रहस्यकथाम्हटले, की मराठी भाषेच्या संदर्भात नावे आठवतात ती बाबुराव अर्नाळकर, नारायण धारप, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर यांची. परंतु त्या सर्वांच्या अगोदर मराठीत गोविंद नारायणशास्त्री दातार (1873-1941) यांनी काही रहस्यपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या. त्यांतील प्रमुख पुस्तके -अधःपात (1912), मानसिक यातना (1915), कालिकामूर्ती, प्रवाळद्वीप, रहस्यभेद – पूर्वार्ध व उत्तरार्ध; बंधुद्वेष – पूर्वार्ध व उत्तरार्ध; सार्थ शिवस्वरोदयम, रंगनाथी योगवसिष्ठ (1905). कोल्हापूरच्या रिया पब्लिकेशन्स यांनी दातार यांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्ती काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये अधःपात, इंद्रभुवन गुहा, मानसिक यातना, कालिकामूर्ती, चतुर माधवराव, प्रवाळद्वीप, शालिवाहन शक, शापविमोचन यांचा समावेश होता. ‘चतुर माधवराव’ या पुस्तकाची जी आवृत्ती रिया पब्लिकेशन्स यांनी 2013 मध्ये प्रकाशित केली, त्यात त्या पुस्तकाच्या प्रथम प्रकाशनाच्या वेळी दातार यांनी लिहिलेली प्रस्तावना (1930) दिलेली आहे. त्या प्रस्तावनेत दातार म्हणतात – “नुकतेच ख्रिस्तवासी झालेले सर आर्थर कॉनन डाईल यांच्या ‘शेरलॉक होम्स‘च्या धर्तीवर या सर्व गोष्टी अगदी नवीन रचल्या आहेत.”
दातार यांच्या काही पुस्तकांच्या आवृती ‘अजब प्रकाशना’नेही प्रसिद्ध केल्या आहेत. दातार यांच्याच काळात आणखी एक रहस्यकथा लेखक होऊन गेले. त्यांचे नाव विठ्ठल कृष्ण नेरुरकर. नेरुरकर यांचा जन्म 1892 सालचा(अर्नाळकर -1924, धारप -1925, नाईक -1938 तर शिरवळकर -1948). त्यांनी लिहिलेले ‘कवीची भेट‘ (प्रकाशन 1916) हे बहुधा त्यांचे पहिले पुस्तक. त्यांच्या नावावर विविध वाङ्मयप्रकारांतील पुस्तके आहेत. त्यांनी कथा, कादंबरी, रूपांतरित कादंबरी, कविता, बालवाङ्मय अशा सर्व प्रकारांत लेखन केलेले आहे. त्यांनी ‘मुलींची शाळा’ ही एक एकांकिकादेखील लिहिली आहे.
नेरुरकर यांची ‘दुधारी सुरी’ ही ‘गुप्त पोलिसांच्या चातुर्यावरील कादंबरी’ (हे उपशीर्षक आहे) 1923 साली प्रकाशित झाली. त्या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेतून दोन गोष्टी समजतात – एक म्हणजे नेरुरकर मालवण येथे निवास करत होते (निदान काही काळ तरी) आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्तुत कादंबरी रूपांतरित आहे. मात्र नेरुरकर यांनी मूळ इंग्रजी कादंबरीचे किंवा लेखकाचे नाव दिलेले नाही. सावंतवाडीचे ग्रंथपाल-लेखक जी.ए. बुवा यांच्याकडून वि.कृ. नेरूरकर यांच्याबद्दल माहिती मिळाली. ती अशी- वि.कृ. नेरुरकर शिक्षणाधिकारी म्हणून सावंतवाडी संस्थानात कार्यरत होते. त्यांनी सावंतवाडी संस्थानचे अधिपती बापुसाहेब महाराज (पाचवे खेमराज) यांना मराठी वाचनासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यासंबंधीच्या आठवणी बापुसाहेब महाराज यांच्या चरित्रात सांगितल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे, “बापुसाहेब विलायतेला जाण्यापूर्वी त्यांनी घेतलेले मराठीचे शिक्षण फुकट गेले. त्यांच्या मराठीच्या पद्धतशीर वाचनाला सुरुवात 1925 सालापासून झाली. त्यांनी नाट्यवाङ्मयांत कृ.प्र. खाडिलकर यांची काही नाटके पाहिली व वाचली होती. पण त्यांनी राम गणेश गडकरी यांची नाटके माझ्याबरोबर अभ्यासली होती.” नेरुरकर स्वत: मालवणी बोलीत कविता लिहीत असत. त्यांनी 1941-42 या काळात बेळगाव येथे मालवणी बोलीतील कविता सादर करून वाहवा मिळवली होती. गंगाधर महाम्बरे यांनी त्यांच्यावर ‘मालवणी भाषेतील आद्यकवी’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता.
