गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली. त्यामुळे गुरवांचा समावेश बलुतेदार म्हणून होऊन गेला.
गुरव हा शब्द मराठीत कन्नड गोरव या शब्दापासून आला असावा. तुंगभद्रेच्या तीरावरील रामेश्वर मंदिराच्या गोरव पुजाऱ्यास भूमी इनाम दिल्याची माहिती इसवी सन 804 सालच्या कन्नड शिलालेखातून कळते. गोरव शब्द कन्नडमध्ये मूळ तमिळ ‘गुरुवन’ या शब्दावरून आला. पुढे, त्यावरून गुरव शब्द मराठीत आल्याचे अनुमान आहे. ‘गुरुवन’चा अर्थ उपाध्याय. उपाध्याय म्हणजे पुरोहित, गुरू, शिक्षक, आचार्य, कुलोपाध्याय, पुजारी, उपदेशाचा अधिकारी इत्यादी. महाराष्ट्रातील गुरव समाजात प्रचलित असणारी उपाध्ये, आचार्य, पंडे, पंडित, पुजारी, शास्त्री, राजगुरू, राजगुरव, स्वामी, भगवान, श्रीवत् ही आडनावे गुरुवन या मूळ शब्दाच्या अर्थच्छटा स्पष्ट करणारी आहेत. गुरुवनचा तपस्वी हाही एक पर्यायी अर्थ विचारात घेता गुजरातमधील शिवमंदिरातील ‘तपोधन’पुजारी हेही मूळचे गुरव असावेत.
गुरव ही लय, ताल, सौंदर्य यांची जाण असणारी, शिवदैवताची पूजा करणारी मूलत: निसर्गपूजक जात. रूद्र देवतेचे प्रखर रूप ब्राह्मण पुरोहितांनी सांभाळले, परंतु भारतीय संदर्भात शिवदैवताची प्रतिमा तयार झाल्यावर त्याच्या नित्य पूजेचे काम गुरवांकडे आले असा एक समज आहे. गुरव करत असलेल्या पूजेत यज्ञयाग, हवन, मंत्रतंत्र यांचा भर असतो; मात्र अवडंबर नसते. त्यांची पूजापद्धत सरळ साधी राहिली. पूजेत विविध सुगंधी फुले, गंध, धूप, दीप, पत्री यांचा समावेश राहिला. शेतकऱ्यांकडून गुरव पुजाऱ्याला शेतीच्या उत्पन्नातील धान्याचा वाटा (बलुते) उपजीविकेसाठी मिळू लागला. गुरवकीच्या व्यवसायाचा भाग म्हणून बेल घालणे, द्रोण–पत्रावळी लावणे, वाद्यवादन करणे या परंपरा त्यांच्यात आहेत. पुजारीपण हा व्यवसाय असणारा ‘गुरव’ हा जातिसमूह आहे. महादेवाची पूजा गुरवाने करायची. देवापुढील उत्पन्न गुरवानेच घ्यायचे हा अलिखित संकेत होता. गुरव हा शिवपरिवारातील मारुती, देवी, गणपती, खंडोबा, भैरोबा यांचाही पुजारी होता. पण तो संकेत डावलला जाण्याची चिन्हे दिसू लागली.
गुरव हे तिसऱ्या श्रेणीचे बलुतेदार गणले जातात. शेतकऱ्याकडून त्यांना पुजारीपणाच्या सेवेबद्दल मिळणाऱ्या धान्याच्या वाट्यात (बलुत्यात) उत्तरोत्तर घट होत गेली. त्याबद्दल ग्रामसभेत न्याय मिळणे अशक्य झाले. त्यांचे अर्थार्जन घटत गेले. पैसा दिसेना. निर्वाह कठीण झाला. आर्थिक दारिद्र्याने जिणे मुश्किल झाले. त्यामुळे भूमिहीन; तसेच, तुटपुंजी जिरायत इनाम जमीन असलेल्या गुरव कुटुंबांचे बलुतेदारीच्या उत्पन्नावर स्वातंत्र्यानंतर भागेना, म्हणून ते मोठ्या संख्येने पोटापाण्यासाठी शहरांकडे वळले. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतून राहणारी ऐंशी टक्के गुरव कुटुंबे गुरव/पुजारी या परंपरागत व्यवसायातून बाहेर पडलेली दिसतील.
