मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा!
आणि कार्यक्रम तेथेच संपला! त्यानंतरच्या शांततेतच दोन्ही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकश्रोत्यांना मिळाली!
मराठवाड्याचा बॅकलॉग भरून का येत नाही?
मुक्तिदिन समारोहातील ‘शांतते’चा उद्गार !
– राजेंद्र शिंदे
मराठवाडा ही संतांची भूमी (ज्ञानेश्वर, एकनाथ वगैरे) असे म्हटले जाते.
शककर्ता शालिवाहन राजा हा तिथलाच.
ज्ञानेश्वरांच्या आधी शंभर वर्षे, ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज, ज्यांना ज्ञानेश्वरांनी ‘मराठी साहित्याचा पहिला मानकरी’ म्हणून वंदले, त्यांची अश्वदरी कुशीतील समाधी तेथेच आहे.
रोज ढबूची शाई संपवत ‘पासोडी’ निर्माण करणारे दासोपंत आंबेजोगाईचे (दासोपंत हे तालशास्त्रज्ञही होते.)
मराठवाड्याला गोदावरी नदीचे वरदान लाभले आहे. ती पुणतांब्याजवळ मराठवाड्यात प्रवेश करते आणि पुढे, उस्मानाबाद व लातूरखेरीज मराठवाड्याच्या बाकी सर्व जिल्ह्यांतून वाहते. हीच दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते.
तुळजाभवानीचे मंदिर यादवकालीन असावे असा निष्कर्ष डॉ. हरिहर ठोसर यांनी काढला आहे. – ते मराठवाड्यात उस्मानाबादजवळ येते.
मराठवाड्याने मास्टर कृष्णराव व अप्पा जळगावकर असे संगीत कलावंत देशाला दिले आहेत. गेल्या पंचवीस वर्षातील मराठी रंगभूमी व चित्रभूमी मराठवाड्यातील कलावंतांनी समुद्ध केली. (प्रशांत दळवी, मकरंद अनासपुरे वगैरे.)
असा मराठवाडा. तो महाराष्ट्रातील एक भूप्रदेश आहे. मराठवाड्याचा भौगोलिक उल्लेख महाभारतापासून आढळतो. तथापी इसवी सनाच्या आरंभकाळातील सातवाहन हे येथील पहिले नोंदले गेलेले राजे. त्यावेळी त्यांची राजधानी पैठण येथे होती. शिवाय, मराठवाड्याचा व्यापार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असल्याच्या नोंदी आहेत. उस्मानाबादजवळ तेर (नगर) येथे तर मोठे संग्रहालय उभे करण्यात आले आहे.
वाकाटक, चालुक्य राजांनीदेखील मराठवाड्याच्या काही भागांवर राज्य केले. तथापि खरा अंमल गाजला तो यादवांचा. या वंशातील पाचव्या भिल्लमाने ११७५ मध्ये देवगिरी येथे राजधानी निर्माण केली व तेथे किल्ला बांधला. रामचंद्र हा यादवांचा सर्वश्रेष्ठ राजा समजला जातो. त्याचा काळ १२७१ ते १३११.
हेमाडपंत (मूळ नाव हेमाद्री) हे यादवांच्या दरबारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक देवळे बांधली गेली व त्यांची शैली हेमाडपंतांच्या नावाने प्रसिध्द झाली. हेमाडपंतांचा ‘चतुर्वर्गचिंतामणि’ हा मोठा ग्रंथ प्रसिध्द आहे.
अल्लाउद्वीन खिलजीने दक्षिणेस स्वारी करून याच रामचंद्राचा पराभव केला. मलिक गफूरने देवगिरीचा पाडाव केला आणि नंतर दिल्लीत तख्तावर आलेल्या महमद तुघलकाने तेथे आपली राजधानी हलवली. त्याने त्या किल्ल्याचे नामांतर दौलताबाद असे केले. त्यानंतरचे बहामनी राज्य, त्याचे पुन्हा पाच तुकडे – आदिलशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही व निजामशाही. मराठवाडा असा विभागला गेला, पण दिल्लीच्या शहाजहानने १६३३ मध्ये दौलताबाद किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचा मुलगा औरंगजेब तेथे आला. त्यानंतर मात्र हैदराबादच्या निजामाचे मराठवाड्यावर राज्य होते. मराठ्यांनी काही लढायांत निजामाचा पराभव केला, परंतु सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर निजामाची सत्ता मराठवाड्यावर (ब्रिटिशांच्या सहकार्याने) अबाधित राहिली. ती संस्थानांच्या स्वतंत्र भारतदेशातील विलिनीकरणानंतर, १९४८ साली संपुष्टात आली.
