जलसाक्षरतेच्या जाणिवा तीक्ष्ण करणारे जल साहित्य संमेलन

4
35
_JalsakshartechyaJaniva_TikshanKarnare_Carasole

धुळे म्हणजे खानदेशची सांस्कृतिक राजधानी. लगतच्या जळगाव आणि नाशिक या शहरांमध्ये आर्थिक संपन्नता व भौतिक साधनांची रेलचेल आढळते. धुळ्याच्या वाट्याला त्या शहरांना लाभलेली समृद्धीची झळाळी कधी आली नाही. मात्र शहरात साधना झाली ती ज्ञानप्राप्तीची, निर्मिती झाली ती संशोधन संस्थांची आणि उभारणी झाली ती दुर्मीळ ग्रंथांनी समृद्ध असलेल्या संग्रहालये व ग्रंथालये यांची. स्वाभाविकच, धुळ्याची ओळख संशोधक, धर्मचिकित्सक, शिक्षणप्रेमी, अभ्यासक, स्वातंत्र्यसेनानी, आंदोलक, साहित्यिक यांच्या पसंतीचे शहर अशी होत गेली आहे. ती परंपरा क्षीण झाली. शहर जातीय दंगली आणि गुन्हेगारी टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्ष यांमुळे मधल्या काळात सतत चर्चेत राहिले. त्या घटनांमधील वारंवारता शहराचा सांस्कृतिक चेहरा काळवंडण्यास कारणीभूत ठरली.

अकरावे जलसाहित्य संमेलन त्या पार्श्वभूमीवर 20  व 21 जानेवारी 2018 रोजी शहरात भरले होते. त्याआधी, 1944 मध्ये मामा वरेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी संमेलन धुळ्यात झाले! त्यानंतर तब्बल त्र्याहत्तर वर्षांनी राज्यस्तरीय व्याप्ती असलेले साहित्य संमेलन धुळयात झाले!

धुळे शहर पांझरा नदीच्या दुतर्फा वसले आहे. ती नदी धुळे जिल्ह्याच्या चारपैकी तीन तालुक्यांची जीवनरेखा आहे. सिंचनाच्या प्राचीन फड पद्धतीचे अवशेष पांझरेच्या उपखो-यात आढळतात. संमेलन स्थळाला `देशबंधू गुप्ता नगरी` असे नाव देण्यात आले होते. अकरावे जल साहित्य संमेलन उत्साहात झाले. संमेलनाच्या दोन दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये पाण्याशी संबंधित अनेकविध पैलूंवर चर्चा झाली. पाण्याची गुणवता, प्रदूषण, साठवणूक, जपणूक, काटकसरीने वापर आणि जलविज्ञानापासून पाण्याच्या अर्थशास्त्रापर्यंत विषय हाताळले गेले. `खानदेशातील जलसंस्कृती` या सत्राच्या निमित्ताने त्या भूमीतील जलपुरुषांनी उभारलेल्या कार्याचा परिचय उपस्थितांना झाला.

धुळ्यातील जल कार्यकर्त्यांना बांधून ठेवणा-या  मुकुंद धाराशिवकर यांच्यासारख्या जलनायकाची उणीव संमेलनात जाणवत होती.

‘देशबंधू गुप्ता फाउंडेशन’सारख्या ग्रामीण विकासासाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थेचे प्रायोजकत्व लाभले.

पाणी हे जीवन आहे असे सर्वजण सतत म्हणत आलेले असले तरी पाण्याला सेलिब्रिटीचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. फाउंडेशनच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांच्या अमलबजावणीच्या निमित्ताने जोडले गेलेले सरपंच, ग्रामीण भागात काम करणारे कार्यकर्ते दोन दिवस संमेलनात समरसून सहभागी झाले. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या स्थानिक शाखेतील सदस्यांमध्ये प्राध्यापक मंडळींची संख्या चांगली आहे. त्यांच्या प्रयत्नाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे तसेच एम.बी.ए. व अभियांत्रिकी या व्यावसायिक विद्याशाखांचे विद्यार्थी सहभागी झाले. पाटबंधारे विभागातील अभियंतेदेखील प्रेक्षकांमध्ये होते. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा सहभाग रीतसर शुल्क भरून व नोंदणी करून होता. व्यासपीठाला लाभलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श व कलात्मक पद्धतीने करण्यात आलेली सजावट सुखावह वाटत होती. संमेलनाचे उद्घाटन व समारोप; तसेच, दोन दिवसांतील सर्व सत्रांना प्रसारमाध्यमांनी स्थानिक आवृत्त्यांमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. मात्र बहुतेक वृत्तपत्रांच्या धुळे जिल्ह्याबाहेरील अन्य आवृत्त्यांमध्ये अकरावे जलसाहित्य संमेलन झळकले नाही. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाच्या विविधांगी पैलूंवर तज्ज्ञांसमवेत झालेली चर्चा धुळ्यापुरती मर्यादित राहिली!  त्यामागे ग्लोबलायझेशनच्या युगात वृत्तपत्रांचे ‘लोकलायझेशन’चे प्रेम आहे, की एखाद्या विषयाची व्यापकता लक्षात न येण्याचे वैचारिक दारिद्र्य! हा शोध घेण्याचा विषय होऊ शकतो. पुण्याच्या अभिजित टिळक आणि त्यांचा चमू यांनी सर्व सत्रे त्यांच्या सीबीपी इंडियाच्या माध्यमातून लाइव्ह प्रक्षेपित करून डिजिटल विश्वात पोचवली.

