सकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती

_Sakina_Bedi_1.jpg

सकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे! तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो!

सकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले! तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.

शाळा साधी आहे, पण जे काही आहे ते स्वच्छ आहे. मात्र सकिनाचे त्या शाळेच्या बाबतीत ध्येय मोठे आहे. तिने त्या क्षेत्रातील शाळेला आदर्श शाळा बनवण्याचा वसा घेतला आहे. एखादी अंधशाळा-तीदेखील मुलींची-मोठी करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. तिने ‘तळवलकर ट्रस्ट’च्या पुरस्कार समारंभात भाषण केले. तिने सांगितले, की “अंध म्हणून आम्हाला दया नको आहे. काम द्यावे, आम्हाला करुणा नको शिक्षण द्यावे. बघा, बघा आम्ही काय करून दाखवतो ते?” सकिनाने तिच्या भाषणात जो दुर्दम्य आत्मविश्वास दाखवला तो सकिना प्रत्यक्ष जगली आहे. त्यामुळे ते भाषण म्हणजे तिचा आतील आवाज होता. त्यामुळे सभा तिने जिंकली होती.

सकिना ही आई जेनी आणि पिताजी वालीद सफाकतभाई सारजान यांचे तिसरे अपत्य. त्या दाम्पत्यास आधीची दोन मुले होती- थोरला शोएब आणि मधला शब्बीर. पण आईवडिलांना मुलगी हवी होती. शब्बीर जन्मतः अंधत्व घेऊन आला होता. एक मूल अंध असल्याने, पुढे काय? असा चान्स घ्यावा का? ती देखील अशीच जन्माला आली तर काय? असे प्रश्न घरातील वडीलधारी मंडळी विचारत. पण आईवडिलांनी तिसऱ्या अपत्याचा विचार केला. दाम्पत्याची इच्छा पुरी झाली खरी, पण ती मुलगीदेखील भावाप्रमाणे दृष्टिहीन जन्मास आली. थोडा विरस झाला, पण काही काळ. आई-वडील सावरले. त्यांनी मुलीचे नाव सकिना ठेवले. सकिना म्हणजे शांती (Peace)! सफाकतभाईंचे पुण्यात बुधवार चौकात ‘शू सेंटर’ नावाचे कोल्हापुरी चपलांचे दुकान आहे. सफाकतभाई हयात नाहीत, मोठा मुलगा शोएब ते दुकान सांभाळतो. त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती. पण सफाकतभाई दोन दिवसांच्या मुलीच्या वेगळ्या भविष्याचा विचार करू लागले होते.

_Sakina_Bedi_4.jpgसकिना मोठी होऊ लागली तसा शाळेचा शोध सुरू झाला. पुण्यात अंध मुलींची शाळा नव्हतीच. तिला मुंबईला ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. लहानगी मुलगी एकटी वसतिगृहात राहणार या काळजीने आई व्याकूळ झाली. पण तिला शिकवायचे हे ठरलेले होते. तिने दोन-तीन वर्षें कशीबशी मुंबईत काढली. मधील काळात वडिलांनी Pune Blind school चे संस्थापक अप्पासाहेब बमणकर यांच्याशी ओळख वाढवली आणि सकिनाला त्या मुलांच्या शाळेत घातले. तिने तेथे दोन वर्षें काढली. मग त्यांना वाटले, की तिला नॉर्मल मुलींच्या शाळेत घालावे. त्याप्रमाणे सोलापूर बझार येथील ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’च्या मुलींच्या शाळेत तिचे नाव घालण्याचे ठरले. शाळेचे मुख्याध्यापक गोपाळराव लवळेकर यांनी सशर्त परवानगी दिली. अट एकच, मुलीला तिच्या अंधत्वामुळे शाळेत काहीही दुखापत झाली तर शाळा जबाबदार राहणार नाही. त्यांनी ती गोष्ट त्या 1979 सालात एक हजार रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून घेतली. सफाकतभाईंच्या दृष्टीने ती रक्कम फार होती, म्हणजे जवळ जवळ एक महिन्याचे एकूण उत्पन्न होते. पण त्यांनी स्टँपपेपरवर तसे लिहून दिले. लवळेकरसर सहृदय गृहस्थ होते. त्यांनी सकिनाची काळजी घेतली. शाळेने सकिनाला फार प्रेम दिले. पाचवीपासून दहावीपर्यंत कृष्णा पुराणिक नावाच्या बाई (शिक्षक) होत्या. त्या सकिनाचा प्रत्येक वाढदिवस शाळेत साजरा करत. तिला त्या निमित्त काहीतरी प्रेरणादायी लिहून देत. छोटी सकिना ती प्रेरणा घेऊन घडत गेली. सविता मोकाशी, संजीवनी माने या मैत्रिणी त्यांच्या आवाजात घरून वेगवेगळ्या विषयांचे धडे ऑडिओ कॅसेट रेकॉर्ड करून आणत. त्या सकिनाला देत. वडील ब्रेल प्रिंटरवर टेक्स्टबुक व इतर पुस्तके तयार करून घेत. स्वत: वडील दुकानातून आले, की रात्री आठ ते दहा आणि सकाळी सहा ते आठ तिला शिकवत. सकिना बहात्तर टक्के मार्क मिळवून एस.एस.सी पास झाली. सकिना म्हणाली, की आई फक्त गॅसजवळ जाऊ देत नसे. इतर सर्व कामे उदाहरणार्थ, भांडी घासणे, धुणे, भाजी निवडणे-चिरणे ही माझ्याकडून करून घेई. सासुबाईदेखील मला गॅसजवळ जाऊ देत नाहीत. पण बाकी सर्व घरकाम मी करते. मला त्यातही आनंद वाटतो.

