महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीत ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आबासाहेब गरवारे. त्यांनी सामान्य कुटुंबातून येऊन, अथक परिश्रम, जिद्द आणि दूरदृष्टीच्या बळावर उद्योगात यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेतलेले आणि कोणतीही गोष्ट पूर्ण समर्पणाने करणाऱ्या आबासाहेब यांचे जीवन प्रेरणादायी आहे. अशा उद्योजक आणि समाजसुधारक यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून देण्यासाठी, ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महाराष्ट्रीय जन्मशताब्दीवीर व्यक्तींची समग्र संकेतस्थळे तयार करत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आबासाहेब गरवारे यांच्यावरील संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
आबासाहेब गरवारे यांचे जीवन आणि कार्य वाचकांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ तीन प्रमुख विभागांमध्ये विभागले आहे. या संकेतस्थळाद्वारे आबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष, यश आणि सामाजिक बांधिलकी तरूण पिढीला शिकायला मिळेल.
संकेतस्थळाचा पहिला विभाग आबासाहेबांचे चरित्र असा आहे. त्या विभागात आबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतला आहे. त्यांचे बालपण, जडणघडण आणि सामान्य कुटुंबातून येऊन ते उद्योग क्षेत्रात कसे स्थिरावले हे सांगितले आहे. ते नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या निर्धाराने मुंबईत आले व व्यवसायास 1920 मध्ये सुरुवात केली. ते सुरुवातीला मोटार गॅरेजमध्ये काम करत. तेथे ते गाड्या दुरुस्त करण्याच्या कामात पारंगत झाले. त्यांनी अवघ्या सतराव्या वर्षी जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात जम बसवला. त्यांचा विनयशील स्वभाव, प्रामाणिकपणा आणि सेवेची खात्री यामुळे मोठे उद्योगपती आणि राजकीय व्यक्ती त्यांच्याकडून गाड्या खरेदी करू लागले. त्यांनी गिरगाव येथे ‘डेक्कन मोटर एजन्सी’ चोवीसाव्या वर्षी स्थापन केली आणि कार डीलर म्हणून विश्वासार्ह नाव कमावले. त्यांनी व्यवसाय वाढीसाठी इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय कार व्यापारात 1933 मध्ये सहभाग घेतला. त्यांनी ‘गरवारे मोटर्स लिमिटेड’ कंपनीची स्थापना 1937 साली करून उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी सर्वसामान्य ग्राहकही गाड्या घेऊ शकतील यासाठी गाड्या हप्त्याने विकण्याची संकल्पना प्रथमच आणली. त्यासाठी त्यांनी ‘गरवारे फायनान्स कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. आबासाहेबांना भारतात स्वतःचा मोटारी बनवण्याचा कारखाना असावा अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यासोबत अमेरिकेचा दौरा 1935 मध्ये केला. तेथे हेन्री फोर्ड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतात मोटार निर्मिती करण्याबाबतचा अहवालही तयार केला, परंतु सरकारी अनास्था आणि निधीच्या कमतरतेमुळे तो प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान नौदलासाठी प्लॅस्टिक बटणे बनवण्यास सुरुवात केली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी भारतामध्ये थर्मोप्लॅस्टिक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि नायलॉन व सिंथेटिक फायबर क्षेत्रात प्रवेश केला. त्यांची स्वातंत्र्यानंतर ‘हाउस ऑफ गरवारे’ म्हणून प्रगती भारताच्या औद्योगिक इतिहासात महत्त्वाची ठरली. ते प्लॅस्टिक उद्योगाचे अग्रणी बनले. ‘गरवारे नायलॉन्स लिमिटेड’ची स्थापना 6 जून 1957 रोजी झाली. त्यांनी मुंबईतील वरळी येथे नायलॉन धागा आणि मोनोफिलामेंट्स तयार करणारा कारखाना 1958 मध्ये सुरू केला. त्यांनी स्वतःचे पॉलिमरायझेशन युनिट 1965 मध्ये स्थापन केले आणि देशातच नायलॉन चिप्स बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले. त्यांनी पॅराशूटसाठी लागणाऱ्या दोऱ्यांच्या निर्मितीद्वारे संरक्षण क्षेत्रातही योगदान दिले. गरवारे समूह नायलॉन धाग्याच्या स्वदेशी उत्पादनात अग्रणी ठरला. त्यांनी आयात पर्यायीकरणाला चालना दिली. आबासाहेबांचा स्वदेशी उत्पादनांवर दृढ विश्वास होता. त्यांनी परदेशी तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते स्वदेशी पद्धतीने उद्योग उभारण्यासाठी वापरले. त्यामुळे ‘गरवारे उद्योग समूह’ राष्ट्रीय औद्योगिक धोरणाचे प्रतीक बनला. त्यांनी ‘गरवारे मोटर्स’, ‘गरवारे प्लॅस्टिक्स’, ‘गरवारे नायलॉन्स’ अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. या सर्व यशात त्यांच्या कामगारांचे सहकार्य आणि उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची होती. त्यांचे असामान्य नेतृत्व, हौस, चिकाटी, नाविन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा आणि एकलव्यासारखी ध्येयनिष्ठा त्यांच्या यशामागे होती. त्यांनी नवे उत्पादन सुरू करताना येणाऱ्या अडचणींमध्ये संयम राखला आणि कामगारांना प्रोत्साहन दिले. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होई आणि ते शिस्तीच्या बाबतीत कठोर होते. त्यांना व्यवसायात व्यस्त असतानाही खेळांची, संगीताची आणि बागकामाची आवड होती. पत्नी विमलाबाई यांनी त्यांना आयुष्यभर साथ दिली. त्यांचा कुटुंबाला एकत्र ठेवण्यात महत्त्वाचा वाटा होता.
