सद्भावनेचे व्यासपीठ

5
677

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेब पोर्टल 2010 मध्ये सुरू झाले. या पोर्टलचा विशेष म्हणजे कालानुरूप बदलणाऱ्या जाणिवा, तंत्रज्ञान, माध्यमे, मानसशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्यांच्या बरोबरीने विचार करणे. बदललेली समाजरीत, कामाच्या पद्धती, मिळणारा पैसा, उपलब्ध संधी, समाज माध्यमांचे अटळ स्थान अशा अनेक घटकांमुळे वर्तमानात आणि नजीकच्या भूतकाळात विलक्षण वेगाने बदल होत आहेत/झाले आहेत. वागण्याच्या, बोलण्याच्या, विचार करण्याच्या आणि भाषेच्यासुद्धा त्रासदायक रीती, पद्धती रूढ होऊ लागल्या आहेत. सगळ्या समाजघटकांमध्ये संवेदनशीलता, सद्भाव, करुणाभाव अशा वृत्तींचा अभाव जाणवतो.

हे कशामुळे झाले असेल? कारण समाजात वावरणाऱ्या बहुतांशी सगळ्यांची आस आहे ती सुखासीन आयुष्य जगण्याची. त्याचेही ठोकताळे प्रत्येक घटकाने आखलेले दिसतात. त्यात काही वावगे अथवा चुकीचे नाही. पण त्यामुळे आयुष्य हे स्वकेंद्रित झालेले दिसते. सुख आणि समाधान यांचा लसावि भौतिक जगण्याशी बांधला गेलेला जाणवतो. समाजाच्या सर्व थरांतील, सर्व घटकांमध्ये विचारांची ही चौकट घट्ट होत आहे. समोर आलेल्या प्रसंगातून, चर्चेतून, संधीमधून मला यातून काय फायदा होऊ शकेल? असा संकुचित विचारच होतो. एखादे काम केले, की त्याचा मोबदला पैशातून मिळणार का आणि किती हा विचार प्रकर्षाने वर येतो. आणि जर काही फायदा होणार नसेल तर ते काम मी कशाला करू अशी वृत्ती बळावलेली दिसते. सगळ्यांनी मिळून, एकत्र येऊन काम करू या भावनेपेक्षा एकेकट्याने काम करण्याला प्राधान्य दिले जात आहे. ही वृत्ती बालकांपासून, शाळा पातळीवरच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत पसरलेली आहे. एकमेकांबरोबरचा संवाद प्रेमभावाने होण्याऐवजी नकळत एकमेकांबरोबर तुलना करण्याकडे झुकला आहे. तुझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे हा फोन आहे अशा प्रकारे एकमेकांना हेरण्याकडे वळला आहे. प्रेमभाव, स्नेहभाव आणि माणुसकी पातळ होऊन गेली आहे.

अशा या गुंतागुंतीच्या समाजामध्ये संवेदनशीलतेने, विचारांच्या शक्तीने, इतरांप्रत असणार्‍या करुणाभावाने आणि सगळ्यात महत्त्वाचे सद्‍भावनेच्या असोशीने विचार करून, समाजातील सदसद्विवेकबुद्धी असलेली माणसे एकत्र आली तर समाज बदलू शकेल असा आश्वासक विश्वास व श्रद्धा बाळगणारे लोकही समाजात आहेत. तशा लोकांना एकत्र आणून बदल घडवण्याचे स्वप्न बघणे आणि ते सत्यात आणण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा, संवाद घडवणे हा पोर्टलचा हेतू आहे. नव्या आधुनिक समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे हे पोर्टल आहे.

आधुनिकीकरण झालेल्या समाजात माणसांची एकमेकांबरोबर असण्याची ओढ मोबाईल आणि इंटरनेट या दोन बलाढ्य यांत्रिक राक्षसांनी काबीज केली आहे. सगळी माणसे टाचणी टोचून बसल्यासारखी वेळीअवेळी त्या छोट्या यंत्रात डोळे खुपसून बसू लागली. प्रत्येकाचा खाजगी कोपरा निर्माण झाला, त्यात इतरांना सामावून घेण्याची गरज कमी होऊ लागली, त्याबद्दल कोणाची तक्रारही राहिली नाही.

मनोरंजनाचे प्रकार बदलले. ओ टी टी सारख्या नव्या करमणुकीच्या साधनांवर नियंत्रण राहिले नाही. Foul language, sex, violence अशा शब्दांची भीती, धास्ती आणि संकोच नाहीसा झाला. ते दररोज कानावर पडणारे, सगळ्यांच्या तोंडी असणारे ‘आपले’ शब्द झाले. एकट्याचा किंवा एकत्रपणे वेळ घालवण्याच्या पद्धती बदलल्या.  मनोरंजन म्हणून जे दाखवले जाते तेच मनोरंजन अशी व्याख्या तयार झाली. त्याचे पडसाद शाळा आणि महाविद्यालये यांतील विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये पडू लागले. दोलायमान राजकीय परिस्थितीमुळे जनता भयभीत झाली. या सगळ्या बदलांशी सामावून घेण्यात वृद्धांची ससेहोलपट होऊ लागली. कोणी कोणाकडे गाऱ्हाणे सांगायचे?  प्रचंड, अनियंत्रित वेगवेड्या आयुष्याला खीळ बसेनाशी झाली आणि अशा जगण्याचा समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम होऊ लागला.

