आम्ही वसईकर – वाडवळ, पानमाळी, भंडारी, कोळी… (Vasai – The picture of integration)

0
138

होय. आम्ही वसईकर आहोत. कारण आमचा धर्म, गोत्र, जात, आर्थिक परिस्थिती, रंग, रूप, काहीही असले, तरी आम्हाला बांधते ते एकच नाते – आम्ही वसईकर ! भारत देश किती मोठा आणि विस्तीर्ण; आणि किती विविधतेने भरलेला आहे ! विविध धर्म, विविध जाती-जमाती, भौगोलिक वैविध्य, विविध संस्कृती आणि रीतिरिवाज ह्यांचा समावेश असलेल्या ह्या देशात कोट्यवधी लोक निवास करत आहेत. त्यांच्यामध्ये अनेक वेळा, जात-धर्म-भाषा-राज्यांच्या सीमा-पाणीवाटप-शाकाहारी-मांसाहारी अशा मुद्यांवरून सामाजिक असहिष्णुता आणि कलह यांचे दर्शन होत असते. परंतु मला छाती अभिमानाने फुगवून असे जरूर सांगावेसे वाटते, की आमची वसई वेगळी आहे. ती ह्या सर्व भेदभावांपासून दूर आहे. ज्या प्रकारे ह्या वसईच्या भूमीत असणाऱ्या फुलांच्या असंख्य बागांत उगवलेली मोगरा, गुलाब, शेवंती, झेंडू ही फुले त्यांचा संमिश्र सुवास सर्वदूर पसरवतात; तसेच, तेथील ख्रिस्ती, हिंदू, मुसलमान, जैन आणि आदिवासी त्यांच्या गुण्यागोविंदाचा, सामंजस्याचा, आदर्श सह-अस्तित्वाचा परिमल सतत दरवळत ठेवत आले आहेत. ख्रिस्ती लोकांमध्ये वाडवळ आहेत, वलकर मोठ्या संख्येने आहेत, कोळी आहेत; बोलीभाषेतील फरकामुळे काही लोकांचे त्यांच्या गावांच्या नावावरून वर्गीकरण केलेले असे मानकर आहेत, भुईगावकर आहेत आणि उत्तर वसईतील मूळचे सामवेदी ब्राह्मण ज्यांना कादो म्हटले जाते, तेही आहेत ! हिंदू बांधवांमध्ये पानमाळी आहेत, भंडारी आहेत, कोळी आहेत, आगरी आहेत आणि अनेक वर्षे स्थायिक होऊन वसईला स्वत:ची म्हणवणारे कुडाळी आहेत. त्या सर्वाना एकत्र माळतो तो पुष्पहार आहे, वसई !

            कुणबी आमाना बोलतान शेतकरी – जलम गेला आमचा शेतावरी- आम्ही वसईचे वाडवळ/वलकर. कुणबी, शेतकरी, वाडवळ, पानमाळी ह्या सर्व शब्दांचा अर्थ एकच. जमीन, शेती जोपासणारे वसईकर भूमिपुत्र. वसईतील ख्रिस्ती शेतकऱ्ऱ्यांना वाडवळ म्हणून संबोधले जाते तर हिंदू शेतकऱ्यांना पानमाळी. वाडवळ हे संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचा पगडा दक्षिण वसईतील एकंदरीत समाजजीवनावर जास्त आहे. वाडवळांची वस्ती त्यांच्या त्यांच्या वाडीवर असते, तर वलकर हे बहुधा वसईच्या शहरी भागातील गावठाण विभागात स्थायिक आहेत. पापडी, सुतार आळी, पालीची ख्रिश्चन आळी आणि छोटे गिरीज ही वलकर बांधवांची वस्तीची पारंपरिक ठिकाणे. वलकर हे शिक्षणाने इतरांपेक्षा पुढे तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत होते. त्यांना इंग्रजी बऱ्यापैकी येई, त्यांना मुंबईत ऑफिसमधील नोकऱ्या होत्या आणि त्यांच्या पोरीबाळी मुंबैच्या मुलींसारख्या फॅशनचे कपडे परिधान करत. म्हणून समाजात त्यांच्या वर्चस्वाचे वलय होते. परंतु तो फरक केव्हाच नेस्तनाबूत झालेला आहे. वाडवळदेखील शिकून-सावरून मोठमोठ्या पदांवर काम करताहेत, इंग्रजी सर्वांच्याच हातचा मळ झालेला आहे… आणि एकंदरीतच, खूप प्रगती झाली आहे. वाडवळच काय, सर्व गटांतील लोक जहाजांवर, परदेशांत कामाला अथवा स्थायिक आहेत. एके काळी शेतीप्रधान लोकशैली आणि घरेदारे असलेला समाज आलिशान बंगले आणि गाड्या मिरवत आहे. आणि काही बाबतींत ऐश्वर्याचे ओंगळ दर्शनही घडते ! एक गोष्ट मात्र दाद देण्यासारखी आहे. त्यांनी अनेक संस्था वाडवळ समाजातील सहकारभावना आणि काही समाजधुरिणांचे लाभलेले पोक्त नेतृत्व ह्या बळावर उभ्या केल्या आहेत. त्यांत कॅथलिक बँक, कार्डिनल हॉस्पिटल, जीजी कॉलेज ह्या मान्यवर संस्था आहेतच; पण आणखी इतरही पतपेढ्या, शाळा, कॉलेजे आहेत. वाडवळ मंडळी मराठी साहित्य जोपासना, नाट्यकला, अभिनय, लेखन ह्या सर्व क्षेत्रांत मोलाची कामगिरी करत आहेत. ख्रिस्ती धर्म आणि पोर्तुगीज प्रभाव ह्यामुळे वाडवळ-वलकर ह्यांची आडनावे सहसा फर्नांडिस, डिसोजा, मच्याडो, कोलासो, परेरा अशी असतात. 