‘दुधारी सुरी‘ ही कादंबरी बऱ्यापैकी मोठी आहे आणि रहस्यकथेचा जो एक आराखडा साधारणपणे मानला जातो. त्यापासून ती फार विचलित झालेली नाही. परिचित आराखडा म्हणजे खून/मृत्यू अचानक घडणे, संशयाची सुई प्रथम एकाकडे, मग तेथून दुसरी, तिसरीकडे अशा अनेक दिशांनी फिरणे, रहस्यपूर्ण घटना एकामागोमाग घडणे, पोलिसांचा अंदाज चुकणे, काही झटापटी, काही काळोख्या भीतीदायक जागा, साहसाच्या कृती वगैरे या सर्वांना त्या कादंबरीत स्थान आहे.
बाबासाहेब देशपांडे नावाचे उतारवयाचे श्रीमान गृहस्थ, त्यांच्या मुलीइतक्या वयाच्या पत्नीबरोबर – अंबुताई – राहत असतात. त्यांच्याबरोबर पत्नीची धाकटी बहीणही – कस्तुर – राहत असते. बाबासाहेबांना औषधोपचार करणारे डॉ. नियोगी हे नर्व्हज् डिसीजेसचे विशेषज्ञ आहेत. त्यांचा सहाय्यक मोहन हा उच्चविद्याविभूषित आहे, संजीव हा त्याचा मित्र गुप्त पोलिस आहे, परंतु वैयक्तिक पातळीवर. तो त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि त्याने पोलिसांना दहाबारा रहस्यमय प्रकरणे सोडवण्यास मदत केली आहे. बाबासाहेबांचा खून होतो. तो दुधारी सुरीने झाला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जातो. संशय प्रथम नोकरावर, मग कस्तुरवर व्यक्त होतो. ती हकिगत मोहनच्या प्रथमपुरुषी निवेदनातून सांगितली आहे. मोहन आणि कस्तुर यांचे एकमेकांवर दाट प्रेम आहे. संशयाची सुई कस्तुरकडे वळल्यावर मोहन काही अंशी विचलित होतो. काही महिन्यांनी खून झालेले बाबासाहेब आणि अंबुताई यांचे दर्शन लेखकाला घडते! पुढे, अंबुताईची हत्या होते. प्रत्यक्ष लेखकाला ठार करण्याचा प्रयत्न केला जातो. डॉक्टर नियोगी यांचे वारंवार आजारी पडणे, पोलिसांना मदत करणाऱ्या एका माणसाचा विष पाजून मृत्यू होणे अशा काही घटना एकापुढे एक घडतात व त्यामुळे कादंबरी काहीशी लांबली असली तरी कादंबरीतील उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. कादंबरीचा शेवट नेहेमीप्रमाणे, म्हणजे ज्याच्यावर संशय येत नाही अथवा येऊ शकत नाही अशी व्यक्ती खुनी म्हणून पुढे येण्यात होतो. कादंबरीत केवळ रहस्यमय घटनांची मालिका नाही तर निवेदक – लेखक – सहनायक आणि त्याची प्रेयसी यांच्यातील प्रेमभावनेतील भरतीओहोटी येत राहते. मुंबईत तत्कालीन जीवनाचे जिवंत वाटावे असे वर्णन, रहस्याची उकल पाहणाऱ्या माणसाचे संदिग्धतेने हालचाली करणे ह्या साऱ्या घटकांबरोबर, गोवालिया टँक-नळबाजार-बोरिवली अशा विविध भागांची रंजक वर्णने आहेत. बोरिवलीचा भाग त्यावेळी मुंबई शहराबाहेर आणि सेकंड होम असू शकेल असा होता हे वाचताना गंमत वाटते.