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देशमुख समितीने (1967) ‘ओबीसीं’साठी आरक्षण दिले. भारतीय शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला साहाय्यभूत ठरणारे घटक, बलुतेदार, कारागीर जाती, सेवा देणाऱ्या जाती यांचा त्या प्रवर्गात समावेश होतो. गुरव हे बलुतेदार असल्याने ते ओबीसींसाठी असलेल्या आरक्षण सवलतीस पात्र ठरले आहेत.
गुरव जातीची लोकसंख्या नेमकी किती?गुरव समाजाच्या मागण्यांचे निवेदन अखिल महाराष्ट्र गुरव समाज संस्था (पुणे) यांनी भारताचे राष्ट्रपती वेंकटरमण यांना 20 फेब्रुवारी 1990 रोजी सादर केले. त्यात गुरवांची संख्या तेहतीस लाख असल्याचे म्हटले आहे. ‘उपेक्षित गुरव समाज’ या लेखात शमा वाघमारे (संपादक ‘गुरव दर्पण’) यांनी ती संख्या जवळ जवळ दहा ते पंधरा लाख असावी असे म्हटले आहे. ‘महाजातीत गुरव’ या लेखात (‘चित्रलेखा’,17 एप्रिल 2000 ) महाराष्ट्रातील गुरव समाजाची लोकसंख्या आठ ते दहा लाखांच्या घरात आहे असे म्हटले आहे.
गुरवांच्या उत्पत्तीसंबंधी उल्लेख शिवपुराणात आहे. मध्ययुगात कलावंतिणीचे नृत्तगुरू व मृदंगवादक असलेले गुरव पुढे शिव आणि शिवगण यांच्या मंदिराचे पुजारी झाले व त्या पुढील काळात गावगाड्यात बलुतेदार म्हणून गणले जाऊ लागले. गुरव जातीचा उल्लेख म्युझिशीयन म्हणजे वादक, वाजंत्री म्हणून मुंबई इलाख्याच्या नासिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर; तसेच विजापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या ब्रिटिशकालीन गॅझेटियर्समध्ये आला आहे. गुरवांची माहिती देताना, नासिक जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये (1883) ‘गुरव महादेवाची पूजा करतात, पखवाज-तबला वाजवतात; तसेच, नाच्या (डान्सिंग गर्ल) मुली आणि मुले यांना नृत्ताचे शिक्षण देऊन त्यात तयार करतात’असा तपशील ‘गावगाडा’(1915) ग्रंथात दिला आहे. गुरवांमध्ये लिंगायत, जैन, कोकणी, जुन्नरे, खतावणे, अहिर, गोव्यातील गुरव या पोटजाती आहेत.
गुरव जातीसंबंधी उल्लेख महाराष्ट्रात सापडतात. चनई येथील सोमेश्वराच्या देवालयावरील शिलालेखाच्या आधारे इसवी सन 1080 च्या पूर्वी दोन-तीनशे वर्षें अस्तित्वात असली पाहिजे. चनई हे गाव बीड-अंबेजोगाई मार्गावर अंबेजोगाईपासून अलिकडे तीन मैलांवर आहे. गाव अगदी लहान असून गावाच्या पूर्वेस कदंब वृक्षाच्या राईत भग्न देवालयांचे व शिल्पखंडांचे अवशेष इतस्तत: पडले आहेत. त्याच अवशेषांत एक पुष्करणी व दोन हेमाडपंती शिवालये आहेत, पण तीही भग्न व उद्ध्वस्त अवस्थेत असून त्यात अनेक फेरबदल झालेले आढळून येतात. त्या मंदिरांपैकी सोमनाथाचे म्हणून जे मंदिर ओळखले जाते त्या मंदिरावर शिलालेखाची शिळा दर्शनी भागास उजव्या बाजूस आडवी बसवली आहे. तो लेख एका तांबड्या लांबट शिलेवर खोल व मोठ्या अक्षरांत कोरलेला आहे. लेखाच्या एकूण पंधरा ओळी असून प्रत्येक ओळीत पाच, सहा किंवा क्वचित सात अक्षरे आहेत.
