ते ‘पुल’कित दिवस (P.L.Deshpande With Aachre Villagers)

0
83

 

आचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरेही विद्याधर करंदीकर यांच्या कवितेतील ओळ खऱ्या अर्थाने आचरे गावात साकार झाली. ते दिवस आम्हा समस्त आचरेवासीयांसाठी स्वर्गीयच!

          त्याचे असे झाले, एके दिवशी आचरे गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध तबलापटू वसंतराव आचरेकर यांचे, रामेश्वर देवस्थानचे तत्कालीन ट्रस्टी बाळासाहेब गुरव यांना पत्र आले. या वर्षी रामेश्वर मंदिराचात्रिशतसांवत्सरिक महोत्सवयेत आहे. आपण रामनवमी उत्सवात गायन, वादन, कला, साहित्य यांचे छोटेखानी संमेलनच भरवू, मी, पु.ल.देशपांडे, कुमार गंधर्व, सुनीताबाई आणि माझ्या साठ-सत्तर स्नेह्यांना घेऊन येत आहे. तयारीला लागावेत्या पत्रातील प्रत्येक अक्षराने अण्णा गुरव यांच्यासोबत अख्खे आचरे गाव आनंदून गेले! माझ्या वडील बंधूंनी, दादा ठाकूर यांनी, ही बातमी घरी सांगितल्यावर आम्हीही मंत्रून गेलो. पु.ल.देशपांडे आचरे गावी येणार आणि चक्क आठ दिवस मुक्कामाला राहाणारही सुवार्ता रानारानात गेली बाई शीळकरत गावातील, घराघरात पोचली. पुलं’, सुनीताबाईंसोबत मध्येमध्ये धामापूरला येऊन जायचे. पण आचरे गावी आणि आठ दिवस पुलंपरिवाराचा मुक्काम हा सर्वांसाठीच महाप्रसादहोता. वसंतराव आचरेकरांनी त्यांचे मुंबईनिवासी मित्र, तसेच उद्योगपती तात्यासाहेब मुसळे आणि भार्गवराम पांगे (मुंबई मराठी साहित्य संघ) यांच्या सहकाऱ्याने तो कार्यक्रम ठरवला होता आणि दिग्गज माणसे येणार होती ती केवळ वसंतराव आचरेकर यांच्या मैत्रीखातर!

