महाजन पिता-पुत्रांची झगड्या नाल्याशी लढाई

3
47
_MahajanPita-Ptranchi_ZagdyaNalyashiLadhai_5.jpg

धुळे जिल्हा-तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी राजधर झुलाल महाजन आणि निमेश राजधर महाजन या पितापुत्रांनी शेताच्या मधोमध असलेल्या झगड्या नाल्यातून वाहणाऱ्या वेगवेड्या पाण्याला बांध घातला; ते रांगते केले; रांगते पाणी थांबते केले आणि थांबते पाणी जिरते केले! महाजनांची शेती नाल्याच्या दोन्ही काठांवर आहे. झगड्या नाला शेतीचे नुकसान दरवर्षी करून त्याचे नाव सार्थ करत असे. परंतु महाजन पिता-पुत्रांनी केलेली नाल्यावरील उपाययोजना त्यांच्याच नव्हे, तर शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे जलदारिद्र्य घटवण्यास निमित्तमात्र ठरली आहे.

खानदेशात पाडळदा नावाची गावे आणखी काही आहेत आणि त्या प्रत्येकाला स्वतंत्र अशी ओळख आहे. तथापी, धुळे तालुक्यातील पाडळदा गावाला स्वतःची अशी ओळख नव्हती. महाजन पितापुत्रांच्या कामगिरीमुळे पाडळदा गावही जून 2016 पासून चर्चेत आले आहे. राजधर आणि निमेश या पितापुत्रांनी त्यांच्या मालकीच्या शेतातील वेगवेड्या नाल्याला नियंत्रित करण्यासाठी जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग राबवले. मीडिया प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या फेऱ्या गावात वाढल्या आहेत.

धुळे, शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर या चार तालुक्यांचा समावेश धुळे जिल्ह्यात होतो. त्यांपैकी शिरपूर वगळता इतर तीन तालुके ‘अवर्षणप्रवण’ आहेत. त्या तीन तालुक्यांचे क्षेत्रफळ चार हजार सातशेत्र्याऐंशी चौरस किलोमीटर असून ते जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 58.13 टक्के आहे. तीन तालुक्यांमध्येही दुष्काळाचे वेगवेगळे स्तर कमीअधिक तीव्रतेनुसार आहेत. धुळे तालुक्यात लळींग किल्ला ते डोंगराळे-गाळणे किल्ल्यापर्यंतचा पट्टा दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असलेला आहे. त्या डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेली लळींग, रावेर, सडगाव, अजनाळे, बल्हाणे, पाडळदा, डोंगराळे-गाळणे ही गावे खडकाळ माळरानावर वसलेली आहेत. त्यांना लगतच्या डोंगररांगांवरून ओढे-नाल्यांतून वेगाने वाहून येणारे पाणी उपकारक ठरण्यापेक्षा अपायकारकच ठरते! धुळे शहराला पाणी पुरवठा डेडरगाव, नकाणे आणि हरण्यामाळ हे तलाव करतात. ते नाले त्याच ओढे-नाल्यांतील पाण्याने भरतात.