गुरवांचा लिखित उल्लेख यादव काळात पहिल्यांदा मिळतो. वीजभरडा शंकरभरडा हे गुरव पुजारी यांचे वंशज मल्हारजी कुलथोजी भांडवलकर हे राजाराम महाराजांच्या काळात सेना पंचसहस्री म्हणून होते. राणा, दरणा, भरडा ही विशेषणे गुरव पुजाऱ्यांचा नेमका बोध व्हावा म्हणून प्राचीन मराठीत वापरलेली आढळतात. तासगाव ताम्रपटात मांजर्डे गावच्या कलिदेवाची व्यवस्था पाहणारा, अन्नछत्राची व्यवस्था बघणारा देवस्थानचा स्वामी, प्रमुख, गुरव होता असे उल्लेख आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरासाठी देणगीदारांच्या यादीत बाईदेव गुरवाचे नाव आहे. यादव काळात गुरव सधन व कर्तबगार असावेत. नंतर मात्र ती परिस्थिती बदलली. गुरवाचे माणशी वार्षिक उत्पन्न अठ्ठावन्न रुपये, तर ब्राह्मणांचे माणशी वार्षिक उत्पन्न दोनशेपंचेचाळीस रुपये असल्याची नोंद ‘बदलापूर’ या ना.गो. चापेकर यांच्या ग्रंथात (1933) आहे.
मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा (1950) मुंबई राज्यात स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आला. त्याचा गुरव जातीला मोठा फटका बसला. ट्रस्ट कायद्याने गुरवांच्या हालाखीच्या स्थितीत आणखी भर घातली. त्यांच्या निर्वाहाचे साधन असलेल्या इनाम जमिनी छिनून घेतल्या गेल्या!सेवा मात्र परंपरेने बंधनकारक राहिल्या. ट्रस्ट कायद्यात देवस्थानच्या उत्पन्नाच्या विनियोगाचा विचार आहे. सेवेकऱ्यांनी देण्याच्या परंपरागत सेवांबाबतच्या हक्काचा, त्यासाठी त्यांना द्याव्या लागणाऱ्या सेवामूल्याचा त्यात विचार नाही. जमीन थोडी. तशा परिस्थितीत त्यांनी ती जमीन (इनाम जमिनी) लगतच्या शेतकऱ्यांना अर्धलीने लावली. पुढे, त्या त्या भागातील धरण-तलावाच्या पाटपाण्यामुळे त्या जमिनींना पाणी मिळू लागले. अर्धलदार शेतकरी त्या सोडीनात, ट्रस्ट नोंदणे सक्तीचे झाल्याने त्या जमिनी ट्रस्ट मिळकतीअंतर्गत जमा झाल्या.
त्या कायद्याच्या कक्षेत देवस्थाने – त्यांचे उत्पन्न, खर्च, व्यवस्था आली. त्यासाठी देवस्थानचा सार्वजनिक न्यास नोंदणे अनिवार्य ठरले. उद्देश देवस्थान उत्पन्नाचा हिशोब नीट राहवा, उत्पन्नाचा देवस्थान खर्चासाठी, देखभालीसाठी योग्य विनियोग व्हावा, त्याचे नियंत्रण धर्मादाय आयुक्त कार्यालय यंत्रणेद्वारे व्हावे असा होता. मात्र ट्रस्ट कायदा करताना देवस्थानचे जे सेवेकरी होते त्यांच्या सेवांबाबत, त्यांच्या निर्वाहाबाबत, त्यांना वंशपरंपरेने जे इनाम जमिनीच्या उत्पन्नाचे, निर्वाहाचे साधन म्हणून हक्काने दिले गेले होते त्याबाबत विचार झाला नाही. सेवेकरी मंडळी मागासवर्गीय होती. गुरव, भोपे, भगत, गोंधळी, घडशी, तेली, साळी, तांबोळी, मुलाणी ही मंडळी मुळात अल्पसंख्य, अल्पशिक्षित, निर्वाहाची तुटपंजी साधने असलेली; त्यांनी जी धार्मिक सेवा करायची त्यामुळे एका ठिकाणी अडकलेली, बांधलेली. जातीत उच्च शिक्षितांचे प्रमाण अल्प आहे. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून पैसा नाही, पैसा नाही म्हणून सत्ता-व्यापारधंदा नाही हे चक्र चालू राहिले आहे. अल्पशिक्षित, जोडीला दारिद्र्य, शेतीला लागणारे भांडवल नाही, पुरेशी अवजारे, बैलबारदाना बाळगण्यासाठी पैसा नाही. त्यांना त्यांचे म्हणणे शासन दरबारी मांडता आले नाही.
