कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांनी संभाव्य औषधांच्या मानवावरील चाचण्यांना आरंभही केला आहे. सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीत मानवांवरील या औषधांच्या चाचण्यांबद्दल फारसे कोणी आक्षेप घेतलेले नाहीत. परंतु सहसा मानवांवरील चाचण्या तर वगळाच; त्याआधी संभाव्य औषधांचा प्रयोग प्राण्यांवर केला जातो, त्यालाही प्राणिमित्रांची हरकत असते. प्राणिमित्र संघटना त्या विरुद्ध आवाज गेली काही वर्षे उठवू लागल्या आहेत. तसेच, मानवांवरील व प्राण्यांवरील तो प्रयोग खर्चिकपण असतो. काही वेळा असे होते, की एखादे औषध एखाद्या व्यक्तीला बरोबर लागू पडते, पण त्या औषधाने दुसऱ्या माणसाला त्रास होऊ शकतो. कारण प्रत्येक माणसाच्या पेशी वेगवेगळ्या असतात. या अशा अडचणी औषधांच्या चाचणी प्रयोगांमध्ये वारंवार येत असतात, त्यावर उपाय म्हणून एक नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे –‘ऑर्गन ऑन चिप्स’. तसा प्रयोग करणारे जे मोजके संशोधक जगभर आहेत, त्यात एक आहेत डॉ.प्राजक्ता दांडेकर-जैन. प्राजक्ता यांचे पती डॉ.रत्नेश जैन हेदेखील त्याच क्षेत्रात संशोधन कार्य करतात. ते दाम्पत्य असिस्टंट प्रोफेसर म्हणून मुंबईच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’मध्ये कार्यरत आहे.
डॉ. प्राजक्ता दांडेकर-जैन आणि डॉ. रत्नेश जैन त्यांच्या प्रयोगशाळेत |
प्राजक्ता दांडेकर-जैन यांना संशोधनाची गोडी लागली ती त्यांच्या प्रोफेसर वंदना पत्रावळे यांच्या प्रयोगशाळेत. त्यांनी ‘इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’मधून बी.फार्म. पदवी घेतल्यानंतर पत्रावळे यांच्या प्रयोगशाळेत काम सुरु केले. त्यांना तेथे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांना संशोधनाची गोडी निर्माण झाली. पुढे, त्या त्यांचे पती डॉ.रत्नेश जैन यांच्या समवेत पोस्ट डॉक्टरेटचे शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला गेल्या. त्यावेळेस रत्नेश यांना Humboldt आणि प्राजक्ता यांना Marie Curie या मानाच्या फेलोशिप मिळाल्या. त्या दोघांनी पुढील कामासाठी शैक्षणिक क्षेत्र निवडले. त्यांचे घर आणि प्रयोगशाळा ‘इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’च्या आवारातच आहे. त्यांचा वेळ हा घरापेक्षा प्रयोगशाळेत जास्त जातो. त्यांच्या छोट्या मुलीची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या आईवडिलांची मदत होते, याचा प्राजक्ता आवर्जून उल्लेख करतात. तसेच, त्या रत्नेश जैन यांच्यासारखा सहचर लाभल्याचा आनंदही व्यक्त करतात. प्राजक्ता या चाळीस वर्षांच्या आहेत. त्यांची दोन पुस्तके, सात लेख आणि सेहेचाळीस पेपर प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या नावावर सहा पेटंट्स आहेत. त्यांना देशी आणि आंतरदेशीय सहा पारितोषिकांनी सन्मानित केले गेले आहे. दांडेकर-जैन पती-पत्नी यांच्या हाताखाली पस्तीस विद्यार्थी डॉक्टरेट आणि M. Tech. करत आहेत. प्राजक्ता यांचा स्वभाव विनम्र आहे. त्यांना त्यांची कामगिरी विशेष वाटत नाही. मात्र त्यांना असे वाटते, की या क्षेत्रात मुलांचे प्रमाण जास्त आहे, तर मुलींनीसुद्धा या क्षेत्रात प्रवेश घ्यावा. प्राजक्ता दांडेकर-जैन यांची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे टी.बी.ची वाढ ज्या प्रोटीनमुळे होते त्या प्रोटीनची वाढ रोखण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्याचबरोबर त्या भविष्यवेध असा सांगतात, की जशी कस्टमाइज्ड टूर ठरवतात तसेच, कस्टमाइज्ड औषध तयार करण्यासाठी प्रयोग सुरु आहेत. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आजारासाठी आजाराच्या गरजेनुसार खास बनवलेले औषध.
डॉ.प्राजक्ता दांडेकर-जैन pd.jain@ictmumbai.edu.in
——————————————————————————————————————