मराठवाड्यातही स्वातंत्र्यचळवळ जोरात होती, पण तिचा बाज वेगळा होता. निजामाच्या राजवटीत रझाकार हे धर्मगुंड फोफावले होते. त्यांचा प्रजेला फार छळ होता. त्यामुळे रझाकारांपासून लपून कारवाया कराव्या लागत. एकीकडे हिंदू ब्राम्हणांचा कर्मठपणा आणि दुसरीकडे निजामाची फूस असलेल्या रझाकारांचा धर्मवेडेपणा यांमध्ये मराठवाड्यातील जनतेने सुमारे शंभर वर्षे काढली व त्याचा परिणाम तेथील जनता विशेष मागास राहण्यात झाला.
स्वातंत्र्योत्तर, बाबासाहेव आंबेडकर यांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून ते शैक्षणिक केंद्र बनवले. त्यामुळे मराठवाड्यात बरीच जागृती घडून आली व तीस दलित अस्मिता लाभली.
ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात पाचशेत्रेसष्ट संस्थाने होती. हैदराबाद या निजामाच्या संस्थानात मराठवाड्याचे पाच जिल्हे, कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि तेलंगणाचे आठ जिल्हे असे एकूण सोळा जिल्हे होते. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, तो प्रदेश १७ सप्टेंबर १९४८ पासून ३१ ऑक्टोबर १९५६ पर्यंत हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. तो १ नोव्हेंबर १९५६ पासून ३० एप्रिल १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट होता. तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्यात आला. मराठवाड्यात सध्या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड हे जिल्हे आहेत.
मराठवाड्यातील जनतेने केलेला त्याग, बलिदान यांमुळेच निजामाच्या कराल दाढेतून मराठवाडा मुक्त झाला व महाराष्ट्रात विलीन झाला असे वर्णन केले जाते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचे आर्य समाजाच्या वतीने नेतृत्व केले.
रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील ‘सिंदगी’ तालुक्याच्या गावी झाला. एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीच्या संदर्भात स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
मराठवाड्याच्या मुक्तिदिनानिमित्त आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम ‘पन्नास वर्षांपूर्वीचे ते दिवस!’ या शीर्षकांतर्गत मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात झाला. गंगाप्रसाद अग्रवाल, बापुसाहेब काळदाते, बद्रिनारायण बारवाले व तारा लढ्ढा यांनी आठवणी कथन केल्या. अजित दळवी, यमाजी मालकर व रविकिरण देशमुख यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘मराठवाडा परिवारा’तर्फे कार्यक्रमाचे संय़ोजन झाले.
तारा लढ्ढा यांनी निजामाच्या शरणागतीनंतरचा मराठवाडा कसा होता याचे वर्णन केले.
१६ सप्टेंबरला, मुक्तीच्या एक दिवस अगोदर रेल्वे बंद होती. रेडिओवरून बातम्या कळत होत्या. हैदराबादेत भारतीय फौजा आल्या होत्या. आपले लोक लपून बसले होते. आम्ही ती रात्र जागून काढली. सकाळी दारावर थाप पडली. आम्ही घाबरलो. प्रत्यक्षात, तो गवळी होता! त्याने खबर दिली, की औरंगाबादहून हिंदी फौजा येत आहेत. झेंडे लावण्यास सांगितले आहे. औरगाबादमध्ये मिठाई वाटण्यात आली. सर्वत्र प्रभातफेर्या निघाल्या. आम्हीही स्वयंस्फूर्तीने प्रभातफेरी काढली. गुलमंडीवर राष्ट्रगीत गायलो.
तारा लढ्ढा या स्वातंत्र्यसेनानी बन्सीलाल लढ्ढा यांच्या पत्नी होत. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केलेले आहे.