          आणि ज्या सोनियाच्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. रामनवमी उत्सव चालू असतानाच कोल्हापूर मार्गे व्हाया कणकवली, रामगड, श्रावण करत धुळीचे रस्ते अक्षरश: तुडवत तुडवत तीन-चार जीपगाड्या, दोन मॅटॅडोर, अम्बेसॅडर, फियाट आदी वाहनांनी पु.ल.देशपांडे आणि त्यांचा गोतावळा आचरे येथे डेरेदाखल झाला. दादा ते आले ना? मी त्यांना प्रथम पाहिलेअशी रुक्मिणीसारखी अवस्था प्रत्येक आचरेवासीयांच्या तनाची आणि मनाची झाली! एक एक नक्षत्र पायउतार होत होते. आपल्या गावी त्या काळी नसलेल्या कोणत्याही भौतिक सुविधांनी ओशाळूनन जाता स्वत: वसंतराव आचरेकर खांद्यावरील हातरुमाल सावरत सर्वांना उतरवून घेत होते. येवा, आचरा आपला आसा.हे सारे त्या आदरतिथ्यात जाणवत होते. त्यात  होते पु.ल.देशपांडे, सुनीता देशपांडे, कुमार गंधर्व, वसुंधरा कोमकली, मालिनी राजूरकर, गोविंदराव पटवर्धन, नारायण पंडित, अतुल व्यास, रत्नाकर व्यास, मुंबई विद्यापीठाचे त्यावेळचे संगीत विभागाचे प्रमुख अशोकजी रानडे, थोर साहित्यिक अरविंद मंगळूरकर, शरदचंद्र चिरमुले, बंडूभैया चौगुले, राम पुजारी, इंदूरचे नटवर्य बाबा डीके, इंदोरचे पत्रकार राहुल देव, बारपुते, थोर चित्रकार एम.आर.आचरेकर, चिंचाळकर गुरुजी आदी साठ-सत्तर मंडळी अक्षरश: आचरे गावी अवतीर्ण होत होती आणि आचरे गावचे नभांगण ताऱ्यांनी भरुन जात होते. दुपारची वेळ, रामेश्वर सभामंडपातील महिरपी, कनातीही जणू गाऊ लागल्या होत्या. वाळ्याचे पडदे वातावरण गंधित करत होते. सभामंडपातील हंडी-झुंबरात दुपारचे सूर्यकिरण लोलकासारखे भासत होते. दरबारात रामेश्वर संस्थानचे त्यावेळचे वयोवृद्ध ख्याल गायक साळुंकेबुवागात होते. त्यांचा पूरिया धनश्रीऐन बहरात आला होता. तबल्यावर होते रामेश्वर संस्थानचे तबलावादक केसरीनाथ आचरेकर आणि हार्मोनियमवर पवार; आणि त्याच धूपदीप वातावरणातपुरिया धनश्रीच्या पार्श्वसंगीतावर आचरे गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णा फोंडकेकाका, पु.ल.देशपांडे यांच्या हाती मानाचा नारळ देऊन त्यांचे चक्क हात आपल्या हाती घेऊन, जसा जावयाला लग्नाच्या माळेला घेऊन यावा तसे, ‘पुलंना रामेश्वराच्या सभामंडपात आणत होते. पुलंच्या मागाहून महाराष्ट्राचा साहित्य, संगीत, चित्र, शिल्पकलेचा अक्षरश: शाही सरंजामपायी चालत येत होता. त्या माजघरातील शाही स्वागताने भाईंचेडोळे पाणावून गेल्याचे आम्ही अगदी जवळून पाहिले.

