वासुदेव बळवंत; नव्हे, हॉटसन-गोगटे ! (The ill famous Hotson-Gogate)

 

        सोलापूर मार्शल लॉचे प्रकरण, त्याचा निकाल लागून गेल्यानंतरही चिघळत राहिले आणि त्याचे पर्यवसान मार्शल लॉचे कर्ते अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. तो इतिहास रोमहर्षक आहे. बेजबाबदार नोकरशाहीला पाठीशी घालताना ब्रिटिश साम्राज्यसत्तेने लोकमताची थट्टा केल्याची उदाहरणे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आढळतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांना स्वतःची सत्ता आणि स्वत:चे सामर्थ्य दाखवण्याच्या भरात पोच न राहिल्याने अनेकदा जनतेच्या प्राणावर बेतते, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूर शहरात नेमके तसेच घडले ! महात्मा गांधी यांना 1930 साली अटक झाली आणि देशभरातील वातावरण तापले. त्याला सोलापूरही अपवाद नव्हते. त्या वेळचा सोलापूरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हेन्री नाईट हा खुनशी व भेकड होता. त्याने सोलापुरात दंग्याचे निमित्त करून हत्यारी पोलिसांकडून हत्याकांड घडवले आणि तेवढे झाल्यावर शहरात राहण्याचे धैर्य नसल्याने, तो शहर वाऱ्यावर सोडून पळून गेला; चार दिवस सोलापूर स्वतंत्र होते. संपूर्ण देशात एवढ्या एका शहराने पारतंत्र्यातदेखील स्वातंत्र्य भोगले हे शल्य साम्राज्यसत्तेला होते. त्या चार दिवसांत सोलापुरातील राज्ययंत्र राष्ट्रीय चळवळीच्या स्वयंसेवकांकडून एवढे सुंदर हाताळले गेले की स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशाचे राज्य कसे चालवले जाईल याचा तो वस्तुपाठच होता, पण साम्राज्यसत्तेने ते सारे दडपले आणि सोलापूर शहर गुंडांच्या ताब्यात गेल्याची हाकाटी करत सोलापुरात मार्शल लॉ (लष्करी कायदा) जारी केला. तो तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला. त्या काळात सोलापूरच्या जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. लष्करी कोर्ट नेमून अनेक निरपराधांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या तर मुलकी कोर्टाने चार जणांना परमावधीची म्हणजे फाशीची शिक्षा दिली.

          मुंबई इलाख्याचा होम मेंबर (गृहमंत्री) अर्नेस्ट हॉटसन हा त्या साऱ्या प्रकरणात आघाडीवर होता. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हेन्री नाईट यांनी सोलापुरात पोलिसांकडून हत्याकांड घडवले होते. त्या प्रकरणी नाईट यांचा बचाव हॉटसन यांनीच केला. त्या हत्याकांडात पंचवीस माणसे मारली गेली. त्यामध्ये बारा-तेरा वर्षांची कोवळी पोरेदेखील होती. पन्नासाच्या वर लोक जबर जखमी झाले. मात्र त्या बहाद्दराने तसा काही गोळीबार झाला होता याची कबुली देण्याचे शेवटपर्यंत टाळले. सोलापूर गोळीबार चौकशीचा ठराव मुंबई कौन्सिलात फेटाळला गेला. त्यावेळी नाइट तेथे हजर होते. हॉटसन यांनी नाइट यांचे सभागृहात पाठ थोपटून कौतुक केले. पंजाब प्रकरणी ज्याप्रमाणे ब्रिटिश सत्तेने डायर-ओडवायरला पाठीशी घातले होते, तसाच प्रकार हॉटसन यांनी सोलापूर प्रकरणी नाईट यांना पाठीशी घालत केला. हॉटसन यांच्या वक्तव्याला असणारा सत्तेचा मद हा कोणाही देशभक्ताला चीड आणणारा होता.

          तशातच गांधी-आयर्विन समेटाचे सूतोवाच झाले. त्या समेटाच्या चर्चेत सोलापूर प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चार आरोपींबाबत आयर्विन महोदय काही वेगळा निर्णय घेतात की काय अशी भीती हॉटसन यांना वाटली. म्हणून त्यांनी घाईगडबडीने सोलापूरच्या चार सुपुत्रांची फाशीची शिक्षा अंमलात आणून टाकली आणि त्यासाठी दिवस निवडला, तो 12 जानेवारीचा. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा ! ती धांदल, तो खुनशीपणा जाणवण्याएवढा होता. सोलापूर मार्शल लॉप्रकरणी दाखवलेल्या कर्तव्यतत्परतेचे (!) बक्षीस म्हणून बादशहाच्या वाढदिवसाचे निमित्त करून मुंबई सरकारने हॉटसनला के.सी.एस.आय. या बहुमानाने सन्मानित केले. राष्ट्रीय वृत्तीच्या कोणालाही चीड यावी असेच सरकारचे ते वर्तन होते. परंतु जनतेच्या मनातील त्या संबंधीचा आक्रोश एका धडाक्याच्या रूपाने प्रकटला. तो धडाका होता हॉटसन यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा.