जलसाहित्य संमेलन राजकारणापासून अथवा राजकीय व्यक्तींपासून दूर ठेवण्याचा प्रघात आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार कुणाल रोहिदास पाटील यांनी गेल्या सात-आठ वर्षांपासून धुळे तालुक्यामध्ये वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी तज्ज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञाच्या मदतीने त्यांनी सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामदेखील सुरू केले आहे. त्या कामाचे दृश्य परिणाम समोर येत आहेत. त्यांच्या त्या कार्याची दखल घेत, त्यांना या वर्षीचा जलनायक पुरस्कार संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माधव चितळे, दि. मा. मोरे आणि दत्ता देशकर यांच्यासारख्या पाणीमय झालेल्या ज्येष्ठांची पूर्णवेळ उपस्थिती संमेलनात होती. चितळे यांचे संमेलनात असणे, वावरणे आणि त्यांचे बोलणे ऐकणे हा सुखदायी सोहळाच होता. त्यांनी भविष्यातील जलसाहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने दिशादिग्दर्शन केले.

धुळ्याच्या जलसाहित्य संमेलनात ठराव संमत झाले. त्या ठरावांचा बाज जरा वेगळा आहे. पांझरा बारमाही आणि फड पद्धतीच्या बंधा-यांना जागतिक वारसा देण्याचा विषय मार्गी लावण्यासाठी शासनाकडून अपेक्षा व्यक्त करणारा ठराव समारोप समारंभात संमत करण्यात आला. त्यासाठी नेटाने पाठपुरावा केला तर तो विषय मार्गी लागण्यास मदत होईल. मात्र सर्व अपेक्षांची जबाबदारी एकट्या शासनावर ढकलण्याचा प्रयत्न भारतीय जलसंस्कृती मंडळाने केलेला नाही. स्थानिक व परकीय भाषांमध्ये उपलब्ध असलेले पाणी प्रश्नांसंबंधीचे साहित्य अनुवादित करून ते समाजापर्यंत पोचवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस भारतीय जलसंस्कृती मंडळाने व्यक्त केला आहे. त्याशिवाय तापी नदीवर उभारण्यात आलेल्या प्रकाशा, सारंगखेडा आणि सुलवाडे बंधा-यांमध्ये साठवण्यात आलेली पाणी वापरण्याची पद्धत सुचवण्यासाठी जी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल, त्यास सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे. सर्व विद्यापीठांतून पाण्याचे आयोजन, नियोजन व संयोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्यासंबंधीच्या व जलसाक्षरतेसारख्या विषयांचा समावेश करावा अशी ठरावाद्वारे मागणी करतानाच अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी भारतीय जलसंस्कृती मंडळ पुढाकार घेईल असे अभिवचनदेखील देण्यात आले आहे.

पाणी वितरण व्यवस्थेसाठीच्या भांडवली खर्चाची वसुली, पाण्याची गुणवत्ता, पशुधनासाठी देखील शुद्ध पाण्याचा पुरवठा, पाण्याचा पुनर्वापर, कुरण विकास, शेतीला नळ प्रणालीद्वारे पाणीपुरवठा या विषयांवर झालेले मंथन उपस्थितांच्या जाणिवा सजग करणारे आहे. प्रबोधनाचा टप्पा या जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने अंशत: यशस्वी झाला असे म्हणता येईल. मात्र हे यांस संघटित स्वरूप देऊन यादृष्टीने सक्रियता वाढवण्याची जबाबदारी आता स्थानिक मंडळींची आहे.

– संजय झेंडे

About Post Author

Previous articleआता नजर जळगाव विद्यापीठावर
Next articleजावळविधीचा संस्कार
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679

4 COMMENTS

  1. पांझराकाठ बचाव समिती पिंपळनेर मोतीलाल पोतदार

    धूळे येथे हे जल साहित्य…
    धूळे येथे हे जल साहित्य संमेलन भरल्यामूळे जिल्ह्यातील फड व्यवस्था पून्हा चर्चला आली.त्यामुळे पाणी नियोजना बाबत जनजागृती झाली

  2. पांझराकाठ बचाव समिती पिंपळनेर मोतीलाल पोतदार

    चांगल् काम जलसाहित्या मुळे…
    चांगल् काम जलसाहित्या मुळे जनजागृती झाली

  3. धुळ्याचा असल्याने…
    धुळ्याचा असल्याने उपक्रमाबाबत कौतुक वाटले. सातत्याने उपक्रम होणे आवश्यक.

  4. साक्रितालूक्या तीन फड बागयत…
    साक्रितालूक्या तीन फड बागयत,व फडयोजना पुर्नजिवित कराकी

Comments are closed.