गुरव हे मुख्यत: शिवपूजक आहेत. गुरव म्हणून पुजारीपणाच्या व्यवसायावर आधारित असे जाती-वैशिष्ट्य कायम टिकून राहिले आहे. मात्र समाजगट म्हणून त्यांच्यात वेगवेगळेपणा बराच दाखवून दिला जातो. त्यामुळे त्यांच्यात शिव, शक्ती व शिवगणांची पूजा करणारे, त्या देवतांच्या मंदिरांतून पुजारीपण हा व्यवसाय करणारे असे विविध गट आहेत. त्यांची विभागणी त्याखेरीज प्रदेशानुसार झाडे, वऱ्हाडे, खानदेशी अहिर, नगरे, जुन्नरे, कोकणी अशी केली जाते, तर उपासना पद्धतीनुसार हिंदू, जैन, लिंगायत अशीही केली जाते. आहार, संस्कार, चालीरीती, प्रदेश यांमुळे पूर्वी गुरव जातीत आणखीही पोटभेद होते; त्यांच्यात एकसंधता कधीच नव्हती. तशी ती आजही नाही. आज ते भेद बरेच पुसट झाले आहेत. देवस्थानातील पुजारी गुरवांचा एक वर्ग, पुजारीपणाचा व्यवसाय न करणारा पण खेड्यात राहणाऱ्या गुरवांचा दुसरा वर्ग, नोकरी-चाकरीनिमित्त शहरात आलेल्या मध्यम आर्थिक स्थिती असलेल्या गुरवांचा तिसरा वर्ग आणि व्यवसाय, उद्योगधंदा व वेगवेगळ्या अधिकारस्थानी असलेल्या गुरवांचा चौथा वर्ग. या चारी वर्गांचा त्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाच्या, विवाहाच्या दृष्टीने जातीशी संबंध येतो. ते जातीच्या वधू-वर मेळाव्यात एकत्र दिसतात. जात हा त्या चारी वर्गांना जोडणारा लग्नवेळी समान धागा आहे.
ख्यातनाम पखवाज वादनकार नानासाहेब पानसे (इंदूर) यांचे गुरव जातीतील शंकरभय्या घोरपडकर, सखारामजी आगळे, शंकरराव अळकुटकर हे पखवाज वादन करणारे प्रसिद्ध शिष्य होत. सखारामजी आगळे यांचे शिष्य गोविंदराव बऱ्हाणपूरकर, भय्यासाहेब तथा माधवराव अळकुटकर (शंकरराव यांचे चिरंजीव) यांनी पखवाज वादनात खूप नाव मिळवले. वसंतराव घोरपडकर (शंकरभय्या यांचे चिरंजीव) आकाशवाणीवर पखवाज वादनाचे कार्यक्रम करतात.
गुरव समाजात गेल्या शतकभरात एक-दोन चळवळी घडून आल्या. त्या काळी ते कधी आक्रमकही बनले. गुरवांकडे जी देवस्थाने ठिकठिकाणी होती, त्यांच्या पूजेच्या उत्पन्नाचे जे हक्क त्यांच्याकडे होते, त्याबाबत गुरव हे ब्राह्मण नाहीत असा मुद्दा काढून, त्यांना पूजेचे अधिकार नाहीत असा वाद सुरू झाला. त्यातून गुरव जातीला व्यवसाय गुरवकीचा असला तरी ते मूळचे ब्राह्मण आहेत हे सिद्ध करण्याची निकड वाटू लागली. त्यातून शैव ब्राह्मण चळवळीने मूळ धरले. गुरवांचा ब्राह्मण्याचा आग्रह हा वृत्ती, पूजेचे अधिकार व वारसा हक्काप्रमाणे स्थावर मिळकत मिळावी या हेतूने होता. त्या उलट ब्राह्मण समुदाय गुरव हे ब्राह्मण नाहीत असे म्हणू लागला. गुरवांना ते ब्राह्मण नाहीत असे म्हटल्याने त्यांच्या परंपरागत हक्काला बाधा येऊ लागली व गुरव पेटून उठले.