ती ‘नौरोसजी वाडिया कॉलेज’मधून इतिहास हा विषय घेऊन बीएही झाली. पुढील शिक्षणासाठी मुंबईला ‘टाटा समाजशास्त्र संस्थे’त प्रवेश घेण्याचे ठरले. सकिना संस्थेच्या प्रवेश परीक्षांच्या सर्व टप्प्यांत उतीर्ण झाली. तेथे तिला भेटली सुकन्या साठे (आता सुकन्या पटवर्धन). तिने सकिनाच्या पपांना सांगितले, सर, जगात उच्च मानांकित असलेल्या या संस्थेत फक्त एकशेपंचवीस जागा आहेत, त्यात सकिनाला प्रवेश मिळाला आहे. भाग्य तुमच्या पायाशी आहे, ती संधी तुम्ही सोडू नका. मी पुण्याचीच आहे. वाटले, तर माझ्याबरोबर तिला एक महिना राहू द्यात. बघा, ती रुळते का? एक महिन्यांनी तुमचा निर्णय तुम्ही घ्या. अनोळखी सुकन्या साठे मदतीचा हात देत होती. तिने पपांना विचार करण्यास वाव दिला नाही लगेच जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी सुकन्याच्या भरवशावर प्रवेश पक्का करण्याचा निर्णय घेतला. सकिना मेडिकल सायकियाट्री हे स्पेशलायझेशन घेऊन 1991 साली MSW (Masters in social work) उत्तम प्राविण्यासह पास झाली. सकिना म्हणते, “मला माझ्या आई-पपांपासून ते समाजापर्यंत सर्वांनी भरभरून दिले. आता परतफेड करायची होती.”

_Sakina_Bedi_5.jpgतिला ‘सोस्वा’, ‘केअर इंडिया’ यांसारख्या नामांकित NGO मध्ये नोकरीची संधी मिळाली. तेथे काम करताना एका प्रोजेक्ट निमित्ताने संदीप बेदी यांची ओळख झाली. ते freelance financial consultant म्हणून काम करतात. तो प्रोजेक्ट जवळपास वर्षभर चालला. संदीप सकिनासारखेच होते. त्यांची दृष्टी लहानपणापासून क्षीण होत पूर्ण गेली होती. ती दोघे कामानिमित्त एकत्र आले, जवळीक वाढली. एके दिवशी, संदीप यांनी सकिनाला लग्नाविषयी विचारले. दोघांनी लग्न करू, पण दोघेही त्यांचा त्यांचा जन्मदत्त धर्म न बदलता लग्न करू आणि मानवता धर्माने एकत्र काम करू असे ठरवले. विवाह 1994 मध्ये झाला. अनमोल नावाचे कन्यारत्न त्यांच्या संसारवेलीला 1996 मध्ये लागले. अनमोल नुकतीच CA झाली आहे. संदीपची Intellectual Asset Management ही फायनान्स कंपनी आहे. संदीप त्याच्या विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात; अनेक शैक्षणिक संस्थांत त्या विषयावर तज्ज्ञ म्हणून लेक्चर देतात.