          त्या वेळी रामेश्वर मंदिराच्या परिसरात कोणत्याही अत्याधुनिक सोडाच, पण अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. पु.ल.देशपांडे आपल्या घरी राहतील का? सुनीताबाई अॅडजेस्ट करून घेतील का,’ या विचारांनी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब तथा अण्णा थोडे धास्तावलेच होते. त्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे अक्षरशः त्यांचा शेजारचा मांगर. तो त्यांनी झापाने शाकारून सजवला होता. जमीन शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या होत्या. वसंतराव आचरेकरांनी कोल्हापूरहून गाद्या, उशा, खुर्च्या आणल्या होत्या. सर्व तऱ्हेच्या आठ दिवसाला लागणाऱ्या भाज्या आणि सोबत यल्लप्पा आचारीदेखील कोल्हापूरहूनच आणला होता.
          वास्तूला शोभा त्यांच्या स्थापत्यरचनेपेक्षा, ‘त्यात कोणाचे वास्तव्य,’ यावरच खरी अवलंबून! पुलं’, सुनीताबाई, कुमार गंधर्व, एम.आर.आचरेकर आदी रत्नजडीत साठ-सत्तर जवाहीर त्या मांगरवजा कुटीतराहायला आले आणि त्या पर्णकुटीचा क्षणार्धात कसा राजमहलझाला तो आम्ही याची डोळा पाहिला. अण्णा गुरवांची काकी (थोरली काकी), अरुणा वहिनी (अण्णांच्या पत्नी), अख्खं गुरव कुटुंबच त्यांच्या तैनातीला होते. सुनीताबाई, वसुंधरा कोमकली गुरवांच्या घरच्या सुनाच झाल्या होत्या. पुलंची दंगामस्ती बघायला आम्ही आमचाही तळ आमच्या घराकडून गुरवांच्या घरी हलवला होता. एकदा काही पत्रकारांनीसुनीताबाईंनागुरवांच्या घरी तांदूळ निवडताना पाहून प्रश्न केला. तुम्ही तांदूळ निवडता?’ त्या वेळी सुनीताबाई म्हणाल्या, ‘हो, आम्ही जेवतोसुद्धा!आणि कुमारांपासून गोविंदराव पटवर्धनांपर्यंत सर्व हास्यकल्लोळात बुडाले!
          अगदी लहान मूल आजोळी जशी दंगामस्ती करते तसेपुलंत्यांचे वय विसरून वागायचे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर अरे वसंता, काल मी पु.ल.देशपांडे होतो रे! आज मी पु.ल.आचरेकर झालो.दुपारी, संध्याकाळी रामेश्वर मंडपात कुमारांच्या मैफिली रंगायच्या. प्रारंभी मालिनी राजूरकर, वसुंधरा कोमकली, नारायण पंडित यांचे गायन व्हायचे. नंतर सतारवादन, संतूरवादन; त्यानंतर कुमारजी अवतीर्ण व्हायचे!
          भार्गवराम तथा दादा पांगे ध्वनी संयोजनाची जबाबदारी घ्यायचे. तबल्यावर वसंतराव आचरेकर तर कधी त्यांचे चिरंजीव सुरेश आचरेकर, हार्मोनिअमवर गोविंदराव पटवर्धन, तानपुऱ्यावर वसुंधरा कोमकली आणि निवेदनाची जबाबदारी स्वत: पु.ल. देशपांडे यांनी घेतलेली आणि रंगत म्हणजे त्या कार्यक्रमाची जिवंत चित्रे पांढऱ्या शुभ्र ड्रॉइंग पेपरवर स्वत: एम.आर.आचरेकर चितारत असत. कुमारांची तानते लीलया पेन्सिलने त्या ड्राईंग पेपरवर उतरवत. सुरुवातीला त्या रेषा अगदी शेवयासारख्या वाटत. पण क्षणार्धात गवयाच्या बैठकीचा आकारकसा घेत ही जादू, एम.आर.आचरेकर या प्रचंड व्यक्तित्वाच्या, महान कलाकाराच्या, अगदी कुशीत राहून बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
