पालघर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. नोव्हेंबर 2018 पासून हा प्रकार सुरू आहे. धुंदलवाडी-दापचरी-तलासरी-डहाणू या गावशहरांमध्ये सतत अस्थिरता व अस्वस्थता आहे. फेब्रुवारी 2019 पर्यंत एकूण पाचशेच्यावर धक्के बसले असतील. त्यांतील दोन खूप मोठे धक्के, 4.1 रिष्टरचा 1 फेब्रुवारी रोजी तर 4.3 रिष्टरचा धक्का 1 मार्च रोजी, बसले. तो लोकांना हादरवून टाकणारा अनुभव होता, कारण घराच्या भिंतींना भेगा पडल्या. दोन मजली घरे काही सेकंद थरथरत होती. त्यामुळे सर्व माणसे व्याकूळ होऊन गेली. दुसरीकडे, धक्क्यांमुळे अफवांना उधाण आले आहे. कोणी म्हणते, धरण फुटणार आहे, तर कोणी म्हणते, की पृथ्वीच्या गर्भातून ज्वालामुखी बाहेर येणार! भूगर्भ हालचाली नोव्हेंबर 2018 आधी जव्हार भागात होत्या, आता त्यांचा केंद्रबिंदू दक्षिणेकडे सरकला आहे.
मला नोकरी निमित्ताने पालघर जिल्ह्यातील दापचरी गावात त्याच बेताला शिफ्ट व्हावे लागले. तेथे जाण्यापूर्वी भूकंपाच्या धक्क्यांविषयी बातमी वाचली होती, पण मी ती दुर्लक्षित केली. तेव्हा वाटले, बसला असेल छोटासा धक्का. त्यामुळे फारसे लक्ष दिले नाही. मला तारीख चांगलीच आठवते, 24 नोव्हेंबर! आम्ही जोराचा धक्का त्या दिवशी दुपारच्या वेळी अनुभवला. तो धक्का 3.3 रिष्टर स्केल इतका होता.
दुपारची वेळ होती. जरा आराम करत होतो आणि अचानक धक्का बसला. कोणीतरी जोरात धक्का दिल्यासारखे झाले. क्षणभर वाटले, आता सगळे संपले की काय! आम्ही पळत घराबाहेर आलो. आमच्या वसाहतीतील सगळे रहिवासी बाहेर आले. माझा शेजारी अविनाश त्याच्या घरातील मांडणीवरची एक-दोन भांडी पडली. त्यामुळे तो जास्त हबकला. सगळेच घाबरून गेलो होतो.
माझे पाय तर फार थरथरत होते. मी घरात अर्ध्या तासानंतर शिरलो. त्या भीतीपोटी, मी दुसऱ्या दिवशी कल्याण (माझे मूळ घर) गाठले. मनात वेगवेगळे विचार येत होते, की जर मोठा भूकंप झाला तर काय होईल?नुसतेच पळण्यापेक्षा जर त्याविषयी माहिती घेऊन, स्वतः सावध झालो तर? असाही प्रश्न मनात येत होता. त्यामुळे ठरवले असे, की पुन्हा दापचरीला राहण्यास जावे, पण त्याआधी मनाची तयारी करणे गरजेचे होते. मी माझ्याशी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माध्यमातून आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या पर्यावरण, भूगोल विषयाचे ज्ञान असलेल्या व्यक्तींशी संवाद फोनवर साधला. मी त्यांना भूकंप मोठा होईल का? किती दिवस असे धक्के बसत राहतील? धरण फुटेल का? इमारत पडणार का? भूकंप झाला तर हवामानात बदल होईल का? शासनाने त्यावर काहीतरी निर्णय घ्यायला हवेत का? असे अनेक प्रश्न विचारत गेलो आणि मला समोरून धीर देणारीच उत्तरे मिळाली!
मी फेसबुकच्या ‘सफर विज्ञानविश्वा’ची या समूहातही प्रश्न उपस्थित केले. जाणकारांकडून ‘इंडियन मेटिरिऑलॉजी’ची वेबसाईट मिळाली. त्या वेबसाईटवर जगात होणाऱ्या प्रत्येक भूकंपाची नोंद आणि त्या भूकंपाचा केंद्रबिंदू दर्शवलेला असतो.