पाडळदे येथे राजधर महाजन यांची वडिलोपार्जित शेती छत्तीस एकर आहे. दोन नाल्यांमुळे त्या शेतीचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन झाले आहे. त्यांपैकी झगड्या नाल्यावर जिल्हा परिषदेमार्फत एक बंधारा सुमारे तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे.परंतु बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने बंधाऱ्यात एकही थेंब पाणी थांबत नव्हते. येणाऱ्या व जाणाऱ्या पाण्याकडे महाजन पितापुत्र बघत राहायचे. हे पाणी कसे थांबवावे ह्याचा विचार महाजन पितापुत्र करायचे. बंधाऱ्यासाठी संपादित करण्यात आलेली जमीन महाजन कुटुंबाचीच होती. त्यांनी त्यासाठी मोबदला त्यावेळी घेतला नव्हता. झगड्या नाल्याचे पात्र वर्षानुवर्षें गाळ साचल्यामुळे उथळ झाले होते. बंधाऱ्याच्या खिडक्याही वाहून गेल्या होत्या. भिंतींना तडे पडले होते. सांडवा वाहून गेला होता. दूर डोंगरावरून प्रचंड वेगाने येणारे पाणी पावसाळ्यात माती वाहून नेत असे. बंधाऱ्याची दुरुस्ती जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यामार्फत करण्यात यावी यासाठी महाजन पितापुत्रांचा पाठपुरावा चार-पाच वर्षें सुरू होता. बंधाऱ्याचे मोजमाप अनेक वेळा झाले. दुरुस्तीचे एस्टिमेट पाच वेळा तयार झाले. सर्वेक्षण झाले. मात्र काम प्रत्यक्ष सुरू झाले नाही. ढिम्म यंत्रणेला पाझर काही फुटला नाही! दुष्काळाची तीव्रता 2015 साली जरा अधिक होती. राजधर महाजन यांनी एक क्विंटल हरभऱ्याची लागवड केली होती. साधारण दहा क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात जेवढे पेरले तेवढे जेमतेम हाती आले. महाजन पितापुत्र हबकले, पण ते वेळीच सावरले. राजधर आणि निमेश यांना वाचनाची आवड आहे. त्यांना ते शेती आणि सिंचन यांविषयक नियतकालिकांचे नियमित वर्गणीदार असल्यामुळे नवनवीन प्रयोग ज्ञात आहेत.

महाजनांची शेती खडकाळ माळरानावर आहे. त्यांची जमीन चढउतारामुळे सलग-सपाट कोठेही नाही. पाणी काही ठिकाणी साचते तर पाणी काही ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यांनी संपूर्ण शेतजमिनीचे सपाटीकरण (लेव्हलिंग) करण्यासाठी मार्च 2016 मध्ये साताऱ्याकडील मंडळींना कंत्राट दिले. त्याच वेळी झगड्या नाल्यातील गाळ काढून शेतात टाकला. दोन हजार दोनशे ट्रॅक्टर गाळ निघाला. नाला खोल झाला! परिसरातील शेतकरी येत, चौकशी करत. राजधर महाजन यांनी सत्तर हजार रुपये खर्च करून पाच आडवे प्रेशर बोअर खोदले. पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. कामास गती आली.

झगड्या नाल्यातील गाळ काढत असताना बंधाऱ्याच्या भिंतीलगत सुमारे वीस ते तीस फूट खोलीकरण करण्यात आले. बंधाऱ्याच्या मुख्य भिंतीची डागडुजी करण्यात आली. दगडगोटे वापरून त्यावर पांढऱ्या मातीचा लेप बंधाऱ्याच्या भिंतीवर चढवण्यात आला. नाल्याच्या उर्वरित भागात गाळ काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना पांढऱ्या मातीचा थर असलेला पट्टा आढळला. चुनखडी, सिमेंट यांपेक्षा चिवट आणि पाणी धरून ठेवणारी पांढरी माती. तिचा उपयोग बंधाऱ्याची डागडुजी करण्यासाठी झाला. पांढऱ्या मातीवर पुन्हा जवळपास एक फुटाचा काळ्या मातीचा स्तर चढवण्यात आला. वेगाने येणाऱ्या पाण्याचा पहिला तडाखा काळ्या मातीवर बसेल, नंतर पांढऱ्या मातीवर. गळती होऊन पाणी वाहून जाणार नाही यासाठी काळजी घेण्यात आली.

झगड्या नाल्याच्या उर्वरित भागात विशिष्ट अंतरावर जंपिंग खड्डे करण्यात आले. जंपिंग खड्डे म्हणजे जहाजाच्या आकाराचे खड्डे. मध्यभागी खोल आणि दोन्ही बाजूंस निमुळते. जंपिंग कोराव्यांच्या (नाल्यामध्ये माती-गाळ अडवण्यासाठी केलेली दगडांची रचना) तोंडावर दगडाचे पिचिंग लावण्यात आले. त्यामुळे नाल्याच्या पाण्यासोबत वाहून येणारी जमिनीवरील सुपीक माती पाण्याबरोबर न वाहता फक्त पाणी पुढील आऊटलेटमधून प्रवासाला निघते. त्यामुळे प्रवाह नियंत्रित होतो. त्यामुळेच मुख्य बंधाऱ्याजवळ गाळ साचण्याचे प्रमाण घटते व क्षमता वाढते.