            वसईचे हिंदू पानमाळी आणि ख्रिस्ती वाडवळ हे पूर्वीचे भाईबंद. दोघांचेही कुळ सोमवंशी क्षत्रिय. त्यांच्या वाड्या आणि जमिनी एकमेकांला लागलेल्या. बोलीभाषादेखील एक. दिसायला इतके सारखे की भाऊभाऊ वाटावेत. पाली परिसरात सावेवाडी, किरवली, मुळगाव; तसेच, होळी-वासळय-देव्हाळे येथे राऊत, सावे, वर्तक, म्हात्रे, पाटील, चौधरी अशी प्रामुख्याने आडनावे असलेले पानमाळी ! 

            किरावली हे गाव फुलशेतीकरता प्रसिद्ध. मोगरा, कागडा, केवडा, झेंडू, गुलाब यांच्या बागांच्या रांगा तेथे फुललेल्या असायच्या. ती फुले वेचून ती कंड्यात (खांद्याला लावता येण्याजोगी लांबट टोपली) भल्या पहाटे भरली जायची. तो कंडा घेऊन वाडवळ व पानमाळी शेतकरी एकत्रपणे पहिली लोकल पकडून दादरच्या फूल मार्केटला विकण्यास जायचे. शेतात काम करणाऱ्या त्या बुजूर्ग मंडळींपैकी काहींना कामाचा शीण घालवण्यासाठी संध्याकाळी थोडासा सोमरस सेवन करण्याची इच्छा होई. घरगुती वातावरणात गुळापासून बनवलेला सोमरस उपलब्धही असे. माझ्या परिसरात अशाच एका ठिकाणी संध्याकाळी वाडवळ व पानमाळी असलेले काही आजोबा व शेतकरी त्यांची नवटाकटाकण्यास जमत. साहित्य आणि संस्कृती यांच्या पारंपरिक बाबींबद्दलचे माझे ज्ञानार्जन तेथे होई. एक आजोबा भक्तिगीते कापऱ्या आवाजात बोलून दाखवत तर दुसरे एक त्यांनी संताच्या बलिदान स्थळी केलेल्या प्रवासाबद्दल सांगत. गंमत अशी, की त्यांना प्रत्येक वेळेला सद्गदित होऊन अश्रू ढाळण्यास होई. एक पानमाळी काका एकच प्यालानाटकामधील संवाद तल्लीन होऊन बोलून दाखवत, तर दुसऱ्या एका आजोबांकडून मी काही अद्वितीय अशा कोट्या व उखाणे शिकलो. 

