सोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे

0
47
carasole

‘सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ’ ही नुकतीच पन्नास वर्षें पूर्ण झालेली सामाजिक संस्था. समाजातील सर्व वयोगटांतील लोकांसाठी तेथे वर्षभर उपक्रम राबवले जातात. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, ज्येष्ठ समाजसेवक व स्वातंत्र्यसैनिक उद्धवजी घरत यांच्या नावाने व्याख्यानमाला, मुला-मुलींसाठी संस्कार शिबिरे हे त्यांतील महत्त्वाचे. समाजातील १४ नोव्हेंबर हा बालदिन वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरा होतो. त्या दिवशी मुलांची महामंडळाशी प्रथमच ओळख होते. बालक कौतुक सोहळ्यात आठ महिने ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्वांसाठी तो दिवस साजरा होत असतो.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वयोगटातील मुलांसाठी ‘किलबिल’ हे शिबिर आयोजित केले जाते. ते दरवर्षी वेगवेगळ्या गावात जाऊन गावकऱ्यांसोबत पार पाडले जाते. त्यामुळे गावकरी महामंडळाशी जोडले जातात. मुलांना त्या शिबिरात साहसी खेळ, कला यासोबत बैलगाडी सफर, गोळेवाला, कुंभारदादा आणि समाजातील अशा अनेक गोष्टींशी भेट घडवली जाते. भारतीय सणांचे महत्त्व व उद्देश मुलांना समजावेत म्हणून सण साजरे केले जातात. कधी गणेशोत्सव, कधी दिवाळी, गुढी पाडवा, कधी होळी, कधी सांताक्लॉज सोबत ख्रिसमस आणि बाहुला-बाहुलीचे लग्नसुद्धा साग्रसंगीत पार पाडले जाते. मंगलाष्टके, होम, अंतरपाट असे सर्व. गावातून मिरवणूक वाजतगाजत फिरते.

‘किलबिल शिबिरा’त खोटी खोटी बँक मुलांना पैसे पुरवते. त्यासाठी स्लिप भरावी लागते. मगच पैसे मिळतात. मग मुले फिरणाऱ्या ‘खाऊ मॉल’मधून छान खाऊ, फळे, चॉकलेट विकत घेऊ शकतात. तसेच, दादातार्इंनी भरवलेल्या जत्रेमधील खेळ खेळता येतात. त्यामध्ये भरपूर बक्षिसे त्यांची वाट पाहत असतात आणि मग खूप साऱ्या नव्या अनुभवांसह ती पाखरे त्यांच्या त्यांच्या घरी जातात, ते पुढल्या वर्षीच्या शिबिराची ओढ घेऊनच.

सहावी ते दहावीपर्यंतच्या मोठ्या मुलांसाठी रविवारी विविध विषयांवरील कार्यशाळा योजल्या जातात. अगदी पोळ्या कशा बनवाव्यात येथपासून घरी स्वत: रोबोट कसा बनवू शकतो येथपर्यंत अनेक विषय असतात. विजेवर चालणाऱ्या उपकरणांची हाताळणी व दुरुस्ती, इस्त्री करण्याचे तंत्र, प्लंबिंग, क्रिएटिव्हीटी, बागकाम असे अनेक विषय असतात व त्यांबाबतचे शंका-समाधान तज्ज्ञांमार्फत केले जाते. त्याचसोबत करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती तेथे मुलांना मिळते. फोटोग्राफी, चित्रकला हे फक्त छंद नसून त्यात करिअरही होऊ शकते यांसारख्या कल्पना व शक्यता यांची माहिती करून दिली जाते.

कलेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा व मुलांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी, प्रोत्साहन देण्याकरता गुणगौरव समारंभ, पालकांना मार्गदर्शनपर भाषणे बालक-पालक मेळाव्यात पालकांना चांगले विचार देऊन जातात.

