माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

0
128
-akola

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश जनरल वेलजोली याने त्याच्या सैन्यासह पाडाव अकोला येथे 27 नोव्हेंबर 1803 मध्ये टाकल्याची नोंद आहे. जनरल वेलजोली हा भारतातील गव्हर्नर जनरलचा भाऊ होता. त्याचे नाव त्या वेळच्या श्रेष्ठ सेनापतींमध्ये घेतले जाई. त्याने ‘वाटर्लू’च्या लढाईत नेपोलियनचा पराभव केला होता. पुढे त्याला ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’चा किताब इंग्लंडमध्ये देण्यात आला होता. त्याच्या वऱ्हाडात येण्याला निमित्त झाले निझाम-भोसले (नागपूरकर) यांच्यामधील बेबनाव.

अकोल्याच्या पुढे प्रगणे बाळापूर असा उल्लेख येतो. अकोला शहरापासून दोन-अडीच किलोमीटरवर उमरी प्रगणे बाळापूर (मोठी उमरी) हे गाव आहे. प्रगणे म्हणजे परगणा. त्याचा उल्लेख होण्याचे कारण असे, की औरंगजेब हा बादशहा म्हणून दिल्ली येथे गादीवर 1658 मध्ये आला. अकोला हे तेव्हा ‘कसबा’ स्वरूपात होते. औरंगजेबाने तो बादशहा झाल्यानंतर त्याच्या मर्जीतील लोकांना सरदारकी, जहागिरी यांचे वाटप केले. वऱ्हाड हे निजामशाही राज्याच्या सीमेजवळ होते. बाळापूर हे राजनैतिकदृष्ट्या बऱ्हाणपूर नंतर खानदेशमार्गे महत्त्वाचे ठाणे होते. बाळापूर हे त्यावेळी वैभवसंपन्न होते. तेथील रजपूत राजवटीच्या खुणा म्हणून बाळापुरात भुईकोट किल्ला सुस्थितीत उभा आहे. तेथे रजपूत सरदाराचा घोडा मृत्यू पावला त्याची दगडी खांबांची छत्रीदेखील ऐतिहासिक बाब म्हणून उभी आहे. ख्वाजा अब्दुल लतिफ यांच्या अकोल्याभोवती परकोट 1697 मध्ये उभारला गेला. तो ‘असदगड’ म्हणून त्या शहरात जीर्ण स्वरूपात आहे. त्याचा उल्लेख अकोल्यापासून वीस किलोमीटरवर असलेल्या दहिहांडा या गावी शिलालेखामध्ये आहे.

अकोला व त्याला जोडलेल्या गाव-वस्त्या यांचा विकास 1818 पर्यंत झाला नाही. कारण निझाम-भोसले यांच्या संघर्षाचा निर्णय पूर्णपणे झालेला नव्हता. अकोला हे 1853 पर्यंत परगणा स्वरूपात होते व कारभार नरनाळा या इतिहासप्रसिद्ध डोंगरी किल्ल्यावरून चालत होता. इंग्रज सरकारने 1853-1859 पर्यंत कारवाई करून शहरामध्ये सरकारी इमारती निर्माण केल्या. लोकांमध्ये जागृती 1857 च्या युद्धापासून झाली. लहानमोठे छुपे हल्ले होत, पण इंग्रज सरकारने मोठ्या ताकदीने त्या कारवाया दडपल्या. पण त्यामुळेच जनक्षोभ वाढत होता. इंग्रजांच्या बलदंड शक्तीविरूद्ध स्वातंत्र्यासाठी लढा देणे हा विचारही कोणी व्यक्त करू शकत नव्हते. समाज भयभीत अवस्थेत होता. नि:शस्त्र, असंघटित, पापभीरू, रूढीप्रिय समाज विरोधात जाण्याचा साधा विचारही मनात न आणण्याची मानसिकता होती. उत्पन्नाची साधने शेती शिवाय इतर कोणतीही नव्हती. शेतमालावर आधारित व्यापार चालायचा. शिक्षण, उद्योगधंदे नसल्यामुळे गावातील बऱ्याच जणांना मिळकतीचे साधन नव्हते. आधीच बेकार, दरिद्री, उदासीन अशा अवस्थेमध्ये असलेल्या लोकांत प्राण फुंकून त्यांना लढण्यासाठी उभे करणे हे काम जिकिरीचे होते. लोकमान्य टिळक हे प्रथम 1908 व नंतर 1917 मध्ये अकोल्याला आले. त्यांनी त्यांच्या प्रखर वाणीने अकोल्यातील लोकांना मार्गदर्शन केले टिळक म्हणाले, “राष्ट्रधर्म, स्वराज्य आणि स्वातंत्र्य हा मनुष्याचा स्वभावसिद्ध हक्क आहे.” ‘स्वराज्य’ शब्दाची उत्पत्ती शिवाजी महाराजांच्या वेळी झाली. स्वराज्य हे अंतिम सत्य आहे. अशा प्रकारे निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम टिळक करत होते.