            भाबड्या आणि प्रेमळ अशा कोळीबंधूंची साद वसईच्या गावात सकाळी नऊनंतर हमखास ऐकू येते – पावगीणे, मावरं हाय गेयडोक्यावर ताज्या मासळीचे (स्थानिक भाषेत, मावरं) टोपले घेऊन दारोदार विकत फिरणाऱ्या कोळी (मच्छिमार) भगिनीची ती साद असते. पावगीणेही पारंपरिक उपाधी कोळी महिलांची दुसऱ्या स्त्रीला साद घालण्याची आहे. वसईचे स्थानिक गावकरी भाजीपाला भरपूर पिकवत असले तरी मासे जेवणात असल्याशिवाय त्यांचा घास गळ्याखाली उतरत नाही हे सत्य आहे. मग बाजारात जाऊन मासे आणण्याऐवजी दारावरच्या आलेल्या पावगीणेकडून का न घ्यावे? तीन कोळीवाडे दक्षिण वसई परिसरात आहेत – पाचुबंदर, खोचिवडे आणि नायगांव. कोळ्यांचे राहण्याचे गाव म्हणजे कोळीवाडा. ती गावे साहजिकच खाडीच्या किंवा समुद्राच्या किनारी वसलेली असतात. कोळी आणि स्थानिक समाज ह्यांचा व्यावसायिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध पूर्वापारपासून आहे. पावगीण दारावर मासे विकण्यास रोजच येत नसते, म्हणून प्रत्येक घरातील गृहिणी सकाळी साधारण अकरा वाजल्यानंतर मासळी मार्केटचा रस्ता पकडते. त्यांची आपापसातील प्रेमळ घासाघीस मासळीच्या भावावरून चालते, ती बेमालूम असते. बहुतेक मच्छिमार भगिनींची नावे ही ग्राहक भगिनींना पाठ असतात. त्यांच्या संवादाचा हा एक नमुना: 

कोळीण ताईने पापलेटचा भाव 1000 रुपये सांगितलाय. 

ग्राहक महिला : गव (अगं), दे चल 600 रुपयांना, नाहीतर मी चालले. 

कोळीण :आ-आ (विशिष्ट हेल काढून आ-आ चा अर्थ – काहीतरीच काय बोलतेयकिंवा सम-आशय असतो), मलाच ते 700 ला पडले आहेत.

            ग्राहक महिला तिला भाव न पटल्याचे सोंग करून दुसऱ्या कोळिणीकडे जाते. मग पहिली तिला बोलावते आणि 750 ला सौदा पटतो. नाही पटलं आणि ग्राहकाने मासे शेजारच्या कोळिणीकडून विकत घेतले तरी कटुपणा काहीच नसतो. संभाषणात रोखठोक भाबडेपणा, मिश्किलता आणि आपुलकी ठासून भरलेली असते. एकदा माझी पत्नी माशांच्या भावावरून हुज्जत घालत असताना त्या कोळी भगिनीने माझ्याकडे बघत जोराने म्हटले, “ओय, तुझी बायको फार कंजूष आहे रे”. संबंधातील असा हा मोकळेपणा. अहो-जाहोच्या कृत्रिम मानापमानांचे जोखड नसलेले एकेरी संबोधन, हे पिढ्यान् पिढ्या जोपासलेल्या भावनिक संबंधांतून व्यक्त होत असते. हे झाले महिलांचे संबंध. मत्स्यव्यवसायाला पूरक असलेला मचवे बांधण्याचा व्यवसाय हा प्रामुख्याने येथील वाडवळ पुरुषांचा असल्यामुळे दोन्ही समाज हे आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या एकमेकांस पूरक आहेत. मचव्याचे जलावतरण होते तेव्हाच्या सोहोळ्यात मचवा बांधणारे मेस्तरीआणि त्यांचे कुटुंबीय यांची बडदास्त खूप ठेवली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. मच्छिमार बांधव हे धंद्याच्या निमित्ताने त्यांचे आडनाव कोळीअसे लावत. त्यांची आडनावे परंपरेने एखाद्या पूर्वजाच्या नावाशी जोडलेली असतात. जसे मनूचे घरचा, बेंडाचे घरचा किंवा त्यांच्या कामावर आधारित जसे नाखवा, तांडेल असू शकतात.  