प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागते ही जाणीव व व्यक्तीने समाजासाठी काही तरी केले पाहिजे ही भावना मुलांच्या मनात रूजवून, संस्कारक्षम मने तयार करण्यासाठी संस्कार शिबिरांची सुरुवात झाली. नवनवीन कल्पनांचा स्वीकार करून त्या राबवण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिले गेले, म्हणूनच काळानुरूप त्या शिबिरांच्या स्वरूपात बदल होत गेले आहेत. नव्या जगाच्या गरजा लक्षात येऊन केलेले आवश्यक बदल व मूळ उद्देश कायम ठेवून योजलेली ही शिबिरे प्रगत होत गेली आहेत. महामंडळाचे कार्यकर्ते घडवणारी ही शाळा इतक्या वर्षांनंतरही तिचे काम पार पाडत आहे. या वर्षीच्या २०१६ च्या ‘किलबिल शिबिरा’त दादा-ताई म्हणून कार्यकर्त्यांची चौथी पिढी काम करत होती, ते पाहून अभिमान वाटला!

काय असतात ही संस्कार शिबिरे? काय शिकवतात तेथे? संस्कार, कला, साहस या सर्वांचा त्यात संगम असतो. डोंगरदऱ्यांत, जंगलात व निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन निसर्ग वाचायला, समजायला शिकवले जाते. पक्षीतज्ज्ञ, प्राणीतज्ज्ञ यांची माहिती दिली जाते. आकाशातील ताऱ्यांमागचे रहस्य तज्ज्ञांकडून समजून घेतले जाते. साखर कारखान्यात साखर कशी बनते हे प्रत्यक्ष जवळून दाखवले जाते.

एकदा विमानाबद्दलचे कुतूहल व अनेक शंका यांसह आम्ही मुलांना नाशिक येथील HAL कारखान्यात घेऊन गेलो. तेथे मुलांना फक्त स्लाईड शो दाखवू शकतो, बाकी काही नाही असे समजले. स्लाईड शोनंतर मुलांनी ऑफिसरांना विचारलेल्या शंका ऐकून ऑफिसर थक्क झाले. असे प्रश्न तर आमचे ट्रेनिंगचे इंजिनीयरही विचारत नाहीत असे ते कौतुकाने म्हणाले. मुलांचे शिस्तबद्ध वागणे पाहून त्यांनी मुलांना थेट विमानाच्या कॉकपीटपर्यंत नेले व मुलांच्या शंकांचे निरसन केले. Black Box व अन्य गोष्टीही दाखवल्या. समाधानाने मुले तेथून बाहेर पडली. नाशिक येथील ‘भोसला मिलिटरी स्कूल’ येथे ट्रेनिंग कसे चालते, काय काय करावे लागते, तेथील नियम या सर्व गोष्टी मुलांनी जाणून घेतल्या. जगातील दगडांचे एकमेव प्रदर्शन गारगोटी येथे आहे त्यास भेट दिली. तेथे मुलांनी चंद्रावरून आणलेला दगड व विविध आकर्षक आणि अद्भुत दगडांची माहिती करून घेतली.

पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेत जाऊन तेथील शाळा करत असलेले समाजकार्य व उपक्रम जाणून घेताना आम्हा कार्यकर्त्यांनाही नव्या कल्पना मिळाल्या. पुण्यात रेल्वे म्युझियमलाही भेट देऊन मुलांनी छान अनुभव व माहिती मिळवली. पाबळ येथील विज्ञानाश्रमात मुले दिवसभर प्रात्यक्षिकांसह जाम बनवणे, गाईचे वजन करणे, कुंभारकाम-बांधकाम-बेकरी-इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक गोष्टी आत्मसात करत होती. दापोली येथील कृषी विद्यापीठाला भेट दिली. त्या प्रचंड मोठ्या परिसरात इतकी माहिती घेण्यासारखी होती, की दिवसही अपुरा पडला! मुलांनी रबराच्या झाडापासून रबर कसा बनतो ते पाहिले. झाडांची लागवड कशी करतात? तशीच का करावी? कलम कशी करावी? ह्यांची माहिती करून घेतली. खते कशी बनवली जातात? मधमाश्यांचा शेतीस फायदा कसा होतो? आंब्याची लागवड, मशरुमची लागवड, त्यासाठी लागणारी अवजारे, फळांपासून बनवलेले पदार्थ, पशुपालन व त्यापासून मिळणारे उत्पन्न अशा एक ना अनेक गोष्टींची तोंडओळख मुलांना झाली. ‘सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक’ येथे भेट दिल्यावर सानेगुरुजी यांच्या जीवनाची वेगळी ओळख मुलांना झाली.

