चित्रकार आर्चिबाल्ड हर्मन मुल्लर यांचा जन्म केरळमधील कोचीन (कोची) शहरामध्ये 11 मार्च 1878 रोजी झाला. त्यांचे वडील हर्मन हे प्रोटेस्टंट जर्मन गृहस्थ होते, तर आई हिंदू रोमन कॅथॉलिक होती. वडिलांचे निधन लहानपणीच झाल्याने त्यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. त्यांची मातृभाषा मल्याळी असली तरी त्यांना इंग्रजी व हिंदी या भाषा उत्तम येत होत्या. मुल्लर यांना चित्रकलेची आवड होती. ते पाहिलेल्या व्यक्तीचे अथवा वस्तू घटकाचे हुबेहूब चित्रण करत असत. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे असे मोठे लोक म्हणत. त्यांनी मद्रास स्कूल ऑफ आर्टच्या मेमरी ड्रॉईंग परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. त्या काळी मेमरी ड्रॉईंगसाठी वस्तूचे चित्रिकरण केले जात असे. स्वाभाविकच मुल्लर यांचे कलाशिक्षण मद्रास ‘स्कूल ऑफ आर्ट’मध्येच झाले. त्यांना वास्तववादी चित्रशैलीचे आकर्षण होते. त्यांचा कल व्यक्तीचे अथवा दृश्याचे हुबेहूब चित्रण करण्याकडे होता. त्यांच्या आवडीचे विषय पोर्ट्रेट, कंम्पोझिशन आणि लँडस्केप हे होते. त्यांना विशेषतः फिगरेटिव्ह कंम्पोझिशन जास्त आवडत असे.
मुल्लर यांनी कलाक्षेत्रात करिअर करण्यासाठी हैदराबाद, पुणे असा प्रवास करत मुंबई 1910 साली गाठली. त्यांनी स्वतःचे स्थान 1910 ते 1922 या बारा वर्षांच्या काळात मुंबईच्या कलाजगतात निर्माण केले. त्या काळी चित्रकला क्षेत्र हे थेटपणे व पूर्णपणे व्यावसायिक नव्हते. मुल्लर यांच्या ‘राजकन्येचे ब्राह्मण भिक्षुक मुलास दान’ या चित्राला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे ‘सुवर्णपदक’ 1911 साली मिळाले. तत्कालीन कलावर्तुळात गाजलेले आणि समकालीन कलाक्षेत्रात सर्वपरिचित असणारे ते चित्र सांगलीच्या वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे.
मुल्लर यांचा स्वभाव हा प्रांजळ, पारदर्शी आणि इतरांना मदत करण्याचा होता. त्यांनी स्वतःमधील कलावंत जिवंत ठेवण्याबरोबरच कलेचा सन्मान कधी ढळू दिला नाही. त्यांनी आर्थिक स्थिती ठीक नसतानाही चित्रनिर्मितीत तडजोड केली नाही. त्यांना त्या मोकळ्या आणि स्वाभिमानी वृत्तीचा आर्थिक फटका बराच बसला. त्यांनी तशाच ताणतणावामुळे 1923 साली मुंबई सोडून बिकानेरच्या महाराजांकडे चित्रकार म्हणून नोकरी पत्करली. त्यांनी बिकानेरमध्ये महाराजांच्या आवडीनुसार असंख्य चित्रे रेखाटली. बिकानेरचे महाराज शिकारीला जाताना चित्रे काढण्यासाठी सोबत मुल्लर यांना घेत असत.
मुल्लर काही कालावधीनंतर बिकानेर सोडून पुन्हा मातृभूमी असलेल्या कोचीनला गेले. मात्र ते कोचीनमध्ये फार रमले नाहीत. त्यांनी तेथे त्यांच्या भाचीबरोबर लग्न करून ते पुन्हा मुंबईत 1928 मध्ये परतले. ते लग्नानंतरचा मुंबईतील वाढता खर्च आणि कौटुंबिक विफलता यामुळे राजस्थानात जोधपूरला गेले. त्यांनी जोधपूरच्या महाराजांसह कोटा, उदेपूर संस्थानसाठी अनेक चित्रे रंगवली. त्यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी 24 सप्टेंबर 1960 रोजी जोधपूर येथेच निधन झाले.
मुल्लर जर्मनवंशीय असले तरी त्यांच्यावर संस्कार हे पूर्णतः भारतीय होते. त्यांचा कालखंड हा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांसह ब्रिटिशांविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा होता. मुल्लर हे ब्रिटिशांकरता शत्रुपक्षातील होते. त्यामुळे ते पहिल्या महायुद्धात भारतीय म्हणून अँग्लो इंडियन लोकांबरोबर सैन्यात भरती झाले.
त्या काळी बहुतेक चित्रकारांवर राजा रविवर्मा यांच्या पाश्चिमात्य वास्तववादी शैलीतील ऐतिहासिक व पौराणिक चित्रांचा प्रभाव होता. शिवाय, तो काळ राष्ट्रीय चळवळीचा आणि जागतिक राजकीय उलथापालथीचा होता. मुल्लर यांनी धार्मिक, पौराणिक विषयांसह रामायण, महाभारत आणि ऐतिहासिक विषयांवर असंख्य चित्रे रंगवली. त्यांनी रामायणाचा सखोल अभ्यास करून चित्रे रेखाटली. त्यांनी लक्ष्मी-विष्णू, यम-सावित्री, राम-सीता, गंगेचा पाताळप्रवेश, दुष्यंताच्या दरबारात शकुंतला, राजपुत्र सिद्धार्थ, गीतोपदेश, द्रौपदी वस्त्रहरण, उलुपी शापमोचन, उषास्वप्न, जनक राजाच्या दरबारी विश्वामित्र, जटायू वध यांसारखे अनेक पौराणिक विषय रंगवले. त्यांचे ‘औरंगजेबाच्या कैदेत छत्रपती शिवाजी’ हे ऐतिहासिक विषयावरील अप्रतिम चित्र औंधच्या भवानी वस्तू संग्रहालयात आहे. शिवाय, त्यांनी अनेक निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे आणि अभ्यासचित्रे रेखाटली आहेत. त्यांची चित्रे लंडन येथील बकिंगहॅम पॅलेस, अल्बर्ट संग्रहालय येथे संग्रहित आहेत. त्यांच्या चित्रांना मागणी असून देश-विदेशातील लिलावात त्यांच्या कलाकृती मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.
मुल्लर यांच्या अनेक कलाकृती सांगलीच्या वस्तू संग्रहालयात संग्रहित आहेत. सांगलीच्या कलावैभवात भर घालणाऱ्या त्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी अनेक चोखंदळ कलाभ्यासक, कलारसिक आणि पर्यटक सांगली वस्तू संग्रहालयास भेट देत असतात.
– प्राचार्य बाळासाहेब पाटील 9960379272 bbpatilsangli@gmail.com
छान पूर्वक माहिती.