आरोग्यदायी कडुनिंब

कडुनिंब हा प्राचीन औषधी असा महावृक्ष आहे. कडुनिंब हा ‘अमृतवृक्ष’ म्हणून ओळखला जातो. देवांनी समुद्रमंथनाच्या वेळी दानवांच्या हाती अमृतकुंभ लागला तेव्हा दानवांशी युद्ध करून तो मिळवला. देव अमृतकुंभ स्वर्गात घेऊन जात असताना त्या कुंभातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. त्या थेंबातून, त्या जागी जो वृक्ष उगवला तो अमृतवृक्ष म्हणजे कडुनिंब होय! कडुनिंब आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आणि उपयुक्त असा वृक्ष आहे. मृतालाही जे जीवदान देते ते अमृत म्हणजेच कडुनिंब असा आयुर्वेदशास्त्रात त्याचा गौरव केला आहे. कडुनिंबाची पाने, फुले, फळे, खोड, फांद्या आदी सर्व भागांचा अनेक रोगांच्या इलाजावर उपयोग होतो.

कडुनिंबाचा वृक्ष आठ-दहा मीटर उंच असतो. त्याची पाने छोटी व मधल्या दांड्याच्या दोन्ही बाजूंला जोडीजोडीने असतात. टोकाचे पान मध्यात असते. फुले लहान व पाढऱ्या रंगाची असतात. त्यांना मंद सुगंध असतो. फळ कच्चे असताना हिरवे व टणक असते, मात्र पिकले की पिवळे व मऊ बनते. फळाच्या आत एक बी असते. बीच्या आत मगज असतो. त्या मगजापासून तेल काढले जाते. कडुनिंबाची पाने हिवाळ्यात गळतात, वसंताची चाहूल लागली, की कोवळी पालवी फुटते आणि वसंताच्या अखेरपर्यंत झुपक्यांनी फुले येऊ लागतात.

हिंदूंचे नवे वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होते. नववर्षाचे स्वागत करताना आंब्याच्या पानांबरोबरच कडुनिंबाच्या पानांचे तोरण दरवाज्याला लावतात. गुढीला कडुनिंबाच्या पानांचा हार घालतात. त्या दिवशी कडुनिंबाच्या पानांची हिंग, जिरे, ओवा, गूळ, चिंच घालून चटणी करून खातात. कारण कडुनिंबाच्या पानात कॅल्शियम, प्रोटीन, लोह आणि अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कृमी-जंत नाश पावून रोगप्रतिकार शक्ती वाढते; शरीर शुद्ध निरोगी बनते. कडुनिंबाच्या कोवळ्या काड्यांनी रोज दात घासले असता दात मजबूत बनतात. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने जखमा, घाव, व्रण धुतले असता त्या निर्जंतुक होऊन लवकर भरून येतात. कुष्ठरोग, खरूज यांवरही कडुनिंब गुणकारी आहे. कडुनिंबाची वाळलेली पाने साठवणीच्या धान्यात, पुस्तकात, कपड्यांत ठेवली असता कीड, अळी जाळी धरत नाही. वाळलेली पाने जाळली असता त्या धुराने डास, कीडे नाहीसे होऊन हवा शुद्ध होते.

कडुनिंबाची पाने पाण्यात घालून ते पाणी उन्हात ठेवून तापवले जाते. त्या पाण्याला ‘झळवणी’ असे म्हणतात. त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घातली असता त्यांना उन्हाळा बाधत नाही. ते पाणी घामोळे, कांजण्या यांवरही गुणकारी ठरते. कडुनिंबापासून तयार केलेले तेल संधिवात, त्वचारोग यांवर उपयुक्त आहे. कडुनिंबापासून साबण, पेस्ट बनवतात. कडुनिंबाच्या झाडाची सावलीही दाट आणि थंड असते. तशा सावलीत नित्य बसले असता रोगप्रतिकार शक्ती वाढते. कडुनिंब त्याच्या औषधी गुणांनी कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांपासून मनुष्याचे रक्षण करतो.

कडुनिंबाचे लाकूडही मजबूत असते. त्या लाकडाला वाळवी, कीड लागत नाही. त्याच्या लाकडाचा उपयोग घरबांधणी, जहाजबांधणी, बागकामाची हत्यारे बनवण्यासाठी करतात. त्या झाडातून निघणारा डिंकही औषधी आणि उपयुक्त आहे. कावीळ, मूळव्याध, पित्तज्वर, मुतखडा, मधुमेह, कुष्ठरोग, घटसर्प इत्यादी रोगांवर आणि रक्तशुद्धी करता कडुनिंब गुणकारी ठरला आहे. शास्त्रज्ञांनी कडुनिंबाचा ‘वंडर प्लाण्ट’ अशा शब्दांत गौरव केला आहे. भारतभूमीतील त्या वृक्षाने साऱ्या विश्वालाच एक बहुमोल असे वरदान दिले आहे.

प्रज्ञा कुलकर्णी 99205134866
———————————————————————————————-

रसाला शिखरिणी (श्रीखंड) – गुढीपाडव्याला जेवणात श्रीखंडाचा आवर्जून समावेश असतो. उन्हाळ्यातील उष्णतेशी सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती चांगली टिकून राहवी यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले श्रीखंड हे रसायनाप्रमाणे उपयोगी ठरत असते. आयुर्वेदात श्रीखंडाला ‘रसाला शिखरिणी’ असे नाव आहे.

त्यामध्ये पाणी निथळून गेलेले दही म्हणजे चक्का, मध, तूप, साखर, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र, मिरे, सुंठ ही घटकद्रव्ये असतात. त्यांचे गुण पुढीलप्रमाणे –

दही – कफवर्धक, पचायला जड, वातशामक, शरीराला स्निग्धता देणारे, पुष्टिकर

मध – कफदोषशामक, पचायला हलके, आवाज सुधारणारे, प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या मेदाला कमी करणारे, रूचकर, रूक्ष

तूप – शक्तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढवणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक

साखर – वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्ती वाढवणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी

दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र ही चार द्रव्ये मिळून ‘चातुर्जात’ गण तयार होतो. तो कफनाशक, रूचिवर्धक, आमपाचक असा असतो.

मिरे व सुंठ – हे दोघेही चवीला तिखट, अग्निवर्धक, पाचक व कफनाशक असतात.

चक्का तयार करताना दूध विरजण्यापूर्वी मातीच्या मडक्याला कापराने सुवासित करून घेतलेले असते. त्याला आतून सुंठीचा लेप लावलेला असतो. तशा मडक्यात तयार झालेले दही सुती कापडात बांधून त्यातील पाणी निथळले, की चक्का तयार होतो. त्या तयार चक्क्यात साखर व इतर द्रव्ये योग्य प्रमाणात मिसळली जातात. पुन्हा एकदा कापराने सुगंधित केलेल्या भांड्यावर स्वच्छ सुती कापड बांधून त्यावर ते मिश्रण थोडे थोडे घासले की श्रीखंड तयार होते.

श्रीखंड वातपित्तशामक, शुक्रवर्धक, बलवर्धक, रूचकर, स्निग्ध, पुष्टिकर, कांतिवर्धक आहे. त्यातील गुण पाहिले असता लक्षात येते, की दही जरी कफ वाढवणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे, की त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. दह्यातील इतर गुण मात्र वृद्धिंगत होतात.

(बालाजी तांबे यांनी दिलेल्या माहिती आधारे)
 

 

About Post Author