मी कल्याणला पाच दिवस राहिल्यानंतर पुन्हा पालघरला आलो. भूकंपाचे सत्र सुरूच होते. धक्के नोव्हेंबर महिन्यात फार कमी प्रमाणात बसले. परंतु त्यांचे प्रमाण डिसेंबरमध्ये अधिक जाणवले होते. जानेवारीमध्येही फार कमी प्रमाणात धक्के बसले. वृत्तपत्रात त्या बातम्या येत होत्या. मात्र 1 फेब्रुवारीला 4.1 रिष्टर स्केल इतका जोराचा धक्का बसला. पहाटे 03:30 मिनिटांनी धक्क्यांची जी सुरुवात झाली ती संध्याकाळी 06:00 पर्यंत सुरूच होती. त्या एकाच दिवशी दहा-पंधरा धक्के बसले. रात्री आम्ही झोपेत असताना 03:30 ला धक्का बसला पण नेहमीची सवय म्हणून आम्ही त्यावर काहीच रिअॅक्ट झालो नाही. सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान तीन धक्के बसले. ते धक्के एक-दोन मिनिटांच्या अंतरांनी लागोपाठ बसले होते. झोपलेल्या अवस्थेतच बाहेर पडावे लागले. आम्ही थंडी असल्यामुळे माझ्या एक वर्षाच्या मुलीला गोधडीत गुंडाळून बाहेर पडलो. त्या दिवशी वसाहतीतील सगळे रहिवासी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंत बाहेर होते. शेजारचे बोलत होते, की धक्के असे बसत होते की जशी काही जमीन हलत आहे आणि ही बिल्डिंग अंगावर कोसळणार की काय असेही वाटत होते.
फेब्रुवारी-मार्चमधील 4.1 रिष्टर स्केलचे दोन धक्के चार महिन्यांच्या अवधीत खूप मोठे होते! त्या धक्क्यांमुळे धुंदलवाडी येथील काही घरांच्या भिंती कोसळल्या, तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले. त्यातच एक दुर्दैवी बातमीही मिळाली, की 4 फेब्रुवारीच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरून पळत असताना, दगडावर आपटून दोन वर्षांच्या मुलीचा जीव गेला. धुंदलवाडीचे बागराव काका म्हणाले, की मी सोफ्यावर बसलो होतो, तो अक्षरश: सहा इंच उडालो! सगळ्यांच्या मनात भीतीचे वातावरण त्या दिवशी होते. शासनाकडून भूकंप झाल्यावर काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण मिळत होते. पण ते धक्क्याच्या प्रत्यक्ष अनुभवप्रसंगी घबराटीमुळे कामी येत नव्हते.
धुंदलवाडी गावातील लोक स्वतः ताडपत्री बांधून नोव्हेंबरपासून बाहेर उघड्यावर झोपत आहेत. कडाक्याची थंडी जानेवारीपर्यंत होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या एनडीआरएफकडून दोनशे तंबूंची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यामार्फत भूकंपाविषयी दक्षता काय घ्यावी याविषयी प्रशिक्षण देणे सुरू होते. जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळा दुपारच्या सत्रात भरत. त्या सकाळच्या सत्रात होऊ लागल्या.
ते सगळे सुरू असताना, मुंबईचे आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांच्याशी माझे बोलणे सुरू होते. बुरांडे यांनी लातूरजवळ किल्लारीला पंचवीस वर्षांपूर्वी ज्यावेळी भूकंप झाला, तेव्हा तिकडे झालेली परिस्थिती आणि तिचे परिणाम जवळून अवलोकन केले होते. त्यांनीही मला धीर देत पालघरमध्ये ‘आपण एकत्र काम करू शकतो’ असा सल्ला दिला. मीही तयार झालो. जेव्हा आमची पहिली भेट ठरली, त्या भेटीत त्यांनी त्यांचे नियोजन कळवले आणि आम्ही धुंदलवाडी गावास भेट देण्यासाठी गेलो. वाटेतच, आम्हाला त्या गावचे माजी सरपंच रामचंद्र भुरसा भेटले. त्यांनी आम्हाला शासनाने बांधलेले तंबू, डिस्पेन्सरी आणि गावातील लोकांनी रात्री झोपण्यासाठी केलेली व्यवस्था दाखवली. धुंदलवाडीच्या पाटील पाड्यात ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘भूकंप परिषदे’चे आयोजन केले होते. त्या परिषदेत ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, एनडीआरएफची टीम ही सगळी मंडळी उपस्थित होती. आम्ही ती परिषद पाहिली. भूकंपाविषयी लोकांमध्ये असलेली भीती दिसत होती. त्यातून असेही कळत होते, की बहुतेक जण स्थलांतरितही होत आहेत. त्यांचेही म्हणणे हेच होते, की शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे. रामचंद्र भुरसा सांगत होते, की 2018 साली गणपती दरम्यान मामुली छोटे धक्के बसायचे, ते समजून येत नव्हते. पण दिवाळी संपल्यानंतर जे धक्के सुरू झाले ते सुरूच आहेत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी वाडा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भूकंपग्रस्त भागातील घरांना रेट्रोफिटिंग प्रणाली बसवण्याचे काम सुरू करणार आहोत. असे आश्वसन दिल्याची बातमी वृत्तपत्रात वाचण्यास मिळाली. आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा त्या गावात येऊन गेले आहेत. पालघर, डहाणू आणि तलासरी या भागात आपत्ती नियंत्रण कक्ष उभारले गेले आहेत.