            दक्षिण वसईतील भूमिपुत्रांपैकी महत्त्वाचा घटक म्हणजे भंडारी समाज. वाडवळ आणि पानमाळी जसे सोमवंशी क्षत्रिय तसे भंडारी हे शेषवंशी क्षत्रिय. ते म्हात्रे, राऊत, कडू, वैती, पाटील ह्या सर्वसाधारण आडनावाने जाणले जात. ताडीमाडीचा धंदा आणि शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. वाडवळांशी तुलना करता भंडारी हे तसे अल्प भूधारक. म्हणून त्यांची वस्ती बहुधा वाडीवर नव्हे तर गावठाणात असते. मी राहतो त्या पाली विभागात दोन भंडारी गावे आहेत – खोचिवडे आणि दरपाळे ही. खोचिवडे गाव म्हणजे नाट्यकलेचे शौकीन ! मंदिराच्या पालखी उत्सवाच्या दिवशी हमखास तेथे तीन अंकी नाटक असायचे. हलकीफुलकी नाटकेच नव्हेत तर चांगली संगीत नाटकेदेखील होत आणि आजूबाजूच्या वाडवळ, पानमाळी, कोळी गावांतून रसिक प्रेक्षक ती नाटके बघण्यासाठी गर्दी करत.  

स्वप्नील पाटील

            दरपाळे गावचे भंडारी हे क्रिकेटच्या खेळाचे अधिक शौकिन. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी क्रिकेट कप्तान प्रकाश पाटील त्याच गावचे आणि त्यांचा मुलगा स्वप्नील पाटील चक्क संयुक्त अरब अमिरातीच्या संघामधून खेळतो ! दरपाळे गावचा भंडारी समाज आणि जवळपासचा ख्रिस्ती समाज ह्यांमध्ये काही किरकोळ बाबींवरून व्यक्तिगत मतभेद निर्माण होत असत. गंमत म्हणजे पाली येथील ख्रिस्तमंदिर, माय दे देउस (देवमाता) चर्च हे ख्रिस्ती वस्तीमध्ये नसून, दरपाळे गावाच्या वेशीवर उभे आहे. मात्र कोणाही धर्मगुरूने त्या भंडारी समाजाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्नच केला नव्हता. फादर मिल्टन मिरांडा ह्या धर्मगुरूंची नेमणूक 1982 साली पाली चर्चमध्ये झाली. भरदार बांधा, बुलंद आवाज, क्रीडानैपुण्य हे गुण आणि संगीताभिलाषा असलेले मिल्टन यांना लोकांना जोडण्याची खुबी होती. त्यांनी त्यांच्या मैत्रीपूर्ण संपर्ककौशल्याचा उपयोग करत दरपाळेकरांची मने थोड्याच दिवसांत जिंकली. मिल्टन ह्यांना दरपाळ्याच्या प्रत्येक कुटुंबात थेट जेवणाचे आमंत्रण दिवाळीमध्ये असायचे. पूर्वीचे वैमनस्य कुठल्या कुठे लुप्त झाले; आणि दोन्ही समाजांत एकोप्याची भावना निर्माण झाली ती आजतागायत. फादरांची बदली इतरत्र काही काळानंतर झाली, तेव्हा त्यांची बदली होऊ नये म्हणून धर्माधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या निवेदनावर दरपाळ्यातील हिंदू बांधवांच्या चक्क सह्या होत्या ! एका ख्रिस्ती धर्मगुरूंची बदली होऊ नये म्हणून हिंदू धर्मीय स्थानिकांनी आर्जव करण्याची ती वेळ पहिलीच असावी. 

 

आमचे आदिवासी कष्टकरी बंधू होळीचा सण असला की आमच्या आजुबाजूला वसलेल्या आदिवासी लोकांचे गट शिमकट शिमकट तोटेरं आज काय आमचं कनेरंहे गाणे म्हणत आणि नाचत घराघरांच्या दाराशी यायचे. मग त्यांना होळीचे पोस्तदिले जायचे. वारली किंवा ठाकर आदिवासी मुळचे पाड्यावरचेरहिवासी. त्यांची गावे वसई पूर्वेला डोंगराळ भागात कामण, पेल्हार, ससुनवघर येथे. परंतु ते वसई पश्चिमेला अनेक पिढ्यांपासून, वाडवळ लोकांच्या वाडीवर काम करण्यासाठी स्थायिक झाले आहेत. प्रत्येकाला त्याच्या मालकाच्या वाडीवर घर बनवून, त्यात संसार थाटण्याची मुभा असल्यामुळे, ते वसईचे अविभाज्य घटक बनले आहेत. वाडीतील सर्व जबाबदारी त्या गड्यांवर असे. रहाटाला बैल जोडणे, पाणी शिंपणे, शेतात राबकरणे, मळणी-कापणी सर्वच काही. आदिवासी महिला त्यांच्या पाठीवर इरलेबांधून ओणव्या अवस्थेत लावणी करत, ते चित्र डोळ्यांपुढे तरंगते. पण मालक-सेवक हा फरक फक्त कामापुरता. सर्व व्यवहारात एकमेकाला एकेरीने हाक मारणे सर्वमान्य. आदिवासी मुले आणि मालकाची मुले एकत्र खेळायची आणि बागडायची. जातीय उच्चनीचतेचा लवलेश नाही ! बऱ्याचशा आदिवासी बंधूंकडे घरेदारे, नोकऱ्या, दुचाकी गाड्या आहेत. शिक्षणामुळे विकास घडतो ही आनंदाची गोष्ट आहे. 