          कुमारांच्यारागदारीगायनानंतर पुलंचे निवेदन, त्यानंतर कुमारजींची निर्गुण भजनेसुरू व्हायची. इंदूर, देवासच्या कलाकारांसोबत आचरेवासीय कलावंतांनाही ती भजने डोलवत ठेवायची! एके दिवशी तर बहारच आली. दुपारी मालिनी राजूरकरांपासून कुमार गंधर्वापर्यंत सर्वांनी वसंत, भीमपलासी, तोंडी, गुजरी-तोडी, मुलतानी-तोडी आदी रागदारीगायकीने चैत्रातील त्या दुपारला मोगऱ्याचा गंध दिला. खऱ्या अर्थाने वसंतोत्सव रंगला! आणि त्याच सायंकाळी पुलंचा एक आगळा पैलू आम्ही पाहिला! हार्मोनिअमची स्वर्गीय जुगलबंदी! पुलंसोबत तेवढ्याच तोलामोलाचे संवादिनीचे बादशहा होते, गोविंदराव पटवर्धन! तबल्यावर सुरेश आचरेकर आणि जुगलबंदीसाठी उभयतांनी नाट्यसंगीत निवडले होते, ‘स्वकुल तारक सुता.जुगलबंदी जवळजवळ दीड तास चालली होती. उभयतांची बोटे सुरांवरून लीलया फिरत होती आणि स्वरांचे महालसभामंडपात आकारत होते. त्या काळी आम्हा कोणाजवळच टेपरेकॉर्डरसारखे साधे उपकरणही उपलब्ध नव्हते. तो स्वर्गीय ठेवा अजूनपर्यंत फक्त आम्ही कानात आणि मनात जपून ठेवला आहे, अगदी अत्तराच्या फायासारखा! चिरंतन! आणि चिरंजीव!
          पुलंचे आदर्श जीवनाचे गुपित साऱ्या मराठी मनाला ज्ञात आहे. पुलंसांगत आयुष्यात मला भावलेले एक गूज सांगतो, ‘उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या! पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा! पण एवढ्यावरच थांबू नका! साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेची मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल…’ ‘पुलंचे हे सुवचन साऱ्या मराठी मनाने, शब्दश: आत्मसात केले असेल; पण आम्ही आचरेवासीयांनी पु.ल.देशपांडे यांच्या त्या सुखद सहवासातूनच त्या वचनाचा गंध घेतला! त्या वेळी रंगांतून, स्वरांतून, शब्दांतून, चित्रांतून, तालांतून, अवघ्या भारत वर्षाला भरभरून देणारे कलावंत दाते’, ‘पुलंआपल्यासोबत घेऊन आले होते. रंगातून देणाऱ्यात होते एम.आर.आचरेकर, चिंचाळकर गुरुजी (चिंचाळकर गुरुजींचे नेपथ्य एवढे दर्जेदार असायचे, की एका काँग्रेस महाअधिवेशनाचे प्रवेशद्वार नुसत्या साध्या झाडू व खराट्यांनी त्यांनी सजवले व ते पाहूनच भारताचे पहिले लाडके पंतप्रधान पंडित नेहरू प्रवेशद्वारापाशीच थांबले आणि त्यांनी गुरुजींचे कसे कौतुक केले हे पुलंनीच आम्हाला सांगितले, असे हे चिंचाळकर गुरुजी!) अनेक कलावंतांनी कलेशी केलेली मैत्री आणि जीवनाला आणलेली एक सोनेरी महिरप आम्ही अगदी जवळून पाहिली. त्याचा एक वेगळा संस्कार आमच्या मनावर झाला. पु.ल.देशपांडे यांनी सांगितलेले ते गूजप्रत्यक्ष कृतीतून आम्हाला बरेच काही सांगून गेले.