-akola-old-asadgadअकोल्याचे भौगोलिकदृष्ट्या स्थान हे उत्तर अक्षांश 20० – 40  व पूर्व रेखांश 77० – 04 वर स्थित आहे. नऊशेपंचवीस फूट उंचीवर आहे. अकोल्याची जमीन साधी, सरळ, सपाट आहे. ते शहर मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावर भुसावळनागपूरच्या साधारण मध्यभागी येते. ते मुंबईपासून पाचशेचौऱ्याऐंशी किलोमीटरवर आहे.

अकोल्याला सर्वात जुने व प्रमुख मंदिर राजेश्वराचे (श्री शंकरमहादेव) आहे. त्या मंदिराबाबत आख्यायिका अनेक आहेत. अकोल सिंगांच्या नावावरून ‘अकोला ’ हे नाव पडले असे म्हणतात. लोकमान्य टिळक यांची सभा त्या परिसरात 1908 साली झाली. त्या सभेला शेगाव संस्थानचे संत गजानन महाराज हे अध्यक्ष म्हणून होते. अकोल्याला ‘बाराभाईंचा गणपती’ लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू केला. ती लाकडाची मूर्ती अजून आहे. त्या मूर्तीचे विसर्जन करत नाहीत. श्री राजराजेश्वरला धारगड, गांधीग्राम (सातपुड्याचा डोंगराळ भाग) येथील पूर्णा नदीचे पाणी कावडीने आणून जलाभिषेक दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. 

रावसाहेब देवराम बाबा दिगंबर या सद्गृहस्थांनी गणपती मंदिराची स्थापना अकोल्याच्या जुने शहर भागात 1884 मध्ये केली. काळा मारूती व मोठा राम ही मंदिरे मोर्णा नदीच्या तीरावर असून रामनवमीला रामाच्या चरणावर सूर्याची किरणे येतात अशी रचना त्या मंदिराची केली गेली आहे. विश्वनाथ सोनाजी कोरान्ने हे महान योगी तपस्वी पुरुष 1704 (माघ शुद्ध 7 शके 1626) मध्ये होऊन गेले. त्यांचे योगसामर्थ्य मोठे होते. ते 1800 (अश्विन शुद्ध 15 शके 1722) मध्ये समाधिस्थ झाले. अकोल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1965 नंतर आले. त्याचा परिसर रम्य आहे. तेथे दरवर्षी कृषी प्रदर्शन भरते व शेतकऱ्यांना नवीन शोधांची माहिती दिली जाते.

अकोला परिसरात ऐतिहासिक वास्तू नाही. असदगड किल्ल्याचे गढी-बुरुज हे कालौघात नष्ट झाले आहेत. शैक्षणिक संस्थांना मात्र ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांतील राष्ट्रीय शाळेने शिक्षणकार्याबरोबर स्वातंत्र्य सैनिक तयार केले. सरस्वती मंदिर ही ती मूळ संस्था. ती 1919 मध्ये स्थापन झाली. काशिनाथ विठ्ठल ऊर्फ बापुसाहेब सहस्रबुद्धे हे त्या संस्थेचे संस्थापक. ती संस्था अण्णासाहेब शिवनामे, य.ग. सबनीस, पुरुषोत्तम कुळकर्णी, दादासाहेब पंडित, बाळतेकर मास्तर या तरुणांनी वाढवली. शाळेचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणे हे होते. राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन तुरुंगवास भोगला.