नटश्रेष्ठ चिंतोपंत दिवेकर यांनी गुरव समाजातील पुढारी मंडळींस हाताशी धरून पुणे येथे नागेशराव बेंद्रे यांच्या माडीवर बैठक घेतली. चिंतोपंत दिवेकर हे आळंदीच्या वाघमारे गुरव मंडळींशी नात्याने संबंधित. बैठकीचे फलित ‘अखिल महाराष्ट्र देवलक गुरव शिक्षण फंड’ ही संस्था स्थापन करण्यात झाली (देवलक म्हणजे देवापुढे येणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करणारा देवाचा पुजारी). ती गुरव समाजाची आद्यसंस्था. त्या संस्थेचे रूपांतर ‘अखिल महाराष्ट्रीय शैव ब्राह्मण संस्था’ या नावाने 1912 साली करण्यात आले. आळंदी देवाची (जिल्हा पुणे) येथील गुरव- ब्राह्मण वाद कोर्टात चालू होता. त्यात कोर्टाने ‘गुरव हे ब्राह्मण आहेत’ असा निवाडा 1911 मध्ये दिला. मौजे बाळे (जि. सोलापूर) येथील गुरवांनी त्यांची जात ब्राह्मण लावावी असा अर्ज सोलापूर कलेक्टरांनीही 1911 सालच्या खानेसुमारीत केला. सोलापूर कलेक्टरांनी गुरवांची जात ब्राह्मण लावावी असा निर्णय दिला.
गुरव मंडळी शृंगेरीपीठाचे श्रीमत् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या विदर्भ भेटीत त्यांना भेटली. त्यांनी त्यांचे गुरव हे मूळचे ब्राह्मण आहेत याबद्दलचे म्हणणे शंकराचार्य यांच्यासमोर मांडले. शंकराचार्य यांनी त्यावर त्यांचा अभिप्राय ‘गुरव हे ब्राह्मण होत’ असा दिला. त्या भेटीसंबंधी ‘शैव समाचार’ शंकर गोपाळ गोरक्ष (निजाम स्टेट) ‘शैव ब्राह्मण समालोचन’या लेखात (जून 1940, पान दोन) लिहितात, की – ता. 15/10/1912 रोजी सायंकाळी धामणगाव (वऱ्हाड) मुक्कामी कै. आबासाहेब रामेकर पर्मनंट वे इन्स्पेक्टर यांच्या मुख्य जातीसंबंधीच्या प्रश्नावरून श्रीमत् जगद्गुरू शंकराचार्य (शृंगेरी) यांनी जो खुलासा केला तो असा – ‘मला फार आश्चर्य वाटते, की इकडील ब्राह्मण गुरवास शूद्राप्रमाणे लेखतात. वास्तविक ते आपस्तंभ शाखेचे ब्राह्मण असून त्यांना यजुर्वेद आहे. आमचेकडील प्रांतात त्यांना गुरुकुल अथवा शैव ब्राह्मण असे म्हणतात. त्यांची दहा घरे आहेत.’ गुरव हे ब्राह्मण आहेत हे सिद्ध झाल्यावर तशा तऱ्हेचे दावे पुढे आले नाहीत. त्यामुळे ‘अखिल महाराष्ट्रीय शैव ब्राह्मण संस्था’ हे नाव संस्थेला देणे शक्य झाले. दिवेकर यांनी पुढे, 1916 साली ‘किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी’ ही कंपनी सोडल्यावर सर्व मंडळींच्या साहाय्याने व मताने 1924 साली ‘शैव ब्राह्मण’ही संस्था स्थापन केली. नगरी (नागरी) गुरवांची शैव ब्राह्मण चळवळ गुरव जातीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात खूप गतिमान होती. ती मेळावे, अधिवेशने, चर्चा, परिषदा, जाती-वर्तमानपत्रे यांतून गाजत होती. ती चळवळ मुख्यत:पुणे, नगर, नासिक, सोलापूर, सातारा, निजामी मुलखातील मराठवाडा; तसेच, विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागांतील शैव गुरवांतील पुढारी मंडळींनी, त्यांच्या नातलगांनी चालवलेली दिसते. गुरव ब्राह्मण चळवळीचा एक वेगळाच परिणाम पुढे ओबीसी वगैरे जातविभाणीनंतर घडून आला. शैव ब्राह्मण चळवळ शिगेला पोचली असताना पुणे, नागपूर वा अन्य ठिकाणच्या ज्यांनी ज्यांनी त्यांची जात शैवब्राह्मण अशी नोंद केली, त्यांना- त्यांच्या मुलांना गुरव म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे अडचणीचे ठरत आहे.