         

अतिशय हजरजबाबी, खोडकर, खेळकर, अवखळ पुलंची बालरूपे आम्ही अण्णा गुरवांच्या मांगरात पहात होतो. तेवढीच त्यांची शब्दशिल्पे कशी आकार घेतात, ही रामेश्वर सभामंडपात दुपार व सायंकाळच्या वेळी होणाऱ्या, कुमारजी व इतर गायकांच्या मैफिलीच्या निवेदनाच्या वेळी अनुभवत होतो. अण्णा गुरवांच्या मांगरातील गप्पांच्या मैफिली आणि सभामंडपातील ख्याल गायनाच्या मैफिलीतेवढ्याच दर्जेदारपणे रंगत जायच्या! काय बघू आणि काय नको असे होऊन जायचे. साहित्य, विनोद, नाटक, चित्रपट, संगीत, वक्तृत्व आदी अनेक क्षेत्रात एकाचवेळी संचार करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे सामान्यरूप आम्ही जवळून पाहिले. पुलं – एक प्रवासव्हाया अण्णा गुरव मांगर ते रामेश्वर सभामंडप!

          त्या वेळी आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला तसे काही नियोजन असे नसायचे. आलेपुलं’, कुमारजींच्या मना, तेथे कोणाचे चालेनाअशाच स्वरूपाचा तो कार्यक्रम होता. त्यामुळे रामेश्वर मंदिर व अण्णांचा मांगर सोडून कोठे जाऊ नये असे वाटे. मुंबई साहित्य संघाचे सर्वेसर्वा आणि आचरे गावचे सुपुत्र भार्गवराम पांगे, तथा दादा पांगे कार्यक्रमाचे संयोजक होते. सहा फूट उंचीचे, धोतर नेसलेले, डोक्यावर जाड भिंगाचा चष्मा, धारदार नाक, शोधक व कलात्मक नजर, ओठांना लाली देणारा किंचित पानांचा रंग असे दादा पांगे आधीच देहयष्टीने आणि व्यक्तिमत्त्वाने उंच असल्याने सर्व कलावंतांच्या तारांगणात उठून दिसत. तेच कार्यक्रमाची विविधता मध्येच सांगत.
          एकदा दादा पांगे यांनी सांगितले, ‘संध्याकाळी रामेश्वर मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळा होणार!त्या निवेदनाने आम्ही चक्रावलोच. कारण आमच्या गावात होणारापुस्तक प्रकाशनाचातो पहिलावहिला सोहळा! अधिक चौकशीअंती समजले. आचरे गावचे सुपुत्र, मुंबईनिवासी, भारतीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि चिंतक, गंगाधर आचरेकर यांनी लिहिलेल्या भारतीय संगीतया भारतीय संगीतावर मराठीत पहिल्यांदा प्रकाशित होत असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन सर्वश्री पु.ल.देशपांडे यांच्या शुभहस्ते होणार होते आणि चक्क आमच्या आचरे गावात!
          संध्याकाळी इंदोर, देवास, मुंबईच्या रसिकजनांसोबत, ‘आचरेकर समस्त श्रोतेसभामंडपात जमले. गंगाधर आचरेकरांचे छोटेखानी प्रास्ताविक झाले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात साहित्य आणि संगीत यांचा खरा पूल, या पुलंनी जोडला आहे, म्हणून माझ्याच जन्मगावी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पु.ल.देशपांडे यांच्या उपस्थितीत होत आहे.आणि त्यानंतर पुलंबोलू लागले, ‘गेले चार दिवस वसंता मला आचऱ्याचासुंदर निसर्ग दाखवत आहे. माडाची बने आणि देवाचा हिरवागार मळा (त्या वेळी आचऱ्याच्या देवाच्या मळ्यात वायंगणी शेती पिकवली जायची) या सुंदर निसर्गसंपन्न वातावरणात आचरे गावी संगीताची, कलेचीच पिकं येणार! वसंतराव, भार्गवराम आचरेकर. भार्गवराम पांगे, एम. आर. जी., गंगाधर आचरेकर ही याच निसर्गाची मोठी देन आहे.पु.लं.च्या त्या कौतुकाने आमच्या अंगावर क्षणभर हिरवे रोमांच उभे राहिले.
          पुलंपुढे म्हणाले, ‘भारतीय संगीताचे पुढे काय होणार आहे,’ हे हिऱ्याचे पुढे काय होणार आहे,’ असे विचारण्यासारखे आहे. हा हिराच आहे. त्यावर प्रकाश पडला, की तो लखलखणारच. तुम्ही नको म्हटले तरी! गंगाधार आचरेकरांचा हा ग्रंथराजभारतीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक असाच राहील!’ ‘पुलंबोलत होते. आम्ही कान देऊन ऐकत होतो. भारतीय संगीतावर नंतर त्यांचे तासभर अभ्यासपूर्ण भाषण झाले. आमचे कान तृप्त झाले, आमच्या गावी हे आम्ही प्रथमच ऐकत होतो.