          सोलापूर प्रकरणी झालेल्या अन्यायाला जबाबदार असणाऱ्या हॉटसन यांनाच कंठस्नान घालून सोलापूर प्रकरणाचा प्रतिशोध घेण्याचा निश्चय पुण्याच्या एका तरुणाने केला. तो तरुण होता वासुदेव बळवंत गोगटे ! मिरज हायस्कूलचे हेडमास्तर बळवंत रामचंद्र गोगटे यांचा तो मुलगा. वासुदेव पुण्यात शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजात 1929 साली दाखल झाले होते. तात्यासाहेब केळकर वासुदेव यांच्या वडिलांचे विद्यार्थी. त्यामुळे वासुदेव यांचा तात्यासाहेबांबरोबर घरोबा होता. वासुदेव यांच्या मनात सावरकर यांच्याविषयी आकर्षण होते. वासुदेव पुण्यात 1931 साली ज्युनिअर बी ए च्या वर्गात होते. त्याच वर्षी सोलापूरच्या चार सुपुत्रांना येरवड्यात फाशी देण्यात आली, साम्राज्यशाहीच्या त्या जुलमाचा तीव्र निषेध करावा असे वासुदेव यांना वाटले. त्यांनी दोन रिव्हॉल्व्हर्स मिळवली व ते योग्य संधीची वाट पाहू लागले. हॉटसन मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे उद्घाटन करण्यासाठी येणार अशी माहिती गोगटेयांना 20 जुलै रोजी मिळाली. गोगटे यांनी त्यावेळी तेथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे ठरवले. असेंब्लीत जाण्यासाठी प्रवेशपत्रिका मागण्याकरता गोगटे तात्यासाहेब केळकर यांच्याकडे गेले. केळकर यांनी केसरी कार्यालयासाठी म्हणून एक चिठ्ठी दिली व प्रवेशपत्रिका केसरीतून घेण्यास सांगितले, परंतु केसरीचा बातमीदार वेगळा नेमला गेल्याने गोगटे यांना प्रवेशपत्रिका मिळू शकली नाही. ते निराश झाले.

         हॉटसन त्यानंतर, 22 जुलै 1931 या दिवशी फर्ग्युसन कॉलेजात येणार असल्याची बातमी गोगटे यांना मिळाली. त्या दिवशी हत्यारे सोबत घेऊन गोगटे कॉलेजवर गेले. दुपारी एक ते दीडच्या सुमारास हॉटसन फर्ग्युसनच्या वाडिया लायब्ररीत पाहणी करण्यासाठी आले असता गोगटे यांनी हॉटसन यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. हॉटसन त्यांच्या अंगात चिलखत असल्याने गोळ्या झाडूनही बचावले. गोगटे यांना तात्काळ अटक करण्यात आली. त्या हल्ल्याने थक्क झालेल्या हॉटसन यांनी गोगटे यांना “Why did you fire at me?” असा प्रश्न केला, तेव्हा गोगटे यांनी “As a protest against your tyrannical administration in Sholapur” असे स्पष्ट उत्तर दिले. त्या हल्ल्यात हॉटसन मारले गेले असते तर वासुदेव गोगटे यांची फाशी अटळ होती. पण गोगटेयांना आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली. तुरुंगात असताना, गोगटे यांनी विनायकनावाची कादंबरी लिहिली, ती त्यांच्या सुटकेनंतर वा.वि. साठे यांनी प्रसिद्ध केली. सुटकेनंतर गोगटेएलएल बी झाले. त्यांनी नंतरच्या काळात पुण्याचे महापौर,केसरीचे विश्वस्त अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी स्वतःला हिंदू महासभेच्या कार्याला सावरकर यांच्यासोबत वाहून घेतले.

सोलापूर प्रकरणात नोकरशाहीची प्रत्येक कृती ही सत्तेच्या उन्मादामधून झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. चित्रमय जगतकारांनी नोकरशाहीच्या त्या वागण्याचे वर्णन आगळीकीची चढाई अशा रास्त शब्दांत केलेले आहे. स्वतःची सत्ता आणि स्वतःचे सामर्थ्य दाखवण्याच्या भरात अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या गोष्टींचा पोच राहत नाही, हे त्या साऱ्या कृतीमागील कारण होय. सनदशीर मार्गाने त्या साऱ्याविरुद्ध दाद मागावी तर पदरी निराशाच येते ! जनतेच्या मनातील आक्रोश वासुदेव गोगटे यांच्या धडाक्याच्या रूपाने प्रकटला होता. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने एका वासुदेव बळवंताने यापूर्वी साम्राज्यसत्तेला कापरे भरवले होते; तर या वासुदेव बळवंताच्या कृत्याने सत्तेच्या मदाने धुंदावलेल्या नोकरशाहीच्या कानठळ्या बसवल्या ! सशस्त्र प्रतिकाराची वाट चोखाळणारे वासुदेव बळवंत गोगटेहे अखेरचे. वासुदेव बळवंत गोगटे यांना त्या नंतरच्या काळात जनतेने कायम हॉटसन गोगटे या नावाने गौरवले !

 

अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केले आहे. त्यांची बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख ही पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोधसोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

————————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleसव्विसावे साहित्य संमेलन (Twenty Sixth Marathi Literary Meet – 1941
Next articleचपाती व पोळी (Chapati, Poli Marathi Versions of Loaf)
अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक लेखन महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत केले आहे. त्यांचे तसे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ते सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याला राहतात.

1 COMMENT

  1. महत्त्वपूर्ण लेख. वासूदेव बळवंत गोगटे यांना विनम्र अभिवादन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here