त्याचबरोबर हे जाणवते, की रहस्यकथा वेगवान असली पाहिजे हे तत्त्व नेरुरकर यांना मान्य असले तरी त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतले आहे आणि त्यामुळे सामाजिक कथानक वाचत असल्याचा भास कोठे कोठे होतो. एकोणिसाव्या प्रकरणात, त्यांनी मुंबईला अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्याची बायको जेव्हा कोकणात भेटीवर जात असे तेव्हा तिची आर्थिक परिस्थिती लपवून ती कशी आव आणत असे याचे वर्णन सविस्तर केले आहे. ते वर्णन केल्यानंतर, ‘माझी कस्तुर तसल्या मुलींसारखी नव्हती‘ असे विधान येते. त्यांनी चाकरमान्यांचे हे वर्णन एका कवितेतसुद्धा केले आहे. त्यांच्यावरील लेखात असा मजकूर आहे – ‘त्यांच्या मालवणी बोलीतील पाच कविता उपलब्ध आहेत . ‘चेडवाक निरोप’ ही त्यांपैकी एक कविता. ती कविता अशी –
चल चेडवा / पडवांतसून आगबोटीर जपान
शिमिटाच्या चाळीत / घोव तुतो ऱ्हवता
हडापलो दिसभर खपान
गिरनीतली चाकरी / हाटेलातला खाना
उरताला कसला घोपान?
मेळयता आडको, सायबाचो लाडको
संबाळुक बायलच गुपान
मायेचा मानुस, होयां घालुक संवरुक
नायतर तो जायत गो सुकान
आखरेकुन धर त्यांका / तिनसांच्या येळाक
दारयेचा वगीत दुकान
बरी तर बरी / म्हुमयची चाकरी
घालयतत किती गो फुकान ———-
( कविता आणखी काही ओळी आहे. येथे ती एवढीच दिली आहे ते नेरुरकर यांना तो मुद्दा प्रिय होता हे सांगण्यापुरती)
याच नेरुरकर यांनी ‘अकबराचे वेदसाधन’ नावाची आणखी एक कादंबरी लिहिली आहे. ती 1920 साली प्रकाशित झाली होती. त्यात अकबराच्या दिने-इ-लाही धर्माच्या स्थापनेच्या प्रयत्नांचा भाग असलेल्या धर्मसभा आणि त्यात सहभागी होणाऱ्यांच्या रहस्यमय कारवाया प्रामुख्याने येतात. त्यावरून त्यांचा कल त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात रहस्यप्रधान वाङ्मय लिहिण्याकडे असावा असे वाटते.
नेरुरकर यांची रहस्यमय कादंबरी एकदा वाचावी अशी निश्चित आहे, त्याबरोबरच ती नेरुरकरांचे इतर साहित्य वाचण्यासाठी औत्सुक्य वाटण्यास लावणारीही आहे!
ही कादंबरी तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
टेलिग्राम |
व्हॉट्सअॅप |
फेसबुक |
ट्विटर |
– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्यांना प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लोज्ड सर्किट’, ‘शब्दसुरांच्या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ’महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
——————————————————————————————————————————————————————————————————————
एक काळ असा होता की आम्ही बाबूराव अर्नाकळांच्या रहस्यमय पुस्तकात इतके गढून जायचो की अभ्यासाची पुस्तके बाजूला सारून अगोदर ती पुस्तके वाचायचो . विशिष्ट प्रकारच्या वाचनाचेही एक विशिष्ट वय असते . वाचनाची आवड ,निवड वयानुसार आणि समजदारीनुसार बदलत जाते .वझे साहेबांकडे जुन्या माहीतीचा खजीना आहे.तो खजीना ते इतरांसाठी खुला करतात ही आनंदाची गोष्ट आहे.चांगला लेख वाचायला मिळाला.धन्यवाद.
ह्या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या निघाल्या आहेत का? कुठे मिळू शकतात? वाचायला आवडतील
लेखाखाली पुस्तकाची लिंक दिली आहे. तुम्ही पुस्तक ऑनलाईन वाचू शकता किंवा डाउनलोडही करू शकता.
नवीनच माहिती मिळाली.
दातार यांची कालिकादेवी (बहुतेक हेच नाव ) इतकि अप्रतिम कि वर्णन करायला शब्द नाहित.