          एका सायंकाळी देवाचे अस्तित्व मान्य करता काया विषयावर मजेशीर परिसंवाद झाला. पु.ल.देशपांडे आपला किल्ला एकांगी लढवत होते; पण त्या परिसंवादात राम पुजारी, बाबा डिके, शरदचंद्र चिरमुले, अरविंद मंगळूरकर आदींनी पुलंच्या मुद्द्याचा चांगलाच परामर्श घेतला होता. पण आमच्या लक्षात राहिले ते पुलंचे मुद्देच अधिक! त्यांनी सर्वांना चिमटे आणि गुद्दे देऊन अक्षरश: हैराण केले.
          एकदा दुपारीच लहर आली म्हणून सगळे सवंगडी झोपी गेले असतानाच पु.ल. देशपांडे रामेश्वर मंदिरानजीक असलेल्या वाचन मंदिरात येऊन टपकले. पुलंना काही वेळ अशी गंमत करण्याची लहर यायची. त्या वेळी वाचनालयाचे ग्रंथपाल म्हणून सत्तर वर्षाचे वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक काका दळवी काम करत. वाचनालयाचे काम अगदी निष्ठेने व काटेकोरपणे करायचे. त्यांनी काही पुलंना ओळखले नाही. (ओळख असून दाखवलीही नसेल. कारण ग्रंथपाल काका दळवी हे एक आचऱ्याचे अजब रसायन! माझा पहिला लेख त्यांच्यावर आहे. ग्रंथपाल हेच गुरू! तेच हे काका दळवी!) त्यांची नजर थोडी अधू होती. पण वृत्ती करारी होती. त्यांच्यात आणि पु.ल.देशपांडे यांच्यात वाचनालयात झालेला, बाळासाहेब गुरव यांनी कथन केलेला, संवाद जसाच्या तसा आमच्या लक्षात आहे. तो आम्हाला मागाहून कळलेला.
          पु. ल. देशपांडे –काय हो, मी केव्हाची पुस्तकासाठी वाट बघतोय आहात कुठे?’
         काका दळवी –आत्ता घड्याळात तीन वाजले. वाचनालयात यायची वेळ तीनचीच आहे. तीनलाच उघडणार!
          पु. ल. देशपांडे –मला पु.ल.देशपांडे यांची असतील तेवढी पुस्तके हवी आहेत.
        काका दळवी –मिळणार नाहीत! एकच मिळेल. तेही डिपॉझिट भरून. अण्णा गुरवांकडे उतरला असाल तर त्यांची चिठ्ठी आणा. अगर अण्णांना घेऊन या. त्यांनी केलेले नियम मी मोडणार नाही. समजले?’
          पुलंत्वरित अण्णांच्या मांगरात आले. त्यांनी ही गंमत रामेश्वर वाचनालयाचे सेक्रेटरी अण्णा गुरव यांना सांगितली व त्यांनाच ते पालक म्हणून घेऊन पुन्हा वाचनालयात आले. अण्णा, काका दळवींना म्हणाले – काका, हे पु.ल.देशपांडे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व ओळखले नाहीत?’ तेव्हा काका म्हणाले, ‘मी नाही ओळखले, मी तर त्यांना पहिल्यांदाच पाहतो. अहो देशपांडे, नमस्कार! तुमची पुस्तके आम्हाला दैवतासमान! ती प्राणापलीकडे या खेड्यात आम्ही जपतो. डिपॉझिट घेतल्याशिवाय कोणालाच वाचायला देत नाही. तुम्हाला मी बोललो असेन तर माफ करा! आज पुंडलिका भेटी परब्रह्म आलेहो! नाही तर तुमची पुस्तके हेच आमचेपुलंकाका दळवींच्या बोलण्याने पुलंदेखील गहिवरले! पुलंम्हणाले, ‘काका दळवी! तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष ग्रंथपाल या वाचनालयाला लाभले आहेत. हे  वाचनालय शताब्दीचकाय, आपली सहस्राब्दीही वैभवात साजरी करेल!
        शेवटच्या समारंभाच्या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते सर्व सत्तर अतिथींचा रामेश्वर सभामंडपात रामेश्वराचा फोटो देऊन सत्कार करण्यात येत होता. अध्यक्षस्थानी होते अर्थात पुलं’! ते प्रत्येकाची खाशी ओळख सर्वांना करून देत. त्या वेळी सभामंडपात खसखस तरी पिकायची, टाळ्यांचा कडकडाट तरी व्हायचा, नाही तर शांतता पसरायची! वसंतराव आचरेकरांचा सत्कार करताना पुलंम्हणाले, ‘तुमचा वसंता तालांचा बादशहा आहे. उद्या कोणीतरी म्हणेल इंग्लंडची व्हिक्टोरिया राणी कोण? तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण वसंताबाबत असे होणार नाही. त्याचे ताल मराठी मनामनात पोचलेत. संगीत ही अशी कला आहे तिथे फसवता येत नाही. सूर म्हणजे सूरच लागावा लागतो. ताल म्हणजे तालच यावा लागतो. मनुष्य कितीही श्रीमंत असला अगदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तरी त्रिताल हा सोळा मात्रांतच घ्यावा लागतो. तेथे सतरावी मात्रा चालत नाही आणि पंधरावीही. हसवण्याचा माझा धंदा! आणि वसंताचा न फसवण्याचा धंदा! अरे, तो काही झाले तरी तालाचा सम्राट आहे.