सौरऊर्जा प्रकल्पामुळे मुलांना सूर्यप्रकाशाचा उपयोग करून बनवलेली यंत्रे पाहता आली. किती सांगावे? ज्यातून मुलांना जीवनोपयोगी असे काही सापडणार आहे अशा सर्व गोष्टींची ओळख करून देण्याची आम्हा कार्यकर्त्यांची धडपड असते.

आम्ही यावर्षी (२०१६) नवीन अनुभव द्यावा म्हणून नगर येथे जाण्याचे ठरवले. प्रचंड उन्हाळा. त्यात दुष्काळी भाग. त्यामुळे साहजिकच पाण्याचा तुटवडा सर्वत्र असे वातावरण, पण पालकांचा महामंडळाच्या कार्यकर्त्यांवरचा विश्वास हा संस्कार शिबिरातील सर्वांत मोठा भाग असतो. पन्नास मुले व तीस कार्यकर्ते, आम्ही ‘स्नेहालय’च्या दिशेने निघालो. गिरीश कुलकर्णी यांचे ‘स्नेहालय’. आईवडिलांच्या सहवासास, प्रेमास मुकलेली, समाजाने न स्वीकारलेली, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली मुले. त्यांचे ते घर. आपल्यापेक्षा मोठ्या मुलांना दादा-ताई मानणारी व आपल्यापेक्षा लहानांची दादा-ताई होणारी सर्व वयोगटांतील अनाथ मुले हसत-बागडत असलेली दिसली. आम्ही ‘स्नेहालयात’च वास्तव्यास दोन-तीन दिवस होतो. शिबिरार्थी मुलांनी हिवरे-बाजार, राळेगणसिद्धी अशी नगर जिल्ह्यातील ‘तीर्थस्थाने’ पाहिली, तेथील मंडळींना भेटली. तेथील प्रयोग जाणून घेतले.

शिबिरातील मुलांनी ‘स्नेहालय’च्या मुलांसाठी खाऊ व कपडे नेले होते. ती बघता बघता त्या मुलांमध्ये सहज मिसळून गेली. एकमेकांना नावाने हाका मारू लागली. मुलांनी त्यांना आपल्यातील एक मानून खेळण्यास सुरुवात केली. मुलांचे दु:ख कुरवाळण्यापेक्षा मला ते जास्त छान वाटले. मस्त मॅच रंगली. ‘स्नेहालय टिम’ व ‘शिबिरार्थी टिम’. सर्व मुले आनंदात होती. चौकार, षट्कार यावर मस्त नाचत होती. शेवटी ‘स्नेहालय’ टिम जिंकली. ‘स्नेहालया’तील मुलांचे आनंदी चेहरे पाहताना, आमच्या ‘शिबिरार्थी’ टिमला हरण्याचा आनंद झाला. मग काय, विजेत्या टिमच्या कॅप्टनची मुलाखत झाली. कलिंगडाची ट्रॉफी नाचवत जल्लोष साजरा झाला. किती सहज आनंदाचे क्षण मुलेच मुलांना देऊन गेली! सहानुभूतीपेक्षा हे प्रेम, आपलेपण मुलांना जास्त हवेसे असते. त्याचीच जास्त गरज असते.

– यज्ञिता राऊत

About Post Author