गंगाप्रसाद अग्रवाल यांनी सांगितले, की लोकांच्या भावना तीव्र होत्या. मी भूमिगत होतो. आम्ही रात्रीच एका ठाण्यावर हल्ला केला होता. सकाळपर्यंत चालत राहिलो. आमच्या अंगावर खाकी वस्त्रे व हातात शस्त्र; त्यामुळे गावकरी आम्हाला निजामाचे लोक समजून पळून जात होते. तेव्हा ‘आम्ही निजामाचे लोक नाही तर कॉंग्रेसवाले आहोत’ असे त्यांना ओरडून ओरडून सांगितले. त्यानंतर मात्र गावकर्यांनी असा प्रतिसाद दिला, की तुम्हांला नाश्ता केल्याशिवाय जाता येणार नाही! लोक निजामाच्या राजवटीत खूप त्रासले होते. आमच्या घराचा ताबा पोलिसांनी घेतला होता.
मूळचे हिंगोलीचे असणारे बद्रिनारायण बारवाले यांनी सेंद्रीय शेतीचा प्रयोग मराठवाड्यात केला. वडलांनी त्यांना मन:पूर्वक परवानगी दिली. ते मराठवाड्यात अग्रस्थानी आहेत. त्यांनी काही शिक्षणसंस्था निर्माण केल्या आहेत.
बापुसाहेब काळदाते यांनी सांगितले, की मी अनंत भालेराव यांच्यामुळे उर्दू शिकलो. माणूस म्हणून माणसाकडे पाहिले पाहिजे हे संतांकडून शिकलो. ज्ञान मिळवण्याची संधी ज्ञानी माणसांकडून मिळाली. जे काम केले ते आनंदाने केले. मी मराठवाड्यात उशिरा म्हणजे १९५८ साली आलो. मराठवाडा गंगाप्रसाद अग्रवाल यांच्यासारख्या चारित्र्यवान माणसांनी घडवला. स्वातंत्र्यानंतर १९४९ साली राष्ट्र सेवा दलाच्या कामास सुरुवात केली. मी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात काम सुरू केले. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व गावांत जाऊन काम केले. केवळ संघर्षाने परिवर्तन होत नाही असे ते एका संदर्भात म्हणाले.
बापुसाहेब काळदाते यांचा जन्म बीड जिल्ह्यात झाला. त्यांच्यावर एस. एम. जोशींचा गाढ प्रभाव आहे. त्यांनी आमदार, खासदार अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे वक्तृत्व, विचार यांचा संस्कार चार पिढ्यांवर आहे. ते सेवा दलाचे प्रमुख असताना, पुण्यात लोक (गांधी हत्येच्या वेळेस) एसपी कॉलेज जाळावयास निघाले होते, त्यांनी त्यांना रोखले. त्यांना लढण्याची प्रेरणा सेवादल, साने गुरूजी यांच्यामुळे मिळाली व आपण सहजपणे समाजवादी झालो असे ते म्हणाले. त्यांनी वर्णन केले, की मराठवाड्याच्या लढ्यासाठी लीग ऑफ सोशलिस्ट संघटना होती, तिची आता नामोनिशाणीही राहिलेली नाही. तशी आम्हा समाजवाद्यांची अवस्था आहे. मागे आमची ‘कॉंग्रेस को आखरी धक्का’ अशी घोषणा होती, पण त्यांनीच आम्हांला आखरी धक्का देऊन टाकला!
मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा!
आणि कार्यक्रम तेथेच संपला! त्यानंतरच्या शांततेतच दोन्ही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकश्रोत्यांना मिळाली!
‘मराठवाड्याच्या प्रेमा’पोटी लोकसभेतील उपनेते गोपिनाथ मुंडे हे उपस्थित झाले, पण त्यांना उशीर झाला होता! त्यांच्या हस्ते, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भक्तिगीते आणि अभंगगायनाचा मधुर दरवळ- ‘सूर गोदातटीचा’ हा, मराठवाड्यातील कलावंतांचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ पैकी कार्तिकी गायकवाड व रोहित राऊत हे गायक कलावंत होते.
– राजेंद्र शिंदे
भ्रमणध्वनी : 9324635303
thinkm2010@gmail.com