त्यांचे वय अवघे एक्यांऐशी वर्षें…सहसा, ज्येष्ठ व्यक्ती त्या वयात शरीर साथ देत नसल्याने मनाने काहीशा खचलेल्या दिसतात. मात्र ते वीस वर्षांपासून पार्किन्सन्स म्हणजेच कंपवाताच्या आजाराशी लढा देत आहेत. पण त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि मनातील जिद्द कायम असल्याचे दिसून येते. एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत असो, एखाद्या विषयावरील लिखाण करणे असो किंवा पेंटिंग कॅनव्हासवर चितारणे असो ते त्या सगळ्या गोष्टी उत्साहाने करत असतात. त्या जिद्दी व्यक्तीचे नाव आहे जयंत खेर!
खेर यांचा जन्म मध्यप्रदेशमधील बडवानी या अतिशय छोट्या गावातील. त्यांचे शालेय शिक्षण खंडवामध्ये झाले आणि त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण जबलपूर येथे घेऊन, त्यांच्या करियरला सुरुवात केली. त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा दिल्यानंतर तेथे नोकरी लागली. त्यांना मुंबईसारख्या शहराची ओढ होतीच. ते त्या शहरी नोकरी निमित्ताने प्रथम येत होते. अक्षरशः दोन शर्ट आणि पँट एवढ्या कपड्यांवर मुंबईत ठेवलेले पहिले पाऊल ते या शहरात राहून स्वतःची रसिक व बँकर म्हणून निर्माण केलेली ओळख ही त्यांची खरी कमाई आहे!
वय वाढते तशा वयस्कर व्यक्ती मनाने आणि शरीराने खचल्याचे दिसते. त्यातही व्यक्तीला एखादा आजार असेल तर विचारायलाच नको. परावलंबित्व आल्यामुळे होणारी तगमग, दुसऱ्याला स्वत:चा भार पेलावा लागत आहे याचा मनावर येणारा ताण आणि एकूण परिस्थितीशी जुळवून घेताना होणारा त्रागा यांमुळे आयुष्य दिवसेंदिवस कठीण होत जाते. ती व्यक्ती अधिकच निराशाग्रस्त होते. मात्र, खेर यांनी त्या सगळ्यांवर मात करत आजाराला वैताग न मानता त्याच्याशी मैत्री केली आहे. पार्किन्सन्सने त्यांचे हात थरथरत असले, तरीही मन मात्र स्थिर आणि खंबीर आहे. त्यांनी त्यांचे वेगळे विश्व त्यांच्या अंगात जात्या असलेला रसिकपणा आणि पत्नीची उत्तम साथ यांमधून तयार केले आहे. त्यांनी आजार झाला म्हणून स्वतःला कोंडून न घेता उलट त्यांचे विश्व वेगळ्या तऱ्हेने विस्तारले आहे. या वीसेक वर्षाच्या कालावधीत त्यांनी कर्जतला एक फार्म हाऊस डेव्हलप करुन त्या ठिकाणी जवळपास सहाशे रोपांची लागवड स्वत: केली आहे. आजारी असतानाही आजही एखादी नवीन गोष्ट दिसली तरीही त्यांना ती करावीशी वाटते. बाहेर फिरावेसे वाटते. त्यामुळे शरीराचे वय वाढले असले तरी मनाने ते तरुणच आहेत.
त्यांना बँकिंग क्षेत्रातील वीस वर्षांचा तगडा अनुभव आहे, तसेच त्यांनी इतर अनेक नामांकित संस्था-संघटनांच्या जबाबदाऱ्या निभावल्या आहेत आणि त्या सगळ्यांत, त्यांनी स्वतःला कायम तरुण ठेवण्यासाठी फिरण्याचा, वाचनाचा, पेंटिंग्जचा आणि लिखाणाचा छंद जपला. तरीदेखील त्यांना वयाच्या एका टप्प्यावर पार्किन्सनने गाठले. पण जयंत यांनी त्यांची कार्यवृत्ती व रसिकता सोडली नाही. ते हात थरथरत असताना, दिवसातील कितीही वेळ दुखण्याखुपण्यात गेला तरी दहा ओळी का होईना कॉम्प्युटरवर टाईप करतात. त्यासाठी त्यांना कोणी कसली जबरदस्ती केलेली नाही वा कोणी काही सुचवलेले नाही. त्यांच्या अंगात जिद्द असल्याने काहीही झाले तरी चालेल पण मी हातात घेतलेले लिखाणाचे काम अर्धवट सोडणार नाही असा त्यांचा पणच आहे जणू!
