भारतात पहिला छापखाना गोव्याला 1556 मध्ये आला. तेथून भारतात मुद्रणयुग अवतरले. भारतीय भाषांतील मजकूर रोमन लिपीत छापण्याचे काम सुरू झाले. फादर स्टीफन्स यांचा ‘ख्रिस्तपुराण’ हा मराठी ग्रंथ 1616 मध्ये रोमन लिपीत छापला गेला. विल्यम कॅरे यांचे ‘A Grammar of the Mahratta Language’ हे पुस्तक म्हणजे ‘देवनागरी मुद्राक्षरे वापरून छापले गेलेले पहिले मराठी पुस्तक’ होय. ते 1805 मध्ये कोलकात्याजवळ श्रीरामपूर (सेरामपूर) येथे प्रकाशित झाले. पण शरद गोगटे यांनी मिरज आणि तंजावर येथे 1805 मध्येच झालेल्या देवनागरीतील ग्रंथमुद्रणाची माहिती दिली आहे (पुस्तक – मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षें). ‘बालबोधमुक्तावली’ हे पुस्तक तंजावरच्या ‘नवविद्याकलानिधी’ मुद्रणालयात छापले गेले, तर श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकांचे तांब्याचे ठसे करून, लाकडी मुद्रणयंत्र वापरून लाखी शाईने गीतेच्या दोनशे प्रती मिरजेला छापल्या गेल्या. त्यामागे नाना फडणीस यांची प्रेरणा होती.
गणपत कृष्णाजी पाटील यांनी मराठी मुद्रण-प्रकाशनाची मुहूर्तमेढ 1831 मध्ये रोवली. त्यांनी ‘पंचांग’ छापले आणि विशेष म्हणजे छपाईसाठी गाईच्या तुपातील शाई तयार केली! देशी भाषांतून लिहिलेल्या पुस्तकांना पारितोषिके देण्याची योजना ‘हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी’तर्फे 1825 मध्ये जाहीर झाली. ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ 1851 मध्ये स्थापन झाली. त्यांच्याकडून ग्रंथप्रकाशनाला आर्थिक सहकार्य मिळू लागले.
न्यायमूर्ती म.गो. रानडे यांच्या पुढाकाराने 1870 ते 1880 या दरम्यान सुरू झालेले सार्वजनिक उपक्रमही ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन देणारे होते. त्यातील ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ (आजची ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’, पुणे) आणि ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’ (आजचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’) हे उपक्रम विशेष महत्त्वाचे ठरतात.
ग्रंथ म्हणजे ज्ञानार्जन, ज्ञानसंकलन, ज्ञानसंक्रमण यांचे माध्यम. सुरुवातीच्या काळात ग्रंथाचे ते महत्त्व ओळखून काही प्रकाशकांनी मुद्रक, नियतकालिकाचे संपादक यांबरोबरच लोकशिक्षक म्हणूनही भूमिका बजावली. तर काही लेखकांनी स्वत:चे प्रकाशनाचे कामही केले. ग्रंथव्यवहारामध्ये ग्रंथकाराबरोबर प्रकाशक, मुद्रक, चित्रकार, विक्रेते, ग्रंथपाल, ग्रंथसंग्राहक आणि वाचक अशा इतरांचा समावेश असतो. मात्र मराठीत लेखककेंद्री विचार जास्त प्रमाणात होतो. इतर घटकांचाही विचार व्हायला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचा प्रसार, विविध सामाजिक चळवळीमुळे आलेली जागरुकता, नवलेखक अनुदान योजना आदींमुळे ग्रंथनिर्मितीला वेग येत गेला. नवसाक्षर वर्गातून नवा वाचकवर्गही मिळत गेला. वाचन हा छंद जोपासणारे काही लोक दिसतात. मात्र वाचनाकडे केवळ व्यक्तिगत छंद म्हणून न पाहता ‘सामाजिक अभिसरणाचा घटक’ म्हणूनही पाहण्यास हवे. ‘वाचक’ या घटकाचा जिज्ञासायुक्त, डोळस ‘रसिक’ या पदावर अधिकार सांगता येईल अशा स्वरूपात विकास करण्यासाठी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. अभिरुची आणि ग्रंथनिर्मिती यांचा संबंध अन्योन्य स्वरूपाचा असतो. मराठी वाचकवर्गाच्या जिज्ञासाक्षेत्राचा विकास जितक्या विविध अंगाने होईल, तितके ग्रंथनिर्मितीला पोषक वातावरण तयार होईल. ग्रंथ ‘ई बुक’ या रूपातही आकार घेत आहे. तरुण वर्ग ई-वाचनाकडे वळत आहे. ग्रंथनिर्मितीचे स्वरूप तंत्रज्ञानाचा प्रभाव असलेल्या या युगात बदलणे स्वाभाविक आहे.
– नीलिमा गुंडी