बंधाऱ्याच्या भिंतीलगत वीस ते तीस फूट खोलीकरण करण्यात आले. नाल्याच्या उर्वरित भागात साताठ फूट रुंद कोरण्यात आले, तर दहा ते पंधरा फूट खोलीकरण करण्यात आले. झगड्या नाल्याने महाजन यांच्या शेताचा सुमारे पाच एकरांचा परिसर अंकित केला आहे. नाला पुढील टप्प्यात अरुंद होत जातो. बांधाजवळ साचलेले पाणी सुमारे एक एकर आकाराच्या शेतीच्या तुकड्यात वळवण्यात आले. शेततळ्याची नैसर्गिक निर्मिती त्या निमित्ताने झाली. वाहून जाणारे पाणी त्या छोट्या बंधाऱ्यामुळे अडवले गेले. अडवलेले पाणी शेततळ्यात साठवले गेले. ट्रॅक्टर बार लावून शेततळ्याचे खोलीकरण करण्यात आले. शेततळे पंचवीस-तीस फूट खोल असून त्या ठिकाणचा लोण्यासारखा मऊ गाळ शेतात टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेततळ्यात कापड अंथरण्यात आलेले नाही. शेतातील छोटा पाझर तलाव असे त्या शेततळ्याचे स्वरूप आहे. तो प्रयास शेतातील नाल्यातून वाहून जाणारे पाणी अंशतः शेततळ्याकडे वळवून भूपृष्ठावर जलसाठा तयार करण्याचा आहे.

शेततळ्याच्या नजिक जुनी विहीर आहे. त्या विहिरीतील गाळदेखील काढण्यात आला. सुमारे पन्नास फूट खोलीकरण करण्यात आले. विहिरीत तीन आडवे बोअर खोदण्यात आले. झगड्या नाला जूनमध्ये झालेल्या पहिल्याच पावसामुळे भरभरून वाहिला. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतात Compartment Budding बांधबंदिस्तीकरण योजना राबवण्यात आली. बांधबंदिस्ती करणामुळे शेताच्या उतारावर चर खोदून त्यात वाया जाणारे पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे शेतातील पाणी शेतातच जिरवून उर्वरीत पाणी चराद्वारे नाल्यात वळते केले. तेथील माळमाथा भागात बांधाच्या किनाऱ्यावर पीक लावल्यामुळे कापसाचे व तुरीचे खोड यांची शेतातील इतर रोपांपेक्षा जास्त वाढ होऊन विनाखताचे भरघोस उत्पन्न आले. पाणी बांधबंदिस्तीमुळे अडवले गेले होतेच. पाणी थांबल्यामुळे विहिरींची पातळी वाढली. केवळ महाजन यांच्या शेतातील नव्हे तर शिवारातील पन्नास-साठ विहिरी जिवंत झाल्या! विहिरीतील पाण्याचा उपसा इलेक्ट्रिक मोटर बसवून करण्यात येतो. ते पाणी पाईप लाईनच्या माध्यमातून शेतात दूरदूरपर्यंत चौफेर फिरवण्यात आले आहे.

झगड्या नाल्याचे एरव्ही वाहून जाणारे पाणी तीन पद्धतींनी बंदिस्त करण्यात आले. मुख्य बंधाऱ्याची स्वखर्चाने डागडुजी करण्यात येऊन गळती थांबवण्यात आली. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येऊन साठवणक्षमता वाढवण्यात आली. ते पाणी नवीन दगड-मातीचा बंधारा उभारून शेततळ्यात वळवण्यात आले. शिवाय, विहिरीचे खोलीकरण करण्यात येऊन साठवणक्षमता वाढवण्यात आली. विहिरीच्या वरील भागातील नाल्यावर छोटे छोटे बंधारे ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. बंधारे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यामुळे दिसत नाहीत. महाजनांनी त्यांच्या शेतात पडणारे पाणी त्यांच्याच शेतात कसे राहील याची तजवीज केली आहे. त्या प्रयोगांचा फायदा एकदा पावसाने एकदीड महिना दडी मारली त्यावेळी झाला. सोयाबीनचे पीक जमिनीत ओलावा वाढला असल्यामुळे टिकून राहिले. बाजूच्या मातीत तूर पेरण्यात आली. तुरीचे पीक डोलताना दिसते.