          अशा कौतुकानेही सभामंडपात टाळ्यांचा कडकडाट होई. एम.आर.आचरेकरांचे कौतुक करताना अरे, तुमचे हे एम.आर.! राज कपूरच्या श्री 420’,‘आवारापासून कालच्या बॉबी’पर्यंत राजकपूरच्या मागे आर्ट डायरेक्टरम्हणून खंदे उभे आहेत. म्हणून राज कपूर उभा आहे!अशा कौतुकानेही एक प्रकारची शांतता पसरे आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट होई. ती समदेखील बरोबर साधली जाई! सर्व मंडळी जायला निघण्यापूर्वी अण्णा गुरवांच्या घरी एक आगळा सोहळा संपन्न झाला. सोलापूरचे खंदे वक्ते व पुलंचे जिगरदोस्त राम पुजारी सर्वांना म्हणाले, ‘अरे, सर्वांचे सत्कार झाले, पण ज्याने आम्हाला आठ दिवस सुग्रास भोजन करून घातले त्या आचारी यल्लप्पाचा सत्कार व्हायला हवा.झाले पु.ल.देशपांडे आणि त्यांचे सर्व मैत्र जिवांचेकामाला लागले. गुरवाच्या खळ्यात बल्लवाचार्ययल्लप्पाचा सत्कार सर्वांनी आयोजित केला. अध्यक्षस्थानी राम पुजारी होते. ते प्रारंभी बोलले, नंतर सर्व वक्ते बोलले, राम पुजारी म्हणाले, ‘आज यल्लप्पाच्या सत्काराचे अध्यक्षपद मला देण्यात आले आहे. त्याचे हे एक गुपित आहे. कुमारजींपासून एम.आर.आचरेकरांपर्यंत आणि नारायण पंडितांपासून पु.ल. देशपांडेंपर्यंत हे सर्व माझे दोस्त आचरे येथे सपत्नीक आले आहेत. केवळ मीच शिडाफटिंग माणूस आहे! या सर्व महान व्यक्तींना कदाचित आपआपल्या पत्नीसमोर यल्लप्पाच्या  सुग्रास भोजनाचे कौतुक करणे जड जात आहे. कारण उद्यापासून प्रत्येकाला त्यांच्या सौभाग्यवतीने केलेले कदान्न, पक्वान्न म्हणून खावे लागणार, अशी ही लबाड माणसं! (टाळ्या)अशा तऱ्हेने त्या छोटेखानी कार्यक्रमातच एक प्रकारची मजा आली. नंतर इतर सर्व वक्ते दणकून बोलले. शेवटी पुलंबोलले. पु.लं. यल्लप्पावर भरभरून बोलले. त्या बिचाऱ्याला मराठी समजत नव्हते. तरी पुलंच्या चेहऱ्यावरील भाव त्याला समजत होते. तो अक्षरश: ढसाढसा रडला. रंगमंचावरील कलावंतासोबत पडद्यामागील कारागिराच्या श्रमाची कदर कशी केली जाते हेही, आम्ही अगदी जवळून पाहिले.
          पुलंच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘आज आमचा आचरे येथील घास संपला.आठ दिवस राहून सर्व मंडळी आली तशी त्याच गाड्यांतून भुर्रऽऽकन निघून गेली. आमचे गाव खऱ्या अर्थाने रिते झाले. आमचीही तंद्री पुरती उतरत नव्हती.
          त्यानंतर या अशा वलयांकित व्यक्तींना अगदी जवळून पाहिल्याचे, अनुभवल्याचे आम्ही सर्वांना सांगत राहिलो. त्या प्रसंगाची दुर्मिळ छायाचित्रे दाखवून आमची ही श्रीमंती इतरांना वाटत राहिलो.
          – सुरेश ठाकूर 9421263665
(सुरेश ठाकूर यांच्या शतदा प्रेम करावे (ती माणसे, ते दिवस)या उत्कर्ष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून.)
———————————————————————————————-
           लेखक परिचय

सुरेश ठाकूर हे सिंधदुर्ग येथील आचरा या गावी राहतात. ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत ललित लेखन करतात. त्यांनीशतदा प्रेम करावे..हे ललित पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. ते सध्या कोकण मराठी साहित्य परिषदमालवण‘ शाखेचे अध्यक्ष आहेत.

——————————————————————————————————————

आचरे गावातील चाळीस वर्षांपूर्वीची क्षणचित्रे –

 

 

 

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here