सकिनाने संदीपच्या कामात काही काळ मदत केली. अनमोल थोडी मोठी झाल्यावर, 1999 साली तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’ला भेट दिली. शाळेची अवस्था फार वाईट होती. एका छोट्याशा हॉलमध्ये सत्तर मुली होत्या. फक्त दोन संडास आणि बाथरूम्स होते. शाळेचे संस्थापक रमेश गुलाणी यांनी त्यांची मजबुरी सकिनापुढे मांडली. सकिनाने मनात विचार केला, की कामाची हीच संधी आहे! सकिनाने दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणावा ही वडिलांची इच्छा होती, ती पूर्ण करण्याची हीच संधी आहे. तिने गुलाणींना जाग्यावर सांगितले, मी संस्थेचे आर्थिक पालकत्व घेते. तुम्ही तयार आहात? त्यांनी संमती दिली. काम सुरू झाले. ती खोपटासमान शाळेपासून लोकांचे डोळे दिपतील अशी मोठी शाळा घडवण्याचे स्वप्न बघू लागली. मनात कामाची रूपरेखा सुरू झाली. त्यात शाळेची अद्ययावत इमारत, कौशल्यशिक्षण, वसतिगृह अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. त्या सगळ्यासाठी मोठी जागा आणि पैशांचा अव्याहत प्रवाह लागणार होता. तिने कंबर कसली. इन्फोसिस आणि तशा मोठ्या कंपन्यांना आवाहन केले. त्या कंपन्यांचे CSR फंड इकडे वळवण्यासाठी त्यांचे मन वळवणे सुरू झाले. सकिना दात्यांना पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे भेटू लागली. शाळेची अवस्था दाखवली. भविष्यातील योजना मांडल्या. प्रोजेक्ट रिपोर्ट केले. सरकार दरबारी जागा मिळवण्यासाठी धडका मारणे सुरू झाले. दोन एकर जागा मंजूर झाली. पण गावकरी काम करू देईनात. अनेक अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. जमीन वादात पडली, ती सोडवताना नाकी नऊ आले. प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च दिवसामागे वाढत होता. मुलींचा दररोजचा जेवणाखाण्याचा, राहण्याचा खर्चदेखील चालूच होता. पण पावले पुढे पुढे पडत होती. अनेक संस्था मदतीस येत होत्या.

_Sakina_Bedi_2.jpgशाळेची आधुनिक इमारत उभी राहिली आहे. पूर्वीच्या जागेचे वसतिगृहात रुपांतर पूर्णतः झाले आहे. शाळा आणि सध्याचे वसतिगृह यांत अंतर असल्याने रोटरीच्या मदतीतून बसची कायमस्वरूपी सोय झाली आहे. वाहत्या रस्त्यावरून मुली चालत न्यायच्या ही रिस्क होती. ‘रोटरी क्लब’तर्फे शाळेत इंटरअॅक्ट क्लब सुरू केला आहे तो क्लब मुलीच चालवतात. त्यांना त्या माध्यमातून संस्था चालवण्याचे संस्कार मुली घेतात. शाळेच्या नव्या इमारतीत कम्प्युटर आले, राज्यातील सगळ्यात मोठा ब्रेल प्रिंटर आला. पाचवी ते दहावीच्या मुली लॅपटॉप सहज वापरतात.

लाखो रुपयांचे बजेट असलेला विद्यालय व वसतिगृह अशा ह्या प्रकल्पातील विद्यालयाचे डिझाइन अंध मुली इमारतीत अडथळ्याविना सहज वावरतील असे केले गेले आहे. सर्व सोयींनी युक्त असे ते विद्यालय आणि त्याला जोडून वसतिगृह होणार आहे. सध्या विद्यालय पूर्ण झाले आहे आणि ग्राउंड + 2 मजले. वसतिगृहाच्या एकूण बजेटपैकी साठ टक्के रक्कम दात्यांकडून मिळाली आहे. त्या रकमेतून इमारतीचे RCC वर्क आणि तळमजल्याच्या ब्रिकवर्कचे काम झाले आहे. सकिना दात्यांना इमेल पाठवून, फोनवर बोलून आवाहन करते. लोक मदत करतात. सकिना कोणाही दात्याने मदतीचा चेक देतो असे सांगितले, की स्वत: तिच्या मदतनीसासह चेक घेण्यास येते. सविता गायकवाड हिचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपुरा होईल. सविता सकिनाची या कार्यात सावलीसारखी पाठराखण गेली अठरा वर्षें करत आहे. जेथे जेथे सकिना ‘जागृती’च्या कामासाठी जाते, सविता तिचे डोळे बनून तिला तेथे घेऊन जाते.

शाळेतून अनेक मुली SSC होऊन, गेल्या वीस वर्षांत बाहेर पडल्या आहेत. त्यातील काही मुली पदवीधर झाल्या व बँकिंग, इन्शुरन्स, शिक्षण या क्षेत्रांत त्यांचा ठसा उमटवत आहेत. अंजना काळे आणि प्रतिभा सानप या विद्यार्थिनी बँकेत नोकरी करतात. जिना नावाची मुलगी एअरपोर्टवर स्वत:चे स्पा चालवते. ही नावे वानगीदाखल आहेत. अशा अनेक मुली विविध क्षेत्रांत त्यांचे भविष्य घडवत आहेत. शाळेचा निकाल शंभर टक्के असतोच, पण यंदा सीमा खरात या विद्यार्थिनीस अठ्ठ्याण्णव टक्के आणि साक्षी अमृतकर हिला त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळाले. तीर्थक्षेत्र असलेल्या ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदीत ‘जागृती’ नावाचे शिक्षणक्षेत्र आहे व ते ज्ञानक्षेत्र म्हणून घडत आहे!

सकीना बेदी – 9823061133, 9890952578, sakinaiam@gmail.com

– श्रीकांत कुलकर्णी,

 

About Post Author

Previous articleविलास व स्वाती पोळ – भारताचा अभिमान
Next articleहरितायन – वृक्षराजीचा अनवट आनंद प्रदेश!
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143

1 COMMENT

Comments are closed.