शेतात ठिकठिकाणी सुमारे तीनशे नवीन वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, निंब आणि महुगुणी (ऑस्ट्रेलियन साग) वृक्षांची लागवड करण्यात आली. महाजन पितापुत्रांनी या वृक्षांसाठी ड्रीप करून पाणीपुरवठ्याची नीटनेटकी व्यवस्था केली आहे. महाजनांचा खर्च त्या सर्व कामासाठी सुमारे दहा लाख रुपये झाला. महात्मा गांधी जलभूमी अभियानांतर्गत गाळ कोरण्याच्या डिझेल खर्चापोटी महाजन यांना पंचायत समितीने अठ्ठयाहत्तर हजार सातशेएकोणसत्तर रुपये अदा केले. तेवढाच शासकीय सहभाग या कामात लाभला. ही मोहीम राबवताना महाजन पितापुत्रांना तांत्रिक मार्गदर्शन लाभले, ते पंचायत समितीचे लघुसिंचन विभागातील शाखा अभियंता ए.बी. पाटील यांचे. त्यांनी काम सुरू असताना अनेक वेळा भेट देऊन महाजनांचा हुरूप वाढवला.  तसेच जिल्हा कृषी अधिकारी सांगळे, मंडळ कृषी अधिकारी पवार, तेले, अमोल पाटील, तसेच जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत व गोपाळ साळुंखे यांचे सहकार्य लाभले. या कामामागील मुख्य प्रेरणा ही आध्यात्मिक आहे असे राजधर महाजन यांचे म्हणणे आहे. महाजन कुटुंबीय श्री अनिरुद्ध उपासना केंद्राशी निगडित आहे. अनिरुद्धाज युनिव्हर्सल बँक ऑफ रामनामच्या वह्या भूमातेला अर्पण व नामपत्राचे हवन याच ठिकाणी गेल्या वर्षी करण्यात आले. त्याचा प्रसाद म्हणून जलगंगेने एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर्शन दिले, असे महाजन यांना वाटते.

राजधर महाजन यांचे 8मार्च 2018 रोजी मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निमेश त्यांची आश्रमशाळेतील शिक्षकाची नोकरी सांभाळून शेती वाढवतात. ते म्हणाले, की जलसंवर्धनाची उपाययोजना केल्यामुळे उत्पन्न गेल्या दोन वर्षांत चौपट वाढले. शेततळे पाण्याने भरलेले असतेच व त्यामुळे आजुबाजूच्या पंचवीस-तीस विहिरीदेखील पाणी देतात. नाल्यातील गाळ शेतात टाकल्यामुळे शेतीला खत देण्याची गरज राहिली नाही. अजून आठ वर्षें तरी शेतीला खत लागणार नाही.

निमेश राजधर महाजन  9423541641
सुयोग कॉलनी, साक्री रोड, महिंदळे शिवार, धुळे.

– संजय झेंडे

About Post Author

Previous articleनापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग
Next articleकै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679

3 COMMENTS

  1. अतिशय प्रेरणादायी कार्य,इतर…
    अतिशय प्रेरणादायी कार्य,इतर शेतकर्र्यांंना मार्गदर्शक,पाणी अडल्याशिवाय पाडळदे,बल्हाणे व सडगाव परिसरातील स्थलांंतर थांंबणार नाही.
    निमेश महाजन सरांंच्या भगीरथ प्रयत्नांंना सलाम!!

  2. बहुआयामी व प्रशंसनीय कार्य।
    बहुआयामी व प्रशंसनीय कार्य।

Comments are closed.