !
बाबासाहेब आंबेडकर यांचा आबासाहेब काकडे यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडलेला होता. त्यांनी अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाच्या सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी पुढाकार घेतला. तसेच, अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण अहमदनगरच्या जुन्या एस.टी.स्टँडजवळ 26 ऑगस्ट 1959 रोजी आबासाहेब काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसा शिलालेख तेथे बसवण्यात आला आहे.
आबासाहेब जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष, सदस्य आणि पहिल्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्या पदांसाठी म्हणून शासनाकडून मिळणारे सर्व मानधन, भत्ते ते लाल निशाण पक्षनिधीसाठी दर महिन्याला स्वतः पक्ष कार्यालयात जाऊन जमा करत, अशी त्यांची पक्षनिष्ठा होती.
आबासाहेबांनी 1967 च्या विधानसभेची निवडणूक शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून ‘लाल निशाण’ पक्षातर्फे काँग्रेस विरुद्ध लढवली. ते त्या निवडणुकीत अवघ्या साडेसातशे मतांनी पराभूत झाले. आबासाहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला ‘रयत सुवर्ण महोत्सव गौरव निधी’ उभा करून देण्यात पुढाकार घेतला आणि ते सत्कार्य पूर्ण केले.
आबासाहेब काकडे यांचे कार्य वैचारिक भूमिका घेऊन केलेले विविधांगी आहे. सर्वसामान्य जनतेचे हक्क जागृत करून त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका होती. तो एक मोठा कालखंड शेवगाव परिसरात डाव्या राजकारणाने भारलेला होता आणि आबासाहेब काकडे हे त्याचे प्रणेते-प्रचारक-पुरस्कर्ते सर्वकाही होते.
– सुभाष खर्चन 9823794489 skharchan3@gmail.com
————————————————————————————————————–