            ह्या लेखात दक्षिण वसईतील समाजांचा प्रामुख्याने विचार केला आहे. परंतु उत्तर वसईतील एका महत्त्वाच्या सामाजिक घटकाचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. दक्षिणेत जसे वाडवळ भारी तसे उत्तर वसईत कादोबंधूंचे अग्रस्थान आहे. त्यांची आडनावे पोर्तुगीज आहेत परंतु तुस्कानो, दिब्रिटो, रुमावं, कोरिया, मोंतेरो, ही आडनावे फक्त कादो समाजातच आढळून येतात. ते पूर्वाश्रमीचे सामवेदी ब्राह्मण आहेत. त्यांच्या बोलीभाषेला कादोडी किंवा सामवेदी बोली म्हटले जाते. आणि ह्या स्वरांचा अति उपयोग; तसेच, वेगाने शब्दोच्चार करण्याची त्यांची सवय ह्यामुळे कादोडी भाषा वसईतील इतर समाजांना सुद्धा समजण्यास कठीण जाते. तो समाज हाडाचा शेतकरी, जमिनीही भरपूर; अर्थार्जनासाठी नोकरीची गरज भासत नव्हती. म्हणून त्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष काही दशके दिले नाही. मुंबईस दूधपुरवठा करणारे वसईवाले ते हेच. कमी शिक्षण, न समजणारी बोली आणि रांगडी शेतीप्रधान जीवनशैली ह्यामुळे कादो लोकांना पूर्वी वाडवळ समाजाकडून कमी लेखले जाई. रोटीबेटी व्यवहार नसल्यासारखा होता आणि क्वचित एखादे लग्न जुळले तर देगूल्या ओडेलो कोडेलो गेलतोहे त्यांच्या बोलींमधील गाणे हिणवण्याच्या आविर्भावात बोलले जाऊन, त्यावरून व्याह्यांमध्ये बाचाबाचीही होई. कादो बांधवांनीही शिक्षणात भरीव प्रगती केल्यामुळे आणि देशविदेशात नाव कमावल्यामुळे समानतेच्या भावनेने त्यांच्याकडे पाहिले जाते. किंबहुना ते कादोडी-सामवेदीपणाचा अभिमानाने स्वीकार करतात आणि त्यावर अनेक संशोधनात्मक उपक्रम, साहित्य, नाटके ह्याद्वारे सांस्कृतिक संवर्धन साधले आहे. 

            शेवटी वाडवळ, पानमाळी, भंडारी, कोळी, आदिवासी, कादोडी ह्यांची विभिन्न बोली, विभिन्न संस्कृती, विभिन्न धर्म, विभिन्न परंपरा ह्यांना जोडणारा एकच दुवा आहे आणि तो म्हणजे – आम्ही सर्व वसईकर !

 

दीपक मच्याडो 9967238611 deepak.machado@yahoo.com

दीपक मच्याडो हे नाबार्डमधील निवृत्त, जनसंपर्क उपप्रमुख. त्यांना गृहपत्रिकेचा सहसंपादक म्हणून कार्यानुभव. त्याखेरीज ग्रामीण विकास, बँकिंग आणि आर्थिक समावेशन यांबद्दलचा देशभरच्या कार्याचा व्यापक अनुभव. त्यांचे कथा, ललित, प्रवासवर्णन, समाज प्रबोधनपर आणि विनोदी लेखन प्रसिद्ध झालेले आहे. ते मराठी बोलीभाषेचे आणि वसईच्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी ज्युलिअस-दीपक मच्याडो ह्या नावानेदेखील लेखन केले आहे.

—————————————————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here