त्यांना ते चांगले चालत-फिरत असताना, एकदा अचानक त्यांचे हात थरथरत आहेत असे जाणवले. त्यातून त्यांना ते अतिशय अवघड अशा, कधीही बऱ्या न होणाऱ्या आजाराची शिकार ठरले आहेत हे समजले. ते मान्य करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण खेर यांनी त्या सगळ्याच्या पलीकडे जात वयस्कर आणि आजारी व्यक्तींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांना केवळ पार्किन्सन नव्हे तर अन्य व्याधींनीदेखील कधी कधी त्रस्त केले आहे. कधी मोतिबिदू, हृदयाच्या तक्रारी तर कधी दातांच्या समस्या, तर कधी हाडांना लागलेला मार किंवा आणखी काही… त्यामध्ये घ्याव्या लागणार्याम औषधांमुळे परावलंबी होत आहोत याची मनाला होणारी बोच आणि तरीही आलेला दिवस उत्साहाने जगण्याची त्यांची धडपड ही अनुकरणीयच आहे. त्यांचा दिनक्रम म्हणावा तितका विशेष नसला तरीही ते आलेला दिवस ढकलावा म्हणून जगत नाहीत, तर ते जीवन प्रतिकूल परिस्थितीतही उमेदीने जगत असतात.
त्यांनी पार्किन्सन या आजाराशी मैत्री केलीच, पण त्याहीपलीकडे जात त्यांनी आजारासोबतचे त्यांचे आयुष्य चांगले आणि गुणवत्तापूर्ण कसे होईल यावर लक्ष ठेवले. त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नाही, परंतु त्यांनी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीं अचानक ब्रश हातात घेतला आणि स्वत:ला आवडेल, जमेल, रुचेल त्या पद्धतीने चित्रे काढण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणत्या रंगासोबत कोणता रंग द्यावा, काय केले म्हणजे चित्र जास्तीत जास्त चांगले दिसेल असे सगळे नियम बाजूला सारत स्वतःची अशी वेगळी शैली निर्माण केली आहे. ते अगदी कौतुकाने “मी चित्रे काढतोच पण मी रंगांशी खेळतो” असे सांगतात. “मानवाकृती काढणे मला विशेष आवडत नाही, पण मी अॅबस्ट्रॅक्ट अगदी मनापासून काढतो” असेही ते म्हणतात. त्यांनी चितारलेली चित्रे घराच्या हॉलमध्ये मांडलेली आहेत. ती चित्रेही चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीने काढली असावीत इतकी सुबक, आकर्षक आणि अॅबस्ट्रॅक्ट तरीही अर्थपूर्ण असल्याचे जाणवते.
कोणतेही शिक्षण नसताना अचानक चित्रकला आणि तीही इतकी समरस होऊन! हे कसे काय जमले असे विचारले असता ते म्हणतात, “मी अगदी तरुण असल्यापासून चित्रकलेची असंख्य प्रदर्शने आवडीने पाहिली होती. आवड तर होतीच, पण प्रत्यक्षात स्वतः चित्र काढावे अशी वेळ कधी आली नाही. पण पाहून पाहून नजरेला काय चांगले आणि काय वाईट इतके तर समजू लागले होते. आजारी पडल्यावर मन रमवण्यासाठी एकदा काढून पाहुया म्हणून एक चित्र काढले आणि मग नकळत त्यात कधी व कसा रमत गेलो ते माझे मलाच कळले नाही.” त्यांनी जवळपास पन्नासहून अधिक उत्कृष्ट अशी चित्रे काढली आहेत!
ते मुळात रसिक असल्याने फिरण्याची आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची आवडही वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी देशात आणि देशाबाहेरही फिरायला गेले असताना, जमवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींचा व कलावस्तूंचा खजिना त्यांच्या घरात पाहण्यास मिळतो. विशेष म्हणजे, त्यांनी इतक्या सगळ्या मूर्ती कधी आणि कोठून आणल्या हे त्यांच्या चांगले लक्षात आहे. अतिशय दुर्मीळ अशा त्या मूर्ती हे त्यांचे वैभव असल्याचे जाणवते. ते त्यांचा पगार सुरुवातीच्या काळात कमी असताना, त्यातील काही हिस्सा आवर्जून पेंटिंग्ज व मूर्ती खरेदी करण्यावर खर्च करत असत हे ते अभिमानाने नमूद करतात. पण त्यांची ती रसिकता वयाच्या या टप्प्यावरही कायम आहे आणि त्यामुळेच इतका असाध्य आजार होऊनही त्यांच्यातील उत्साह व जिद्द टिकून आहे. त्यांनी आजारपणातच जॉन मार्शलवरील पुस्तक लिहून पूर्ण केले. तर आता ते मॅकोलेवरील पुस्तक लिहीत आहेत. याशिवाय त्यांनी लिहीलेली वाणिज्य आणि इतर विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे मन खंबीर आणि उत्साही असेल तर आजार आणि वय यांमुळे व्यक्ती थकत नाही हेच त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर समजते.
– सायली जोशी
Inspiring story
Inspiring story
फारच मोलाचा लेख. उमेद वाढते…
फारच मोलाचा लेख. उमेद वाढते.
जयंत खेर आणि संजीवनी खेर यांना खूप शुभेच्छा.
Hats off To Dear Jayant Kher…
Hats off To Dear Jayant Kher !
Fantastic, Jayant Kher!
Fantastic, Jayant Kher!
Comments are closed.