-shala-smarakशाळेचा विद्यार्थी लक्ष्मण गोडबोले तुरुंगवासात आजारी होऊन तापाने शहीद झाला. त्याचे शहीद स्मारक अकोला येथे आहे. अकोल्याच्या गांधी जवाहर बागेत दोन संगमरवरी स्तंभांवर इतर शेजारील गावाच्या चाळीस जणांची नोंद आहे. त्यात दहा जणांची नोंद असून सर्वात वर शहीदकुमार लक्ष्मण गोडबोले यांचे नाव आहे. ते सर्व शिक्षक, कार्यकर्ते, विद्यार्थी ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर’चे आहेत. 1940-42 च्या आंदोलनामध्ये व त्या आधीच्या जनआंदोलनामध्ये लोकनेतृत्व करणाऱ्या ‘टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, उमरी, अकोला या संस्थेची नोंद इंग्रज सरकारच्या दफ्तरी ‘हेडएक’ संस्था अशी झाली असावी. त्यातच उमरी-बोरगाव दरम्यान मिलिटरी ट्रेन रूळावरून घसरवल्याचा संशय येथील शिक्षक-कार्यकर्त्यांवर आल्यामुळे ‘Dangerous to the public peace’ असे म्हणून त्या संस्थेला ‘सील’ लावण्यात आले. सर्व शिक्षक-कार्यकर्ते-विद्यार्थी- संस्था यांना शाळा सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. जगतगुरू शंकराचार्य कूर्तकोटी, आचार्य कृपलानी, पंडित मदन मोहन मालवीय, सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, स्वामी कुवलयानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भेटी शाळेला झाल्या आहेत. त्यांचे संदेश संस्थेत आहेत. विशेष असे, की क्रांतिवीर भगतसिंग यांचे सहकारी राजगुरू हे संस्थेत बराच काळ वास्तव्यास होते हे इंग्रजांनाही कळले नव्हते. मुलांनी केलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीच्या गौरवार्थ ‘जिनके खूनसे आजादी की बाग सिंची’ असे वाक्य लिहिलेली चांदीची ढाल संस्थेला दिली गेली आहे.

वऱ्हाडातील स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे अकोला येथून ठरवली जात होती. युद्धमंत्री म्हणून त्यावेळचे नेते ब्रिजलालजी बियाणी यांनी ती जबाबदारी घेतली होती. पण सर्व कार्यालयीन कामे, मीटिंग्जचे नियोजन हे ‘राष्ट्रीय शाळा’ येथून चालत असे. इंग्रजांच्या बलदंड सत्तेविरूद्ध त्या काळी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणे हा विचारही कोणी व्यक्त करू शकत नव्हते. नि:शस्त्र, असंघटित, रुढीप्रिय समाज, मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे दारिद्र्य व उदासीनता आलेल्या समाजाला प्राण फुंकून लढण्यासाठी उभे करणे हे काम जिकिरीचे होते. ते काम सुरुवातीला सशस्त्र क्रांतिकारकांनी केले. कोलकाता डमडम येथील तुरुंग फोडून आलेले सिनानाथ डे, पृथ्वीसिंह आझाद, वीर राजगुरू यांचे वास्तव्य दीर्घकाळ ह्या शहराने अनुभवले. काही नेते, पुढारी, समाजसुधारक, संत-महंत यांनीही या शहराला, उमरीच्या शाळेला भेटी देऊन स्वातंत्र्याची ज्योत धगधगती ठेवली.

– विलास बोराळे 9881215697

(संदर्भ: ‘स्मृतींच्या मशाली’ – लेखक : चंदू ओक, अकोला मार्गदर्शक – लेखक : बालमुकुंदजी अग्रवाल,
सुवर्ण महोत्सव स्मरणिका- टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, उमरी-अकोला)
 

 

 

About Post Author