ही कथा आहे एका ध्येयवेड्या माणसाची. त्याने पाहिलेल्या स्वप्नाची. ती कथा त्या माणसाची (एका व्यक्तीची) न राहता, त्याच्या तीन पिढ्यांची आणि सध्या वाढत असलेल्या आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ व अशोकवन अशा चौफेर नवनिर्मित समाजाची आहे. त्या ध्येयवेड्या माणसाचे स्वप्न प्रत्येक माणसाला न्याय, निरोगी, समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे होते. ते सुरू झाले कुष्ठरोग्यांपासून; पण त्या कार्यात अपंग, कर्णबधिर, अंध आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांचा समावेश होत गेला आहे.
‘आनंदवन’ ही एक प्रकृती आहे. दुसऱ्याची वेदना जाणून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारी माणसे तेथे आहेत. त्यांचा ध्यास स्वतःच्या वेदनांवर मात करून नवनिर्माण करण्याचा आहे. ते पुस्तक वाचताना जाणवते.
बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. विकास, डॉ. प्रकाश आणि त्यांच्या कार्याशी तादात्म्य पावणाऱ्या सुना; एवढेच नव्हे, तर बाबांच्या डॉक्टर झालेल्या नाती व सी.ए. झालेले नातू हे सर्व त्या प्रकल्पाचे घटक झाले आहेत, होत आहेत.
हे घडले कसे आणि घडत आहे कसे त्याची ओळख व्हावी, माहिती मिळावी असे वाटत असेल तर त्याने हे पुस्तक वाचावे; नव्हे, ज्याला जीवनात कोठल्याही वेदनेला तोंड देऊन जगण्याचे सामर्थ्य हवे असेल त्याने हे पुस्तक वाचावेच वाचावे. वाचणाऱ्याला पुस्तकात वाट दिसेल असा माझा विश्वास आहे. हे पुस्तक रहस्यमय पुस्तकासारखे वाचनीय झाले आहे!
माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत. त्यामुळे माणूस हा एकच संभाव्य प्राणी त्यासंबंधीच्या कोणत्याही प्रयोगासाठी उरतो, म्हणून आजवरच्या आरोग्य विषयक संशोधनात कुष्ठरोगावर लस तयार होऊ शकली नाही. पण कुष्ठरोग्यांना माणुसकीचे जीवन जगण्याचा हक्क आहे! तो ध्यास घेतलेल्या बाबांनी त्यांच्या स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू प्रयोगाखातर टोचून घेण्याची तयारी दाखवली. प्राध्यापकांनी त्या वेड्या साहसाला नकार दिला. तेव्हा बाबांनी स्वतः ते करून पाहिले. लोकांच्या भल्याकरता कार्य करणाऱ्या ख्रिस्ताला लोकांनी मारले, पण बाबा कुष्ठरोग्यांच्या प्रेमापायी विषाचा प्रयोग स्वतःवरच करते झाले! ते धैर्य देव न मानणाऱ्या देव माणसाचे! तो अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक नागरिकाने वाचावे.
बाबा 1939 पूर्वी वकिली करत होते. त्यांना वकिली करून पैसा मिळवण्यात रस वाटला नाही. कारण गुन्हेगारांचे संरक्षण करणारे वकील खोऱ्याने पैसा ओढतात. पण कोणीच गरिबांची वकिली करण्यास पुढे येत नाही. शिवाय, एखादा वकील पंधरा मिनिटांच्या बडबडीचे पन्नास रुपये फी आकारतो आणि त्याच वेळी बारा तास काम करणाऱ्या मजुराला बारा आणे मजुरी मिळत नाही अशी स्थिती त्यावेळी होती व आकडे बदलले असले तरी आजही आहे. ती सामाजिक विसंगती बाबांना अस्वस्थ करत होती. तरुणांना ध्येयशील बनवण्याकरता हे पुस्तक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचन म्हणून लावावे.
विकास आमटे यांचे ‘आनंदवन प्रयोगवन’ हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख होऊन शहाणे होण्यास मदत करते. रवींद्रनाथ टागोर यांचा एक उपदेश आहे, “जीवन हे देवाचे दान आहे, त्याचे जेवढे दान कराल तेवढे मोल वाढेल.” तोच संदेश हे पुस्तक देत आहे.
पुस्तकाचे नाव – आनंदवन प्रयोगवन
लेखक – विकास आमटे
प्रकाशन – समकालीन प्रकाशन
पृष्ठ संख्या – 192
किंमत – 250.00 रुपये
– अतुल अल्मेडा
atulalmeida@yahoo.co.in