खोटा कळवळा येऊन दुःख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात.
नक्र म्हणजे सुसर. नक्राश्रू म्हणजे सुसरीची आसवे. इंग्रजी भाषेतही Shading crocodile tears असा वाक्प्रचार आहे. तो खोटी सहानुभूती दाखवणे किंवा दुःख झाल्याचे नाटक करणे अशा अर्थानेच वापरला जातो.
सुसरीच्या डोळ्यांत तिचे भक्ष्य खाताना पाणी येते अशी समजूत त्यामागे आहे. व्यक्तीला दुःख झाले किंवा तिने दुसऱ्याला दुःख होताना पाहिले, की तिच्या डोळ्यांत पाणी येते. खरे तर भक्ष्य खाताना सुसरीलाच नव्हे तर सर्व शिकारी प्राण्यांना आनंदच होत असणार! परंतु सुसर हा एकमेव प्राणी असा आहे, की त्याच्या डोळ्यात भक्ष्य खाताना पाणी येते. त्यामुळे सुसरीच्या डोळ्यांत पाणी आनंद होत असतानाही येते यावरून ती दुःखाचे नाटक करते असा समज रूढ झाला आणि त्यावरून नक्राश्रू ढाळणे हा शब्दप्रयोग तयार झाला.
सुसरींना अश्रू येतात आणि सुसरी अश्रू निर्माणही करतात. परंतु त्यांचा भावनांशी काही संबंध नसतो. अश्रूंचे काम डोळे स्वच्छ करणे आणि कोरडे पडू न देणे हे आहे. सुसरी जेव्हा पाण्याच्या बाहेर जमिनीवर ऊन खात पडलेल्या असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. खाऱ्या पाण्यातील सुसरींमध्ये शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्याचे कामही अश्रू करतात.
सुसरी खाताना खरेच रडतात का याचा शोध २००६ साली फ्लोरिडा विद्यापीठातील माल्कम शॅनर या न्युरॉलॉजिस्टने फ्लोरिडातील सेंट ऑगस्टिन प्राणिसंग्रहालयातील सुसरींच्याच जातीतील केमन (caiman) ह्या प्राण्यांचा अभ्यास करून घेतला. त्या साठी त्याने सात केमनांचे निरीक्षण केले. त्यातून त्याला सातपैकी पाच केमन यांच्या डोळ्यांत खाताना पाणी येत असल्याचे आढळले. त्यावरून नक्राश्रू हा वाक्प्रचार वस्तुस्थितीला धरून असल्याचे सिद्ध झाले. सुसर खातेवेळी गरम हवा कवटीच्या पोकळ्यांत (sinuses) वेगाने शिरते आणि त्याचा दाब अश्रुग्रंथींवर पडतो व त्यामुळे डोळ्यांत अश्रू जमा होतात हे नक्राश्रूंचे शास्त्रीय कारण आहे.
दुसरी विशेष गोष्ट ही, की कधी कधी तोंडाचा लकवा (Bell’s palsy) बरा झालेल्या रोग्यांमध्ये एक विलक्षण लक्षण दिसून येते. खाताना त्या रुग्णांच्या डोळ्यांत पाणी येते. बोगोराड या न्यूरो-पॅथॉलॉजिस्टने ती गोष्ट प्रथम निदर्शनास आणली. म्हणून त्यास बोगोराडचा लक्षण समुच्चय (Bogorad’s syndrome) असे म्हणतात. त्यालाच बोली-भाषेत नक्राश्रू लक्षण असेही म्हणतात. अर्थात ते रुग्ण मुद्दाम ती गोष्ट करत नसतात. त्यामुळे त्यांना नक्राश्रू ढाळणे हा शब्दप्रयोग लागू होत नाही.
नक्राश्रू ढाळणे हा शब्दप्रयोग खरे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार यांवर जाहीर शोक प्रदर्शन करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनाच तंतोतंत लागू पडतो असे तुम्हाला नाही वाटत?
– डॉ. उमेश करंबेळकर