बुरांडे आणि मी लोकांच्या मनात भूकंपाविषयी कोठलीही भीती राहू नये, लोकांनी मूळ गावातून स्थलांतरित होऊ नये यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने जनजागृतीपर कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. पहिले सत्र 16 फेब्रुवारीला तलासरी येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’त झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांना जनजागृतीविषयी माहिती देण्यात आली. तसेच, 21 फेब्रुवारी रोजी विनायकराव बी. पाटील कृषी महाविद्यालय आणि चिंचले येथील बालक मंदिर संस्था, कल्याण येथे दोन सत्रांत विद्यार्थ्यांशी भूकंप या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून त्यांना भूकंपाबद्दल पडणारे प्रश्न मागवले होते. मोठा भूकंप होईल का? सतत येणारे धक्के कधीपर्यंत सुरू राहतील? धक्के कशामुळे बसत आहेत? धक्क्यांमुळे किती नुकसान होईल? भूकंप झाला तर आम्ही काय करावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून मिळाले. बुरांडे यांनी विद्यार्थ्यांच्या त्या प्रश्नांचे निरसन केले. मोठा भूकंप होईल की नाही? किंवा कधी होईल? हे काही ठोस सांगता येत नाही, पण सतत चिंतेत राहण्यापेक्षा आपण जर सतर्क राहिलो तर ते कमी नुकसानकारक ठरेल. जीवितहानी टळू शकेल असे सांगितले. परिसंवादात अनिलचंद्र यावलकर, महाविद्यालयाचे संचालक भुसारे-पाटील, देवकीनंदन व्यास, बागराव, प्राचार्य तुवर आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
परिसंवाद चिंचले येथील बालक मंदिर संस्था, कल्याण या शाळेतही झाला. ती निवासी आश्रमशाळा आहे. चारशे विद्यार्थी तेथे राहतात. त्या शाळेची परिस्थिती पाहता जरा हायसे वाटले. शाळेची इमारत रिकामी होती. सगळे विद्यार्थी भूकंपाच्या भीतीमुळे पटांगणात तंबूत राहतात. तेथेच शिक्षण घेतात. विद्यार्थी सततच्या होणाऱ्या भूकंपाविषयी त्यांचा अनुभवही सांगत होते. वातावरण चिंतेचे आहे, पण त्यांच्यात सतर्कता दिसत नाही. ती सतर्कता सर्व स्तरावर व्हावी यासाठी ‘पूर्वआपत्ती सज्जता कृती नियोजन’ या प्रकारचा कार्यक्रम ठरवणे गरजेचे आहे. तलासरी, धुंदलवाडी येथील गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचे नियोजन आहे.
किल्लारी भूकंपानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी सोलापूरला महिनाभर मुक्काम ठोकून सर्व पुनर्वसन मार्गी लावले होते. पण त्यावेळी बरीच जीवित व वित्तहानी होऊन गेली होती. त्यामुळे ती पश्चात योजना ठरली. येते भूकंप वारंवार पूर्वसूचना देत आहे. सरकार त्यांच्या पातळीवर काम करत आहेत. रेट्रोफिटिंग संदर्भात बोलणं सुरू आहे आणि आणखी ताडपत्री देणे सुरू आहे. असे उपक्रम सरकार राबवत आहेत.
– शैलेश पाटील