|
मधुकर टांकसाळे |
गुरव समाजात जागृतीची लाट त्या चळवळीमुळे आली- गुरवांच्या प्रश्नांवर, अडचणींवर व्यापक चर्चा झाल्या, ठिकठिकाणी संस्था निघाल्या, शिखर संस्था स्थापन झाली. त्या चळवळीची निशाणी गुरव समाजाच्या ‘नूतन शैव ब्राह्मण संस्था, पुणे’ या नावात तेवढी शिल्लक राहिली आहे. तशीच चळवळ साताऱ्यातून (15 मार्च 1992 पासून) देवस्थान इनाम जमिनी मुक्तिसंघर्ष समितीची होती.
त्या चळवळीचा परिणाम गुरवांच्या पोटजातींवर झाल्याचे मात्र आढळले नाही. दुसरे ‘अखिल महाराष्ट्र गुरव शिक्षण सहाय्यक मंडळ’ नागपूर येथे 1932 साली तेथील तरुण आणि कर्तबगार लोकांनी स्थापन केले आणि सात वर्षांत सातशे-साडेसातशे रुपयांची मदत होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना दिली. जातिसंस्थांकडून तीन प्रकारची कामे अपेक्षित आहेत– शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक पुरस्कार देणे. यांपैकी आर्थिक साहाय्य देण्याचे कार्य गुरव ज्ञातिसंस्थेकडून कमीअधिक प्रमाणात 1912 सालापासून चालू आहे. शैक्षणिक पुरस्कार जाहीर समारंभाद्वारे देण्याची प्रथा 1984 पासून सुरू झाली आहे.
(संकलित)
(कै. मधुकर टांकसाळे यांच्या ‘पाऊलखुणा’ व ‘जागर’ या दोन पुस्तकांवरून)
—————————————————————————————————————————————————-
———————————————————————————————————
खूप छान माहिती. अनुराधा म्हात्रे. पुणे.
खूपच छान माहिती आहे श्री मधुकर टाकसाळे यांनी गुरव समाज ह्या वर केलेलं संशोधन हे उल्लेखनय आहे
आपण दिलेली माहिती अत्यंत मोलाची आहे.आपण दिलेल्या माहीतीबाबत प्रथम आपले आभारी आहोत.अशाच प्रकारे पुढील माहीती पुरविण्यात यावी अशी नंम्र विनंती.त्याच प्रमाणे कोकणातील गावरहाटी संदर्भात माहीती पुरविल्यास कोकणातील गावरहाटी व प्रथापरंपरा सुधारणेसाठी फायदा होऊ शकतो.धंन्यवाद
हा लेख गुरव समाजस आथिर्कदृष्ट्या,सामाजिक,उन्नतीसाठी यशाच्या शीखरा पर्यंत नेणारा जीवनाचा महामार्ग आहे.धन्यवाद.
Khup chan
Veru nice information Thanks.
शंकरराव गोपाळराव गोरक्ष.हे माझे पणजोबा होते. वत्यांच्या संग्रहात शंकराचार्यांनी गुर्वांचा शैवब्राम्हण असा उल्लेखमागे कधीतरी माझ्या वाचनात आला होता.