आबासाहेबांनी कामगारांच्या कल्याणासाठी गांधीजींच्या विश्वस्त पदाच्या तत्त्वांचे पालन केले. त्यांनी आरोग्य, शिक्षण यांसारख्या सामाजिक कार्यांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या. त्यांनी ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’च्या (MES) कार्यामुळे प्रभावित होऊन संस्थेला अनुदान दिले. आबासाहेबांच्या योगदानाला गौरवण्यासाठी MES ने त्यांच्या एका संस्थेला ‘आबासाहेब गरवारे कॉलेज’ असे नाव दिले.
त्यांची भारत सरकारने मुंबईचे शेरिफ म्हणून नियुक्ती 1959 मध्ये केली. त्यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद 1956 ते 1965 दरम्यान भूषवले. त्यांना भारत सरकारने भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘पद्मभूषण’ किताब देऊन 1971 साली सन्मानित केले. त्यांना पुणे विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट.) या मानद पदवीने 1989 साली गौरवले आहे.
संकेतस्थळाचा दुसरा विभाग; निवडक भाषणे असा आहे. आबासाहेबांनी सार्वजनिक व्यासपीठांवर केलेली निवडक भाषणे त्यात वाचण्यास मिळतील. त्या भाषणांमधून त्यांनी सामाजिक, औद्योगिक आणि राष्ट्रीय विषयांवर व्यक्त केलेले महत्त्वपूर्ण विचार वाचकांपर्यंत पोचवले आहेत. आबासाहेबांच्या मते, भारताच्या प्रगतीसाठी औद्योगिकीकरण अत्यंत आवश्यक असले तरी, तो विकास मानवी मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीशी जोडलेला असावा. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, संधीची ओळख, कष्टाचे महत्त्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांवर अधिक भर दिला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि उद्योगाशी त्याचा समन्वय यावरही त्यांचे विचार मांडले आहेत. त्यांची भाषणे व्यक्तीमत्वातील दूरदृष्टी आणि व्यापक दृष्टिकोन दर्शवतात.
संकेतस्थळाचा तिसरा विभाग विसाव्या शतकात देशातील औद्योगिक परिस्थितीचे स्वरूप आणि उद्योगक्षेत्रातील घडामोडी उलगडून दाखवणारे लेख असा आहे. त्यामुळे वाचकाला त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आबासाहेब गरवारे यांचे उद्योग क्षेत्रातील योगदान अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होते. त्यांनी कोणत्या काळात आणि कोणत्या परिस्थितीत त्यांचे उद्योग उभारले, कोणत्या आव्हानांवर मात केली हे त्या भागांतून स्पष्ट होते. आबासाहेबांनी जगाचा निरोप 2 नोव्हेंबर 1990 रोजी घेतला परंतु, त्यांचा उद्योग समूह आणि त्यांचे विचार आजही प्रेरणा देत आहेत.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या जन्मशताब्दीवीरांच्या ‘महाभूषण’ प्रकल्पात साकारलेले आबासाहेब गरवारे यांच्यावरील हे संकेतस्थळ, एका उद्योजकाच्या जीवनाची, त्यांच्या संघर्षाची, यशाची आणि त्यांनी देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची समग्र माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. हे त्यांचे केवळ चरित्र नाही, तर तत्कालीन औद्योगिक भारताचा इतिहास आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारे विचार यांचा ठेवा आहे. हे संकेतस्थळ आबासाहेबांसारख्या व्यक्तीच्या स्मृतीला आणि त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणारे एक महत्त्वपूर्ण साधन ठरेल.
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com