आपलेपणा, चांगुलपणा, दुसर्‍यासाठी सहज भावनेने मदत करण्याची मनोवृत्ती या नित्य भासणार्‍या गोष्टी नवख्या वाटू लागल्या. पैसे असणारे आणि पैसे नसणारे, हिंसा करणारे आणि हिंसेला घाबरणारे, जातिधर्म पाळणारे आणि न पाळणारे असे समुदाय तयार होऊ लागले. चांगुलपणाला व्यक्त होण्याची भीती वाटू लागली. दुसर्‍याप्रती असणारी सद्भावना व्यक्त न करण्याची अलिखित जणू सक्ती झाली आणि समाज असंबद्धपणाने भरकटू लागला. निसर्गात दिसणारा चांगुलपणा माणसांत दिसेनासा झाला. यालाच कदाचित अराजक म्हणत असावेत !

अशा नैतिक अस्थिर परिस्थितीमध्ये संवेदना जागृत असलेले लोक चांगुलपणा, उमेद, नैतिक मूल्ये आणि अशा प्रवृत्ती व्यक्त झाल्या पाहिजेत. तशा विचाराने अस्वस्थ होणारे लोक आहेत. त्यांचे नेटवर्क करता येईल का? सद्भावाला बळकटी देणाऱ्या वृत्ती जोपासता येतील का? अशा समविचारी लोकांना, आपल्यासारखे कोणी आहे हे जाणल्यानंतर मनाला दिलासा वाटणार नाही का? अशा विधायक भावनेतून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून आम्ही ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ हा प्रकल्प 1 मार्च 2023 पासून सुरू करत आहोत.

समाजातील सगळ्या घटकांमध्ये एकमेकांबद्दल स्नेह वाटावा, मदतीची भावना दाटावी, चांगले वागणे हा दुबळेपणा नव्हे अशी भावना रुजली जावी असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अवतीभवती चांगुलपणाचे काम सद्‍भावनेने करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना या व्यासपीठावर त्यांच्या फोटोंसह, मुलाखतींच्या रुपात आणले जाणार आहे. मन बदलण्याची शक्ती असलेले, सद्भाव जागृत करणारे प्रसंग, किस्से, लेख, कविता तर असतीलच. एखादा सिनेमा, आवडलेल्या साहित्यातील प्रसंग, या साऱ्याबरोबर सोयरे, सहचर असलेल्या वनस्पती, जंगले, प्राणी यांच्यात असलेला शब्दांशिवायचा संवाद, चांगुलपणा आणि त्यातून व्यक्त होणारा सद्भावही असेल.

असे समविचारी आपण सगळे यात सहभागी होऊया. सद्भाव शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी, आपल्याबरोबर आपल्यासारखा विचार करणारे आहेत हा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी, ‘असाही विचार करणारे लोक आहेत बरं का’ याची जाणीव (कदाचित त्याची जरबही) निर्माण करण्यासाठी आपण सारे एकत्र येऊ या.

अशा सार्‍यांसाठी हे सद्भावना व्यासपीठ खुले होत आहे.

सद्‍भावनेच्या उत्फुल्ल आविष्काराने आपण एकत्र येऊ या. सद्भावाचा जल्लोष साजरा करू या.

लोगोबरोबर ऐकू येणाऱ्या ओळी सुनील सुकथनकर यांनी लिहिलेल्या, मला भावलेल्या आणि सद्भावनेच्या व्यासपीठाचे अंतर्मन सांगणाऱ्या कवितेतील आहेत. आपण सगळ्यांनी दर आठवड्याला पहिल्या सोमवारी सद्‍भावनेच्या व्यासपीठावर येणारे लेख, मुलाखती, प्रसंग, किस्से वाचावे; त्यावर प्रतिसाद द्यावा असा सद्भाव आपल्याप्रती मनात ठेवते.

अपर्णा महाजन 9822059678
सूत्रधार : सद्भावनेचे व्यासपीठ

——————————————————————————————————

About Post Author

5 COMMENTS

  1. अतिशय सुंदर उपक्रम! भावना अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देताना या विषयीची लेखिकेची तळमळ या लेखात उमटली आहे.
    समविचारांची अभिव्यक्ती मनाला दिलासा देणारी!
    उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!

    • तुमच्या प्रतिक्रियेने हुरूप वाढला.

  2. जीवनाविषयी आस्था असलेल्या व्यक्तींसाठी हे व्यासपीठ खरोखरच उपयुक्त आहे. नवे विचार, नवे उपक्रम याद्वारे कार्यान्वित होऊ शकतात. समाजमनात सद्भावना जागृत होण्यासाठी हे व्यासपीठ आवश्यकच वाटते. मनापासून शुभेच्छा!

  3. नमस्कार! लेख आताच वाचला. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन लेखातही प्रतिबिंबित झाला आहे. विचार करून काही अल्प-स्वल्प योगदान देण्याचा प्रयत्न जरूर करेन. तुम्ही लेखात मांडलेले मुद्दे विचारात टाकणारे असून आज समाजात हेच चित्र सगळीकडे दिसत आहे आणि म्हणूनच तुमच्या या उपक्रमाला महत्त्व आहे. तुमच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here